पुढील तीन महिन्यांत देशात सुमारे ३५ ठिकाणी लष्कर भरती मोहीम राबविली जाणार असून, त्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात भरती मोहीम नसली, तरी नवीन वर्षात नागपूर आणि कोल्हापूर येथे भरती होणार आहे. त्यामुळे लष्कर भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्यांना आत्तापासून तयारी करण्यास वाव आहे.
जानेवारीमध्ये नागपूरला ६ ते २५ तारखेला भरती आहे. नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, बडनेरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती आहे.
३ फेब्रुवारीला कोल्हापूरला भरती आहे. त्यात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र, गोव्यातील युवकांना प्राधान्य असेल.
युरोपिअन युनियन व तुर्कस्तानदरम्यान करार
पश्चिम आशियामधून मोठ्या संख्येने युरोपकडे येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंदर्भात युरोपिअन युनियन (इयु) व तुर्कस्तानमध्ये करार झाला आहे.
२८ सदस्यीय इयुच्या प्रतिनिधींनी तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमद दावुतोग्लु यांची भेट घेऊन या करारावर शिकामोर्तब केले.
या करारान्वये इयुने तुर्कस्तानला ३.२ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले असून त्याबदल्यात या निर्वासितांची सोय तुर्कस्तान करणार आहे.
तुर्कस्तानमध्ये सध्या सुमारे २० लाखांपेक्षा जास्त निर्वासित राहून जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
'बीएसएफ'मध्येही महिला अधिकारी
हवाई दलात फायटर पायलट म्हणून महिलांना सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयापाठोपाठ आता जगातील सर्वात मोठी सीमा सुरक्षा दल म्हणून ओळख असलेल्या ‘बीएसएफ’मध्येही प्रथमच महिलांना अधिकारी म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे.
पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील टेकनपूरच्या ‘बीएसएफ’ अॅकॅडमीत महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होणार आहे.
‘बीएसएफ’च्या स्थापनेला १ डिसेंबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असून, सुवर्णमहोत्सवी वर्षात महिलांना दलात सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक वैद्यकीय आणि कारकुनीसारखी केवळ नोकरी न करता महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
२००८ मध्ये बीएसएफमध्ये ७४५ महिलांना हवालदार (कॉन्स्टेबल) म्हणून भरती करण्यात आले होते. आता मात्र अधिकारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे.
जपानकडून मेट्रोला साडेपाच हजार कोटी
जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी ५४७९ कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.
दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला १०६९ कोटी तर अहमदाबाद मेट्रोला ४४१० कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे.
काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे.
भारत पायाभूत प्रकल्पांना जास्त महत्त्व देत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा प्रमुख भाग असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व हरितगृह वायूंचे प्रमाणही कमी होईल. भारत आर्थिक साधनांसाठी द्विपक्षीय व बहुराष्ट्रीय मदतही घेत आहे.
फ्युरीला विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद
वाल्दीमिर क्लित्सच्कोचा अकरा वर्षांचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत काढताना ब्रिटनच्या २७ वर्षीय टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले. २७ वर्षीय फ्युरीने डसेल्डरेफ येथे झालेल्या सामन्यात ११५-११२, ११५-११२ व ११६-१११ अशी बाजी मारली.
डब्लूबीए, आयबीएफ, आयबीओ आणि डब्लूबीओ अशी जेतेपदे नावावर असलेल्या युक्रेनच्या क्लित्सच्कोचा हा २००४ नंतरचा पहिला पराभव आहे.
gov requirments kuthe kaltil?
उत्तर द्याहटवा