फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ओलांद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची अधिकृत घोषणा भारत अथवा फ्रान्स यांच्याकडून करण्यात आलेली नाही.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ओलांद यांना निमंत्रण दिले होते. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेण्ट फॅबिअस हे २० नोव्हेबर रोजी दिल्लीत होते तेव्हा त्यांनी, ओलांद यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली.
‘आसियान’साठी ‘आर्थिक समुदाय’ स्थापन
संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर आसियान सदस्य राष्ट्रांच्या विकासासाठी आसियान इकॉनॉमिक कम्युनिटी (एईसी) नावाने विभागीय आर्थिक ब्लॉक स्थापन करण्याचा निर्णय आसियान सदस्य राष्ट्राच्या नेत्यांनी घेतला आहे.
क्वालालंपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांच्यासह दहा सदस्यराष्ट्रांच्या नेत्यांनी या करारावर सह्या केल्या.
'एईसी'च्या माध्यमातून आसियान राष्ट्रांमध्ये वस्तू, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे; तसेच दक्षिण आणि पूर्व आशियातील अर्थव्यवस्थांचे एकीकरण शक्य होणार आहे.
आसियान सदस्य राष्ट्राच्या नेत्यांकडून 'आसियान २०२५-एकत्र पुढे जाऊ या' या घोषणापत्राचाही अंगिकार करण्यात आला.
मालीमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला
पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बामको येथे रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून १७० जणांना ओलिस ठेवले. तब्बल नऊ तास हे ओलिसनाटय़ चालले.
दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २७ जण ठार झाले. तर उर्वरितांची सुटका करण्यात आली. त्यात २० भारतीयांचाही समावेश आहे.
हॉटेलातील ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या माली सुरक्षा जवानांच्या मदतीसाठी फ्रान्सने तातडीने ४० जवानांचे विशेष पथक रवाना केले होते.
मोदींच्या ट्विटर खात्यावर १.६१ कोटी फॉलोअर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अॅट नरेंद्र मोदी या ट्विटरवरील खात्याला आतापर्यंत १.६१ कोटी अनुसारक (फॉलोअर्स) मिळाले आहेत. केवळ दोन महिन्यांत मोदी यांच्या अनुसारकांमध्ये १० लाखांची भर पडून एकूण संख्या १.६१ कोटी इतकी झाली आहे.
२६ मे २०१४ रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ही संख्या १.१९ कोटीने वाढली. १७ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१५ दरम्यान ही संख्या ८८ लाखांनी वाढली आहे.
अमिताभ बच्चन यांचे १.७८ कोटी तर शाहरुख खानचे १.६२ कोटी अनुसारक आहेत. राजकीय नेत्यांमध्ये २००९ पासून मोदी हे भारतीय राजकीय नेत्यात आघाडीवर असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ६.६१ कोटी अनुसारक असून त्यांचा ट्विटर पत्ता अॅट बराक ओबामा असा आहे.
राज्यसभा वाहिनी नव्या रुपात
राज्यसभा वाहिनी लवकरच व्यावसायिक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित मालिका आणि टीव्ही प्रकल्पांचे प्रसारण या वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील श्याम बेनेगल, टिगमांशू धुलिया आणि विनय शुक्ला या दिग्गजांना वाहिनीने यापूर्वीच सहभागी करून घेतले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित चित्रपट तसेच इतर कार्यक्रमांची निर्मिती केली जात आहे.
राज्यसभा वाहिनीवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. कार्यक्रमांची विक्री करून निधी उभारण्याची परवानगीही वाहिनीला मिळाली आहे.
चित्रपटांच्या निर्मितीसह मालिका आणि माहितीपट यांचीही निर्मिती करणार आहेत. त्यांची विक्री अन्य वाहिन्यांना करण्यात येणार आहे.
राज्यसभा वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी : गुरदीपसिंग सप्पल
पंकज अडवाणी विश्वविजेता
भारताचा सर्वात यशस्वी स्नूकरपटू पंकज अडवाणीने आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. चीनच्या झुआ शिनटाँगला नमवून पंकजने कारकीर्दीतील १५व्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
सनराइज क्रिस्टल बे रिसॉर्ट येथे झालेल्या अंतिम सामन्यात ३० वर्षीय पंकजने झुआला ८-६ अशा फरकाने नमवले.
सप्टेंबर महिन्यात आयबीएसएफचे बिलियर्डस जगज्जेतेपद पटकावणाऱ्या बंगळुरूच्या सुवर्णपुत्राने अवघ्या दोन महिन्यांत आणखी एक जागतिक जेतेपद आपल्या खात्यावर जमा केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा