चालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५


स्टॅन्चार्ट बँकेच्या भारतातील प्रमुखपदी झरिन दारूवाला

    Zarin Daruwala
  • मूळच्या ब्रिटनच्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झरिन दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यापूर्वी त्या आयसीआयसीआय बँकेतील घाऊक बँक विभागाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होत्या. तो आयसीआयसीआय समूहातीलच विशाखा मुळ्ये या मराठी महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी आयसीआयसीआय बँक समूहातील शिखा शर्मा या बाहेर पडत अ‍ॅक्सिस बँकेत रुजू झाल्या होत्या.
  • स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतात १०० हून अधिक शाखा असून ती देशातील सर्वात मोठी खासगी विदेशी बँक आहे. बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या बँकेच्या संघरचनेत फेरबदल सुरू आहेत. यानुसार झरिन यांच्या आधी भारतीय व्यवसायाची जबाबदारी पाहात असलेले सुनील कौशल यांना आफ्रिका विभागाचे मुख्य म्हणून बढती देण्यात आली आहे.

मिशेल जॉन्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

  • ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर तो निवृत्त होणार आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडीन, रायन हॅरीस, ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉट्सन यांनी नुकतीच ऍशेस मालिकेनंतर निवृत्ती घेतली होती. आता या वरिष्ठ खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत ३४ वर्षीय जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
  • ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जॉन्सनचा चौथा क्रमांक लागतो. त्याने ३११ बळी घेतले असून, त्याच्यापेक्षा जास्त शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅकग्रा (५६३) व डेनिस लिली (३५५) यांनी जास्त मिळविलेले आहेत. जॉन्सनने ७३ कसोटीत ३११ बळी घेतला आहेत. तर, १५३ वनडेमध्ये २३९ विकेट घेतल्या आहेत.

‘इसिस’च्या तळांवर फ्रान्सचा हल्ला

  • पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सने सीरियामधील ‘इसिस’ विरोधातील आक्रमणाला धार आणली असून, त्यांच्या लढाऊ विमानांनी जोरदार चढाया केल्या. या कारवाईत ‘इसिस’च्या ताब्यात असलेल्या रक्का या शहरातील त्यांचे दोन प्रशिक्षण तळ आणि मोठा शस्त्रसाथे उद्ध्वस्त झाले आहेत. 
  • फ्रान्सच्या वीस जेट विमानांनी रक्का शहरामध्ये तीसहून अधिक बाँब टाकले. ‘इसिस’च्या संकल्पनेत असलेल्या खिलाफतची राजधानी म्हणून रक्का शहराचा वापर होतो. त्यामुळेच हल्ल्यासाठी फ्रान्सने हेच शहर निवडले.

‘विहिंप’चे नेते अशोक सिंघल यांचे निधन

    Ashok Singhal
  • ऐंशीच्या दशकात अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी आंदोलनात आक्रमक कार्यशैलीमुळे प्रसिद्धीस आलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे १७ नोव्हेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
  • धातुशास्त्रातील पदवी, पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे असे कला व ज्ञानाचे अस्तर लाभलेले अशोक सिंघल यांनी सर्व आयुष्य संघकार्य आणि विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारासाठी वाहून घेतले होते.
  • विहिंपला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकाश्रय मिळवून देण्यात आणि त्याद्वारे आर्थिक पाया भक्कम करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • आग्रा शहरापासून जवळ असलेल्या अतरौली येथे २७ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. १९४२ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. सिंघल यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून धातुशास्त्र विषयात पदवी घेतली होती.
  • १९८० मध्ये ते विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव बनले. कारसेवक म्हणून त्यांनी डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीदविरोधी वादग्रस्त मोहिमेत आक्रमक भूमिका पार पाडली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा