चालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५


सिरिया, इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना प्रतिबंध करणारे विधेयक अमेरिकेत मंजूर

  • रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी प्रतिनिधिगृहात सीरिया व इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना अमेरिकेत प्रवेश देणे तूर्त थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
  • या शरणार्थीना पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर तपासणीशिवाय देशात प्रवेश देऊ नये अशी भूमिका यात घेण्यात आली आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हे विधेयक नाकारण्याचा इशारा देऊनही ते संमत झाले आहे.
  • इराक व सीरियातून येणाऱ्या शरणार्थीना तूर्त प्रवेश बंदी व त्यांच्यावर कडक तपासणी र्निबध लादणारे हे विधेयक २८९ विरूद्ध १३७ मतांनी मंजूर झाले आहे.
  • ओबामा प्रशासनाला त्यामुळे धक्का बसला असून अमेरिकी अध्यक्ष ओबामा यांचा अशा प्रकारच्या विधेयकास विरोध होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. आता हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होणे गरजेचे आहे.
  • सीरिया, इराकमधून शरणार्थीना येऊ देणे धोकादायक आहे. त्यांच्यात इसिसचे दहशतवादी आहेत की नाहीत हे ओळखणे अवघड आहे, असे कायदा अंमलबजावणी संस्थांनी म्हटले आहे.

मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत उत्तर कोरियाविरोधात ठराव मंजूर

  • उत्तर कोरियात मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याचा निषेध करणारा ठराव विक्रमी बहुमताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आला आहे. आता आमसभेच्या पूर्ण अधिवेशनात त्यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे.
  • बाकी जगापासून स्वत:ला वेगळे ठेवणाऱ्या उत्तर कोरियात मोठय़ा प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन होत आहे. त्याबाबतचा ठराव ११२ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी तो १११ मतांनी मंजूर झाला होता.
  • युरोपी व जपानी राजनीतिज्ञांनी या ठरावाचा मसुदा तयार केला होता, त्यात २००५ पासून उत्तर कोरियात मानवी हक्कांचे वाढतच चाललेले जे उल्लंघन आहे त्याचा निषेध केला आहे. यावर्षीच्या मसुद्यात मानवी हक्कांचे पद्धतशीर, व्यापक स्वरूपात जे उल्लंघन सुरू आहे त्याचा उल्लेख केला आहे.
  • लागोपाठ दुसऱ्या दिवशी या ठरावात उत्तर कोरियाला मानवतेविरोधातील गुन्ह्य़ांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात हजर करण्याची सूचना सुरक्षा मंडळाला करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा नागपुरमध्ये

  • नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५९वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नागपूर येथे ६ ते १० जानेवारीदरम्यान चिटणीस पार्कवर आयोजित करण्यात येणार आहे.
  • तीन दशकांनंतर प्रथमच ही स्पर्धा नागपूरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ८६ किलो, ९७ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गटात ८६ ते १२५ किलो वजन गटात स्पर्धा होणार आहेत. 
  • यात राज्यातील ४४ जिल्हा संघटना सहभागी होणार आहेत. दररोज सरासरी २५० कुस्त्या होणार असून त्यासाठी १५०० ते २००० मल्लांना निमंत्रित करण्यात आले आहे.
  • गादी आणि माती या विभागात या स्पर्धा होतील व त्यातून ‘महाराष्ट्र केसरी’ निवडला जाईल. विजेत्याला चांदीची गदा व एक लाख रुपये रोख व उपविजेत्याला ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
  • तसेच विविध वजन गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देण्यात येणार आहे.
  • स्पर्धेसाठी राज्यातून १२५ पंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापक व इतर पदाधिकारी अशा एकूण १२०० प्रतिनिधींचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

स्वाती दांडेकर आशियायी विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी

    Swati Dandekar
  • भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला स्वाती दांडेकर (वय ६४) यांची आशियायी विकास बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालकपदी अध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्ती केली आहे. दांडेकर यांना राजदूताचा दर्जा देण्यात आला आहे. 
  • आयोवा प्रतिनिधिगृहात प्रथमच निवडून आलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला सदस्य असून २००३ मध्येही त्या निवडून आल्या होत्या.
  • दांडेकर या जन्माने भारतीय असून, अमेरिकेतील विधिमंडळात निवडून येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आयोवा प्रतिनिधी मंडळात त्या २००३ ते २००९ दरम्यान सदस्य होत्या व नंतर आयोवा सिनेटमध्ये त्यांनी २००९ ते २०११ दरम्यान काम केले. 
  • त्यानंतर आयोवा युटिलिटी बोर्डवर त्यांनी २०११ ते २०१३ दरम्यान काम केले. व्हिजन आयोवा मंडळावर त्या २००० ते २००३ दरम्यान संचालक होत्या.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना

  • महाराष्ट्रातील १६ आदिवासी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही योजना १ डिसेंबर २०१५पासून सुरू होणार आहे. 
  • अनुसूचित क्षेत्रातील आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये तर याचे प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे.
  • अपुरा आहार तसेच गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक जागरुकता दिसून येत नाही. शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचा विकास व वाढ होत असते. अशा कालावधीत गर्भवती स्त्रिया श्रमाची कामे करत असतात. या कालावधीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते. 
  • या पार्श्वभूमीवर या स्त्रियांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत चौरस आहार देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या क्षेत्रातील गरोदर तसेच स्तनदा मातांची यादी तयार करतील.
  • गावपातळीवर ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार. या समितीवर एक गरोदर महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात येणार आहे.
  • गहू तांदूळ, अंडी, सोयाबिन, हिरव्या पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी ही समिती करणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांची उपस्थिती, आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहील.

‘किस ऑफ लव्ह’ मोहिमेच्या आयोजकांना अटक

    Kiss of Love
  • ‘किस ऑफ लव्ह’ मोहिमेचे आयोजक राहुल पशुपलन आणि रश्मी नायर यांना एका सेक्स रॅकेट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांसह अन्य आठ जणांनाही पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याप्रकरणी अटक केली आहे.
  • केरळ पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणाचा तपास करून संपूर्ण प्रकरण उघड केले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये ‘किस ऑफ लव्ह’ नावाचा उपक्रम या सर्वांनी आयोजित केला होता. 
 काय आहे ‘किस ऑफ लव्ह’? 
  • कालिकतमधील एका कॉफी शॉपमध्ये २०१४ साली संस्कृतीरक्षकांनी घुसून अश्लील प्रकार चालत असल्याचा आरोप करत काही युगुलांना मारहाण केली होती.
  • या प्रकरणाचा विरोध म्हणून शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांनी चुंबन घेण्याची मोहिम उघडली होती. ही मोहिम हळूहळू देशभर पसरत गेली होती.
  • या मोहिमेमध्ये सहभागी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्यासाठी प्रेरित करण्यात येत होते. या मोहिमेला सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. तर काही शहरांमध्ये या उपक्रमाच्या आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा