चालू घडामोडी - १ डिसेंबर २०१५


भारत आणि फ्रान्स : ३६ राफेल लढाऊ विमानांचा करार

    Rafael
  • फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला हजर राहण्यासाठी भारत भेटीवर येणार असून त्या वेळी भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ राफेल लढाऊ विमानांबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
  • या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तीन वर्षांत पहिले लढाऊ विमान भारताला पुरविण्यात येणार असल्याचे कराराच्या मसुद्यात म्हटले आहे.
  • करारावर स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलासाठी ३६ लढाऊ विमाने सात वर्षांच्या कालावधीत पुरविण्यात येणार आहेत.
  • सध्या उपलब्ध असलेली लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यासाठी पुरेशी नाहीत, त्यासाठी किमान ४४ विमानांची गरज आहे. त्यामुळे सदर ३६ विमाने मिळाल्यावर हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात पॅरिसला गेले असताना फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने घेण्याच्या प्रस्तावाची घोषणा करण्यात आली होती.

रशियन पर्यटकांसाठी भारत असुरक्षित

  • रशियाने आपल्या सुरक्षित पर्यटन स्थळांच्या यादीतून गोवा आणि भारताला वगळले आहे.
  • इजिप्त आणि तुर्कस्थानला काळ्या यादीत टाकल्यानंतर रशियाने पर्यटनाबाबतची सुधारीत 'अॅडव्हायझरी' प्रसिद्ध केली. त्यानुसार भारत आणि गोव्याला वगळण्यात आल्याचे वृत्त गोव्यात असलेल्या रशियाच्या माहिती केंद्राने जाहीर केले.
  • जगातील रशियन पर्यटकांसाठी सुरक्षित पर्यटन स्थळांच्या यादीत आता क्यूबा, दक्षिण व्हिएतनाम आणि दक्षिण चीन या देशांना 'सुरक्षित' असल्याची पावती देण्यात आली आहे.
  • रशियाच्या या निर्णयामुळे  भारत आणि गोवा राज्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी

  • महात्मा गांधी यांनी त्यांच्या काळातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांशी केलेली वैचारिक देवाण घेवाण प्रकाशमान करण्याच्या उद्देशार्थ महात्मा गांधी यांना पाठविण्यात आलेली साडेआठ हजारपेक्षा जास्त पत्रे प्रसिद्ध करण्याचा निर्णय साबरमती आश्रमने घेतला आहे.
  • ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी‘ या ग्रंथामध्ये गांधी यांनी लिहिलेली ३१ हजारांपेक्षा जास्त पत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र यांमध्ये गांधी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • रोमां रोलॉं, रविंद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडू, मेडेलेन स्लेड (मीराबेन), इस्थर फेरिंग अशा अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांनी गांधींजींना पाठविलेली पत्रे व या माध्यमामधून झालेली चर्चा यामुळे प्रकाशात येणार आहे.

‘डेली टाइम्स’च्या संपादकाचा राजीनामा

  • लाहोरमधील ‘डेली टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक रशीद रहमान यांनी व्यवस्थापनासोबतचे वाद विकोपाला गेल्याने राजीनामा दिला आहे.
  • प्रखर डाव्या विचारांच्या आणि लष्करविरोधी स्तंभलेखकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सोबतच आपल्या कर्मचाऱ्यांची २०१२ पासूनची पगाराची थकबाकी मिळवून देण्यासाठी चार वर्षे लढा दिल्यानंतर रहमान यांनी १० दिवसांपूर्वी पद सोडले.
  • त्यांच्या राजीनाम्यामागे लष्कराचा दबाव हे मुख्य कारण असल्याच्या संशयामुळे सध्या ते चर्चेत आहेत.

देवदासी प्रथेप्रकरणी केंद्राला दंड

  • मुलींना सक्तीने देवदासी बनवले जात असल्याबाबत आणि ही प्रथा नष्ट करण्यासंबंधीच्या उपाययोजनांबाबत वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला २५ हजारांचा दंड ठोठावला.
  • 'एल. एल. फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत देशाच्या अनेक भागांत देवदासीची अनिष्ट प्रथा आजही सुरू असल्याचे म्हटले होते. यावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने केंद्राला याप्रकरणी ११ सप्टेंबर २०१५ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
  • तसेच राज्यात सुरू असलेली देवदासी प्रथा कर्नाटक देवदासी समर्पणविरोधी कायदा १९८२ आणि बालहक्क कायद्याविरोधी असल्याचे नमूद करत कोर्टाने ही प्रथा रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश कर्नाटकच्या मुख्य सचिवांना दिले होते.
  • केंद्र सरकारने यासंबंधी वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्या. मदन बी. लोकुर आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने २५ हजारांचा दंड ठोठावला.

सुनील नरिनच्या गोलंदाजीवर बंदी

    Sunil Narine
  • सदोष शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर सुनील नरिनच्या गोलंदाजीवर तात्काळ बंदी घातली आली आहे.
  • पल्लकल येथे पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पंचांनी नरिनच्या गोलंदाजीवर हरकत घेतली होती. यावर १७ नोव्हेंबरला आयसीसीच्या लघबर्घ युनिव्हर्सिटी या अधिकृत केंद्रात नरिनच्या गोलंदाजीची चाचणी घेण्यात आली. यात त्याची शैली सदोष आढळली. 
  • या चाचणीत गोलंदाजी करताना नरिनचा हात १५ अंशाच्या कोनापेक्षा बाहेर जात असल्याचे निष्पन्न झाले. अशी शैली नियम बाह्य असते.
  • वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे शब्द टाकून नरिनला किमान विंडिजमधील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळवण्याची परवानगी मागितली आहे.
  • आपल्या गोलंदाजीची शैली सुधारून नरिन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्याआधी सहाजिकच त्याला आयसीसीच्या अधिकृत केंद्रामध्ये चाचणीला सामोरे जावे लागेल.

भारतीय इतिहास संशोधन समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा

  • भारतीय इतिहास संशोधक परिषदेचे अध्यक्ष येलप्रगडा सुदर्शन राव यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राव यांनी आयसीएचआरचा पदभार स्विकारून फक्त १६ महिनेच झाले होते.
  • काकटीय विद्यापीठातून निवृत्त झालेल्या राव यांची अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. राव यांची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित होती व राव हे अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे सदस्य होते. ही योजना संघाची होती.

व्हेनेझुएलात विरोधी पक्षनेत्याची हत्या

  • व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते लुईस मॅन्युअल डायझ यांची निवडणूक प्रचार सभेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता तणाव निर्माण झाला आहे.
  • तुरुंगात असलेल्या एका नेत्याच्या पत्नी लिलियन टिंटोरीही सभेस उपस्थित होत्या. डायझ हे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे टीकाकार होते.
  • मादुरो यांचा या निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता वर्तवली असून नॅशनल असेंब्लीसाठी ६ डिसेंबरला निवडणुका होत आहेत.

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत ब्रिटन विजेता

  • ब्रिटनचा डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील जेतेपदांचा दुष्काळ अखेर ७९ वर्षांनंतर संपुष्टात आला. अँडी मरेच्या चमकदार कामगिरीमुळे ब्रिटनने अंतिम फेरीत बेल्जियमवर ३-१ अशी मात केली.
  • एकेरी, दुहेरी व परतीची एकेरीची झुंज अशा तीन लढती मरेने ब्रिटनला जिंकून दिल्या. 
  • यजमान बेल्जियमला अंतिम फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, मरेने हा सामना जिंकून ब्रिटनचे विजेतेपद निश्चित केले.
  • डेव्हिस कपमध्ये एका लढतीत तीन सामने जिंकणरा मरे हा मागील वीस वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी, १९९५ मध्ये अमेरिकेच्या पीट सँप्रासने हा पराक्रम केला होता. मरेने या वर्षी डेव्हिस कपमध्ये सलग अकरा सामने जिंकले आहेत. 
  • ब्रिटनला १९३६ नंतर प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात यश आले. त्यांचे हे एकूण दहावे विजेतेपद आहे. याबरोबरच डेव्हिस कपमध्ये सर्वाधिक विजेतीपदे पटकावणाऱ्या देशांच्या यादीत ब्रिटनने फ्रान्सला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे. 
  • या स्पर्धेची सर्वाधिक विजेतीपदे अमेरिकेच्या (३२) नावावर असून, त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा संघ (२८) विजेता ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा