भारत-कझाकस्तानमध्ये पाच करार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कझाकस्तान दौऱ्यादरम्यान ९ जुलै रोजी दोन्ही देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या करारांमध्ये युरेनियम पुरठ्यासंदर्भातील करारासहित लष्करी सहकार्य वाढविण्याबाबतच्या कराराचाही समावेश आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नजरबाएफ या दोघांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासोबत संरक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि सामग्रीच्या आदान-प्रदानासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यावर मोदी आणि नजरबाएफ यांची सहमती झाली.
- या बैठकीत प्रादेशिक शांतता, दळणवळण, संयुक्त राष्ट्रसंघामधील सुधारणा, दहशतवाद यांसह अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली.
- संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांत संयुक्त सहभाग, संयुक्त लष्करी कवायती, लष्करी प्रशिक्षण या मुद्दय़ांवरही भर देण्यात आला.
भारत व कझाकस्तानमध्ये संरक्षण क्षेत्रामधील सामंजस्य करार
- या करारामुळे दोन देशांमधील संरक्षण क्षेत्रामधील सहकार्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे.
- भारताला मोठ्या कालावधीसाठी नैसर्गिक युरेनियमचा पुरवठा करण्यासंदर्भातील कराराचे पुनरुज्जीवनही या वेळी करण्यात आले. यासाठी कझाअॅटमप्रॉम व एनपीसीआयएल यांच्यात करार झाला आहे.
- संरक्षण क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण
व्यापमंचे मोबाईल ऍप
- व्यावसायिक परीक्षा मंडळामधील (व्यापमं) गैरव्यवहाराचे प्रकरण देशभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मोबाईल ऍप लॉंच करण्यात आले आहे.
- मध्य प्रदेशचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उमाशंकर गुप्ता यांनी ९ जुलै रोजी हे ऍप लॉंच केली.
- डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत हे ऍप तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून ‘व्यापमं’मधील सर्व परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही अडथळ्याविना सुयोग्यरित्या पार पडतील.
- या ऍपमध्ये अर्ज, विविध परीक्षांचे तारखा, पश्न-उत्तरपत्रिका बॅंक इत्यादी सुविधा असणार आहेत. तसेच या ऍपद्वारे उमेदवारांना प्रवेश पत्रही डाऊनलोडकरता येणार आहे.
- येत्या ३० ऑगस्ट रोजी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक अभ्यासक्रमांसाठीची पूर्वपरीक्षा याच पद्धतीने घेण्यात येणार आहे. ‘व्यापमं’मधील ही पहिली ऑनलाईन परीक्षा असणार आहे.
- ‘व्यापमं’च्या माध्यमातून २०१५ या वर्षात विविध अभ्यासक्रमांच्या ९५,२५० जागा भरण्यात आल्या आहेत. तसेच ६०,७०० शासकीय नोकऱ्यांची भरतीही करण्यात आली आहे.
- ‘व्यापमं’चे अध्यक्ष : मोहन उपाध्याय
- टीप : संशयित आणि तपासकर्त्यांच्या गूढ मृत्यूंमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ९ जुलै रोजी दिले. सीबीआय १३ जुलैपासून तपासाला सुरवात करणार आहे.
- मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा या गैरव्यवहाराशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे
- अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. शेषराव मोरे यांची निवड झाली असून, पाच आणि सहा सप्टेंबरला हे संमेलन होणार आहे.
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यास नकार दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. शेषराव मोरे यांची नावे चर्चेत होती. मात्र, चपळगावकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉ. मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
- नांदेड जिल्ह्यातील जांब बुद्रूक (ता. मुखेड) हे डॉ. मोरे यांचे जन्मगाव आहे. १९९९मध्ये परभणीत झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ब्रिक्स देशांमधील सर्वोत्तम विद्यापीठांची यादी प्रसिद्ध
- ‘क्युएस युनिव्हर्सिटी रॅंकिंग : ब्रिक्स २०१५’ हा अहवाल १० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये ‘ब्रिक्स’ राष्ट्रांमधील आघाडीच्या २०० विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली.
- यानुसार जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचे आकर्षणबिंदू ठरलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर’ या संस्थेने ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांमधील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे.
- या यादीमध्ये मुंबई विद्यापीठ ५८व्या स्थानावर आहे.
- या यादीमध्ये चिनी विद्यापीठांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. तिसींगहुआ, पेकिंग आणि फुदान या तिन्ही विद्यापीठांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे.
- टॉपटेन विद्यापीठांमध्ये चीनच्या सात संस्था असून आहेत तर आघाडीच्या ५० विद्यापीठांमध्ये चीनच्या निम्म्याहून अधिक संस्था ब्राझीलच्या १० आणि भारतातील ९ संस्थांचा समावेश आहे.
- आघाडीच्या दोनशे विद्यापीठांत ५३ संस्थांसह रशिया दुसऱ्या स्थानी असून, चीनच्या ६७ विद्यापीठांचा यात समावेश होतो.
- हे सर्वेक्षण करण्याआधी संबंधित विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ख्याती, तेथे शिकविणाऱ्या प्राध्यापकांचा दर्जा आणि तेथे होणारे संशोधन आणि त्याचा जगावर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. पहिल्या टॉप टेन विद्यापीठाच्या रांगेमध्ये चीनचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते.
इटलीच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षाचा तुरुंगवास
- एका सिनेट सदस्याला लाच दिल्याच्या आरोपावरून इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हीओ बेर्लुस्कोनी यांना १० जुलै रोजी रोम येथील न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
- कायद्यातील तांत्रिक अडचणींमुळे बेर्लूस्कोनी यांना शिक्षा भोगावी लागणार नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही.
- बेर्लुस्कोनी यांनी एका सिनेट सदस्याला तत्कालीन सरकारमधून बाहेर पडण्यासाठी ३० लाख पौंडांची लाच दिल्याचे उघड झाले आहे.
- २००८ मध्ये झालेल्या या प्रकारानंतर सरकार पडून नंतरच्या निवडणुकीत बेर्लुस्कोनी यांचा पक्ष विजयी झाला होता. बेर्लुस्कोनी यांनी २००८ ते २०११ अशी तीन वर्षे पंतप्रधानपद सांभाळले होते. लाच घेतल्याचे संबंधित सिनेटने मान्य केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते.
पाश्चात्य अभिनेते आयर्विन कीइस यांचे निधन
- प्रसिद्ध टीव्ही शो ‘द जेफर्सन’मधील ह्युगो नावाच्या अंगरक्षकाची भूमिका अजरामर करणारे पाश्चात्य अभिनेते आयर्विन कीइस यांचे दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये निधन झाले.
- आयर्विन यांना संप्रेरकांचा आजार होता. या आजारामध्ये मेंदूच्या खालील ग्रंथीं संप्ररेकांची अतिवाढ करतात, त्यामुळे हात-पायांची अयोग्य प्रमाणात वाढ होते, तसेच मानसिक संतुलन बिघडते. यामुळे आयर्विन यांना अकाली मृत्यू ओढवला. आयर्विन यांना हा आजार जन्मभर होता. अभिनेते आंद्र रेने रुसिमॉफ हेही याच आजाराने त्रस्त होते.
- आपारंपरिक वास्तववादी, अनियमित व विविध पात्रे साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या पिढीतील आयर्विन हे शेवटचे अभिनेते मानले जातात.
रोसनेफ्ट-एस्सार यांच्यात तेल पुरवठ्यासाठी करार
- भारतातील एस्सार ऑइल लिमिटेड या कंपनीचे ४९ टक्के समभाग खरेदी करण्याचा प्राथमिक करार रशियाच्या रोसनेफ्टने केला आहे. एस्सार ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खासगी तेल शुद्धीकरण कंपनी असून, रोसनेफ्ट ही जगातील आघाडीची आणि रशियाची सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल उत्पादक कंपनी आहे.
- रोसनेफ्ट कंपनीच्या जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या प्रयत्नांना पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे खीळ पडली होती. त्यामुळेच या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
- या करारनुसार पुढील दहा वर्षांत रोसनेफ्टकडून एस्सारला दरदिवशी दोन लाख बॅरल तेलाचा पुरवठा केला जाणार आहे.
- हा करार प्राथमिक असून, इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे एस्सारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनिमित्त रशियात आले असून, एस्सारसह काही उद्योजकही त्यांच्याबरोबर येथे आले आहेत.
- एस्सार ऑइल मुख्य प्रवर्तक : शशी रुईया व रवी रुईया
जयपूर फेस्टिव्हल अमेरिकेत
- साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने प्रथमच देशाबाहेर पाऊल टाकले असून, अमेरिकेतील बोल्डर येथे तीन दिवसांचा साहित्य उत्सव होणार आहे.
- शंभर साहित्यिक आणि विचारवंत तिथे हजेरी लावणार असून, येत्या १८ सप्टेंबरपासून हा उत्सव सुरू होईल.
भारत-अमेरिका करविषयक करार
- विदेशातील खात्यांच्या माध्यमातून होणारी कर चोरी रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एफएटीसीएच्या अंमलबजावणीसाठी करारावर १० जुलै राजी स्वाक्षरी केली. या करारानुसार दोन्ही देशांत १ आॅक्टोबरपासून कराशी संबंधित सूचनांची देवाणघेवाण होईल.
- याद्वारे कर चुकवणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर तसेच अमेरिकेत राहून भारतीय आयकर चुकवणाऱ्या भारतीयांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.
- इक्विटी, बँक खाती व विमा यासारख्या आर्थिक उत्पादनांच्या माध्यमातून कर चुकवण्याच्या अमेरिकी नागरिकांच्या प्रवृत्तीला यामुळे लगाम घातला जाणार आहे. या बदल्यात भारतीयांकडून परदेशांतील करसवलतींचा लाभ उठवत गुंतवलेल्या पैशाची माहिती अमेरिका भारताला देणार आहे.
मेव्हेदरचे 'वेल्टरवेट विश्वविजेतेपद' काढून घेतले
- अमेरिकन बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेव्हेदरने दोन महिन्यांपूर्वी मॅन्नी पॅकिआओ याला नमवून जिंकलेले 'वेल्टरवेट विश्वविजेतेपद' जागतिक बॉक्सिंग संघटनेने (डब्लूबीओ) काढून घेतले आहे.
- पॅकिआओला नमवल्यानंतर डब्लूबीओ यांना देण्यात येणारी दोन लाख अमेरिकन डॉलरचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख चुकवल्यामुळे मेव्हेदरवर ही कारवाई करण्यात आली.
- २ मे रोजी लास व्हेगास येथे पार पडलेल्या लढतीत मेव्हेदरने पॅकिआओला नमवून जवळपास २२ कोटी अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम जिंकली होती. डब्लूबीओच्या नियमानुसार बक्षीस रकमेच्या दोन टक्के रक्कम शुल्क म्हणून संघटनेला देणे लागते.
- त्यासाठी मेव्हेदरला ३ जुलै पर्यंतची मुदत मिळाली होती, परंतु त्याने वेळेत शुल्क न भरल्याने डब्लूबीओने कारवाई केली.
- वेल्टरवेटसह मेव्हेदर सध्या डब्लूबीसी आणि डब्लूबीए कनिष्ठ मिडलवेट गटाचा विजेता आहे.
नरेंद्र मोदींनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
- ब्रिक्स व एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) देशांच्या परिषदांच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जुलै रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांची भेट घेतली. मोदी यांची रोहानी यांच्याबरोबरील ही पहिलीच भेट होती.
- या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी भारत इराणमध्ये बांधत असलेल्या चाबहार प्रकल्पासह अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली. या महत्त्वाच्या प्रकल्पासह दळणवळण, हायड्रोकार्बन्स आणि दहशतवादाचा धोका या विषयांचा चर्चेत समावेश होता.
- भारताच्या मध्य आशियाविषयक धोरणामध्ये इराणचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
- या भेटीत रुहानी यांनी मोदी यांना इराण-भेटीचे निमंत्रण दिले आणि मोदी यांनी ते स्वीकारले.
- मोदी हे सातव्या ब्रिक्स आणि १५व्या एससीओ परिषदेस उपस्थित राहण्यासाठी अन्य जागतिक नेत्यांसह उफा येथे दाखल झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा