इराणबरोबर अणुसमझोता अखेर मंजूर
- गेले अनेक महिने फक्त चर्चेमुळे चर्चेत असलेला पाश्चिमात्य देश आणि इराणदरम्यानचा आण्विक करार सर्व अडथळे पार केल्यानंतर त्याचा मसुदा १५ जुलै रोजी मंजूर करण्यात आला. या करारामुळे इराणवरील निर्बंध उठविले जाणार असून, त्यांच्या अणू कार्यक्रमालाही लगाम घालण्यात आला आहे.

करारातील महत्वाचे मुद्दे
- संयुक्त राष्ट्रसंघाचे निरीक्षक इराणच्या लष्करी तळांना नियमित भेट देऊन त्याची तपासणी करतील.
- त्याबदल्यात युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रसंघ हे इराणवरील निर्बंध उठवतील.
- अणुकराराचे पालन झाल्यास संयुक्त राष्ट्रसंघाचे नियम आणि अटी दहा वर्षांसाठी शिथिल होतील आणि इराणचा अण्विक मुद्दा हा सुरक्षा समितीच्या अजेंड्यावरून वगळण्यात येईल.
- इराणबरोबरच्या अणुकरारास मंजुरीसाठी आणि निर्बंध हटविण्यासाठी सुरक्षा समितीचे मतदान आवश्यक मानले जाते. हे मतदान ३० दिवसांच्या आत घेतले पाहिजे. सुरक्षा समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ठरलेल्या करारानुसार इराणवरील निर्बंध शिथिल होतील अन्यथा सुरक्षा समितीला पुनर्विचार करावा लागेल.
- इराण त्यांचे सेंट्रीफ्युजेस १९ हजारांवरून ६१०४ पर्यंत कमी करणार आहे.
- या कराराअभावी लागू असलेल्या र्निबधांमुळे इराणचे १०० अब्ज डॉलरचे महसूली नुकसान होत होते.
तेलाचे दर घसरले
- करार मंजूर होण्याची बातमी पसरताच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीत घसरण झाली. इराणवरील निर्बंध उठणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आणि त्यांच्याकडून तेलनिर्यातील सुरवात होणार असल्याने हा बदल झाला आहे.
पार्श्वभूमी
- १९५०च्या सुमारास अमेरिकेच्याच पुढाकाराने इराणचा अणुकार्यक्रम सुरू झाला होता.
- मात्र १९७९मध्ये इराणमध्ये क्रांती होऊन शाह यांची राजवट उलथवून टाकण्यात आल्यापासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी या सहा प्रमुख अण्वस्त्रधारी देशांनी इराणने अण्वस्त्रनिर्मितीत उतरू नये, यासाठी प्रयत्न केले होते. २००६पासून या देशांनी त्यासाठी इराणशी व्यापक चर्चा सुरू केली होती.
चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा रद्द
- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पीयन्स लीग ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
- या स्पर्धेसाठी संलग्न असलेल्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) या दोन्ही संघटनांशी बीसीसीआयने चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे. यावर्षी पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होणार होती. पण, आता ही स्पर्धा होणार नाही.
- सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रॅंचाईजी संघांना स्पर्धेतून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
- त्याच वेळी सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांवरून दोन्ही संघांचे मुख्य पदाधिकारी गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा
- चॅम्पियन्स लीग स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय यांचा संयुक्त उपक्रम असून २००९ सालापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
- या स्पर्धेत आयपीएलमधील चार संघ, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील दोन तसेच दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दोन संघ यांच्यासह श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० संघ सहभागी होतात.
प्लुटो ग्रहाचा आकार अंदाजापेक्षा मोठा
- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सोडलेल्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लुटोच्या जवळून जात प्लुटोची छायाचित्रे टिपली आहेत. न्यू होरायझन्सवरील लॉंग रेंज रिकॉनायसन्स इमेजर या उपकरणाने ही छायाचित्रे टिपली आहेत.
- अवकाशयानाने दिलेल्या माहितीवरून प्लुटोचा व्यास २३७० किलोमीटर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आधी अंदाज केल्यापेक्षा हा आकार मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेपच्यूनच्या पलीकडे असलेला तो सर्वात मोठा घटक आहे असे आता स्पष्ट झाले आहे.
- नव्या माहितीनुसार प्लुटोचा आकार मोठा असून घनता व वस्तुमान मात्र कमी आहे. त्याच्या अंतर्भागात असलेला बर्फाचा संचय काही प्रमाणात जास्त आहे. त्याचे ट्रोपोस्फिअर हे जास्त खोल आहे.
- प्लुटोचा सर्वांत मोठा चंद्र असलेल्या चारोनचा व्यासही १२०८ किमी असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे. निक्स आणि हायड्रा हे इतर दोन चंद्र अनुक्रमे ३५ आणि ४५ किमी व्यासाचे आहेत. हे चंद्र उजळ दिसत असल्याने त्यांच्यावर बर्फ असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. कर्बेरॉस आणि स्टिक्स हे उर्वरित चंद्र फारच लहान असल्याने त्यांचे आकारमान समजले.

प्लुटो ग्रहाबद्दल
- प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. परंतु ऑगस्ट २४, २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले.
तिस्ता सेटलवाडांच्या कार्यालयावर छापे
- सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) १६ जणांच्या तुकडीने १४ जुलै रोजी छापे घातले.
- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणी न करता विदेशातून देणग्या स्वीकारल्याबद्दल सीबीआयने ८ जुलै रोजी सबरंग कम्युनिकेशन्सविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे आणि विदेशी साह्य नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
- सीबीआयने सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक जावेद आनंद, तिस्ता सेटलवाड, पेशीमम गुलाम महमंद आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२० (बी), त्यातील विदेशी चलन नियमन कायदा, २०१० चे कलम ३५, ३७, त्यात कलम ३, ११ आणि १९ ते विदेशी चलन नियमन कायदा, १९७६ चे कलम २३,२५ मधील कलम ४,६ आणि १३ अन्वये दाखल झाला आहे.
- हा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
स्पाईसजेटची एक रुपयात हवाई सफर
- ‘स्पाईसजेट’ एअरलाईन्सने नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयात तिकीटाची ऑफर दिली आहे. स्पाईसजेटने १ रुपयात एकतर्फी प्रवासासाठी १ लाख तिकिटे ठेवली आहे.
- निर्धारित वेळेसाठी असलेल्या या ऑफरमध्ये मात्र कर आणि शुल्काचा समावेश करण्यात आलेला नाही.
- तथापि, तीन दिवसांच्या या ऑफरमध्ये प्रवाशांना परतीचे तिकीटही आरक्षित करावे लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. शिवाय त्यासाठी नियमित भाडे भरावे लागेल.
- प्रवासी १५ जुलैपासून पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत या तिकीटावर प्रवास करु शकतात. या ऑफर अंतर्गत १५ जुलै ते १७ जुलैपर्यंत तिकीट आरक्षित करता येणार आहे.
केरळमध्ये फक्त महिलांसाठी बससेवा
- केरळमध्ये सर्व महिला किंवा महिला स्पेशल टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता केरळातील जेंडर पार्क या सरकारी मालकीच्या स्वायत्त संस्थेने ‘शी बस’ ही केवळ महिलांनी महिलांसाठी चालवलेली बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
- ‘शी टॅक्सी’ या उपक्रमाचे देशभरात कौतुक झाले, कारण त्यामुळे महिलांना चोवीस तास सुरक्षित टॅक्सी सेवा उपलब्ध झाली. या सेवेचे जागतिक बँकेनेही कौतुक केले आहे व त्याचा शाश्वत उद्योजकतेसाठी गौरव केला आहे.
- अलीकडे टॅक्सी व बसगाडय़ांमधील बलात्कारांचे गुन्हे वाढल्याने या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
- जेंडर पार्कने राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या नेतृत्वाखाली ही सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. तिरूअनंतपुरम येथे पहिली सेवा दिली जाईल. नंतर ती कोची व कोझिकोड येथे विस्तारली जाईल. या बसगाडय़ा वातानुकूलित व महिला स्नेही असतील. महिलांशिवाय मुलेही त्यातून प्रवास करू शकतील.
प्रसिद्ध तमिळ संगीतकार विश्वनाथन यांचे निधन
- संगीताच्या प्रत्येक प्रकारात ठसा उमटवणारे प्रसिद्ध तामिळ चित्रपट संगीतकार एम.एस. विश्वनाथन (वय ८८) यांचे १५ जुलै रोजी निधन झाले.
- त्यांनी एकूण १७०० चित्रपटांना संगीत दिले होते व एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, एम.करुणानिधी व जयललिता या चारही मुख्यमंत्र्यांच्या समवेत काम केले आहे.
- संगीताचे विविध प्रकार त्यांनी हाताळले असून 'जेनोवा' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यात एम.जी.रामचंद्रन हे नायक होते.
- अलिकडच्या काळात त्यांनी इलयाराजा व ए.आर.रहमान यांच्यासमवेत काम केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा