चालू घडामोडी - ३१ जुलै २०१५


पेटीएम बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सर

    Paytm title sponser for BCCI
  • २०१९ पर्यंत भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा टायटल प्रायोजक मिळाला आहे.
  • ई-कॉमर्स वेबसाईट कंपनी पेटीएम चालविणाऱ्या ‘वन-९७ कम्युनिकेशन्स कंपनी’ला २०३.२८ कोटी रूपयांत बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व मिळाले आहे.
  • पुढील चार वर्षांत भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम बीसीआयला २.४२ कोटी रूपये मोजणार आहे. बीसीसीआयचे प्रायोजकत्व पहिल्यांदाच ई-कॉमर्स कंपनीला देण्यात आले आहे.
  • पुढील चार वर्षात भारतात जवळपास ८४ सामने खेळले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यापासून पेटीएम आता बीसीसीआयच्या जर्सीवर आपली ब्रॅन्डींग करू शकणार आहे.
  • आता नव्या मोसमापासून रणजी करंडक स्पर्धा ‘पेटीएम रणजी करंडक’ म्हणून ओळखली जाईल.
  • यापुर्वी मायक्रोमॅक्स या कंपनीकडे बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व होते, ते प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला २.०२ कोटी रूपये मोजायचे. अपुर्ण कागदपत्रांमुळे यावेळी मायक्रोमॅक्स टायटल प्रायोजकत्वावर बोली लावू शकले नाही. 

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे दिली आहे. 
  • ‘स्मार्ट सिटीज्’ तयार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे-पिंपरी, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या दहा शहरांची निवड केली आहे. 

स्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेला दहा लाख डॉलर्सचा दंड

    SBI Logo
  • हाँगकाँग सेंट्रल बँकेनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हाँगकाँग येथील शाखेला दहा लाख डॉलरचा (सुमारे ६.२ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादविरोधी आर्थिक नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण दाखवत स्टेट बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • हाँगकाँगमध्ये २०१२ साली ‘अँटी मनी लाँडरिंग आणि काऊंटर टेरेरिस्ट फायनान्सिंग लॉ’ (मनी लाँड्रिंगविरोधी कायदा) आल्यानंतर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.
  • एप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान स्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेने मनी लाँड्रिंगविरोधी नियम राबविण्यात हलगर्जीपणा केला. विशेषत: बँकेच्या २८ कॉर्पोरेट ग्राहकांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात आली नाही. ग्राहकांच्या सध्याच्या औद्योगिक व्यवहारांवर बँकेचे नियंत्रण नाही. बँकेच्या ग्राहकांमध्ये राजकीयदृष्ट्या भ्रष्ट व्यक्तींचा समावेश आहे की नाही याची शहानिशा करण्यात आलेली नाही, असा ठपका हाँगकाँग पत नियामक प्राधिकरणानं (एचएमए) ठेवला आहे. 
  • दहा लाख डॉलरच्या दंडाबरोबरच स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश ‘एचएमए’ने स्टेट बँकेला दिले आहेत. बँकेच्या अंतर्गत कारभारावर पुढील काळात कसे नियंत्रण ठेवले जाणार आहे, त्यासाठी बँक काय उपाययोजना करणार, याची माहिती देण्यासही ‘एचएमए’ने बजावले आहे.
  • स्टेट बँकेचे हाँगकाँगमध्ये ३५ हून अधिक वर्षांसाठी अस्तित्व आहे.

दरवर्षी १ रुपयाच्या नव्या नोटा सरकार छापणार

  • एक रुपया बाजारमूल्याच्या १५ कोटी नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. १ जानेवारी २०१५पासून दरवर्षी या नोटा छापल्या जातील. 
  • १ जानेवारीपासून दरवर्षी १ रुपया बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी १५ डिसेंबर २०१४रोजी राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नोटा कॉइनेज अॅक्टमधील तरतुदींनुसार छापण्यात येतील. 
  • नोटा छपाईचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन १, २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे या नोटा सरकारने छापण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.

चीनमध्ये विजेवरील बसचा सार्वजनिक वाहतुकीत वापर

  • चीनमध्ये दहा सेकंदात पूर्णपणे विद्युतभारित होणारी (चार्जिग) बस तयार करण्यात आली असून ती ३१ जुलैपासून सेवेत दाखल करण्यात आली आहे.
  • ही बस ११ कि.मी. रस्त्यावर धावते. झेजियांग प्रांतात निंगबो येथे या बससेवेला एकूण २४ थांबे आहेत. येत्या तीन वर्षांत अशा १२०० बसगाड्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. या शहरात विद्युत बसगाड्या निर्मितीचा प्रकल्पही आहे.
  • बस थांबलेली असताना किंवा प्रवासी चढत-उतरत असताना विद्युतभारित होते. एका विद्युतभारात ही बस पाच किमी अंतर कापते. तसेच या बसच्या वापरामुळे प्रदूषणदेखील कमी होते.
  • झुझाऊ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कंपनीने ही बस तयार केली असून, चीनमधील वेगवान रेल्वे बनवणाऱ्या चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन या संस्थेची ही उपकंपनी आहे.
  • या बस उत्पादनाशिवाय याच धर्तीवर इतर विद्युत वाहनांपेक्षा ३० ते ५० टक्के कमी वीज लागणारी इतर वीज वाहने कंपनी एप्रिलपर्यंत तयार करणार आहे.
  • या बसचे संधारित्र (कॅपॅसिटर) २० लाख वेळा विद्युतभारित करता येते त्यामुळे त्याचा कार्यकाल १० वर्षांचा आहे. या बससेवेत बस रॅपिड ट्रान्झिट पद्धतीच्या मार्गाचा अवलंब केल्याने ती रहदारीच्या अडथळ्यांशिवाय चालू शकते.

आयएमएफचे इराकला १.२४ अब्ज डॉलरचे कर्ज

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इराकला १.२४ अब्ज डॉलरच्या कर्जास तात्काळ मंजुरी दिली आहे. 
  • इसिसची वाढलेली बंडखोरी आणि जागतिक बाजारात कमी झालेल्या तेलाच्या किंमतीमुळे वित्तीय तूट इराकची वित्तीय तूट वाढली आहे. त्यामुळे देशाला अतिरिक्त निधीची गरज असल्याचे सांगितले आहे.
  • सरकारच्या अर्थसंकल्पासाठी तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्ट्रक्चरल सुधारणांचा स्वीकार करण्यासाठी आयएमएफ पूर्ण मदत करेल, असे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार इराकी अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी (२०१४-१५) २.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चालू वर्षात अर्थव्यवस्थेत फक्त ०.५ टक्के वाढीची शक्यता आहे.

आयसीजीएस आरुष नौकेचे जलावतरण

  • कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)तर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या २० जलद गस्त नौकांपैकी (बीवाय ५१७) १७ व्या नौकेचे गुरुवारी कोचीन गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.
  • तटरक्षक दुरुस्ती आणि उत्पादन पर्यवेक्षकचे डीआयजी जी. देवानंद यांची पत्नी ज्योती देवानंद यांच्या हस्ते ‘आयसीजीएस आरुष’ या नौकेचे जलावतरण करण्यात आले.

मंगल सिंग चाम्पियाचा रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित

  • कोपनहेगन, डेन्मार्क येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंगल सिंग चाम्पियाने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासह रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित केला आहे.
  • रजत चौहानने कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत प्रवेशासह रजत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, महिलांमध्ये लक्ष्मीराणी माझी रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीची लढत खेळणार आहे.

इंडोको रेमेडिजची महाराष्ट्र व गोव्यात १२५ कोटींची गुंतवणूक

  • औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या इंडोको रेमेडिजने महाराष्ट्र व गोवा प्रकल्प विस्ताराची योजना आखली असून यासाठी १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • कंपनी महाराष्ट्रातील पातळगंगा येथे हरितक्षेत्र एपीआय सुविधा केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील स्टरलाईट ऑप्थॅल्मिक सुविधा केंद्राचाही विस्तार करण्यात येणार आहे.

शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासचा ताबा

    BNP Paribas to buy brokerage firm Sharekhan
  • दीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासने ताबा मिळविला आहे. हा व्यवहार २००० कोटी रुपयांचा झाला असण्याची शक्यता आहे.
  • भारतीय भांडवली बाजारात सल्लागाराच्या भूमिकेचा विस्तार करताना बीएनपी पारिबासने शेअरखानचे सर्व, १०० टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. बीएनपी पारिबासचे युरोपात १७ लाख ग्राहक आहेत.
  • बीएनपी पारिबासमध्ये विलीन झाल्यानंतर शेअरखान ही यंत्रणा भारतातील व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत असेल; समभाग तसेच म्युच्युअल फंड, अन्य बचत योजनांची विक्री शेअरखानमार्फत कायम असेल.
  • २०००च्या दशकात देशातील पहिली स्वतंत्र दलाल पेढी म्हणून अस्तित्वात आलेल्या शेअरखानचा खाते राखण्यातील ७ टक्के हिस्सा आहे. गेल्या एक तपापासून ही पेढी नफ्यात राहिली आहे. तर बीएनपी पारिबासचे ७५ देशांमध्ये अस्तित्व असून तिच्याअंतर्गत १.८५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
  • एसएसकेआय इन्व्हेस्टर सर्व्हिसेसच्या नावाने शेअरखान १९९५ मध्ये कार्यरत होती.

इसिसने अपहरण केलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका

  • लिबियातील सर्टे या शहरात इसिसचा मोठा प्रभाव असून ३० जुलै रोजी संध्याकाळी येथून चार भारतीय प्राध्यापकांचे इसिसने अपहरण केले होते. 
  • लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. 
  • यापैकी दोघेजण हैदराबाद, एकजण रायचूर आणि एक प्राध्यापक बेंगुळरूमधील आहे. हे सर्व जण त्रिपोली आणि ट्युनिसमार्गे भारताकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी सर्टे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकनाक्यावरून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. 
  • अपहरण करण्यात आलेले चारही प्राध्यापक गेल्या एक वर्षापासून लिबियातील विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून भारतीय नागरिकांना लिबिया सोडण्याची सूचना केली होती. 

देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन यांचे निधन

    Suniti Solomon, M.D., HIV specialist
  • देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन २९ जुलै २०१५ रोजी यांचे चेन्नईमध्ये कर्करोगाने निधन झाले.
  • देशात एड्सचा १९८५च्या दरम्यान वेगाने प्रसार होत असताना डॉ सुनितींनी पुढाकार घेऊन एड्स प्रसाराची कारणं, त्यावरच्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा, आणि भारतात त्याबाबतची जागृती यासाठी आयुष्य वेचले. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे काम साऱ्या जगात वाखाण्यात आले.
  • चेन्नईत त्यांनी उभ्या केलेल्या वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेत साडे पाच हजार रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
  • डॉ. सुनिती यांना तीन महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे  निधन

  • वर्णभेद प्रकरणातील बंदी उठल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे २८ जुलै रोजी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
  • वर्ण आणि वांशिक भेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांना फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नाही. बंदी उठल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने १९९१ मध्ये जेव्हा भारताचा दौरा केला, तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार ठरले. त्या वेळी ते ४२ वर्षांचे होते.
  • क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. पण त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तीन एकदिवसीय सामन्यांपुरतीच मर्यादित राहिली. त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधीच मिळाली नाही.
  • नॉटिंगहॅमशायरचे नेतृत्व करताना त्यांनी संघाला दोन वेळा इंग्लिश कौंटीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी नॉटिंगहॅमशायर संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.

MT Fast Facts
पॉन्झी योजना म्हणजे काय?
  • कोणत्याही आर्थिक योजनेतून नागरिकांकडून १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गोळा करणारी योजना सेबीअंतर्गत येते. त्याचप्रमाणे एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ५० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अशी योजना सार्वजनिक योजना म्हणून ओळखली जाते. अशी योजना सेबीअंतर्गत येते.
  • अनेक योजनांमध्ये ५०पेक्षा कमी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्याची तर एकूण रक्कम १०० कोटींपेक्षा कमी गोळा केल्याची बतावणी अशी योजना राबवणाऱ्या कंपनीकडून केली जाते. अशा प्रकारे पैसे गोळा करण्यासाठी अपरिवर्तनशील ऋणपत्रे (एनसीडी) किंवा तत्सम आर्थिक उत्पादनांची मदत घेतली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा