चलनी नोटांवर जागतिक वारसा स्थळे
- भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नोटांवर असलेल्या प्रतिमा बदलण्याचा निर्णय घेतला असून दहा रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूला असलेल्या वाघ-सिहांच्या प्रतिमांची जागा आता हंपीचा जगप्रसिद्ध रथ घेणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने भारतीय पुरातत्त्व खात्याकडून हंपीतील रथाचे चित्र मागविले आहे.
- जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेली देशातील आठ स्मारके चलनी नोटांवर मुद्रित केली जाणार आहेत. देशात चलनात असलेल्या १० ते १००० रुपयांच्या नोटांवरील प्रतिमा बदलणार आहेत.
- रिझर्व्ह बॅंकेने ठरविल्याप्रमाणे २० रुपयांच्या नोटेवर राष्ट्रध्वजासह लाल किल्ला, ५० रुपयांच्या नोटेवर कोणार्कचे सूर्यनारायण मंदिर, १००च्या नोटेवर ताजमहल, ५००च्या नोटेवर गोव्यातील पुरातन चर्च आणि १००० रुपयांच्या नोटेवर अजंठाची गुहा मुद्रित केली जाणार आहे.
- जागतिक वारसास्थळांची माहिती सर्वांना मिळावी. नव्या पिढीला आपली संस्कृती समजून जागतिक वारसास्थळांचे महत्त्वही समजावे. देशात येणाऱ्या पर्यटकांना वारसास्थळे पाहण्यासाठी कुतूहल निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नोटांवर या प्रतिमांचे मुद्रण केले जाणार आहे.
'वैवाहिक बलात्कार' गुन्हा मानला जावा : राजपूत समितीचा अहवाल
- पतीने बळजबरीने पत्नीशी सेक्स केल्यास तो बलात्कार समजून गुन्हा मानला जावा, अशी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या राजपूत समितीने महिला आणि बालविकास मंत्रालयाला केली आहे.
- या समितीने यासंदर्भातील अहवाल महिला आणि बालविकास मंत्रालयाला सादर केला आहे. पत्नीचं वय व गुन्हेगार आणि पीडितेशी असलेल्या संबंधांवरून हा प्रकार 'वैवाहिक बलात्कारा'च्या श्रेणीत गुन्हा मानला जावा, असं समितीने अहवालात म्हटलं आहे.
- केंद्रीय महिला-बालविकस मंत्री मनेका गांधी यांनी यापूर्वीच 'वैवाहिक बलात्कारा'च्या मुद्द्याचं समर्थन केलं आहे.
- न्यायमूर्ती जे.एस. वर्मा समितीनेही यापूर्वीच 'वैवाहिक बलात्कार' गुन्हा मानला जावा, अशी शिफारस केलेली आहे.
- भारतातील १५ ते ४९ वर्ष वयोगटातील दोन तृतींश पेक्षा अधिक विवाहित महिला सेक्ससाठी केलेल्या बळजबरीत पुरुषांच्या हिंसेच्या शिकार होतात, असा दावा युएन पॉप्युलेशन फंडने केला आहे.
एसबीआय मिळकतीच्या रक्कमेतील ३ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना वाटणार
- एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) २०१४-१५ या वर्षातील मिळकतीच्या रक्कमेतील ३ टक्के रक्कम (३९० कोटी रुपये) कर्मचाऱ्यांना वाटण्याचे ठरवले असल्याने बॅंकेतील २.३ लाख कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकणार आहे.
- त्यासाठीचा परवानगीसाठीचा प्रस्ताव एसबीआयने वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. कर्मचाऱ्यांचा कामातील उत्साह वाढविण्यासाठी बॅंकेने हा निर्णय घेतला.
- खासगी बॅंका कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी अधिक पगार देत असल्याने अनेक चांगले कर्मचारी खासगी बॅंकेकडे जातात. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळकतीतील रक्कम वाटल्यास त्यांच्या कामात उत्साह वाढेल आणि ते खासगी बॅंकेकडे जाणार नाहित, यासाठी हा निर्णय घेतल्याचे भट्टाचार्य म्हणाल्या.
- भारतीय स्टेट बॅंकेला २०१४-१५ या वर्षात १३,१०१,५७ कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे. या वर्षात बॅकेच्या मिळकतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील ३ टक्के रक्कम (३९० कोटी) रुपये कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्याचे बॅंकेने ठरवले. सध्याच्या नियमानुसार, बॅंकांना मिळकतीतील केवळ १ टक्काच लाभ कर्मचाऱ्यांना वाटण्याची परवानगी आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी तरतूद
- सरकारी कार्यालयांमध्ये होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.
- त्यानुसार सहकाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार करणाऱ्या सरकारी कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्याला यापुढे तीन महिन्यांपर्यंत भरपगारी रजा मिळू शकेल. ही रजा त्या महिलेच्या वार्षिक रजांमधून वजा होणार नाही.
- शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत तक्रारदार महिलेची किंवा ज्याच्याविरोधात तक्रार केली आहे त्याची अन्य विभागात बदली होऊ शकते. तशी शिफारस करण्याचा अधिकार केंद्र सरकारने प्रत्येक मंत्रालयात आणि विभागांत नेमलेल्या तक्रार समित्यांना दिला आहे.
- राजस्थान सरकार विरुद्ध विशाखा या खटल्यात १९९७ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयांमध्ये आणि सर्व विभागांमध्ये तक्रार समित्या नेमणे बंधनकारक आहे. समितीच्या प्रमुखपदावर महिलाच असेल आणि समितीचे निम्मे सदस्य महिला असतील, अशी प्रमुख अटही आहे.
- वरिष्ठ पातळीवरून कोणताही दबाव येऊ नये किंवा पदाचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी या तक्रार समित्यांनी एखादी सामाजिक संस्था किंवा लैंगिक छळाविरोधात काम करणारी एखादी संस्था यांचाही समावेश समितीत करावा, अशी सूचना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केली आहे.
फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बिआंची याचे निधन
- भर पावसात फार्म्युला वन शर्यत आयोजनाचा अट्टहास आणि निसरड्या ट्रॅकवरून कार घसरल्याने अपघातात गंभीर जखमी झालेला फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बिआंची याचे १८ जुलै रोजी निधन झाले. बियांची ५ ऑक्टोबर २०१४ पासून कोमामध्ये होता.
- गेल्यावर्षी जापनीज ग्रां प्री फॉर्म्युला वन शर्यतीदरम्यान बिआंचीच्या गाडीला अपघात झाला होता. बिआंची याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून तो कोमामध्ये होता.
- या अपघातानंतर ५३ फेऱ्यांची शर्यत ४४व्या फेरीलाच थांबवण्यात आली होती. त्या वेळचीच क्रमवारी अंतिम मानली गेली. मर्सिडिजच्या लुईस हॅमिल्टनला विजयी घोषित करण्यात आले होते. पदकाचा जल्लोष झाला नाही, तसेच शॅम्पेनही उडविण्यात आली नव्हती.
- प्रसिद्ध फुटबॉलपटू फर्नांडो अलोन्सोचा सरावातील सहकारी अशीच बिआंचीची ओळख होती. फॉर्म्युला वनमधील ड्रायव्हरमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून तो प्रसिद्ध होता.
सरोगसीद्वारे मातृत्वासाठीही रजा
- सरकारी सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यास सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली असेल, तर अशी कर्मचारीसुद्धा रजेसाठी पात्र आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात दिला आहे. अशा वेळी रजा नाकारणे हे आई आणि बाळ या दोघांसाठीही हानिकारक आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.
- केवळ स्वतः गर्भवती राहून अपत्यास जन्म देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास रजा देणे म्हणजे विज्ञानाने केलेल्या प्रगतीकडे काणाडोळा करणे ठरेल, असे न्या. राजीव शकधर यांच्या पीठाने स्पष्ट केले.
- एखादी महिला आणि / किंवा तिचा पुरुष जोडीदार यांचे जैविक पालकत्व असले किंवा नसले, तरीही जर एखाद्या महिलेने अपत्यासाठी अन्य महिलेची सेवा घेतली असेल, तर या परिस्थितीचाही 'मॅटर्निटी' या शब्दामध्ये अंतर्भाव होतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
‘सोलर पॅनल’प्रकरणी केरळच्या मुख्यमंत्र्यांना नोटीस
- गेल्या तीन वर्षांपासून केरळच्या राजकारणात गाजत असलेल्या सोलर पॅनल घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री उम्मेन चंडी यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
- हायकोर्टाचे माजी न्यायाधीश जी. शिवराजन यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने मुख्यमंत्र्यांबरोबरच राज्यातील मंत्री, आमदार आणि अनेक राजकारण्यांना नोटीस बजावली आहे.
काय आहे प्रकरण?
- सरिता नायर आणि बिजू राधाकृष्णन या लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने 'टीम सोलार' नावाची एक फर्म सुरू केली. सोलार पॅनल देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले. मात्र, त्यांनी लोकांना सोलर पॅनेल दिलेच नाहीत.
- या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी सरिता आणि बिजूला अटक केली आहे. नऊ महिने तुरुंगात काढल्यानंतर सरिताला जामीन मंजूर झाला आहे, बिजू राधाकृष्णन अद्याप तुरुंगातच आहे.
- व्यावसायिक श्रीधरन नायर याने सरितासह मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांच्याकडून प्रोजेक्टला परवानगी मिळाल्यावरच सरिता हिला पलक्कड येथे फॅक्टरी उभी करण्यासाठी चाळीस लाख रुपये दिले असा दावा केला. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव आले आहे.
नांगका वादळाचा जपानला तडाखा
- जपानच्या किनारपट्टीला १७ जुलै रोजी नांगका या चक्रीवादळाचा फटका बसला. या चक्रीवादळात आतापर्यंत दोघाजणांना प्राण गमवावे लागले असून, सुमारे अडीच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
- जपानचे मुख्य बेट असलेल्या होन्शूच्या किनारपट्टीवर हे वादळ आदळले. वादळाचा वेग ताशी १२६ किलोमीटर होता.
- या वादळामुळे पश्चिम जपानमध्ये वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे देशांतर्गत ९४ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
- किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाचा वेग कमी होत असला, तरी पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहिल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार
- दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
- मोठ्या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या आयोजन समितीत डॉ. एम. श्रीधर क्रिकेट संचालनालयाचे महासंचालक असतील. अमृत माथूर यांना मुख्य समन्वयक व आर. पी. शाह यांना मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे. राव यांना क्रिकेट संचालनालय व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले.
चीनमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकाची सुटका
- दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या संशयावरून चीनमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिक राजीव मोहन कुलश्रेष्ठ याची सुटका करण्यात आली असून, त्याला पुन्हा मायदेशी पाठविण्यात आले आहे.
- चीनने दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून २० परदेशी नागरिकांना अटक केली होती. यामध्ये ब्रिटिश, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यातील ११ पर्यटकांची लगेच सुटका करण्यात आली होती. उर्वरित व्यक्तींना मंगोलियातील कारागृहात ठेवण्यात आले होते. यामध्ये भारतीय नागरिक होता. अखेर चीनने त्याचीही सुटका केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा