विज्ञानेश्वराचे प्रस्थान
- ‘भारतरत्न’ माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना लाखोंच्या जनसमुदायाने शोकाकुल वातावरणात ३० जुलै रोजी अखेरचा निरोप दिला.
- रामेश्वरम येथून फुलांनी सजविलेल्या गाडीतून कलाम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. रामेश्वरमपासून जवळच असलेल्या पेईकरूम्बू येथे दफनविधी करण्यात आले.
- आपल्या भूमीतील लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्यविधीवेळी लाखोंचा जनसागर लोटला होता. ‘कलाम सर अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
- लष्करी इतमामात झालेल्या अंत्यविधीवेळी लष्कराच्या जवानांकडून बंदुकीच्या फेऱ्या झाडून सलामी देण्यात आली.
केरळमधील तांत्रिक विद्यापीठाला डॉ. कलाम यांचे नाव
- केरळमधील प्रस्तावित तांत्रिक विद्यापीठाला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय केरळ राज्य सरकारने घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी राज्य विधानसभेत ही घोषणा केली.
- भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. कलाम यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. एक वैज्ञानिक म्हणून डॉ. कलाम यांचा केरळशी जवळपास २० वर्षे निकटचा संबंध होता, असे चंडी म्हणाले.
गुगलकडून विशेष श्रद्धांजली
- डॉ. अब्दुल कलाम यांना गुगलकडून विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या असामान्य व्यक्तिमत्त्वाला ‘सर्च इंजिन गुगल’नेही सलाम केला आहे.
- गुगलने डूडलचा वापर न करता सर्च टॅबच्याखाली एक काळी रिबन लावून कलाम यांना अनोखी अशी श्रद्धांजली वाहिली आहे. या रिबनवर कर्सर नेल्यास ‘इन मेमरी ऑफ डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ असा संदेश बाजूला उमटत आहे.
- कलाम यांनी राष्ट्रपती झाल्यानंतरही साधेपणा सोडला नाही. हाच साधेपणा श्रद्धांजलीत असावा अशा पद्धतीने गुगलने डूडल न वापरता ही श्रद्धांजली वाहिली आहे.
अखेर याकूब मेमनला फाशी
- मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमनला ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
- २९ जुलैच्या रात्री राष्ट्रपतींनी याकूबचा दया अर्ज फेटाळल्यानंतर २९ जुलैच्या रात्रीपासून ते ३० जुलैच्या पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अभूतपूर्व अशा घडामोडी पहायला मिळाल्या.
- या सुनावणीसाठी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक ४ मध्ये ३० जुलैच्या पहाटे ३.१८ ते ५ या वेळेत याकूबच्या याचिकेवर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. पी. सी. पंत आणि आमिताव रॉय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
- याकूबच्या वकिलांनी शिक्षेचा निकाल सुनाविल्यापासून शिक्षेच्या अंमलबजावणीमध्ये १४ दिवसांचे अंतर असावे, हे कायदेशीर कारण पुढे करत ही याचिका दाखल केली होती.
याकूबने शिक्षेबाबत घेतलेल्या हरकती
- न्यायालयाने न्याय देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी विचारात घेतल्या नव्हत्या.
- राष्ट्रपतींनी ११ एप्रिल २०१४ रोजी दयेचा अर्ज फेटाळून लावला, त्याची माहिती २६ मे रोजी देण्यात आली.
- आपले म्हणणे ऐकून न घेताच परस्पर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
- आरोपीला दोन आठवडे आधी शिक्षेची माहिती देण्यात येते, मात्र हा नियमही पाळण्यात आला नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- टाडा न्यायालयाने ३० एप्रिल रोजी याकूबला सुनावलेल्या मृत्युदंडाच्या आदेशात कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळलेली नाही. या पार्श्वभूमीवर याकूबने सादर केलेली रिट याचिका रद्दबातल ठरते. तसेच त्याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा निर्णयही योग्य होता.
- याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीसाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला जात नसतानाही याकूबच्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी दहा दिवस सुरू होती. यावरून, याकूबला त्याची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता अशाप्रकारच्या खटल्यात अधिक वेळ वाया घालवणे योग्य नसल्याचे सांगत न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांनी याकूबची याचिका फेटाळली.
पार्श्वभूमी
- मुंबई बाँबस्फोट खटल्यातील १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्यात प्रमुख आरोपी याकूब मेमनसह आरडीएक्स स्फोटके विविध ठिकाणी ठेवणाऱ्यांसह १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
देशात नजीकच्या काळातील फाशीच्या शिक्षा | ||
---|---|---|
३० जुलै २०१५ (नागपूर) | याकूब मेमन | मुंबईत १९९३ मध्ये साखळी बाँबस्फोटांमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा सिद्ध. |
९ फेब्रुवारी २०१३ (दिल्ली) | अफजल गुरू | भारताच्या संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी दोषी. |
२१ नोव्हेंबर २०१२ (पुणे) | अजमल कसाब | मुंबईवर २००८मध्ये (२६/११) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोषी. |
१४ ऑगस्ट २००४ (कोलकता) | धनंजय चटर्जी | १९९० मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध. |
जीएसटी विधेयकात दुरुस्तीस मंजुरी
- जीएसटी विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे राज्यांचे होणारे नुकसान पहिली पाच वर्षे केंद्राकडून भरून देण्याबाबतच्या जीएसटी विधेयकातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ जुलै रोजी मंजुरी दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीएसटीबाबत राज्यसभेच्या प्रवर समितीने केलेल्या या सूचनेस मंजुरी देण्यात आली.
- जीएसटीमधील या बदलांमुळे प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ओडिशामधील बिजू जनता दल यांचा विश्वास जिंकणे सत्ताधारी एनडीएला शक्य होणार असून एनडीएचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत जीएसटी विधेयकाचा मार्ग सोपा होण्याची अपेक्षा आहे.
ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर
- मंत्रिमंडळाने बैठकीत ‘ग्राहक संरक्षण विधेयक-२०१५’लाही मंजुरी दिली आहे. हे विधेयक संमत झाल्यास गेली २९ वर्षे अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेईल. या नव्या विधेयकात व्यापारी गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी एका नियामक प्राधिकरणाच्या स्थापनेची तरतूद आहे.
- विविध उत्पादनांबाबत ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा वेगाने निपटारा व्हावा, तसेच, मुळात त्यांना दर्जेदार व सुरक्षित उत्पादने मिळावीत, हा या विधेयकाचा हेतू आहे.
- उत्पादनात खोट असल्यास व त्याचा फटका एकपेक्षा अधिक ग्राहकांना बसल्यास वेळप्रसंगी संबंधित उत्पादकास त्याची उत्पादने बाजारातून काढून घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार या प्रस्तावित प्राधिकरणास असेल.
- ग्राहकहक्कांना नख लागल्यास काही प्रकरणांत संबंधितांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात असून, ई-रिटेलिंग व्यवहारांतही ग्राहकहित जपण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.
विमान अपहरणविरोधी विधेयक मंजूर
- विमान अपहरणात विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तरीही संबंधित दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेल्या विमान अपहरणविरोधी विधेयकाला (२०१४) मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी
- याव्यतिरिक्त, पायाभूत प्रकल्पांसाठी २० हजार कोटी रु.च्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या (एनआयआयएफ) स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
संसदेच्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हि विधेयके मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत.
२०२२ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश
- संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक लोकसंख्या अहवाल-२०१५’ची सुधारित आवृत्ती २९ जुलै रोजी जाहीर केली.
- भारत २०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले आहे.
- पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असून २१०० सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे.
- सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी इतकी, तर भारताची १३१ कोटींच्या घरात आहे.
- भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर २०३० साली भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या आसपास असेल. २०५० साली हाच आकडा १७० कोटींच्या घरात जाऊ शकतो.
- चीनच्या बाबतीत २०३०पर्यंत त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बऱ्यापैकी स्थिर राहील तर २०५० नंतर दर कमी झालेला असेल.
- २०१३ साली जाहीर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात भारत २०२८ सालापर्यंत लोकसंख्येच्या आकडेवारीत चीनच्या पुढे जाईल, असे नमूद करण्यात आले होते.
जनरल मोटर्सची भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक
- अमेरिकेच्या जनरल मोटर्सने भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. याचबरोबर शेव्हरले नाममुद्रेसह भारतीय वाहन बाजारपेठेत अस्तित्व राखणाऱ्या जनरल मोटर्सने येत्या पाच वर्षांत १० नवीन वाहने सादर करण्याचे ठरविले आहे.
- तसेच कंपनी गुजरातमधील उत्पादन प्रकल्प बंद करून तिच्या महाराष्ट्रातील पुण्यानजीकच्या तळेगाव येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित करणार आहे.
- जनरल मोटर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी : मेरी बॅरा
कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचे ४०० विकेट
- दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने ४०० विकेट घेणाऱ्या महान गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा तो तेरावा गोलंदाज ठरला आहे.
- शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरूद्ध मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत स्टेनने ४०० वा बळी टिपला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल ही स्टेनची ४००वी शिकार ठरली. या विकेटने ४०० चा टप्पा गाठणाऱ्या अन्य १२ महान गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन स्टेन बसला आहे.
- २००४ मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी पदार्पण करणारा स्टेन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात ‘खतरनाक’ गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
ह्युंदाई मोटर इंडियाला ४२० कोटींचा दंड
- वाहनांचे सुटे भाग खुल्या बाजारात उपलब्ध न करून देण्यावरून भारतीय देशातील वाहननिर्मिती व्यवसाय पुन्हा एकदा दंडाच्या जाळ्यात ओढला गेला असून यंदाच्या फेऱ्यात कोरियन ह्युंदाई मोटर इंडियाला ४२० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
- भारतीय स्पर्धा आयोगाने ऑगस्ट २०१४ मध्ये वाहन कंपन्यांना केलेल्या दंडानंतर आता एकत्रित रक्मक २,५४४.६४ कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी १४ कंपन्यांबाबत आयोगाने आदेश दिले होते.
- यंदा ह्युंदाईला ४२० कोटी रुपयांचा दंडाचे आदेश जारी करण्यात आले असून महिंद्र रेवा व प्रीमियरला शिस्तीचा अवलंब करण्याबाबत बजाविले आहे.
- ह्युंदाईच्या दंडाची रक्कम ही कंपनीच्या तीन आर्थिक वर्षांतील सरासरी उलाढालीपैकी २ टक्के आहे.
शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन
- प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित कुमार गंधर्व यांची पत्नी, शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली (वय ८५) यांचे २९ जुलै रोजी निधन झाले.
- पद्मश्री पुरस्कार विजेत्या वसुंधरा कोमकली यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्काराचा समावेश आहे.
- जमशेदपूर येथे जन्मलेल्या वसुंधरा या कालांतराने कोलकत्ता येथे राहण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यानंतर प्रोफेसर बी. आर. देवधर यांनी त्यांना संगीताचे शिक्षण दिले आणि नंतर पंडित कुमार गंधर्व यांच्या शिष्या बनल्या.
- १९६३ साली पंडित कुमार गंधर्व यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या देवास येथे स्थलांतरित झाल्या होत्या.
Thanks for this great information.. Very useful
उत्तर द्याहटवा