चालू घडामोडी - १९, २० जुलै २०१५


लोढा समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची समिती

    BCCI
  • न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
  • आयपीएलच्या समितीचे अध्यक्ष असलेल्या राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली सचिव अनुराग ठाकूर, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व अनिरुद्ध चौधरी या चौघांनी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीसीसीआयचे कायदेशीर समितीचे प्रमुख यू. एन. बॅनर्जी यांचे सहाय्य त्यांना लाभणार आहे. 
  • हा कार्यगट आयपीएल फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणार असून शिफारस करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
  • आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्‍सिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवले होते. तसेच चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

आत्महत्येच्या प्रमाणात महाराष्ट्र आघाडीवर

  • गेल्या वर्षात भारतात सरासरी प्रत्येक तासाला १५ जणांची आत्महत्या झाल्या असून, यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
  • गेल्या वर्षभरात भारतात एकूण १ लाख ३१ हजार जणांनी आत्महत्या केली. चेन्नई शहरामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून आले आहे.
  • गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्यांपैकी ६९.७ टक्के व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक लाखांहून कमी होते. तसेच, आत्महत्या केलेल्या दर ६ जणांपैकी १ गृहिणी होती.
  • महाराष्ट्रात २०१४ मध्ये सर्वाधिक १६,३०७ जणांनी आत्महत्या केली. त्यानंतर तामिळनाडू (१६,१२२) आणि पश्चिम बंगालचा (१४,३१०) क्रमांक लागतो.
  • ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक आत्महत्या झालेली शहरे
चेन्नई२,२१४
बंगळूर१,९०६
दिल्ली१,८४७
मुंबई१,१९६
भोपाळ१,०६४
सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यात
  • राज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे.
  • २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत.
  • वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.

भारत करणार हेलिकॉप्टर्सची निर्मिती

    India to produce Helicopters Make In India
  • देशाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्याचे उद्दिष्ट ठेवून भारताने रशियाशी नुकताच एक करार केला असून, त्यानुसार रशियाच्या सहकार्याने भारत २०० हेलिकॉप्टर्सची निर्मिती करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होईल.
  • भारत व रशियादरम्यानच्या कराराअंतर्गत विविध संरक्षण प्रकल्पांबाबत सहकार्य करण्यात येणार आहे; तसेच मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत भारतातच या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येणार आहे.
  • भारताचे रशियातील राजदूत : एस. पी. राघवन

मोदींचा सिलीकॉन व्हॅली दौरा

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सिलीकॉन व्हॅलीला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
  • येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौरा करणार असून ते यावेळी सिलीकॉन व्हॅलीला भेट देतील. 
  • पं. नेहरू यांनी १९४९ साली कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. तेव्हा या भागाला सिलीकॉन व्हॅली हे नाव नव्हते. १९७० नंतर कॅलिफोर्नियाचा काही भाग सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखला जाऊ लागला. या भागाचे वैशिष्ट्य असे की, सिलीकॉन व्हॅली हे अनिवासी भारतीयांचे हक्काचे ठिकाण आहे.

प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात

    PRO Kabaddi
  • बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला १८ जुलै रोजी मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली.
  • महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन प्रो कबड्डी दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले.
  • प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात जयपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगली, ज्यामध्ये जयपूरच्या संघाने मुंबईचा ३५-२४ असा पराभव करुन पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली होती.
सहभागी संघ
यू मुम्बापुणेरी पलटण
जयपूर पिंक पँथर्सबंगाल वॉरियर्स
पटणा पायरेटस्दबंग दिल्ली
तेलगू टायटन्सबंगळूर बुल्स
महागडे खेळाडू
    1. राकेश कुमार (पाटणा) – १२.८० लाख
    2. दीपक निवास (तेलुगू टायटन्स) – १२.६० लाख
    3. सुरजित नारवाल (दिल्ली) व अजय ठाकूर (बंगळूर बुल्स) – १२.२० लाख

क्युबात तब्बल ५४ वर्षांनंतर अमेरिकेचा दूतावास

  • ५४ वर्षे परस्पर शत्रुत्व व द्वेष जोपासलेल्या अमेरिका व क्युबा या देशांनी परस्पर राजनैतिक संबंधांची पुन्हा नव्याने सकारात्मक सुरुवात करताना दूतावास स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यानुसार वॉशिंग्टन येथे क्युबाच्या दूतावासाची शेकडो निमंत्रित अतिथींच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. याचबरोबर, अमेरिकेनेही हवाना येथे दूतावासाची स्थापना केली आहे. 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी परस्पर राजनैतिक संबंध पुन्हा सुरळित करण्याच्या उद्दिष्टास मान्यता दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
  • ओबामा यांनी क्युबाबरोबरील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलताना दहशतवाद पसरविणाऱ्या देशांच्या यादीमधील क्युबाचे नाव काढून टाकण्याचा निर्णय गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये घेतला होता.

हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांचा करार रद्द

    Indian hockey coach Paul van Ass sacked
  • पदभार स्वीकारल्यानंतर केवळ पाचच महिन्यांमध्ये भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांचा करार ‘हॉकी इंडिया‘ने २० जुलै रोजी तडकाफडकी रद्द केला. हा करार रद्द करण्याचे कोणतेही कारण ‘हॉकी इंडिया‘ने दिलेले नाही.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) हिमाचल प्रदेशमधील प्रशिक्षण केंद्रात भारतीय संघाचे प्रशिक्षण १९ जुलैपासून सुरू झाले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक व्हॅन ऍस अनुपस्थित राहिले होते. 
  • बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा अहवालही व्हॅन ऍस यांनी वेळेत सादर केला नव्हता. जागतिक हॉकी स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या सामन्यानंतर व्हॅन ऍस आणि ‘हॉकी इंडिया‘चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

शुभम जगलान जागतिक गोल्फ विजेता

  • कुमार गटाच्या जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवत भारताच्या दहावर्षीय शुभम जगलान याने विजेतेपद मिळविले. 
  • अमेरिकेत सॅन दिएगो येथे त्याने १७९ दोषांकासह प्रतिस्पर्ध्यांवर एका स्ट्रोकची आघाडी घेत विजेतेपद पटकाविले. त्याने तीन दिवसांत एकूण १३ बर्डींची नोंद केली. यातील पाच बर्डी त्याने अखेरच्या दिवशी नोंदविल्या. त्याची हीच अचूकता निर्णायक ठरली. 
  • गोल्फमध्ये कारकीर्द घडविण्याचा ध्यास बाळगणारा शुभम हा नवी दिल्लीतील एका दूध विक्रेत्याचा मुलगा आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी इम्रान रझा अन्सारी

  • इम्रान रझा अन्सारी यांची जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री व संघटनेचे माजी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची जागा अन्सारी यांनी घेतली आहे. 
  • अन्सारी हे भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्या जम्म-काश्मीरमधील युती सरकारमध्ये क्रीडामंत्री आहेत. मागील काही दिवसांत जेकेसीए ही संघटना पक्षपातीपणा आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली आहे. 
  • अन्सारी यांची अध्यक्षपदी, तर मेहबूब इक्बाल यांची नवे प्रमुख (चेअरमन) म्हणून निवड करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या प्रचार मोहिमेत अबेदिन यांना सर्वाधिक मानधन

  • अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या प्रचार मोहिमेत भारतीय वंशाच्या हुमा अबेदिन या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कर्मचारी ठरल्या आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या त्या दीर्घकाळापासूनच्या सहकारी आहेत. 
  • हुमा अबेदिन यांचे वडील भारतीय आणि आई पाकिस्तानी होत्या. प्रचार मोहिमेचे काम बघणाऱ्या हुमा यांचा वार्षिक पगार २ लाख ७७ हजार डॉलर इतका आहे. अबेदिन या हिलरी यांच्या प्रचार मोहिमेच्या उपप्रमुख आहेत. त्यांचे पती माजी संसद सदस्य आहेत.
  • अबेदिन यांच्याकडे प्रचार मोहिमेची कार्यवाही असून, अनेकदा त्या स्वतंत्रपणे निर्णय घेतात. तसेच क्लिंटन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या ऐवजी अबेदिनच बैठका घेतात.

गंगेच्या स्वच्छतेसाठी इस्राईलचे पथक

  • गंगा नदी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत इस्राईलचे एक पथक गंगा नदीला भेट देणार आहे.
  • नदीची स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून हे पथक अभ्यास करणार आहे. भारतात इस्राईलतर्फे राबविण्यात येणारा हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे.
  • गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी इस्राईलतर्फे तंत्रज्ञान पुरविण्यात येणार आहे. इस्राईलच्या याबाबतच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकेल. यासाठी हे पथक भारत सरकारबरोबरही चर्चा करणार आहे.
  • जलव्यवस्थापन व जल पुन:प्रक्रिया या क्षेत्रामधील इस्राईलने विकसित केलेले प्रारुप अनेक दुष्काळग्रस्त देशांमध्ये अवलंबिण्यात आले आहे.

विम्बल्डन कनिष्ठ गटात सुमित नागल दुहेरीत अजिंक्य

  • कनिष्ठ मुलांच्या गटात भारताच्या सुमित नागलने व्हिएतनामच्या नाम होअँग ली याच्यासमवेत  दुहेरीचे जेतेपद पटकावले. 
  • अंतिम फेरीत सुमित-ली या आठव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित रीली ओपेल्का व अकिरा सँटिलन या अमेरिकन-जपानी जोडीचा पराभव केला. 
  • रीली ओपेकाने कनिष्ठा मुलांच्या गटात एकेरीचे जेतेपद मिळविले होते. पण त्याची दुहेरी मुकुटाची संधी हुकली.

MT Gyaan
  • कारगिल युद्धाचे 'खलनायक' असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा ‘एनसीईआरटी’ने मान्यता दिलेल्या दिल्लीतील गायत्री प्रकाशनाच्या पुस्तकात महापुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • मध्यप्रदेशमधील इयत्ता तिसरीसाठी असलेल्या या पुस्तकाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गायत्री प्रकाशनाचे लेखक पंकज जैन यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

1 टिप्पणी: