सेल्युलर तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती
- ब्रिटिशांपासून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती पुन्हा एकदा अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये झळकणार आहेत. माजी पेट्रोलियम मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होत आहे.
- सेल्युलर तुरुंगातील स्वातंत्र्य योद्ध्यांच्या स्मारकामध्ये 'स्वातंत्र्य ज्योत' आहे आणि त्याजवळ सावरकरांच्या या काव्यपंक्ती लावण्यात येतील.
- ब्रिटिश सरकारने सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना अंदमानातील सेल्युलर तुरुंगात ठेवण्यात आले होते.
- तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल सेल्युलर जेलच्या आवारात स्मारक उभारण्यात आले. त्यामध्ये 'स्वातंत्र्य ज्योत' असून, चार स्मारके आहेत. त्यामध्ये सावरकरांच्या काव्यपंक्तीही लावण्यात आल्या होत्या.
- तत्कालिन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी हा पुढाकार घेतला होता आणि इंडियन ऑइलच्या माध्यमातून हे स्मारक उभारले होते.
- त्यानंतर काही महिन्यांमध्येच, केंद्रात 'यूपीए'चे सरकार आले आणि मणिशंकर अय्यर यांनी या काव्यपंक्ती हटविल्या होत्या. या निर्णयाचा देशभरातून विरोध झाला होता.
हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन आणि जवाहरलाल नेहरू भवन स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल
- स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यात राजधानीतील ४९ सरकारी इमारतींच्या आवारातील मलनिःसारण यंत्रणा, स्वच्छता आणि कचरापेटींची संख्या या बाबींची पाहणी केली.
- यामध्ये नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन आणि जवाहरलाल नेहरू भवन या तीन इमारतींनी २० रेटिंग मिळवून पहिले स्थान पटकावले. हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन आणि जवाहरलाल नेहरू भवनने स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सर्वाधिक १०, स्वच्छतेमध्ये ८ आणि कचरापेटींच्या संख्येत २ रेटिंग मिळवले.
- सरदार पटेल भवनने १८ रेटिंगसह दुसरा क्रमांक पटकावला, तर नवीन सीजीए इमारतीने १७ रेटिंग मिळवले.
- राष्ट्रपती भवन आणि साउथ ब्लॉकने १४ गुण मिळवत सहावे स्थान पटकावले आहे. कृषी भवन आणि शास्त्री भवनने सर्वात कमी ८ रेटिंग मिळवत तळाचा क्रमांक मिळवला. तर लोकनायक भवनने १० रेटिंगची कमाई केली.
- राजधानीतील १४ इमारतींनी १४ ते १६ दरम्यानचे रेटिंग मिळवले आहेत. नागरी विकास मंत्रालयाने सर्व संबंधित मंत्रालये आणि विभागांना हे रेटिंगचे पत्रक पाठवले असून स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, अशा सूचना दिल्या आहेत.
'पीएसएलव्ही'च्या साहाय्याने ५ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण
- आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अवकाश प्रक्षेपक तळावरून भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या (पीएसएलव्ही) साहाय्याने पाच विदेशी उपग्रह १० जुलै २०१५ रोजी अंतराळात पाठवले जाणार आहेत.
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि त्याची व्यावसायिक शाखा असलेले 'अँट्रिक्स' यांनी हाती घेतलेली ही आतापर्यंतची सगळ्यात जास्त वजनाची व्यावसायिक मोहीम आहे. या पाच उपग्रहांचे उड्डाण करतेवेळीचे एकूण वस्तुमान सुमारे १४४० किलोग्रॅम आहे.
- ब्रिटनच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लि. (एसएसटीएल)ने तयार केलेले तीन एकसारखे डीएमसी-३ प्रकाशीय पृथ्वी निरीक्षक उपग्रह पीएसएलव्ही-२८ हे प्रक्षेपक यान आपल्या तेराव्या उड्डाणात अवकाशात पाठवेल. या तीन उपग्रहांचे वजन प्रत्येकी ४४७ किलोग्रॅम आहे.
- याशिवाय, ब्रिटनमधील दोन सहायक उपग्रहदेखील पीएसएलव्ही-२८ वाहून नेणार आहे.
- ब्रिटनच्या एसएसटीएलच्या मालकीची उपकंपनी असलेली डीएमसी इंटरनॅशनल इमेजिंग आणि भारताची अँट्रिक्स कॉर्पोरेशन लि. यांच्यात झालेल्या करारानुसार हे आंतरराष्ट्रीय ग्राहक उपग्रह (कस्टमर सॅटेलाईट्स) अवकाशाच्या पृथ्वीजवळच्या कक्षेत पाठवण्यात येत आहेत.
- हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कुठल्याही लक्ष्याची दररोज छायाचित्रे घेऊ शकतील.
इस्रायलविरोधी ठरावात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत तटस्थ
- गाझा पट्टीमध्ये गेल्यावर्षी (२०१४) झालेल्या संघर्षामध्ये सहभागी असलेल्यांना युद्ध गुन्हेगार घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघामधील प्रस्तावाला अमेरिकेने विरोध केला आहे. भारतासह इतर चार देशांनी (केनया, इथिओपिया, पॅराग्वे व मॅसेडोनियाया) प्रस्तावावरील मतदानापासून स्वत:ला दूर ठेवत आपली या वादातील तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे.
- मानवाधिकार परिषदेने मांडलेल्या या प्रस्तावाला फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनसह ४५ देशांनी पाठिंबा दिला आहे.
- गेल्या वर्षी इस्राईल आणि पॅलेस्टाइनमध्ये झालेल्या ५१ दिवसांच्या संघर्षासाठी जबाबदार असलेल्यांना युद्ध गुन्हेगार ठरविण्याची मागणी करणारा हा प्रस्ताव आहे.
- या संघर्षामध्ये इस्राईलचे सैनिक आणि पॅलेस्टाइनमधील काही गटांकडून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे ‘यूएन’च्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- या प्रस्तावामध्ये कोणालाही जबाबदार धरले नसले तरी संबंधित व्यक्तींना राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये शिक्षा होण्याची मागणी करण्यात आली आहे.
- इस्राईलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचा पॅलेस्टाईनचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात पॅलेस्टाईनमध्ये २,१४० जणांचा बळी गेला होता. यापैकी बहुतांश नागरिक होते; तर इस्राईलमधील ७३ बळींमध्ये बहुतांश सैनिक होते. या संघर्षामध्ये इस्राईलने मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा वापर केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालातही म्हटले होते.
नीती आयोगाचे उपाध्यक्षांना कॅबिनेटचा दर्जा
- नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया यांना कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- त्याचप्रमाणे नीती आयोगातील पूर्ण वेळ सदस्य विवेक देबराय आणि व्ही. के. सारस्वत यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
- नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वेतन आणि भत्ते कॅबिनेट सचिवांप्रमाणेच असतील.
- नियोजन आयोग बरखास्त करून त्याच्या जागी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१५ रोजी नीती आयोगाची स्थापना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
माजी सरन्यायाधीश वाय. के. सबरवाल कालवश
- माजी सरन्यायाधीश वाय. के. सबरवाल यांचे ३ जुलै २०१५ रोजी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
- १ नोव्हेंबर २००५ ते १३ जानेवारी २००७ या कालावधीत ते देशाचे सरन्यायाधीश होते.
- सबरवाल यांची १९८६मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर एप्रिल १९८७ मध्ये ते स्थायी न्यायाधीश बनले.
- जानेवारी २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली.
- सबरवाल यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले. त्यात बिहार विधानसभा विसर्जित करण्याची कृती अवैध आणि घटनाबाह्य ठरवण्याच्या २००६ मधील निर्णयाचाही समावेश आहे.
कृती तिवारी 'डिजिटल इंडिया'ची ब्रँड अॅम्बेसिडर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘डिजिटल इंडिया’च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी इंदौर आयआयटीमधील टॉपर कृती तिवारीची निवड करण्यात आली आहे.
- ‘डिजिटल इंडिया’च्या पुढील वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये कृती पंतप्रधान मोदींच्या साथीने काम करणार आहे. ‘डिजिटल इंडिया’चा संदेश देशभर पोचविण्यासाठी कृती भारत भ्रमण करणार आहे.
- मोदींनी एक जुलैला ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाची घोषणा केली होती. यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांनी या क्षेत्रात तब्बल ४.५ लाख कोटी रुपयांची व १८ लाख हातांना काम देणाऱ्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
- ‘डिजिटल इंडिया’बद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
नेत्ररुग्णालय उभारणीसाठी अमेरिकेन भारतीयांची मदत
- बिहारमध्ये २०० खाटांचे विशेष नेत्ररुग्णालय उभारण्यासाठी अमेरिकास्थित भारतीयांनी तब्बल ७५,००० डॉलर्सचा निधी उभारला आहे. त्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती.
- शंकर आय फाऊंडेशन आणि बिहार फाऊंडेशन युएसए या दोन संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दरवर्षी तब्बल २५ हजार रुग्णांवर या रुग्णालयात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
- या रुग्णालयाच्या उभारणीसाठी एकूण ४ मिलियन डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयामुळे बिहारमधील लाखो नागरिकांना दरवर्षी लाभ होईल.
- रुग्णालय उभारण्यासाठीची पहिली पायरी म्हणून ७५ हजार डॉलर्सचा निधी उभा करण्यात आला आहे. या निधी उभारण्यासाठी मागील आठवड्यात अमेरिकेत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
व्यापम घोटाळा
- मध्य प्रदेशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक असलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाची (व्यापम) प्रवेश आणि भरतीप्रक्रिया गैरव्यवहार प्रकरणात आरोपींचे संशयास्पद मृत्यू होत असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
- व्यापमं गैरव्यवहार प्रकरणातील अनेक आरोपी आणि साक्षीदारांचे निधन झाल्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत या प्रकरणातील २७ आरोपींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
'स्नॅपडील'वर सहा कोटी रुपयांच्या पेंटहाउसची विक्री
- ऑनलाइन विक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'ने बेंगळुरूतील सहा कोटी रुपयांच्या पेंटहाउसची ऑनलाइन विक्री केल्यामुळे सध्या हि कंपनी चर्चेत आली आहे.
- ऑनलाइन प्रॉपर्टी विक्रीमध्ये हा आतापर्यंतची सर्वांत अधिक रकमेचा व्यवहार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली स्थित एका कंपनीने टाटा हाउसिंगमधील एक फ्लॅट ऑनलाइनद्वारे १.१ कोटी रुपयांना विकत घेतला होता.
- ऑनलाइन वस्तूविक्रीमध्ये आघाडीवर असणाऱ्या 'स्नॅपडील'ने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीबरोबरच वित्तीय सेवा देण्यावर भर दिला आहे. या शिवाय वाहन आणि प्रॉपर्टीविक्रीवरही कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.
- 'स्नॅपडील'ने गेल्या वर्षी रिअल इस्टेट क्षेत्रात पदार्पण केले होते.
अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त द्वैवार्षिक युद्ध सरावात जपानही सहभागी
- चीनच्या वाढत्या साहसवादाला आव्हान देण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त द्वैवार्षिक युद्ध सरावात जपानही ५ जुलै २०१५ रोजी प्रथमच सहभागी झाला.
- गेले दोन आठवडे उत्तरेकडील प्रांत तसेच क्वीनलॅण्ड स्टेट परिसरात युद्ध सराव सुरू असून अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे सुमारे ३० हजारांहून लष्करी अधिकारी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. या सरावात न्यूझीलंडच्याही ५०० हून अधिक सैनिकांचा समावेश होता. येत्या २१ जुलैपर्यंत हा सराव चालणार आहे.
- चीनने दक्षिण चीनच्या समुद्रातील पाण्याच्या वादग्रस्त हद्दीत कृत्रिम बेटांच्या उभारणीस प्रारंभ केला आहे. याखेरीज जपान नियंत्रित सेनकाकू बेटांप्रकरणीही चीनने जपानला आव्हान दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा