सहाय्यक पूर्वपरीक्षेकरिता सर्व विध्यार्थ्यांना "MPSC TOPPERS"तर्फे हार्दिक शुभेच्छा
सामाजिक, आर्थिक, जाती आधारित जनगणना अहवाल
- देशात पहिल्यांदाच सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित करण्यात आलेल्या जनगणनेचा अहवाल ३ जुलै २०१५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रसिद्ध केला.
- देशभरातील ६४० जिल्ह्यांत झालेल्या या जनगणनेसाठी कागदाचा वापर झालेला नाही. तब्बल ६.४ लाख इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे ही जनगणना पूर्ण करण्यात आली आहे.
- या अहवालातील जाती आधारित आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सध्या केवळ ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटिशांची सत्ता असताना १९३१ मध्ये अखेरची जातनिहाय जनगणना झाली होती.
- केंद्र आणि राज्य सरकारांना पुढील धोरण ठरविण्यासाठी या जनगणनेतील निष्कर्षांचा मोठा उपयोग होणार आहे.
या अहवालातील ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
- देशात एकूण २४.३९ कोटी कुटुंबे आहेत.
- ५६ टक्के कुटुंबे भूमिहीन (त्यातील ७० टक्के अनुसूचित जाती, ५० टक्के अनुसूचित जमाती)
- २३ टक्के कुटुंबांत २५ वर्षांपुढील एकही व्यक्ती साक्षर नाही
- ग्रामीण भागातील ४.६ टक्के कुटुंबाकडून प्राप्तिकर भरला जातो.
- ग्रामीण भागातील १० टक्के नोकरदार वर्ग प्राप्तिकर भरतो.
- अनुसूचित जातीमधील कुटुंबांची प्राप्तिकर भरणाऱ्यांची टक्केवारी ३.४९ इतकी आहे.
- अनुसूचित जमातीतील कुटुंबांची प्राप्तिकर भरणाऱ्यांची टक्केवारी ३.३४ इतकी आहे.
- देशातील १७.९१ कोटी कुटुंबे गावामध्ये राहतात. त्यापैकी २.३७ कोटी कुटुंबे (१३ टक्के) एका खोलीच्या कच्च्या घरामध्ये राहतात.
- देशातील एकूण कुटुंबांपैकी १४ टक्के कुटुंबे सरकारी किंवा खासगी नोकरीच्या आधारावर उदरनिर्वाह करत आहेत.
चौथे ‘विश्व साहित्य संमेलन’ अंदमानमध्ये होणार
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून ऑक्टोबर महिन्यात अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’ भरविण्यात येणार असल्याची घोषणा मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली.
- पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि ऑफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
- अमेरिकेतील सान फ्रांसिस्को, दुबई आणि सिंगापूर अशी तीन संमेलने झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलन घेण्यामध्ये अपयश आले. त्यानंतर टोरँटो येथे निश्चित झालेले संमेलन संयोजकांना आर्थिक निधी संकलित न करता आल्यामुळे रद्द झाले.
- तर, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ठरलेले संमेलन साहित्य महामंडळाने आधी सरकारकडून निधी मिळवून दिला तरच होईल, अशी अट संयोजकांनी घातल्यामुळे रद्दबातल झाले.
- टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास पत्राद्वारे त्यांनी नकार दिला. तत्यामुळे या संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्याऐवजी नवीन अध्यक्ष महामंडळाकडून नियुक्त केला जाणार आहे.
यापूर्वीची विश्व मराठी साहित्य संमेलने
| ||
---|---|---|
वर्ष
|
ठिकाण
|
अध्यक्ष
|
पहिले (२००९)
|
सॅनफ्रॅन्सिको
|
डॉ. गंगाधर पानतावणे
|
दुसरे (२०१०)
|
दुबई
|
मंगेश पाडगांवकर
|
तिसरे (२०११)
|
सिंगापूर
|
महेश एलकुंचवार
|
खासदारांच्या पगारात वाढ करण्याची शिफारस
- भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने खासदारांच्या पगारात आणि दैनिक भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याची शिफारस केली आहे. खासदारांच्या पगारात २०१० मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.
- सध्या खासदारांना मूळ वेतन ५० हजार रूपये आणि मतदारसंघ व कार्यालय खर्चाच्या रूपात प्रत्येकी ४५-४५ हजार रूपये मिळतात. अशा प्रकारे खासदारांना दरमहा एक लाख चाळीस हजार रूपये वेतन मिळते. खासदारांची त्यात वाढ करून दोन लाख ऐंशी हजार करण्याची मागणी आहे.
अन्य शिफारशी
- माजी खासदारांच्या निवृत्तिवेतनात ७५ टक्क्यांनी वाढ करावी.
- दैनिक भत्ता २,००० रूपयांवरून ५,००० रूपये करणे.
- मोफत विमान प्रवासांची संख्या ३४ वरून ४८ करणे.
- ७५ हजार रूपये फर्निचर भत्ता दुप्पट करणे.
- निवृत्त खासदारांना मोफत विमान प्रवास, स्वतःसह मुले व नातवंडांना आरोग्य सुविधांचा लाभ.
अन्य देशांतील खासदारांना मिळणारे वेतन
- ऑस्ट्रेलिया : २,०१,२०० रुपये
- अमेरिका : १,७४,००० रुपये
- जपान : १,४९,७०० रुपये
- ब्रिटन : १,०५,४०० रुपये
- स्पेन : ४४,००० रुपये
सेल्फी विथ डॉटर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जून रोजी आपल्या रेडिओवरील "मन की बात‘ कार्यक्रमातून आपल्या लेकीसोबत सेल्फी काढून #SelfieWithDaughter या हॅशटॅगद्वारे सोशल मिडियावर शेअर करण्याचे आवाहन केले होते.
- या मोहिमेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोक आपल्या लेकीसोबतची सेल्फी काढून शेअर करत आहेत. त्यामध्ये काही सेलिब्रिटींचाही व्यक्तींचा समावेश आहे.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, क्रिकेटपटू शिखर धवन, मलाला युसुफझाई, उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांनी आपल्या सेल्फी शेअर केल्या आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आता २ ट्रिलियन डॉलर
- जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आता २ ट्रिलियन डॉलरचा झाला आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (जीडीपी) २०१४ मध्ये २ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे असून सध्या देशाचे सकल आर्थिक उत्पन्न (जीडीपी) २.०६७ लाख कोटींवर (२.०६७ ट्रिलियन) पोचला आहे.
- गेल्या सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार एक लाख कोटींनी वाढला आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
- जागतिक पातळीवर भारत देशाची गणना निम्न-मध्यम उत्पन्न वर्गात केली जाते. शिवाय भारताचे प्रति व्यक्ती ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न वाढून १,६१० डॉलरवर पोचले आहे. सध्याच्या रुपया-डॉलर विनिमय दरानुसार ते रू. १,०१,४३० आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित
- एन्काउंटर स्पेशालिस्ट व धाडसी पोलिस अधिकारी म्हणून ख्याती असलेले दया नायक यांना वर्षभरापूर्वी नागपूर येथे सेवेत हजर होण्याचे आदेश दिले होते, परंतु नायक हे येथे रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- दया नायक यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी २००६ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीत २०१२ मध्ये दया नायक यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, दया नायक हे वर्षभरापासून नागपुरात कामावर रूजू न झाल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
- दया नायक यांनी सेवेत असताना ८०हून अधिक एन्काउंटर केल्याचे सांगण्यात येते. अंडरवर्ल्डपासून नागपूरमध्ये आपल्याला धोका असल्याचे कारण यापूर्वी दया नायक यांनी दिले होते.
ऑलिंपिक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तान प्रथमच अपात्र
- रिओ ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्याच्या पाकिस्तान हॉकी संघाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
- वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीत पाकिस्तानला आयर्लंडकडून ०-१ असा पराभव सहन करावा लागला. पाच ते आठ क्रमांकांसाठी झालेल्या या लढतीतील पराभवामुळे पाकिस्तानचा संघ सातव्या क्रमांकापुढे जाऊ शकत नाही आणि या हॉकी लीगमधून पहिले सहा संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरू शकतील.
- शिवाय, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांना ऑलिम्पिक पात्रतेची ही अखेरची संधी होती.
पार्श्वभूमी
- पाकिस्तानने १९४८ मध्ये ऑलिंपिक पदार्पण केले. तेव्हापासून ते प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत सहगभागी होती.
- ऑलिंपिकमध्ये तीन सुवर्णपदके मिळवणारे पाकिस्तान ताकदवर संघ समजला जातो. ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक आठ सुवर्णपदके मिळवणारा भारत आणि चार सुवर्ण जिंकणाऱ्या जर्मनीनंतर त्यांचा क्रमांक लागतो.
- ऑलिंपिक आणि विश्व स्पर्धेत एकाच वेळी अपात्र ठरण्याची ही पाकिस्तानची पहिलीच वेळ आहे.
- गेल्या वर्षी पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप हॉकीसाठीही पात्र होऊ शकला नव्हता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा