चालू घडामोडी : ३० मार्च

पायाभूत प्रकल्पांसाठी जपानकडून भारताला कर्ज

 • भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन (१४,२५० कोटी रुपये) कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे. हे कर्ज अधिकृत विकास साह्यतेच्या रूपात केले जाईल.
 • त्यात मध्यप्रदेशातील पारेषण प्रणाली मजबूत करण्यासाठी १५.४५ अब्ज येन, ओडिशातील एकीकृत साफसफाई सुधार प्रणाली मजबूत करण्यासाठी २५.७ अब्ज येन आणि समर्पित मालवाहतूक प्रकल्प (टप्पा-एक) आणि टप्पा तीनसाठी १०३.६ अब्ज येन अर्थसाह्य केले जाणार आहे.
 • याशिवाय ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी ६७.१ अब्ज येन, झारखंडमध्ये सूक्ष्म ड्रिप सिंचन प्रकल्पाद्वारे फळबागातील सुधारणांसाठी ४.६५ अब्ज येन दिले जाणार आहेत.
 • हे सारे कर्ज जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेद्वारे (जिका) दिले जाणार आहे.
 • अधिकृत विकास साह्यता अंतर्गत दिले जाणारे कर्ज साधारणपणे द्विपक्षीय मदत आणि बहुपक्षीय मदतीच्या स्वरूपात दिले जाते.
 • विशेषत: द्विपक्षीय मदतीतहत विकसनशील देशांना थेट मदत दिली जाते; तर बहुपक्षीय मदत आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे दिली जाते.

‘उदय’ रोख्यांची विक्री

 • केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या उज्ज्वल डिसकॉम अॅशुरन्स योजना अर्थात उदय अंतर्गत निधी उभारणी सुरू आहे.
 • या निधीच्या साह्याने विविध राज्यांतील कर्जबाजारी झालेल्या वीज वितरण कंपन्यांना संजीवनी देण्यात येणार आहे.
 • यासाठी रोख्यांची विक्री करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
 • बिहार, हरयाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, पंजाब व राजस्थान या राज्यांनी हे रोखे बाजारात विक्रीसाठी आणले आहेत.
 • रोखे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांनी प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे ३० मार्चपर्यंत रोखे खरेदी करावी लागणार आहे.

‘नॅफकब’ अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता

 • ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटी’च्या (‘नॅफकब’) अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता यांची निवड झाली आहे.
 • नॅफकब ही देशातील सर्व सहकारी बँका व पतसंस्थांची शिखर संस्था आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मेहता हे पुढील तीन वर्ष नॅफकबचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 
 • गुजरात स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या मेहता यांनी गुजरातमधील सहकारी बँकांना अडचणीतून सोडवत नफ्यात आणले आहे.

पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला

 • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • शुक्ला या १९८८च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त आणि आयुक्तपदी काम केले आहे.
 • मुंबई शहर पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्या पोलिस दलात परिचित आहेत.
 • पुण्याचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के. के. पाठक ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार हे स्पष्ट होते. त्यांची जागा आता रश्मी शुक्ला घेतील.
 • शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा मान मिळविणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी आयुक्तपद भूषविले होते.

शर्मिला इरोम दोषमुक्त

 • मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां शर्मिला इरोम यांना दिल्ली न्यायालयाने २००६ मधील जंतरमंतर येथे उपोषणाच्या वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे.
 • मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां असलेल्या इरोम या गेली सोळा वर्षे उपोषण करीत आहेत. मणिपूरमधील आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट (एएफएसपीए) हा कायदा रद्द कायदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.
 • ४ ऑक्टोबर २००६ रोजी इरोम यांनी या मागणीकरिता दिल्लीत जंतरमंतर येथे प्राणांतिक उपोषण केले होते.
 • शर्मिला यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला होता. शर्मिला या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत. 

म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव

 • लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव यांनी शपथ घेतली.
 • लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असले हितीन क्याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 
 • स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्यू की यांनी हितीन क्याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
 • स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे हितीन क्याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय स्यू की यांनीही परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा