अमेरिकेतील ‘९११’, इंग्लंडमधील ‘९९९’ या आपत्कालीन संपर्क क्रमांकांच्या धर्तीवर आता भारतातही भारतातही ‘११२’ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करावा या ट्रायच्या प्रस्तावाला सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली आहे.
भारतात सध्या १०० (पोलिस), १०१ (अग्निशामन), १०२ (रुग्णवाहिका) आणि १०८ (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो. पण, आता या सर्व सुविधा ११२ क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.
संपूर्ण देशभरात ११२ या एकाच क्रमांकवर संपर्क साधल्यास अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होऊ शकणार आहे.
घटनास्थळापर्यंत मदत पोहचविण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्याची सर्व माहिती संबंधित विभागांना तत्काळ देण्यात येईल. त्यामुळे मदत पोचविण्यास मदत होणार आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार मंत्रालयाला दिलेल्या एका अहवालामध्ये देशभरात एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याची सूचना केली होती. त्यासाठी ११२ हा क्रमांकही निश्चित करण्यात आला होता.
या सेवेमध्ये सुरुवातीला पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, महिलांना सहाय्य, वृद्धांना सहाय्य आणि लहान मुलांसाठी सहाय्य याचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर टप्याटप्प्याने त्यामध्ये इतर सेवांची वाढ करण्यात येणार आहे.
ही सेवा अधिक उपयुक्त आणि कार्यक्षम करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही या क्रमांकाला वेगळे प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर एसएमएसच्या साह्यानेही ही सेवा पुरविण्यात येईल.
ट्राय (TRAI) : Telecom Regulatory Authority of India (दूरसंचार नियामक प्राधिकरण)
सेबीला सहारा समुहाची मालमत्ता विकण्याची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाने भांडवली बाजार नियामक मंडळ ‘सेबी‘ला सहारा समुहाच्या ८६ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.
मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्यासाठीदेखील वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
परंतु सर्कल रेटपेक्षा ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दराने निविदा आल्या नाही तर या मालमत्ता विकू नयेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
सुब्रतो रॉय १४ मार्च २०१४ पासून तुरुंगात असून न्यायालयाने त्यांच्या जामीनासाठी १०,००० कोटी रूपये रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे. त्यापैकी ५,००० कोटी रोख तर उर्वरित रक्कम बँक गॅरंटीच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे.
शिवाय, सर्व व्याजासह ३६,००० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची अवघड अट कंपनीसमोर आहे. सहारा समुहातील गुंतवणूकदारांना ही रक्कम परत केली जाणार आहे.
नियोजित रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीच्या विदेशातील मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी सहारा समूहाला मिळाली होती.
रॉय यांना खरेदीदारांशी चर्चा करण्यासाठी तुरंगात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु त्यासाठी कोणीही खरेदीदार न मिळाल्याची सबब कंपनीने दिली होती.
देशातील निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
‘असोचेम’ या उद्योग संघटनेच्या एका अभ्यास अहवालानुसार देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
निर्यातीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर असून देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के आहे. त्यात महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे.
२००७-०८ ते २०१४-१५ या वित्तीय वर्षातील निर्यातीचे विश्लेषण केले असता २०१४-१५ या वर्षात ७२.८३ अब्ज डॉलरची निर्यात करून महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले. या काळात गुजरातमधून ५९.५८ अब्ज डॉलरची निर्यात झाली.
या अभ्यासात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना भौगोलिकदृष्ट्या विशाल सागरी किनारा असल्याने त्यांना निर्यातीत फायदा झाला.
पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना मात्र निर्यात वाढविण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सेवांत सुधारणा करणे आवश्यक आहे.
ASSOCHAM : Associated Chambers of Commerce and Industry of India
ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये १०० टक्के एफडीआय
झपाट्याने विकसित होणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
मात्र, ही मान्यता देताना ज्या कंपन्या ‘मार्केट प्लेस’ पद्धतीने व्यवहार करतात, त्यांनाच गुंतवणूक घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशनने ही मान्यता दिली आहे.
पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुकमध्ये
प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक जास्त गाणी गायिल्याने त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
पी. सुशीला मोहन यांनी भारतातील १२ भाषेतून १७,६९५ गाणी गायली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे, तर अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये १७,३३० गाणी गायल्याचे नोंद करण्यात आले आहे. रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेली गाणी ही १९६० पासूनची आहेत.
गेल्या पाच दशकाच्या करिअरमध्ये पी. सुशीला मोहन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. अमित समर्थ ‘रॅम’साठी पात्र
नागपूरचे ॲथलिटडॉ. अमित समर्थयांनी नवी दिल्ली ते वाघा बॉर्डर ही एक हजार किमी अंतराची ‘ब्रेव्हेट’ सायकल शर्यत २७ मार्च रोजी पूर्ण केली. ही शर्यत पूर्ण करणारे ते विदर्भातील पहिले ॲथलिट ठरले.
या साहसी उपक्रमाची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी सहाला ऐतिहासिक इंडिया गेट येथून झाली.
दिल्ली ते वाघा बॉर्डर आणि परत वाघा बॉर्डर ते दिल्ली हे एक हजार किमी अंतर सायकलपटूला ७५ तासांत पूर्ण करावयाचे होते. मात्र, डॉ. समर्थ यांनी ५४ तासांतच अंतर कापले.
या कामगिरीमुळे ते जगातील सर्वांत जुन्या व प्रतिष्ठेच्या ‘रेस ॲक्रॉस अमेरिका’ (रॅम)साठी पात्र ठरले. या शर्यतीत आतापर्यंत एकही भारतीय वैयक्तिक गटात यशस्वी ठरला नाही.
नऊ वेळा ‘आयर्न मॅन’ किताब पटकाविणाऱ्या डॉ. समर्थ यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे ते गोवा ही साडेसहाशे किमी अंतराची डेक्कन क्लिफहॅंगर शर्यत अवघ्या ३६ तासांत पूर्ण केली होती.
व्यवसायाने डॉक्टर असलेले अमित समर्थ प्रो हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून विदर्भातील युवकांना सायकल चालविण्याबद्दल प्रेरित करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा