६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २८ मार्च रोजी दिल्लीत करण्यात आली.
यामध्ये मूळ तमिळ व तेलुगू भाषेत निर्मिती झालेल्या एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाला २०१५-१६साठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून जाहीर करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला. अमिताभ यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
कंगना राणावतला ‘तनू वेड्स मनू अगेन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान जाहीर झाला. तिला सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळाला आहे.
बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर ‘बजरंगी भाईजान’ला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
हरियाणामध्ये जाट समाजाला आरक्षण मंजूर
शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकाचा मसुदा हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केला.
तीन एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा जाट समुदायाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणा मागासवर्ग (सेवेत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश) विधेयक २०१६ आणि हरयाणा मागासवर्ग आयोग विधेयक २०१६ अशी दोन विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. ही दोन्ही विधेयके सभागृहाने एकमताने मंजूर केली.
जाटांबरोबरच शीख, रोर, बिश्नोई आणि त्यागी या चार जातींना सरकारी आणि सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये आणि वर्ग तीन आणि वर्ग चार सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.
‘अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समिती‘ या संघटनेच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारीमध्ये जाट आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये नऊजणांना प्राण गमवावे लागले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियम दौऱ्यावर
बेल्जियमसह अन्य दोन देशांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मार्च रोजी रवाना होणार आहेत. अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन देशांनाही ते भेट देणार आहेत.
ब्रुसेल्समध्ये भारत-युरोपियन युनियनच्या (ईयू) महत्त्वपूर्ण बैठकीस मौदी उपस्थित राहतील. दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत ते बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
ब्रुसेल्सहून मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला जातील. आण्विक सुरक्षा परिषदेच्या चौथ्या बैठकीस ते उपस्थित राहतील. ३१ मार्च व १ एप्रिल रोजी ही बैठक होईल.
अमेरिकेहून मोदी सौदी अरेबियाला जातील. राजे सलमान बीन अब्दुलाझिझ अल सौद यांच्या निमंत्रणानुसार मोदी रियाधला जात असून, तेथे ते दोन दिवस असतील.
फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणार
१ एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य होणार आहे. फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना १३९ क्रमांकावर फोन करावा लागेल.
त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल. पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.
रेल्वे तिकिटांचा काळा-बाजार करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवासभाड्याच्या नियमांमध्ये बदल केले होते. मात्र गरजू प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळेच आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी १३९ क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
अफगाणिस्तान संसदेवर रॉकेट हल्ला
भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर २८ मार्च रोजी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला.
अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांची बैठक सुरु असताना हा रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.
अफगाणिस्तानला संसदेची नवी इमारत बांधून देण्यात भारताने निधीसह अन्य मदत मोठया प्रमाणावर केली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ही संसद इमारत आहे. डिसेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा