चालू घडामोडी : ३ मार्च
काळेधन जाहीर करण्यासाठी पूर्तता कक्ष
- काळेधन जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने चार महिन्यांसाठी पूर्तता कक्ष सुरू केला आहे. चार महिन्यांसाठी सुरू होणारा हा पूर्तता कक्ष १ जूनपासून सुरू होईल आणि तो पुढे चार महिने खुला राहिल.
- या कक्षाचा लाभ उठवत या कालावधीत काळेधन जाहीर केल्यास त्या धनावर ३० टक्के कर व १५ टक्के दंड भरावा लागणार आहे.
- हा कक्ष बंद झाल्यानंतर दंडाची रक्कम ६० टक्के होणार आहे, त्याचवेळी कराची रक्कम ३० टक्के होईल. यामुळे एकूण कर ९० टक्के भरावा लागेल. तसेच सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
- काळेधन बाळगणाऱ्यांविरोधात सरकारने धडक कारवाई सुरू केल्यापासून गेल्या दोन वर्षांत देशात निर्माण झालेल्या सुमारे २० हजार कोटी रुपये काळेधन उघडकीस आणण्यात सरकारला यश आले आहे.
सुरक्षित वीज पुरवठ्यात भारत ९० व्या स्थानी
- स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात १२६ देशांच्या यादीत भारताला ९० वा क्रमांक देण्यात आला आहे. जागतिक आर्थिक मंचने (डब्लूईएफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.
- ‘ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यात १२६ देशांतील वीज पुरवठ्याचे आकलन करण्यात आले आहे. त्यात उचित मूल्य, पर्यावरण, कायम आणि सुरक्षित पुरवठा यांचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सर्वाधिक महाग शहरांमध्ये मुंबई सतरावी
- लंडनमधील सविल्स या रिअल इस्टेट कंपनीने जगभरातील जगण्यासाठी आणि काम करण्याच्या दृष्टिकोनातून महाग शहरांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये लंडन पहिल्या क्रमांकावर व त्यापाठोपाठ न्यूयॉर्क आणि हाँगकाँग ही शहरे आहेत.
- सर्वाधिक महाग शहरांच्या या यादीत पहिल्या २० शहरांमध्ये देशातील मुंबई या एकमेव शहराचा समावेश झाला असून, या यादीत मुंबई सतराव्या स्थानावर आहे. बर्लिन, जोहान्सबर्ग आणि रिओ डी जनेरो या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे.
- जगभरातील अग्रेसर शहरांमधील निवासी आणि कार्यालय निवासाचे प्रतिमाणसी एकूण वार्षिक भाडे, याची तुलना करून ही यादी तयार केली आहे.
- या सर्वेक्षणानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत लंडन १८ टक्क्यांनी अधिक खर्चिक झाले आहे. सर्वाधिक पसंतीस उतरणारी लंडन आणि न्यूयॉर्क ही शहरे व्यवसाय आणि काम करण्याच्या दृष्टीनेही महाग आहेत.
अहमदाबाद, जयपूर विमानतळांचा विकास
- सिंगापूरच्या जगप्रसिद्ध चंगी विमानतळाच्या धर्तीवर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एआयएपी) व जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.
- यासाठी चंगी एअर लिमिटेड ऑपरेशन व मॅनेजमेंट कंपनी येत्या जून महिन्यापासून कामाला सुरवात करणार आहे. त्यानुसार नुकतेच चंगी विमानतळाच्या (सीआयए) अधिकाऱ्यांनी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून (एएआय) अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या प्रस्तावित कराराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
- अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या विकासासाठी मोदींच्या नोव्हेंबरमधील सिंगापूर दौऱ्यादरम्यान एएआय सिंगापूर को ऑपरेशन एंटरप्रायझेसबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारनेही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने कडक निर्बंध लादल्यानंतरही त्याची कसलीही पर्वा न करता किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर अलीकडेच २० वर्षात प्रथमच कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार उत्तर कोरियाला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र चाचणी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- उत्तर कोरियाने नुकतेच हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले होते. पण, उत्तर कोरियाने यूएनच्या निर्बंधांना न जुमानता पुन्हा एकदा चाचणी घेतली आहे.
न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे निधन
- न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज मार्टिन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाले.
- मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते. क्रो यांनी ७७ कसोटी आणि १४३ एकदिवसीय सामने खेळले होते. क्रो यांनी कसोटीत ४५.३६ च्या सरासरीने ५,४४४ धावा करत १७ शतके झळकावली होती. तर एकदिवसीय कारकीर्दीत त्यांनी ३८.५५च्या सरासरीने ४,७०४ धावा केल्या होत्या.
- क्रो हे सलग १३ वर्ष न्यूझीलंड संघाचे सदस्य होते. ते चार वर्षे न्यूझीलंडसंघाचे कर्णधार होते. क्रो यांनी आपली शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता.
- आयसीसी हॉल ऑफ फेममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.
पोप फ्रान्सिस पाकिस्तान दौऱ्यावर
- ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून इस्लामिक राष्ट्रांतील हा त्यांचा पहिलाच दौरा ठरणार आहे.
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जहाजबांधणीमंत्री कामरान मिशेल यांच्यातर्फे पोप यांना निमंत्रण दिले असून, पोप फ्रान्सिस यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. सध्याच्या पाकिस्तान मंत्रिमंडळात मिशेल हे एकमेव ख्रिश्चन मंत्री आहेत.
- या दौऱ्यात पोप पंतप्रधान नवाझ शरीफ आणि राष्ट्रपती मामनून हुसेन यांची भेट घेणार आहेत. ते अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजाशी व्यापक चर्चा करणार आहेत. तसेच, पाकिस्तानमधील काही चर्चला ते भेट देतील.
रस्ते अपघातांसाठी हेल्पलाइन
- वाहतूक आणि रस्त्यावरील अपघाताच्या अनुषंगाने १०३३ या क्रमांकाला राष्ट्रीय स्थरावरील हेल्प-लाइन क्रंमाक म्हणून कार्यान्वित करण्यात आला आहे, त्यामुळे अपघातावेळी लोकांना तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे केंद्रीय मंत्री : नितीन गडकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा