चालू घडामोडी : १४ मार्च
हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँण्ड लायसेन्सिंग पॉलिसी (HELP)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हायड्रोकार्बनचा शोध आणि परवाना धोरण अर्थात HELPला मान्यता देण्यात आली.
- या धोरणाची ४ प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
- सर्व प्रकारच्या हायड्रोकार्बनचा शोध आणि उत्पादनासाठी समान परवाने
- एकूण एकर जमिनीबाबत खुले धोरण
- महसूल वाटपाचा सुलभ नमुना
- उत्पादित खनिज तेल आणि भू-गर्भ वायूसाठी विपणन आणि दर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य
- या निर्णयामुळे देशांतर्गत तेल आणि भू-गर्भ वायू उत्पादनाला चालना मिळेल, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल.
- या धोरणाअंतर्गत पारदर्शकतेला चालना देण्यावर तसंच प्रशासकीय दूरदर्शित्व कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
- समान परवान्यामुळे एकाच परवान्याअंतर्गत तेल आणि भूगर्भ वायू स्त्रोतांचा परंपरागत आणि अ-पारंपारिक शोध घेणे कंत्राटदाराला शक्य होणार आहे. तसेच निश्चित केलेल्या भू-भागातून विशिष्ट भागाची निवड करता येईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
- दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देणाऱ्या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला’ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
- या योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसच्या ५ कोटी जोडण्या प्रदान केल्या जाणार असून, त्यासाठी ८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक जोडणीसाठी १६०० रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे.
- राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा करुन पात्र लाभार्थी निश्चित केले जातील. २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ अशा तीन वित्तीय वर्षात ही योजना राबवली जाणार आहे.
- या योजनेमुळे देशभरात स्वयंपाकासाठी गॅस जोडण्यांचा वापर शक्य होणार असून, त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.
- केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेबाबत घोषणा केली होती.
‘अग्नी-१’ची चाचणी यशस्वी
- भारतीय लष्कराने ओडिशाच्या किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून (व्हीलर बेट) ‘अग्नी-१’ या स्वदेशी बनावटीच्या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
- या क्षेपणास्त्राच्या प्रवासमार्गाचे अत्याधुनिक रडार व नौदलाच्या जहाजांच्या सहाय्याने काटेकोर निरीक्षण करण्यात आले.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला ७०० किलोमीटर आहे. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यामधील अग्नी हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
- १२ टन वजन व १५ मीटर लांबी असलेल्या अग्नी-१ क्षेपणास्त्रावरुन १ टनापेक्षा जास्त वजनाची स्फोटके वाहून नेता येणे शक्य आहे. याचबरोबर, स्फोटकांचे वजन (पेलोड) कमी करुन क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्य आहे.
मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी बहरीनबरोबर करार
- मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी विशेषत: स्त्रिया व बालकांच्या तस्करीला रोखण्यासाठी भारत आणि बहरीन दरम्यान एका सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने १० मार्च २०१६ रोजी मान्यता दिली.
- बहरीन येथे प्रामुख्याने वेठबिगारी व वेश्याव्यवसायाकरीता महिला व पुरुषांची तस्करी केली जाते. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध वृद्धिंगत होणार आहेत.
- या करारामुळे मानवी तस्करी विशेषत: स्त्रिया व बालकांच्या तस्करीसंदर्भात प्रतिबंध, बचावकार्य, पुनर्प्राप्ती आणि परत पाठवणी या विषयांवरील द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळणार आहे.
- या सामंजस्य कराराअंतर्गत तस्करी विरोधी पथक व कृती दल मानवी तस्करीला रोखण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्य करणार आहे.
छगन भुजबळ यांना अटक
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंडरिंग कायद्याखाली अटक केली.
- नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार लाचलुचपतविरोधी पथक आणि ईडीच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरू होता.
- चार वर्षांपासून या प्रकरणी एसआयटीने सखोल तपास केला. या प्रकरणी उपलब्ध पुराव्यांच्या अनुषंगाने भुजबळ यांचा पुतण्या माजी खासदार समीर आणि मुलगा आमदार पंकज या दोघांचीही एसआयटीने चौकशी केली होती.
- त्यात भुजबळ यांनी पदाचा गैरवापर करून कंत्राटदाराला कोट्यवधींचा फायदा मिळवून दिल्याचे; तसेच उपकंपन्या स्थापन करून स्वतःच कामे घेतल्याचा आरोपही ठेवण्यात आला.
- यातील बरीच मोठी रक्कम हवालाद्वारे परदेशात पाठविण्यात आल्याचा ठपका भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर ठेवण्यात आला होता.
- याबाबत ईडीने माजी खासदार समीर भुजबळ यांची चौकशी करून एक फेब्रुवारीला अटक केली होती, तर पंकज यांचीसुद्धा काही दिवसांपूर्वी चौकशी झाली होती.
संघाच्या पारंपारिक गणवेशात बदल
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या पारंपारिक गणवेशात बदल केला आहे. संघ स्वयंसेवक आता खाकी हाफपँटऐवजी तपकिरी रंगाची फुलपँट परिधान करणार आहेत.
- राजस्थान नागौर येथे सुरु असलेल्या संघाच्या तीन दिवसीय बैठकीच्या अंतिम दिवशी संघाच्या पोषाखात बदल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
- १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून खाकी हाफपँट संघाची ओळख होती. खाकी हाफपँट सोडली तर, संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल झाले होते.
- संघाच्या स्थापनेपासून खाकी शर्ट आणि खाकी पँट संघाचा गणवेश होता. १९४० मध्ये खाकी शर्टच्या जागी सफेद शर्टाचा वापर सुरु झाला.
- १९७३ मध्ये संघाच्या गणवेशामध्ये लेदर बुटांचा वापर सुरु झाला. त्यानंतर रेक्सिन बूट वापरण्यालाही परवानगी देण्यात आली.
राहण्यायोग्य देशांच्या यादीत भारत २२वा
- राहण्यासाठी योग्य असलेल्या सर्वोत्कृष्ट ६० देशांच्या यादीत भारताने २२वे स्थान मिळविले आहे. जागतिक अर्थ परिषदेत याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली.
- पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठाने अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशिया या चार खंडांमधील ३६ देशांमध्ये पाहणी करून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर देशांचे मानांकन निश्चित करण्यात आले आहे.
- महत्त्वाचे व्यवसाय, आर्थिक आणि जीवनशैलीचा दर्जा या पातळीवरील संमिश्र कामगिरीच्या आधारावर साठ देशांची निवड करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१३मधील एकूण देशांतर्गत उत्पादनातील आघाडीचे १०० देश, जागतिक बॅंकेच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळातील आघाडीचे १०० देश, संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१४मधील मानवी विकास निर्देशांकमधील आघाडीचे १५० देश आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्याच २०१३मधील परकी थेट गुंतवणुकीतील आघाडीच्या १०० देशांमधील मानांकनावरून सर्वोत्कृष्ट देशांची यादी तयार करण्यात आली.
- प्रत्येक देशासाठी गुणात्मक पातळीवर नऊ उपमानांकनांचे गट तयार करण्यात आले होते. यामध्ये साहस, नागरिकत्व, संस्कृतीचा प्रभाव, उद्योजकता, वारसा, कार्यक्षमता, व्यवसायासाठी संधी, ताकद आणि जगण्याचा दर्जा यांचा समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा