स्वतंत्र मराठवाडा करण्याचे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असलेले महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राज्यपाल सी. विद्यासागार राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
शिवसेनेने राजीनाम्याबरोबरच त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे. तर विरोधी पक्षाने अणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली.
जालना येथील एका कार्यक्रमात बोलताना विदर्भासह मराठवाडाही स्वतंत्र व्हावा असे वादग्रस्त वक्तव्य श्रीहरी अणे यांनी केले होते.
अगस्त्यमाला जैवपर्यावरण क्षेत्र
जैव पर्यावरण क्षेत्रांच्या जागतिक साखळीमध्ये युनेस्कोने आणखी १९ नव्या ठिकाणांचा समावेश केला असून, त्यात भारतातील अगस्त्यमाला जैव पर्यावरण क्षेत्राचेही नाव आहे.
पेरूची राजधानी लिमामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या या निर्णयामुळे जागतिक साखळीमधील जैवपर्यावरण क्षेत्रांची संख्या ६६९ झाली आहे.
नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या जैवावरणात नवीन १८ ठिकाणांचा समावेश असून एक जैवावरण हे स्पेन व पोर्तुगाल यांच्यात संयुक्त आहे.
आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायदा
येत्या एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले.
यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या २१ होणार आहे.
डिजिटायझेशन, आधार कार्ड, रेशन कार्डला जोडले जाणे, संगणकीकृत यंत्रणा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी या राज्यांनी पूर्ण केल्या आहेत.
देशभरातील एकूण २४ कोटी १८ लाख ५० हजार रेशन कार्डांपैकी ९९.९० टक्के रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात केले असून, ४८ टक्के रेशन कार्ड आधार कार्डला जोडण्यात आले आहेत.
ब्रुसेल्स येथील विमानतळावर दहशतवादी हल्ला
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील झॅव्हनटेम विमानतळाचा प्रस्थान कक्ष आणि मेट्रो स्टेशन अशा दोन ठिकाणी २२ मार्चच्या सकाळी बॉम्बस्फोट झाले.
या घटनेनंतर ब्रुसेल्स विमानतळ खाली करण्यात आले. तसेच विमानतळाकडे जाणारी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.
या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ३४ जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एक महिला आणि एक पुरुष अशा दोन भारतीयांचा समावेश असून हे दोघेही जेट एअरवेजचे कर्मचारी आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी ब्रसेल्समध्ये हल्ला करण्यात आला.
बेल्जियमचे पंतप्रधान : चार्ल्स मिचेल
इंटेलचे माजी सीईओ अँडी ग्रूव्ह यांचे निधन
संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी १९८०च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले.
इंटेलमध्ये ३७ वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता.
जोकोव्हिच आणि अझारेन्का यांना इंडियन वेल्स स्पर्धेचे जेतेपद
नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे तिसरे जेतेपद आहे.
अंतिम लढतीत जोकोव्हिचने खोलवर सर्व्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकचा ६-२, ६-० असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला ६-४, ६-४ असे नमवले.
जेतेपदासह अझारेन्काने २०१४ नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा