पाच ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारी आघाडीची रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा यंदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.
यामुळे १२ मार्चपासून तिला तात्पुरते निलंबित केल्याचे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) जाहीर केले आहे.
शारापोव्हाने याबद्दल पत्रकार परिषद घेऊन दोषी ठरल्याची कबुली दिली आहे. तिने सेवन केलेल्या औषधावर यंदा मोसमाच्या सुरुवातीपासून बंदी घालण्यात आली होती. याबद्दल माहिती नसल्याने ही चूक घडल्याचे तिचे म्हणणे आहे.
२००६पासून शारापोव्हा ‘मेल्डोनियम’ या औषधाचे सेवन करते आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने यंदा २०१६च्या सुरुवातालीला या औषधाचा समावेश बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये करण्यात आला.
मात्र ही यादी शारापोव्हाने वाचली नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे सेवन करत असलेले औषध बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत असल्याचे तिला कळले नाही.
गुंतवणुकीसाठी पोषक राज्यांत महाराष्ट्र पाचवा
आर्थिक विषयातील थिंक टँक असणाऱ्या ‘एनसीएईआर’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार गुंतवणुकीसाठी पोषक असणाऱ्या देशातील एकवीस राज्यांच्या यादीत गुजरातने पहिला क्रमांक पटकावला आहे.
गुजरातपाठोपाठ दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे.
यादीमध्ये वीस राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. मजूरांची उपलब्धता, पायाभूत सोयीसुविधा, आर्थिक वातावरण, प्रशासन, राजकीय स्थैर्यता यांसह ५१ निकषांच्या आधारे राज्यांचे क्रम निर्धारित करण्यात आले आहेत.
२१ राज्यांपैकी बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांना गुंतवणुकीसाठी खूप प्रयत्न करावे लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील गुंतवणूकयोग्य राज्यांमध्ये ईशान्य भारतातील आसाम या एकमेव राज्याचा अंतर्भाव अहवालात करण्यात आला आहे.
या अहवालात संबंधित राज्यांतील भ्रष्टाचार, परवानग्या मिळण्यात येणाऱ्या अडचणी आदी समस्यांचाही आढावा घेण्यात आला आहे.
माळढोक पक्षी अभयारण्याच्या सीमेचे पुनर्गठण
माळढोक अभयारण्याच्या एकूण ८८७.६५ चौरस किमी खासगी क्षेत्रापैकी अत्यावश्यक क्षेत्र म्हणून फक्त ४.८० चौरस किमी क्षेत्र संपादित करून उर्वरित ८८२.८४ चौरस किमी खासगी क्षेत्र अभयारण्यातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यामुळे आता जमीन खरेदी-विक्री, गहाण ठेवण्यासह बॅंकेतून कर्ज देण्या-घेण्याच्या सर्वच बाबी करता येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा