सागरी भारत परिषद २०१६ (मेरीटाईम इंडिया समिट २०१६ : एमआयएस २०१६) हा भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाचा एक अभिनव उपक्रम आहे.
या परिषदेत सहभागी होणाऱ्या व्यक्तिंना भारतीय सागरी क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देणारे व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश्य आहे.
मुंबईत १४ ते १६ एप्रिल २०१६ या कालावधीत एमआयएस २०१६चे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये परिषद, प्रदर्शन व प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे. सागरी भारत परिषद २०१६ साठी दक्षिण कोरिया हा भागीदारी देश आहे.
वरिष्ठ सरकारी अधिकारी व धोरणकर्ते, भारतीय व जागतिक सागरी उद्योग क्षेत्रातले मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग तज्ञ तसेच जगभरातले नेते आणि मान्यवर वक्ते असे अंदाजे २००० लोक या परिषदेत सहभागी होतील.
या परिषदेला दक्षिण कोरिया, नॉर्वे, सिंगापूर, संयुक्त अरब अमीराती, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपियन युनियन सारख्या सागरी देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
सूरत भारतातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक
रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भारतातील १६ झोनमधील एकूण ४०७ रेल्वे स्थानकांमध्ये सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ स्थानक असून महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाला चौथा क्रमांक मिळाला आहे.
भारतीय रेल्वे आणि टीएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी देशभरातील १६ झोनमधील ‘ए-१’ आणि ‘ए’ श्रेणीतील एकूण ४०७ रेल्वे स्थानकांची पाहणी केली.
त्यापैकी १३ स्थानकांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशिष्ट श्रेणीत स्थान मिळविले तर ९२ स्थानकांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम श्रेणीत स्थान पटकावले.
या सर्व स्थानकांचा अभ्यास करताना प्राथमिक सोयीसुविधांसह वेगवेगळ्या ४७ घटकांचा अभ्यास करण्यात आला. तसेच प्रवाशांकडूनही माहिती गोळा घेण्यात आली.
या सर्व स्थानकांमध्ये सूरत हे सर्वात स्वच्छ स्थानक असल्याचे आढळून आले आहे. तर राजकोट आणि विलासपूर अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ स्थानक ठरले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाचा क्रमांक लागला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील केवळ ४ स्थानकांना पहिल्या ७५ मध्ये स्थान मिळवता आले.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६
प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०११च्या जागी केंद्र सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अधिसूचित केला आहे.
प्लास्टिकच्या महाप्रचंड व अतिरिक्त वापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्लास्टिक कचराबंदीबाबतची ही नवी अधिसूचना जारी केली.
देशभरातील प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्याची जबाबदारी या प्लास्टिकचे उद्योजक व ग्रामपंचायतींपासून सर्वांवर लागू होईल. यासाठी राबविल्या जाणाऱ्या व्यापक जनजागृती मोहिमेचे घोषवाक्य ‘प्लास्टिक नही कपडा सही’ हे असेल.
यानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या किमान जाडीची ४० मायक्रॉन्सची मर्यादा वाढवून ५० मायक्रॉन्स करण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम देशातील सहा लाख ग्रामपंचायतींनाही लागू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला या नियमांमुळे हातभार लागणार असून त्यामुळे स्वच्छतेच्या आघाडीवर लक्षणीय सुधारणा होईल.
केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल राज्यमंत्री : प्रकाश जावडेकर
जाहिरातींमध्ये पुन्हा राजकीय नेत्याचे छायाचित्र
शासकीय जाहिरातींमध्ये यापुढे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राज्यमंत्र्यांचे छायाचित्र वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांच्या छायाचित्रांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा सरकारी जाहिरातींमध्ये यापुढे वापर करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १३ मे २०१५ रोजी दिला होता.
या आदेशाचा पुनर्विचार करावा यासाठी केंद्र सरकारसह आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो असावेत आणि त्यातील मजकूर काय असावा हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी सरकारचा आहे. न्यायालयाने अशा धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू नये, असा मुद्दा केंद्र सरकारने मांडला होता.
मुख्यमंत्र्यांचा फोटो सरकारी जाहिरातीत टाकण्यास मनाई करणे हे देशाच्या संघीय रचनेच्या विरोधात आहे, असे याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद विचारात घेऊन अखेर न्यायालयाने ही बंदी उठवली.
अँड्रय़ू वाइल्स यांना आबेल पुरस्कार
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर अँड्रय़ू वाइल्स यांनी तीनशे वर्षे गूढ बनून राहिलेला एक कूटप्रश्न सोडवला असून त्यांना त्यासाठी गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
२००२पासून आबेल पुरस्कार निल्स हेनरिक आबेल यांच्या नावाने दिला जातो. आबेल यांचे १८२९ मध्ये निधन झाले होते. हा पुरस्कार ५ लाख पौंडाचा आहे. नॉर्वे विज्ञान व साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
मे महिन्यामध्ये ऑस्लो येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘फरमॅट्स लास्ट थेरम’ या नावाने प्रसिद्ध असणारे प्रमेय वायल्स यांनी १९९४ मध्ये सिद्ध केले होते.
ज्येष्ठ नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे निधन
ज्येष्ठ नृत्यांगना आशा जोगळेकर (वय ८०) यांचे १८ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
‘अर्चना नृत्यालय’ ही कथक अकादमी अंधेरी येथे त्या ५०हून अधिक वर्षे चालवीत होत्या. १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूरमध्ये एका विद्यार्थिनीला घेऊन त्यांनी प्रशिक्षणाला सुरवात केली.
त्यानंतर दादर, अंधेरी येथे त्याच्या शाखा काढल्या. २००३मध्ये नृत्यालयाची शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे सुरू झाली.
त्यांनी कथक हा नृत्यप्रकार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून तो लोकप्रिय केला, त्याचप्रमाणे आशा जोगळेकर यांनी आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
मराठी चित्रपटसृष्टीत कलाकार असलेल्या ऊर्मिला कानेटकर, रेशम टिपणीस, नेहा पेंडसे, मयूर वैद्य, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आदी त्यांच्या शिष्या आहेत.
उत्तर कोरियाची पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी
उत्तर कोरियाने १८ मार्च रोजी पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने मागील वर्षी एप्रिल महिन्यात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, उत्तर कोरियाने या निर्बंधांना न जुमानता क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
प्योंगयांगच्या उत्तरेकडील तळावरून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ८०० किलोमीटर अंतरावरील समुद्रातील लक्ष्याचा क्षेपणास्त्राने यशस्वीपणे वेध घेतला.
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग ऊन यांनी अमेरिकेत मारा करू शकणाऱ्या शस्त्रांची चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव सुरू असून, त्यास उत्तर कोरियाने आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे.
मागील काही आठवड्यांत उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली असून, त्याद्वारे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला आपला विरोध असल्याचे संकेत दिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा