पुढील महिन्यात लंडन, सिंगापूर, हाँगकाँग व बँकॉकमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
मोदींची ओळख बनलेल्या कुर्त्यामध्येच त्यांनी या पुतळ्यासाठी पोज दिली आहे. पारपंरिक नमस्ते करताना मोदी या पुतळ्यामध्ये दिसणार आहेत.
टाइम मॅगेझिनच्या टॉप टेन पर्सन्समध्ये मोदी असून जागतिक बाजारात ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचे म्युझियमने म्हटले आहे.
मोदींचे पुतळे बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचे व दीड लाख ब्रिटिश पौंड खर्च येणार आहे.
या म्युझियममध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, हृतिक रोशन आणि माधुरी दीक्षित या तारकांचा समावेश आहे.
रिअल इस्टेट विधेयक संसदेत मंजूर
विकासकाडून घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारऱ्या रिअल इस्टेट विधेयकाला (नियमन आणि विकास) लोकसभेने मंजुरी दिली आहे. राज्यसभेने १० मार्चला या विधेयकाला मंजुरी दिली होती.
या विधेयकातील नियमांचे उल्लंघन झाले तर त्यामुळे विकासक किंवा बांधकाम व्यावसायिकांना दंड तर करता येणार आहेच पण त्याचबरोबर तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकाचे हित जपणे, त्यासंदर्भातील व्यवहार कार्यक्षम करणे, पारदर्शकता वाढविणे आणि या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यास चालना देणे हे या विधेयकाचे हेतू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत व्हावी म्हणून देखरेखीसाठी रिअल इस्टेट नियमन प्राधिकरण (आरईआरए) स्थापण्याची तरतूदही या विधेयकात आहे.
मदर तेरेसा यांना संतपद
गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे.
तेरेसा यांचा जन्म १९१०मध्ये मॅसिडोनियात झाला होता. त्यांचे आई-वडील हे अल्बानियाचे होते. मदर तेरेसा यांना १९७९मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कोलकात्यात मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या मदर तेरेसा यांचे १९९७मध्ये ८७व्या वर्षी निधन झाले.
बचत खात्यांवरील व्याज मिळणार दर तिमाहीला
रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे.
सध्या बॅंकेत बचत खात्यांवर सहा महिन्याला व्याज दिले जाते. १ एप्रिल २०१० पासून बचत खात्यावरील व्याज रोजच्या रोज मोजले जाते.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर ४ टक्के, तर खासगी बॅंकांतर्फे ६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
आरबीआयने प्रत्येक बॅंकेला २०११मध्ये बचत खात्यांवरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते; परंतु एक लाखापर्यंतच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहे.
जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे; परंतु बॅंकांना मात्र या निर्णयामुळे ५०० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
शहनाईवादक उस्ताद अली अहमद खान यांचे निधन
प्रख्यात शहनाईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे १६ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्यानंतरचे प्रख्यात शहनाईवादक म्हणून अली अहमद हुसेन खान यांचा लौकिक होता.
बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधित असलेले अली खान यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
बनारसमध्ये शहनाईवादकांच्या घराण्यात जन्मलेले अली खान यांचे शास्त्रीय आणि निमशास्त्रीय संगीतावर प्रभुत्व होते.
पश्चिम बंगाल सरकारने २०१२ मध्ये त्यांचा बंगभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.
सिरीयामधील रशियाचे सैन्य मागे
हिंसाचारग्रत सिरीयामधील शांतता प्रक्रिया सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सिरीयातील आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाच्या ठाम व आक्रमक पाठिंब्यावर सिरीयाचे अध्यक्ष बाशर अल असाद हे सत्तेवर टिकून आहेत. रशियाच्या सहकार्यामुळेच इसिस व इतर बंडखोरांच्या फौजांविरोधात असाद यांच्या सैन्यास यश मिळाले आहे.
सैन्य माघारी घेणार असलो तरी सिरीयातील हवाई व नाविक तळांवरील ताबा सोडणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
इस्लामिक देशांची लढाऊ आघाडी
दहशतवादाविरोधात इस्लामिक देशांच्या लढाऊ आघाडीच्या निर्मितीचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मांडला आहे. या आघाडीची निर्मिती नाटोच्या धर्तीवर केली जाण्याचा प्रस्ताव आहे.
ही आघाडी कोणत्याही विशिष्ट देशाविरुद्ध नसून इस्लामिक स्टेट (इसिस) यांसारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जगातील ३४ मुस्लिम बहुसंख्यांक देशांच्या या प्रस्तावित आघाडीची निश्चित रुपरेषा करण्यासंदर्भातील काम पाकिस्तानकडे सोपविण्यात आले आहे.
या आघाडीमध्ये सौदी अरेबियाचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिया बहुसंख्यांक इराणच्या समावेशाबद्दल अद्याप संदिग्धता आहे.
नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या आघाडीची स्थापना १९४९मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावास पायबंद घालण्याच्या उद्देशार्थ करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा