शिखर धवनच्या आक्रमक ६० धावा त्याला विराट कोहलीने ४१ धांवाची दिलेली संयमी साथ आणि धोनीच्या झटपट २० धावांच्या बळावर भारताने बांगलादेशला ८ गड्यांनी हरवत सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.
शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने ठेवलेल्या १२१ धावांचा भारताने यशस्वी पाठलाग करत विजेतेपद प्राप्त केले.
भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा आशियाई चषक विजेतेपद जिंकले ज्याचे पहिल्यांदाच टी-२० प्रारुपमध्ये आयोजन केले होते. आधीचे पाचही विजेतेपद ५० षटकांच्या स्पर्धांमध्ये होते.
सामन्याच्या सुरुवातीलाच वादळी पाऊस झाल्यामुळे हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला.
टी २० मधील भारताचा हा सलग ७ वा विजय आहे. धोनीने आज ७ विजय मिळवत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. तसेच दोन्ही फॉरमॅटमध्ये आशिया चषक पटकावणारा धोनी हा पहिला कर्णधार बनला. यापूर्वी २०१० मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडिया चॅम्पियन झाली होती.
इराणचे अब्जाधीश जनजनी यांना मृत्युदंड
इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील बबक जनजनी यांना अब्जावधी डॉलर्सच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले असून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जनजनी यांना डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिका आणि युरोपियन संघटनेने जनजनी यांना काळ्या यादीत टाकले होते. कारण निर्बंधांच्या काळात त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून इराणला तेल विक्री केले होते. त्यामुळे इराणला फायदा झाला होता.
बबक मुर्तजा जनजनी इराणचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी आहेत. त्यांचा जन्म २१ मार्च १९७४ मध्ये तेहरानला झाला होता. त्यांच्याकडे नेदरलँड आणि इराणचे दुहेरी नागरिकत्व आहे.
सोरिनेट कंपनीचे ते भागीदार आहेत. सोरिनेट समूह हा इराणमधील बड्या कंपनीपैकी आहे. ही कंपनी सौंदर्य प्रसाधने, वित्त, बँकिंग, व्यावसायिक विमान सेवा, पायाभूत, इमारत बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.
सनदी अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार
स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदींची उत्कृष्ठ अंमलबजावनी करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमधील सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधान उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.
दरवर्षी २१ एप्रिल रोजी सार्वजनिक सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
या वर्षीपासून जनधन किंवा स्वच्छ भारत सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावनी करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा