भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन (१४,२५० कोटी रुपये) कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे. हे कर्ज अधिकृत विकास साह्यतेच्या रूपात केले जाईल.
त्यात मध्यप्रदेशातील पारेषण प्रणाली मजबूत करण्यासाठी १५.४५ अब्ज येन, ओडिशातील एकीकृत साफसफाई सुधार प्रणाली मजबूत करण्यासाठी २५.७ अब्ज येन आणि समर्पित मालवाहतूक प्रकल्प (टप्पा-एक) आणि टप्पा तीनसाठी १०३.६ अब्ज येन अर्थसाह्य केले जाणार आहे.
याशिवाय ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी ६७.१ अब्ज येन, झारखंडमध्ये सूक्ष्म ड्रिप सिंचन प्रकल्पाद्वारे फळबागातील सुधारणांसाठी ४.६५ अब्ज येन दिले जाणार आहेत.
हे सारे कर्ज जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेद्वारे (जिका) दिले जाणार आहे.
अधिकृत विकास साह्यता अंतर्गत दिले जाणारे कर्ज साधारणपणे द्विपक्षीय मदत आणि बहुपक्षीय मदतीच्या स्वरूपात दिले जाते.
विशेषत: द्विपक्षीय मदतीतहत विकसनशील देशांना थेट मदत दिली जाते; तर बहुपक्षीय मदत आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे दिली जाते.
‘उदय’ रोख्यांची विक्री
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या उज्ज्वल डिसकॉम अॅशुरन्स योजना अर्थात उदय अंतर्गत निधी उभारणी सुरू आहे.
या निधीच्या साह्याने विविध राज्यांतील कर्जबाजारी झालेल्या वीज वितरण कंपन्यांना संजीवनी देण्यात येणार आहे.
यासाठी रोख्यांची विक्री करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
बिहार, हरयाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, पंजाब व राजस्थान या राज्यांनी हे रोखे बाजारात विक्रीसाठी आणले आहेत.
रोखे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांनी प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे ३० मार्चपर्यंत रोखे खरेदी करावी लागणार आहे.
‘नॅफकब’ अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता
‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटी’च्या (‘नॅफकब’) अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता यांची निवड झाली आहे.
नॅफकब ही देशातील सर्व सहकारी बँका व पतसंस्थांची शिखर संस्था आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मेहता हे पुढील तीन वर्ष नॅफकबचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
गुजरात स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या मेहता यांनी गुजरातमधील सहकारी बँकांना अडचणीतून सोडवत नफ्यात आणले आहे.
पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्ला या १९८८च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त आणि आयुक्तपदी काम केले आहे.
मुंबई शहर पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्या पोलिस दलात परिचित आहेत.
पुण्याचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के. के. पाठक ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार हे स्पष्ट होते. त्यांची जागा आता रश्मी शुक्ला घेतील.
शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा मान मिळविणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी आयुक्तपद भूषविले होते.
शर्मिला इरोम दोषमुक्त
मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां शर्मिला इरोम यांना दिल्ली न्यायालयाने २००६ मधील जंतरमंतर येथे उपोषणाच्या वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे.
मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां असलेल्या इरोम या गेली सोळा वर्षे उपोषण करीत आहेत. मणिपूरमधील आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट (एएफएसपीए) हा कायदा रद्द कायदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.
४ ऑक्टोबर २००६ रोजी इरोम यांनी या मागणीकरिता दिल्लीत जंतरमंतर येथे प्राणांतिक उपोषण केले होते.
शर्मिला यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला होता. शर्मिला या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.
म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव
लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव यांनी शपथ घेतली.
लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असले हितीन क्याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्यू की यांनी हितीन क्याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे हितीन क्याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय स्यू की यांनीही परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा