चालू घडामोडी : २६ मार्च
स्वच्छ भारत अभियानासाठी जागतिक बँकेची मदत
- स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) साठी जागतिक बँकेच्या १५०० दशलक्ष डॉलर्स परियोजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
- या प्रकल्पाअंतर्गत राज्यांची कामगिरी विशिष्ट मापदंडांच्या आधारावर मापली जाईल त्यांना डिसबर्समेंट-लिंक्ड इंडिकेटर्स म्हणून संबोधण्यात येणार आहे.
- आधीच्या वर्षाशी तुलना करता, राज्यातल्या ग्रामीण भागात उघड्यावर शौचाला बसण्याच्या प्रमाणात झालेली घट
- गावांची हागणदारी मुक्त स्थिती कायम राखणे
- घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सेवा केल्या जाणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येची वाढती टक्केवारी
- राज्ये, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन अनुदान निधीचा मोठा भाग (९५ टक्के पेक्षा जास्त) संबंधित जिल्हा, ग्रामपंचायत स्तराकडे वर्ग करतील. यामुळे २०१९ पर्यंत स्वच्छता क्षेत्रातले उद्दीष्ट गाठण्याच्या प्रयत्नांना वेग मिळणार आहे.
ग्रामीण आवास योजनेअंतर्गत २.९५ कोटी घरे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गृहनिर्मिती योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी देण्यात आली.
- या योजनेअंतर्गत बेघरांना तसंच मोडकळीला आलेल्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
- या योजनेखाली २०२२ पर्यंत २.९५ कोटी घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी १ कोटी घरे येत्या तीन वर्षात बांधण्यात येतील.
- या घरांच्या बांधकामासाठी सखल भागातल्या प्रत्येक घरासाठी १.२० लाख रुपये तर डोंगराळ भागासाठी १.३० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरविण्यात येईल. ७०,००० रुपयांचं कर्जही लाभार्थीला घेता येईल मात्र हे कर्ज ऐच्छिक आहे.
- २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या काळात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८१,९७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दिल्ली आणि चंदीगड वगळता देशभरातल्या सर्व ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
- सखल भागात घरबांधणीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ६०:४० तर ईशान्य आणि डोंगराळ भागात ९०:१० या प्रमाणात विभागला जाईल.
- जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक-आर्थिक माहितीचा उपयोग करुन गरजूंचा शोध घेतला जाईल यामुळे पारदर्शकताही राखली जाणार आहे.
- संपूर्ण यादीतून ग्रामसभेच्या सहभागातून वार्षिक लाभार्थींची यादी निश्चित केली जाईल.
सफाई कर्मचारी आयोगाला मुदतवाढ
- सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात ३१-०३-२०१६च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
- वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे १३.०८ कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे. सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.
- सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो.
एस. श्रीसंतला भाजपची उमेदवारी
- मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेला माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्याला केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिरुअनंतपुरममधून भाजपने उमेदवारी दिली आहे.
- भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने केरळ विधासभेतील एकूण ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली.
- क्रिकेटपटू श्रीसंतला इर्नाकुलम किंवा त्रिपुनीथुरा मतदारसंघातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र पक्षाने त्याला तिरुअनंतपुरममधून उमेदवारी दिली आहे.
- १६ मे रोजी केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत २९ एप्रिलपर्यंत आहे.
सात वर्षाची प्रिती निवडणुक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर
- इयत्ता दुसरीत जाणारी सात वर्षाची प्रिती यावर्षी मतदान जागृती अभियानात निवडणूक आयोगाच्या सोबत काम करणार आहे.
- मे महिन्यात तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने सात वर्षाच्या प्रितीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे.
- मतदान जागृतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या शॉट फिल्ममध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
- इतक्या लहान वयाच्या प्रितीची निवड करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तामिळनाडूतील सर्व म्हणजे २३४ विधानसभा मतदारसंघांची नावे तिला तोंडपाठ आहेत.
- मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोग मतदानाआधी जनजागृती करत असते.
- निवडणूक आयोगाने राज्यातून एकूण १ हजार २०० ब्रँड अँबॅसिडर निवडले आहेत. यात अभिनेते, क्रीडापटूंचा समावेश आहे.
टीम चिट्टोकचा सायकलयात्रेचा नवा विक्रम
- ‘वर्ल्डस् फास्टेस्ट किवी’ म्हणून प्रसिद्ध न्यूझीलंडच्या टीम चिट्टोक याने भारताच्या सुवर्ण चतुर्भुज (इंडियन गोल्डन क्वाड्रिलॅटरल) ही सुमारे ६ हजार किमीपर्यंची सायकलयात्रा पूर्ण करीत नवा विक्रम केला आहे.
- चिट्टोक याने न्यूझीलंडच्या दूतावासापासून सायकलने प्रवास करीत चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, जयपूर, कानपूर, पुणे, गुंटूर आणि विशाखापट्टणम असे जवळजवळ ६००० किमीचे अंतर पूर्ण केले.
- त्याने दररोज २५० कि.मी. अंतर पार पाडत २४ दिवसांमध्ये हा पल्ला गाठला.
- चिट्टोक याने न्यूझीलंडच्या वैकाटो विद्यापीठातून कायदा आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड ते ऑस्ट्रेलिया असे अंतर पार करीत तो वेगवान सायकलपटू बनला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा