चालू घडामोडी : ०२ नोव्हेंबर

भारताला इराणकडून तेल खरेदी करण्याची सवलत

  • इराणविरोधात ५ नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांतही भारतासह ८ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.
  • इराणकडून तेल खरेदी ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्णत: थांबविण्याचे निर्देश ट्रम्प प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते.
  • इराणकडून पूर्णपणे तेल खरेदीवर बंदी घालण्याच्या या निर्णयामुळे इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या देशांना मोठा फटका बसणार होता. त्यामुळे काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.
  • जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांना इराणकडून तेल विकत घेण्यास अमेरिकने अनुमती दिली आहे.
  • अमेरिकेने परवानगी दिली असली तरी भारतासह अन्य देशांना मुबलक प्रमाणात इराणकडून तेल विकत घेता येणार नाही.
  • सवलत दिलेल्या सर्व देशांना तेल खरेदीमध्ये कपात करावी लागेल. इराणची आर्थिक कोंडी करण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष्य आहे.
  • चीनसुद्धा इराणकडून मोठया प्रमाणावर तेल आयात करतो. त्यामुळे चीनदेखील तेल खरेदीतून सवलत मिळवण्यासाठी अमेरिकेबरोबर वाटाघाटी करत आहे.
  • सवलत देताना ट्रम्प प्रशासनाला संतुलन साधावे लागणार आहे. या सवलतीमुळे इराणला मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा इराण विरोधात लागू केलेले निर्बंध गैरलागू ठरतील.
  • भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३० टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली.
पार्श्वभूमी
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५मध्ये इराणशी झालेल्या अणुकरारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा केली.
  • त्यांनी सर्व देशांना ४ नोव्हेंबरपर्यंत इराणबरोबरचे तेल व्यवहार संपवण्याचे आदेश दिले होते.
  • बराक ओबामा यांच्या काळात म्हणजेच २०१५मध्ये इराणचा अमेरिका व अन्य ५ देशांशी करार झाला होता.
  • त्यानुसार इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करण्याच्या बदल्यात आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना अणुकेंद्रांच्या तपासणीची अनुमती दिली आणि सर्व आंतरराष्ट्रीय नियमनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.
  • अमेरिकेच्या बरोबरीने ६ अन्य बड्या देशांची ३ वर्षांपूर्वी झालेल्या या करारास मान्यता होती. परंतु सत्तेवर येताच ट्रम्प यांनी या करारास विरोध दर्शवला होता.

आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर होणार

  • गौरवशाली इतिहास असणाऱ्या आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा तसेच तरुणांमध्ये सागरी क्षेत्रात आवड निर्माण व्हावी, यासाठी आयएनएस विराटचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
  • ८५२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
  • हे वस्तुसंग्रहालय सिंधुदुर्ग जिल्यातील मालवणजवळील समुद्र किनाऱ्यावर विकसित करण्यात येईल. यामध्ये सागरी जैवविश्व केंद्र आणि साहसी सागरी खेळांसाठी केंद्रही असेल.
  • याशिवाय या वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृकश्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास सांगणारे आभासी दालन आदी सुविधा असतील.
  • यामध्ये व्यापारी जहाजावर काम करणाऱ्या व्यक्तींना सागरी प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • जगभरात अशा केवळ सातच विमानवाहू युद्धनौका आहेत, ज्यांचे रुपांतर वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे.
आयएनएस विराट
  • द्वितीय विश्वयुद्धादरम्यान १९४३साली या युद्धनौकेचा आराखडा तयार करण्यात आला होता.
  • १९५९साली इंग्लंडच्या रॉयल नेव्हीमध्ये ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ही युद्धनौका सामील झाली आणि तेथे सुमारे २७ वर्षे सेवा बजावली.
  • त्यानंतर १९८७मध्ये भारताने ४६५ मिलीयन डॉलर किमतीत ही युद्धनौका विकत घेतली आणि आयएनएस विराटने सुमारे ३० वर्षे देशसेवा केली.
  • अशाप्रकारे ५७ वर्षांची सलग नौदल सेवा केल्याने या युद्धनौकेची गिनीज बुकच्या जागतिक विक्रमात नोंददेखील झाली आहे.
  • २२० मी. लांब, ४५ मी. रुंद आयएनएस विराटमध्ये ९ मेगावॉट वीजनिर्मिती करणारी यंत्रणा आहे. ३० सी हॉरीयर लढावू विमाने वाहून नेण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे.
  • आयएनएस विराटने एकूण २२८२ दिवस समुद्रात घालवले असून १० लाख ९४ हजार २१५ किलोमीटरचा एकूण जलप्रवास केला आहे.
  • १९८९साली श्रीलंकेमध्ये 'ऑपरेशन ज्युपिटर' या शांती मोहिमेत आयएनएस विराटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००१-०२मध्ये तिने 'ऑपरेशन पराक्रम'मध्ये भाग घेतला.
  • आयएनएस विराट मार्च २०१७मध्ये भारतीय नौसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली. सध्या ती मुबई येथील नौसेना गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे.
  • या युद्धनौकेने देशाच्या सागरी सीमांना पोलादी संरक्षण पुरवत भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातील दरारा कायम राखण्यात सिंहाचा वाटा उचलला.

सर्वोत्कृष्ट १०० बिगरइंग्रजी चित्रपटांच्या यादीत ‘पाथेर पांचाली’

  • ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या २१व्या शतकातील सर्वोत्कृष्ट १०० बिगरइंग्रजी चित्रपटांच्या यादीत सत्यजित रे दिग्दर्शित ‘पाथेर पांचाली’ या एकमेव भारतीय चित्रपटाला स्थान मिळाले आहे.
  • बीबीसीने विदेशी भाषांतील (इंग्रजी वगळता) सर्वोत्कृष्ट चित्रपट शोधण्यासाठी ४३ देशांतील २०९ शहरांमध्ये काही समीक्षकांचा पोल घेतला.
  • या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत ‘पाथेर पांचाली’ १५व्या स्थानी आहे. हा बंगाली चित्रपट भारतात १९५५ साली प्रदर्शित झाला होता.
  • या यादीत प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या १९५०मध्ये आलेल्या ‘सेव्हन सामुराई’ या चित्रपटाने प्रथम स्थान पटकावले आहे.
  • तर इटालियन दिग्दर्शक व्हितोरियो डे सिका यांचा ‘बायसिकल थीफ’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • बीबीसीने २४ देशांतील १९ भाषांमध्ये चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ६७ दिग्दर्शकांचे १०० चित्रपट निवडले आहेत.
  • बीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांच्या यादीत फ्रेंचमधील सर्वाधिक २७, मँडरिनमधील १२ आणि इटालियन व जपानी प्रत्येकी ११ चित्रपट आहेत.
  • पूर्व आशियातील २५ चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये जपान ११, चीन ६, तायवान ४, हाँगकाँग ३ आणि दक्षिण कोरियाच्या एका चित्रपटाचा समावेश आहे.
  • या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांच्या यादीतील केवळ ४ चित्रपटांचे दिग्दर्शन महिलांनी केले आहे. प्रत्यक्षात पोलमध्ये महिला समीक्षकांचे प्रमाण ४५ टक्के होते.
पाथेर पांचाली
  • पाथेर पांचाली (अर्थ: पथाचे (रस्त्याचे) गाणे) हा प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाला एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • सत्यजित रे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीने १९५५मध्ये करण्यात आली होती.
  • विभूतीभूषण बंडोपाध्येय यांच्या ‘विलडंगसरोमन’ या कथेवर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा स्वातंत्र्यानंतरच्या भारतावर भाष्य करणारा आहे.
  • सत्यजित रे यांचा स्वप्नपूर्ती करणारा हा सिनेमा अपू नावाच्या एका बंगाली मुलाच्या अगदी लहानमोठ्या गरजांवर भाष्य करणारा आहे.
  • अपू ट्रायोलॉजीतील हा पहिला चित्रपट. रे यांनी हा सिनेमा अर्धाच बनवला आणि तो तसाच प्रदर्शित झाला. त्यानंतर रे यांनी हा सिनेमा पूर्ण केला आणि २ भागांत प्रदर्शित केला, तीच आहे ‘अपू ट्रायोलॉजी’.
  • १९५५मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तर १९५६मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला.
  • २००५मध्ये ‘टाइम’ मासिकाने प्रसिध्द केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादीत हा चित्रपट होता. ऑस्कर अॅकॅडमीनेही रायना जीवनगौरव पुरस्कार देऊन या चित्रपटाचा सन्मान केला होता.
सत्यजित रे
  • भारतरत्न सत्यजित रे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते.
  • त्यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकाता येथे झाला. तर २३ एप्रिल १९९२ रोजी त्यांचे निधन झाले.
  • चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल १९९२मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत.
  • १९५५मध्ये त्यांनी पाथेर पांचाली या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनतर त्यांनी एकूण ३६ चित्रपटांची निर्मिती केली.
  • त्याच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारतत्यांनार्फे त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्व पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत.
  • याशिवाय १९९२मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डीलिट असे अनेक मान- सन्मान प्राप्त झाले.

गुन्हेगारी प्रकरणात सहकार्यासाठी भारत-मोरोक्कोमध्ये करार

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मोरोक्को दरम्यान गुन्हेगारी प्रकरणात परस्पर कायदेशीर सहाय्य देण्याबाबतच्या कराराला मंजुरी दिली आहे.
  • गुन्ह्यांचा तपास आणि खटले दाखल करण्यातील कार्यतत्परता वाढवणे हा या कराराचा उद्देश आहे.
  • या कराराअंतर्गत भारत आणि मोरोक्को यांच्यातील गुन्हेगारी खटल्यांची चौकशी करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देण्यात येईल.
  • यामुळे गुन्हाचा तपास करणे व कार्यवाही करणे यांची कार्यतत्परता वाढेल. ज्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली शांतता राखण्यास मदत मिळेल.
  • या करारामुळे संघटीत गुन्हेगारी तसेच दहशतवाद्यांच्या कार्य पद्धतीबाबत अधिक चांगला दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत मिळेल. ज्यांचा वापर देशांतर्गत सुरक्षा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेताना होईल.

पर्यटन क्षेत्रात सहकार्यासाठी भारत-दक्षिण कोरियामध्ये करार

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यानच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली.
या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये
  • पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार.
  • पर्यटनाशी संबंधित माहिती आणि आकडेवारीचे आदान-प्रदान.
  • हॉटेल्स व सहल व्यावसायिकांसहित पर्यटन क्षेत्राशी सर्व संबंधितांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे.
  • मनुष्यबळ विकास क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आदान-प्रदान कार्यक्रम स्थापन करणे.
  • पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देणे.
  • दोन्ही देशातल्या पर्यटनात वाढ होण्यासाठी सहल आयोजक/माध्यमे यांच्यतल्या भेटींचे आदान-प्रदान.
  • पर्यटन स्थळांचा विकास आणि व्यवस्थापन, पर्यटन स्थळांना चालना या क्षेत्रात अनुभवांचे देवाण-घेवाण.
  • दोन्ही देशांमधल्या पर्यटन जत्रा/प्रदर्शन यातील सहभागासाठी चालना देणे.
  • सुरक्षित, आदरणीय, शाश्वत पर्यटनाला चालना देणे.
पार्श्वभूमी
  • भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान दीर्घ काळापासून मजबूत राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत.
  • आता उभय देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
  • पूर्व आशिया क्षेत्रातील भारतात येणारे बरेचसे पारटक दक्षिण कोरियातून येतात. या करारानंतर भारतात दक्षिण कोरियातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

धर्म गार्डियन: भारत आणि जपानचा संयुक्त सैन्य अभ्यास

  • भारत आणि जपानच्या सैन्यादरम्यान पहिला ‘धर्म गार्डियन २०१८’ हा संयुक्त सैन्य अभ्यास १ नोव्हेंबरपासून मिझोराममधील वैरेंगते येथे सुरु झाला. हा सराव २ आठवड्यांपर्यंत चालेल.
  • या सैन्य अभ्यासात जंगली प्रदेशात युद्धाभ्यास केला जाईल. संरक्षणासंबधी आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान समन्वय वाढविणे, हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
  • या सरावादरम्यान दोन्ही सैन्य युद्धस्थितीचा अभ्यास, युद्ध काळात योजना आखणी आणि त्याची अंमलबजावणी याचा सराव करणार आहेत.
  • या संयुक्त सैन्य अभ्यासात भारताचे प्रतिनिधित्व ६/१ गोरखा रायफल्स करेल. तर जपानचे प्रतिनिधित्व त्यांच्या भूदलाच्या ३२ इन्फंट्री रेजिमेंटद्वारे केले जाईल.
  • या संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंध सुधारतील. तसेच दहशतवादाविरुद्ध लढण्यास मदत होईल.
  • भारत आणि जपान यांच्यातील प्रगतीशील संबंधांमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल सिध्द होईल.

पी. एस. राजेश्वर इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे नवे प्रमुख

  • नुकतेच लेफ्टिनंट जनरल बनलेले पी. एस. राजेश्वर यांची इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे १२वे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यापूर्वी ते संरक्षण मंत्रालयातील इंटीग्रेटेड मुख्यालयात महानिदेशक म्हणून कार्यरत होते.
  • लेफ्टिनंट जनरल पी. एस. राजेश्वर भारतीय सैन्य अकादमी डेहराडून आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.
  • त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा प्रशासनामध्ये पदवी प्राप्त केली आहे. डिसेंबर १९८०मध्ये त्यांना आर्टिलरी रेजिमेंटमध्ये सामील झाले.
  • त्यांनी उत्तर-पूर्व, जम्मू-काश्मीर तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानामध्ये काम केले आहे.
  • आपल्या ३८ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान आर्टिलरी रेजिमेंट व जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ
  • सशस्त्र दलांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफची स्थापना सरकारद्वारे करण्यात आली.
  • एका मंत्री गटाच्या शिफारसीवरून १ ऑक्टोबर २००१ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या मंत्रीगटाची स्थापना कारगिल युद्धानंतर भारताच्या संरक्षण व्यवस्थापनाचे पुनरावलोकन करण्यासाठी करण्यात आली होती.
  • ही संस्था धोरण, सिद्धांत, युद्ध आणि खरेदीसाठी सर्वोत्तम व्यवस्थापन तंत्राचा वापर करते.
  • यामध्ये तिन्ही सैन्यदलाचे प्रतिनिधी, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो.

अमरावती बनणार भारतातील पहिली ‘जस्टीस सिटी’

  • आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावती भारतातील पहिली ‘जस्टीस सिटी’ (न्याय नगर) म्हणून आंध्रप्रदेश सरकारद्वारे विकसित केली जाणार आहे.
  • अमरावती हे भारताचे असे पहिले शहर असेल जे न्यायदानास समर्पित असेल. या शहराचा विकास आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे केला जात आहे.
  • या न्याय नगरामध्ये राज्य सरकारच्या न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
  • या न्याय नगरामध्ये एकीकृत न्यायिक केंद्र ३३०९ एकरांवर पसरलेले असेल. यामुळे १.३ लाख लोकांना रोजगार प्राप्त होईल.
  • या न्याय नगराच्या स्थापनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सर्वोच्च न्यायालायचे न्या. एन. व्ही. रमन, न्या. एल. नागेश्वर राव, न्या. विनीत सरन आणि न्या. मोहन शांतानागौदर यांनी भाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा