सफदरगंज येथून श्री रामायण एक्स्प्रेस सुरु
- १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सफदरगंज स्टेशनपासून रामायण सर्किटवर धावणारी विशेष पर्यटन रेल्वे श्री रामायण एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दखवण्यात आला.
- ही एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राच्या जीवनाशी संबंधित विविध पवित्र ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणार आहे. तामिळनाडूमधील रामेश्वरमपर्यंतचा हा प्रवास १६ दिवसांचा असेल.
- श्री रामायण एक्सप्रेसची एकूण ८०० प्रवाशांची क्षमता असून, यासाठी प्रतिव्यक्ती तिकिटाचे दर १५,१२० रुपये आहे.
- दिल्लीतून सुरु झालेल्या या एक्स्प्रेसचा पहिला थांबा हा अयोध्या असणार आहे. त्यानंतर नंदीग्राम, सातामरी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रीगव्हरपूर, चित्रकुट, नाशिक, हंपी आणि रामेश्वरम या ठिकाणी ही रेल्वे थांबणार आहे.
- तर सफदरगंज, गाझीयाबाद, मोरादाबाद, बरेली आणि लखनऊ या स्थानकांवरून पर्यटकांना रेल्वेत बसता येणार आहे.
- या यात्रेच्या श्रीलंका दौऱ्यासाठी प्रतिव्यक्ती तिकिटाचे एकूण दर रुपये ३६,९७० इतके असणार आहे.
- आयआरसीटीसीने नियोजन केलेल्या ५ रात्री आणि ६ दिवसांच्या या श्रीलंकन पॅकेजमध्ये चेन्नईवरुन प्रवाशांना विमानाने श्रीलंकेला घेऊन जाण्यात येणार आहे.
- श्रीलंकेत पर्यटकांना केंडी, नुवारा एलीया, कोलंबो आणि नेगोम्बो याठिकाणची यात्रा करविण्यात येणार आहे.
इन्फोसिस पुरस्कार २०१८
- इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने आपल्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त इन्फोसिस पुरस्कार २०१८ची घोषणा केली.
- हा पुरस्कार ६ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये २४४ व्यक्तींमधून निवडलेल्या ६ विजेत्यांना प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कार विजेते
- अभियांत्रिकी व संगणक विज्ञान: नवकांत भट्ट
- नवकांत भट्ट भारतीय विज्ञान संस्था (बंगळूरू) येथे प्राध्यापक आहेत. हा पुरस्कार त्यांना बायोकेमिस्ट्रीमध्ये जैविक-सेंसरच्या संशोधन कार्यासाठी देण्यात आला. यामुळे मेटल ऑक्साईड सेन्सरच्या कार्यक्षमतेत वृद्धी होईल.
- मानवता: कविता सिंह
- कविता सिंह जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कला आणि ॲस्थेटिक्सच्या डीन आहेत. मुगल, राजपूत आणि दख्खन कलेमध्ये केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- जीवशास्त्र विज्ञान: रूप मलिक
- ते टाटा आधारभूत संशोधन संस्थेमध्ये जीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. आण्विक मोटार प्रथिनांमधील संशोधनाच्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
- गणित: नलिनी अनंतरामन
- नलिनी अनंतरामन फ्रान्समधील स्ट्रासबर्ग विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक आहेत. ‘क्वांटम कॅओस’ क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- भौतिकशास्त्र: एस. के. सतीश
- एस. के. सतीश भारतीय विज्ञान संस्थेत (बंगळूरू) सेंटर फॉर ओशनऑफोग्राफिक अँड एटॉस्फोरिक सायन्समध्ये प्राध्यापक आहेत. वातावरणातील बदलाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
- सामाजिक विज्ञान: सेन्धील मुल्लैनाथन
- ते अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात कॉम्प्यूटेशन आणि प्रॅक्टिकल सायन्सचे प्राध्यापक आहेत. अप्लाइड इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
इन्फोसिस पुरस्कार
- हा इन्फोसिस सायन्स फाउंडेशनद्वारे देण्यात येणारा वार्षिक आहे. हा पुरस्कार संशोधक, शास्त्रज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ आणि अभियंते यांना प्रदान करण्यात येतो.
- हा पुरस्कार जीवशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, सामाजिक विज्ञान, भौतिक विज्ञान आणि मानवता या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो.
- सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र आणि १,००,००० डॉलर्स रोख (७२ लाख रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतात वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वाधिक धनराशीचा पुरस्कार आहे.
तितलीनंतर ‘गज’ चक्रीवादळाचे संकट
- तितली चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गज’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
- तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे.
- याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आणि ३० हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
- या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
- विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
- गज चक्रीवादळापूर्वी तितली हे भयंकर चक्रीवादळ ओडिशा व आंध्र प्रदेशाच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकले होते.
हिमा दास युनिसेफची भारतीय युवा सदिच्छादूत
- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी धावपटू हिमा दास हिची युनिसेफची भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- युवकांना निर्णयक्षमतेत कसे सहकार्य करावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हिमा मार्गदर्शन करणार आहे.
- हिमा मुलांचे अधिकार आणि गरजा यांच्याबाबत जागरुकता निर्माण करणे, मुले व युवकांच्या समस्या मांडणे यात कार्यरत असणार आहे व या निमित्ताने समाजाच्या विकासात आपले योगदान देणार आहे.
- हिमा दासने आयएएएफ वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता.
- ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तिने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत शर्यत जिंकली होती.
- त्यानंतर जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ४०० मीटर शर्यतीचे रौप्य, महिलांच्या ४ बाय ४०० मीटरचे सुवर्ण आणि ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
- या अभिमानास्पद कामगिरीमुळे तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- आसाममधील नागाव येथून २० किलोमीटर दूर असलेल्या कांधूलिमारी या दुर्गम भागातल्या हिमाने स्वकतृत्वावर मोठी भरारी घेतली आहे.
नेताजींच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये तिरंगा फडकावलेल्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नेताजींच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.
- या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि प्रत्येकी ५-५ टक्के निकेल आणि जस्त वापरण्यात येईल.
- सेल्युलर जेलच्या समोर तिरंग्याला वंदन करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र या नाण्यावर असेल.
- त्या खाली ३० डिसेंबर १९४३ या तारखेचा उल्लेख असेल. नेताजींनी याच दिवशी पोर्ट ब्लेयरच्या सेल्युलर जेलबाहेर तिरंगा फडकावला होता.
- यावर हिंदी आणि इंग्रजीत ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ म्हणूनही चिन्हांकित केले असेल.
- नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस
- महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ब्रिटिश भारतातील कटक येथे झाला होता.
- सुरुवातीला ते कॉंग्रेसमध्ये समिल झाले. १९३८-३९ दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर कॉंग्रेसमध्ये झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली.
- त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून त्याद्वारे देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. आझाद हिंद फौजची स्थापना २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे निर्वासित भारतीयांनी केली होती.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती.
- ही एक सशस्त्र फौज होती, ज्याचा उद्देश ब्रिटीश नियंत्रणापासून भारत मुक्त करणे हा होता. सुभाषचंद्र बोस या फौजेचे सर्वोच्च कमांडर होते.
शिक्षकांसाठी सरकारचे लीप आणि अर्पित उपक्रम
- मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी नवी दिल्लीत उच्च शिक्षणातील शाखांसाठी लिडरशीप फॉर अकॅडमीशियन्स प्रोग्राम (लीप) आणि ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टिचिंगचा (अर्पित) शुभारंभ केला.
- याअंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना त्यांच्या विषयाशी संबंधित नवीन माहितीसह अद्ययावत केले जाईल. तसेच त्यांच्यातील नेतृत्व प्रतिभा विकसित केली जाईल.
- मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पुधाक्राने सुरु झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलगुरूपासून उच्च शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकांना समाविष्ट करण्यात आले आहे.
- सध्या देशात सुमारे १५ लाख शिक्षक उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवत आहेत.
- या योजनेअंतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षण कोर्सची गणना त्यांच्या पदोन्नतीच्या वेळी केली जाईल. म्हणजेच अशा शिक्षकांना पदोन्नतीकरिता प्राधान्य देण्यात येईल.
- लिडरशीप फॉर अकॅडमीशियन्स प्रोग्राम (लीप): याचा उद्देश सरकारी उच्च शिक्षण संस्थांमधील दुसऱ्या स्तरावरील अकादमिक प्रमुखांना भविष्यात नेतृत्व स्वीकारण्यास तयार करणे आहे.
- ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टिचिंगचा (अर्पित): हा १५ लाख उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या ऑनलाईन विकासासाठी एक उपक्रम आहे.
व्हायब्रंट गुजरातसाठी युएई भागीदार देश
- व्हायब्रंट गुजरात शिखर संमेलन २०१९साठी संयुक्त अरब अमीरात (युएई) हा भागीदार देश असणार आहे.
- १८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान गांधीनगरमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. याची मुख्य संकल्पना (थीम) ‘शेपिंग ऑफ ए न्यू इंडिया’ आहे.
- व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेची ही ९वी आवृत्ती असेल. यामध्ये ‘युथ कनेक्ट फोरम’देखील आयोजित केले जाणर आहे.
- व्हायब्रंट गुजरात ही गुजरात सरकारद्वारे आयोजित द्विवार्षिक गुंतवणूकदार परिषद आहे.
- याचा उद्देश व्यवसाय नेतृत्व, गुंतवणूकदार, कॉर्पोरेशन आणि धोरण निर्माते यांना एका मंचावर एकत्रित करणे आहे. या परिषदेद्वारे गुजरातमध्ये व्यवसायाच्या संधींची चर्चाही केली जाते.
- यापूर्वीच्या वाइब्रंट गुजरात परिषदेमध्ये २५,५७८ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
- यापैकी १८,५३३ सामंजस्य करार सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग क्षेत्रात, ५,९३८ मोठ्या औद्योगिक क्षेत्रात आणि १,१०७ सामंजस्य करार सामरिक आणि तांत्रिक भागीदारी क्षेत्रात करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा