केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे ऑपरेशन ग्रीन्स
- केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने टोमॅटो, कांदा व बटाट्याच्या उत्पादनवाढीसह त्यावरील अन्नप्रक्रियेस प्रोत्साहन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन्सच्या दिशानिर्देशांना मंजुरी दिली आहे.
- सरकारच्या या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देश हा या ३ फळभाज्यांच्या किमतीत होणारा चढ-उतारावर अंकुश ठेवणे हा आहे.
- या कार्यक्रमाअंतर्गत ५० कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
- या अंतर्गत राज्य कृषी व अन्य विपणन संस्था, सहकारी संस्था, किसान उत्पादन संघटना, कंपन्या, स्वयंमदत गट, अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादींना मदत करण्यात येणार आहे.
मंत्रालयाद्वारे मंजुरी देण्यात आलेले दिशानिर्देश
अल्पकालीन किंमत स्थिरता उपाय
- किंमत स्थिरता उपायांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) नोडल एजन्सी असेल.
- टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे उत्पादनापासून गोदामापर्यंत परिवहन आणि साठवणुकीच्या सुविधांसाठी देण्यात येणारे भाडे यासाठी अन्न प्रक्रिया मंत्रालय ५० टक्के अनुदान देणार.
दीर्घकालीन एकीकृत मूल्य शृंखला विकास योजना
- किसान उत्पादन संस्था (एफपीओ) आणि त्यांच्या केद्रांची निर्मिती.
- गुणवत्तायुक्त उत्पादन.
- शेतात कापणीनंतर प्रक्रिया सुविधा.
- कृषी उपकरणे.
- विपणन.
- पिकांची मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती व व्यवस्थापन.
ऑपरेशन ग्रीन्स
- केंद्र सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय भाषणात ऑपरेशन ग्रीन्सची घोषणा करताना या कार्यक्रमासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.
- या कार्यक्रमांतर्गत पिकाच्या कापणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी स्टोरेज सुविधा देण्यात येतील. यामुळे या पिकांच्या किंमतीतील चढ-उतार कमी होईल.
- तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य किंमत मिळण्यास मदत होईल, ज्यामुळे २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
या अभियानाचे मुख्य उद्देश
- उत्पादक आणि ग्राहकांसाठी किंमत स्थिरता सुनिश्चित करणे.
- कापणीनंतर कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिक्स सुविधांच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान कमी करणे.
- अन्न प्रक्रिया क्षमतेमध्ये वाढ करणे.
- टोमॅटो, बटाटे आणि कांद्याची मागणी आणि पुरवठा यांच्या संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी मार्केट इंटेलिजन्स नेटवर्क स्थापन करणे.
भारत-दक्षिण कोरियामध्ये पर्यटन व क्रीडा क्षेत्रात सहकार्यासाठी करार
- भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यासाठी एमओयूवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- दक्षिण कोरियाच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांच्या ४ दिवसीय भारत दौऱ्यात नवी दिल्ली येथे हे करार करण्यात आले.
- फस्ट लेडी किम उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या त्या प्रमुख अतिथी आहेत.
- पर्यटन क्षेत्रातील करारामुळे दक्षिण कोरियामधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
- तसेच यामुळे दोन्ही देशांतील पर्यटन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढेल आणि दोन्ही देश पर्यटनासंबंधी माहितीची देवाणघेवाण करतील.
- क्रीडा क्षेत्रातील कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आहे.
- या करारानुसार क्रीडा प्राधिकरणे, क्रीडा संघटना आणि दोन्ही देशांच्या इतर क्रीडा संघटना यांच्यात विविध क्षेत्रात सहकार्य करण्यात येईल.
- दक्षिण कोरिया आणि अयोध्येदरम्यान ऐतिहासिक संबंध आहेत. असे म्हंटले जाते कि, अयोध्येच्या राजकुमारी सुरीरत्ना ई.स.४८ साली कोरियामध्ये गेल्या व तेथील राजा सुरो यांच्याशी त्यांनी विवाह केला.
सरकारची सीमावर्ती राज्यांसाठी ११३ कोटी रुपयांची तरतूद
- केंद्रीय गृह मंत्रालयाने ६ सीमावर्ती राज्ये आसाम, नागालँड, सिक्किम, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड यांच्याकरिता ११३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- या सीमावर्ती राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविणे हा त्यामागील उद्देश आहे.
- आतपर्यंत गृह मंत्रालयाने या सीमावर्ती राज्यांसाठी २०१८-१९ या वर्षात ६३७.९८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
- यापूर्वी, २०१७-१८मध्ये गृह मंत्रालयाने देशातील १७ राज्यांमधील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती.
- भारताची भूसीमा बांगलादेश (४,०९६ किमी), चीन (३,४८८ किमी), पाकिस्तान (३,३२३ किमी), नेपाळ (१,७५१ किमी), म्यानमार (१,६४३ किमी), भूतान (६९९ किमी) आणि अफगाणिस्तान (१०६ किमी) या देशांना लागून आहे.
सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम
- इंग्रजी: बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (बीएडीपी)
- हा कार्यक्रम १७ राज्यांच्या १०४ सीमावर्ती जिल्ह्यांच्या ३६७ ब्लॉक्समध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केला जात आहे.
- या कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेक्टिव्हिटी, शाळा, पेयजल आणि समुदाय केंद्रे बांधण्यात येतील.
- सीमावर्ती दुर्गम भागांच्या विशेष गरजा पूर्ण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती भागात कौशल्य निर्मितीस चालना देण्यात येईल.
- याशिवाय पर्यटन संवर्धन, सीमा पर्यटन, स्वच्छता अभियान, वारसा स्थळांचे संरक्षण, दुर्गम भागात हेलिपॅडची उभारणी करण्यासाठी इत्यादी अनेक कामे देखील केली जातील.
- सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमांत शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि वैज्ञानिक शेती करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येईल.
- या कार्यक्रमांतर्गत ६१ आदर्श गावांचा विकास केला जात आहे. बीएडीपीअंतर्गत १९८६-८७पासून आतापर्यंत १३,४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अमेरिकेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये विरोधी पक्षाची सत्ता
- अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहावर विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने नियंत्रण मिळवले असून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने सिनेटमधील बहुमत कायम राखले आहे.
- प्रतिनिधी सभागृहामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) डेमॉक्रेटीक पक्षाने बहुमताचा २१८ हा आकडा पार केला. या निकालामुळे ८ वर्षानंतर डेमोक्रॅटसना पहिल्यांदाच प्रतिनिधी सभागृहावर वर्चस्व मिळाले आहे.
- तर सिनेटमधल्या १०० पैकी ५१ जागा रिपब्लिकन पक्षाने जिंकल्या असून ४५ जागा डेमोक्रॅटसला मिळाल्या आहेत.
- राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर अमेरिकेत २ वर्षांनी मध्यावधी निवडणुका होतात. ट्रम्प यांनी स्थलांतरित विरोध, अमेरिका फर्स्ट, स्थानिकांना प्राधान्य या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली होती.
- प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटसला बहुमत मिळाल्यामुळे यापुढे त्यांना ट्रम्प यांच्या कारभारावर वचक ठेवता येईल.
- या विजयामुळे ट्रम्प यांच्या व्यापारासह ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांसदर्भातील एकतर्फी निर्णयांना लगाम घालण्याबरोबरच चौकशी करण्याचे अधिकार डेमोक्रॅटसना मिळाले आहेत.
- २०१६साली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तेव्हा प्रतिनिधी सभागृह व सिनेट या दोन्ही महत्वाच्या सभागृहांवर रिपब्लिकन्सचे वर्चस्व होते.
- गेल्या ८४ वर्षांत दोन्ही सदनांमध्ये केवळ ३ वेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्य झाले आहे.
- गेल्या २ वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रम्प यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजवटीतील अनेक निर्णय त्यांनी बदलले.
मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी
- अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या एका टीमने ‘मोबिलिटी अँड कंजेशन इन अर्बन इंडिया’ (Mobility & Congestion in Urban India) या नावाने अहवाल सादर केला आहे.
- याअंतर्गत अमेरिकेतील ३ विद्यापीठांनी भारतातील १५४ शहरांमधील वाहतुकीच्या समस्येवर आधुनिक तंत्रज्ञान आणि गुगल मॅप्सच्या मदतीने अभ्यास केला.
- यामध्ये वेगवेगळ्या शहरांमधील वाहुतकीचा वेग आणि वाहतूक कोंडी संदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवण्यात आली.
- त्यानुसार सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारताचे आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरु शहर पहिल्या स्थानी आहे
- त्याबरोबरच देशाची आर्थिक राजधानी मुंबई, राजधानी दिल्लीबरोबरच कोलकाता, चेन्नईचा या यादीमध्ये समावेश आहे.
- या अहवालात सर्वाधिक संथ वाहतूक असणारे शहरे, सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारी शाहरे आणि सर्वात वेगवागन वाहतूक असणारी शहरे अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
- सर्वाधिक संथ वाहतूक असणाऱ्या शहरांच्या यादीत कोलकाता प्रथम क्रमांकावर आहे तर सर्वात वेगवान वाहतूक असणाऱ्या शहरांमध्ये तामिळनाडूमधील राणीपेट शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
- गुगल मॅपवरील रिअल टाइम ट्रॅव्हल डेटाच्या आधारे संशोधकांनी या याद्या तयार केल्या आहेत.
- तसेच या समस्यांमागील कारणांचे विश्लेषणही या अहवालामध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांच्या संख्येपेक्षा रस्त्यांची वाईट परिस्थितीच वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
- सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या देशातील अव्वल १० शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. तर अव्वल २० शहरांच्या यादीमध्ये नागपूर आणि अकोला या शहरांचा समावेश आहे.
- वेगवान व वाहतूक कोंडी कमी असणारी शहरे: १) राणीपेट, २) श्रीनगर, ३) कायमकुलम, ४) जम्मू, ५) त्रिशूर.
- सर्वात संथ गतीने वाहतूक होणारी शहरे: १) कोलकाता, २) बेंगळुरू, ३) हैदराबाद, ४) मुंबई, ५) वाराणसी
- सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारी शहरे: १) बेंगळुरू, २) मुंबई, ३) दिल्ली, ४) चेन्नई, ५) कोलकाता, ६) हैदराबाद, ७) पुणे.
आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २ सुवर्णपदक
- कुवेत येथे सुरु असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका यांनी सुवर्णपदक जिंकले.
- १० मीटर रायफल स्पर्धेप्रकारात मिश्र जोडी गटात त्यांनी भारताला सुवर्ण पदकाची कमाई करताना, ज्युनिअर जागतिक विक्रमाचीही नोंदही केली.
- अंतिम फेरीत इलावेनिल-हृदय यांनी ५०२.१ गुणांचा विश्वविक्रमी वेध घेत अव्वल स्थान मिळविले.
- याच प्रकारात भारताच्या मेहुली घोष आणि अर्जुन बाबुता या जोडीने कांस्यपदक मिळवले.
- अंगद वीर सिंग बाजवाने आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटातील स्कीट प्रकारामध्ये विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
- जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय स्कीट नेमबाज ठरला. अंगदने अंतिम फेरीत ६० पैकी ६० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.
- चीनच्या जी जिन याने ५८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले तर यूएईच्या सईद अल मकतोउम याने ४६ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा