मोदींनी सुरु केले ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस ग्रँड चॅलेंज’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे १९ नोव्हेंबर रोजी ‘व्यवसाय सुलभीकरण भव्य आव्हान’ (ईझ ऑफ डुइंग बिझनेस ग्रँड चॅलेंज) या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय सुलभीकरणात येणाऱ्या ७ चिन्हांकित समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
- भारतीय आणि विदेशी कंपन्यांच्या सीईओशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम सुरू केला.
- या चॅलेंजचा हेतू तरुण भारतीय, स्टार्टअप्स आणि खाजगी उद्योगांच्या क्षमतेचा कार्यक्षमतेने वापर करणे आहे.
- आणि असे करताना येणाऱ्या समस्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- व्यवसायासाठी भारत एक सुलभ स्थळ बनविण्याच्या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे.
- देशात व्यवसाय करण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहे.
- या आव्हानात आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), बिग डेटा अॅनालिटिक्स, ब्लॉकचेन सारख्या नवीनतम तंत्रज्ञानाद्वारे सरकारच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल.
- या ग्रँड चॅलेंजचा मंच स्टार्टअप इंडियाचे पोर्टल असेल.
पार्श्वभूमी
- जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या व्यवसाय सुलभीकरणाशी संबंधित क्रमवारीमध्ये भारताने गेल्या वर्षाच्या तुलनेत २३ स्थानांनी प्रगती करत ७७वे स्थान मिळवले होते.
- या क्रमवारीसाठी व्यवसाय सुरू करणे, कर्ज प्राप्त करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी १० निकषांनुसार देशांचा क्रम निश्चित करण्यात येतो.
इफ्फी २०१८ला पणजीमध्ये सुरुवात
- ४९व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी २०१८’चे गोव्याची राजधानी पणजी येथे उद्घाटन झाले. ‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाच्या प्रिमियरने महोत्सवाचे उद्घाटन झाले.
- यावर्षी इफ्फीची मुख्य संकल्पना ‘न्यू इंडिया’ आहे. या महोत्सवात खेळ, इतिहास, अॅक्शन यांसारख्या विविध श्रेणींमधील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
- ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इस्रायल हा भागीदार देश असून यावर्षी झारखंड हे विशेष राज्य म्हणून निश्चित केले आहे.
- या चित्रपट महोत्सवात ६८ देशांचे २१२ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून २ वर्ल्ड प्रिमियर, १६ ॲकॅडमी ॲवार्डसाठी नामनिर्देशित चित्रपट व प्रचलित नसलेल्या भारतीय भाषेतल्या ६ चित्रपटांचा यात समावेश आहे.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या १५ चित्रपटांचा समावेश असून यातले ३ भारतीय चित्रपट सुवर्ण आणि रौप्य मयुरासाठीच्या स्पर्धेत आहेत.
- ४९व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत २६ फिचर (कथाधारित) आणि २१ नॉन-फीचर (कथाबाह्य) चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
- या महोत्सवात अनेक प्रसिद्ध खेळाडूंच्या जीवनावरील चित्रपट ‘खेलो इंडिया’ अंतर्गत दाखवले जाणार आहेत. यामध्ये मैरी कोम, भाग मिल्खा भाग आणि एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हे प्रमुख चित्रपट आहेत.
- या चित्रपट महोत्सवात शशी कपूर, श्रीदेवी, एम. करुणानिधी व कल्पना लाजमी या हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
- २८ नोव्हेंबरला ‘सिल्ड लिप्स’ या जर्मन चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने इफ्फी २०१८ची सांगता होईल.
कंट्री आणि स्टेट ऑफ फोकस
- एखाद्या देशातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि त्या देशाचे योगदान दर्शवणाऱ्या चित्रपटांचा ‘कंट्री ऑफ फोकस’मध्ये समावेश केला जातो.
- ४९व्या इफ्फीमध्ये इस्रायल हा देश कंट्री ऑफ फोकस राहणार आहे. इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने १० चित्रपटांना कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले आहेत.
- इफ्फीमध्ये भारताच्या एका राज्यावर व त्यातल्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांचा ‘स्टेट ऑफ फोकस’मध्ये प्रथमच समावेश केला आहे.
- ४९व्या इफ्फी २०१८मध्ये ‘स्टेट ऑफ फोकस’ म्हणून झारखंड या राज्याची निवड करण्यात आली असून महोत्सवाचा भाग म्हणून २४ नोव्हेंबरला झारखंड दिन साजरा करण्यात येणार आहे.
- झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी, डेथ इन गंज, रांची डायरी, बेगम जान यांचा समावेश आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
- इंग्रजी: इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (इफ्फी)
- या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकारद्वारे केले जाते.
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना १९५२मध्ये झाली. तेव्हापासून प्रतिवर्षी गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे.
- या चित्रपट महोत्सवाद्वारे चित्रपट क्षेत्राला जगभरात आपली चित्रपट कला प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होते.
गुरु नानक यांच्या ५५०व्या जयंती उत्सवासाठी राष्ट्रीय समिती स्थापन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीच्या उत्सवासाठी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीची स्थापना केली.
- ही समिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्य सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा या समितीचे सदस्य आहेत.
- केंद्र सरकारने गुरु नानक देव यांची ५५०वी जयंती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे ठरविले आहे.
- या उत्सवात अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातील. त्याशिवाय किर्तन, प्रभात फेरी, कथा, लंगर यासारख्या धार्मिक उपक्रमांचेही आयोजन केले जाईल.
- याशिवाय सेमिनार, कार्यशाळा आणि भाषणांसारख्या अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
- या कार्यक्रमासाठी शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापक समिती या नॉलेज पार्टनर असेल.
- याशिवाय केंद्र सरकार पंजाबमधील सुलतानपुर लोधी या स्थळाला विकसित करणार आहे. या ठिकाणी गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ व्यतीत केला होता.
- या शहराला वारसा शहराच्या (पिंड बाबे नानक दा) रूपात स्थापित केले जाईल. या ठिकाणी एक उच्च क्षमतेची दुर्बीण स्थापित करण्यात येईल.
- या दुर्बिणीच्या साह्याने पाकिस्तानातील करतारपूर साहिब बघता येऊ शकेल. गुरू नानक देव यांनी अखेरचा काळ करतारपूर साहिबमध्ये व्यतीत केला होता.
- या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालय आणि पोस्टल विभाग गुरू नानक देव यांच्या स्मरणार्थ नाणी व पोस्टल स्टॅम्प देखील प्रकाशित करणार आहे.
भारत-रशिया दरम्यान युद्धनौका बांधणीसाठी करार
- भारत आणि रशिया यांच्यात २० नोव्हेंबर रोजी २ युद्धनौका बांधणीसाठी ५०० दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला.
- या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे. तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
- गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉन एक्स्पोर्ट यांच्यात हा ५०० दशलक्ष डॉलरचा करार झाला.
- त्यानुसार रशिया भारताला २ युद्धनौका बांधणीसाठी तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे.
- या नौकांच्या बांधणीला २०२०मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका २०२६साली आणि दुसरी नौका २०२७साली तयार होईल.
- या तलवार वर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.
हवाई वाहतूक सेवेच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिकेसोबत करार
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अमेरिकेच्या व्यापार आणि विकास एजन्सीसोबत (यूएसटीडीए) हवाई वाहतूक सेवेच्या आधुनिकीकरणाचा रोडमॅप तयार करण्यासाठी करार केला.
- हवाई वाहतूक सेवेमध्ये हवाई रहदारी व्यवस्थापन, संचार, दिशादर्शन आणि देखरेख इत्यादींचा समावेश आहे.
- या करारांतर्गत राष्ट्रीय एरोस्पेस सिस्टमच्या (एनएएस) आधुनिकीकरणासाठी कार्य केले जाईल. यामध्ये अमेरिकन विमान कंपनी बोईंग तंत्रज्ञान सहकार्य प्रदान करेल.
- यामुळे भारतातील हवाई वाहतूक व्यवस्थापन सक्षम होईल आणि हवाई प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.
- गेल्या ४९ महिन्यांत भारतात हवाई प्रवाशांची संख्येत खूप वाढ झाली असून त्यामुळे अनेक आव्हानेही निर्माण झाली आहेत. यामध्ये प्रवासाची सुरक्षितता आणि कुशल विमान ऑपरेशन ही प्रमुख आव्हाने आहेत.
- एएआय आणि यूएसटीडीए एकत्रितपणे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असून, यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य देखील प्राप्त केले जाणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण
- इंग्लिश: Airports Authority of India (AAI)
- स्थापना: १ एप्रिल १९९५
- मुख्यालय: नवी दिल्ली
- भारतीय विमानतळ प्राधिकरण ही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत कार्यरत सरकारी कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.
- ही कंपनी भारताच्या हवाई क्षेत्रासह जवळच्या महासागरातील क्षेत्रांकरीता एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट (एटीएम) सेवादेखील प्रदान करते.
- एएआय एकूण १२५ विमानतळांची देखरेख करते. ज्यामध्ये १२ आंतरराष्ट्रीय, ७८ देशांतर्गत, ७ सीमा शुल्क विभागचे आणि २६ लष्करी विमानतळांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ६ व्यक्ती व ३ संस्थांना दिव्यांगजन पुरस्कार
- महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांना केंद्र सरकारचे दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाले असून राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर या जागतिक अपंगदिनी हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
- या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे.
- जन्मांध असलेल्या कांचनमालाने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.
- तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी तिचा सत्कार करून, १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
- तिने १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिपमध्ये तिने जवळपास १००हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
- तर नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयंच्या हृदयाला छिद्र आहे. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ किमीचे समुद्रातील अंतर १ तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ स्थापित केला आहे.
- पुण्याचे दृष्टिबाधीत भूषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेल तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचाऱ्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- दिव्यांगाच्या उत्थानाच्या कार्यासाठी बोरिवलीचे योगेश दुबे यांना तर दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
- दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशभरातून पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या २ संस्थाची निवड झाली आहे.
- वरळीतील नॅब एम्प्लॉयमेंट संस्थेला दिव्यांगांसाठी रोजगार देण्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
दुधातील भेसळ ओळखण्यासाठी स्मार्टफोन आधारित प्रणाली
- भारतीय औद्योगिक संस्थान म्हणजे आयआयटी हैदराबाद येथील संशोधकांनी दुधातील भेसळ ओळखण्यासाठी स्मार्टफोन आधारित एक प्रणाली विकसित केली आहे.
- या प्रणालीत इंडीकेटर म्हणून एका कागदाचा वापर करण्यात आला आहे, ज्याद्वारे दुधातील आम्लतेच्या स्तराची माहिती मिळू शकते.
- नैनोसाईज्ड नायलॉन फायबरपासून बनलेल्या या कागदासारख्या पदार्थाचे उत्पादन करण्यासाठी इलेक्ट्रोस्पिनिंग नामक प्रक्रियेचा वापर केला आहे.
- हा कागद ३ रंगाच्या मिश्रणाने बनला आहे. या पेपरला हेलोक्रोमिक पेपर असे म्हणतात. आम्लतेच्या प्रमाणानुसार हा पेपर रंग बदलतो.
- या संशोधकांनी एक प्रोटोटाईप स्मार्ट फोन आधारित एल्गोरिदम विकसित केला आहे. या कागदाला दुधात बुडविल्यानंतर त्या स्ट्रीप्सचा स्मार्टफोनच्या सहाय्याने फोटो घेता येतो.
- त्यानंतर तो डेटा पीएच रेंजमध्ये बदलला जातो. या चाचणीमध्ये ९९.७१ टक्के शुद्धतेचे वर्गीकरण मिळणार आहे.
- सध्या क्रोमॅटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राद्वारे भेसळ ओळखणे शक्य आहे. मात्र, ही बाब अतिशय खर्चीक आहे. त्यामुळेच भारतासारख्या विकसनशील देशातील लोक हे तंत्रज्ञान वापरत नाहीत.
- पशु कल्याण मंडळाच्या अहवालानुसार देशातील ६८.७ टक्के दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये डिटर्जंट, ग्लुकोज, युरिया, कॉस्टिक सोडा, सफेद पेंट इत्यादीद्वारे भेसळ केली जाते.
- तसेच यामध्ये बोरिक आम्ल, हायड्रोजन पेरॉक्साईड, फोर्मेलीन यासारख्या अँटी-बायोटीक्सचाही भेसळीसाठी वापर केला जातो.
- भेसळयुक्त दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या नियमित सेवनामुळे हृदयरोग, किडनी रोग, कँसर, त्वचारोग असे आजार होऊ शकतात.
एअर सेवा २.० या वेब पोर्टलच्या व मोबाईल ॲपचे उद्घाटन
- केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने नवी दिल्लीत एअर सेवा २.० या वेब पोर्टलच्या आधुनिक आवृत्तीचे आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन केले.
- हवाई वाहतुकीच्या सर्व सुविधांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पोर्टल आणि ॲप अत्याधुनिक करण्यात आले आहे.
- नव्या आवृत्तीत प्रवाशांना पोर्टलवर नोंदणी करताना सोशल मिडिया आणि चार्ट बोर्ड यावरही संलग्न होता येईल.
- त्याशिवाय प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी चॅटबॉट असेल. प्रवासी #Airsewaचा वापर करून सोशल मिडियाद्वारे तक्रार नोंदवू शकतात.
- या ॲपमुळे विमानाच्या उड्डाणांची माहिती, वेळापत्रक, विमानांची स्थिती याची अद्ययावत माहिती प्रवाशांना मिळू शकेल.
- या ॲपमुळे प्रवाशांना विनासायस विमानसेवा करता येईल. या ॲपच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन नोव्हेंबर २०१६मध्ये करण्यात आले होते.
- या ॲपच्या उद्घाटन सोहळ्यात, एक वर्षात प्रवाशांच्या तक्रारींचे तत्परतेने निवारण केल्याबद्दल चेन्नई विमानतळाला चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात आले.
- सध्या भारतात दरवर्षी सरासरी ५ कोटी प्रवासी हवाई मार्गे प्रवास करत असून ही संख्या भविष्यात वाढणार आहे.
भारतातील पहिल्या सीवर क्लिनिंग यंत्राचे अनावरण
- सुलभ इंटरनॅशनलने भारतातील पहिल्या सीवर (भूमिगत गटार) क्लिनिंग यंत्राचे अनावरण केले.
- या यंत्राचे अनावरण जागतिक शौचालय दिनी (१९ नोव्हेंबर) दिल्लीच्या तिन्ही महानगरपालिका आणि सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांच्या उपस्थितीत झाले.
- या यंत्रामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना सीवरमध्ये उतरण्याची गरज उरणार नाही. दरवर्षी अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सीवरमध्ये विषारी वायू व इतर कारणांनी मृत्यू होतो.
- या यंत्राची किंमत सुमारे ४३ लाख रुपये आहे. सीवर कार्यरत ठेवण्यासाठी या यंत्रामध्ये सर्व आवश्यक साधने आहेत. या यंत्राद्वारे तुंबलेल्या सीवर लाइनदेखील उघडल्या जाऊ शकतात.
सुलभ इंटरनॅशनल
- ही एक सामाजिक सेवा संघटना आहे. ती मानवाधिकार, ऊर्जाचे अपारंपरिक स्त्रोत, पर्यावरण स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाद्वारे समाज सुधारणेचे कार्य करते.
- ही भारतातील एक मोठी गैर-लाभकारी संस्था आहे. १९७०साली सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांनी या संस्थेची स्थापना केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा