शहरी गॅस वितरण प्रकल्प
- २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पंतप्रधानांनी सीडीजी बोली प्रक्रियेच्या (बिडिंग राउंड) नवव्या फेरीच्या अंतर्गत ६५ भौगोलिक क्षेत्रांच्या १२९ जिल्ह्यांमध्ये शहरी गॅस वितरण प्रकल्पाची (City Gas Distribution- CGD Scheme) पायाभरणी केली.
- याशिवाय त्यांनी १०व्या बोली प्रक्रियेची देखील घोषणा केली. यामध्ये ५० भौगोलिक क्षेत्रांमध्ये १४ राज्यांतील १२४ जिल्ह्यांचा समावेश आहे.
- गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी भारत सरकार पर्यावरण अनुकूल स्वच्छ इंधन अर्थात नैसर्गिक वायूच्या वापरावर विशेष भर देत आहे.
- सध्या देशातील उर्जा मिश्रणात (Energy Mix) गॅसचा वाटा ६ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे आणि हे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित आकरण्यात आले आहे. या बाबतीत जागतिक सरासरी २४ टक्के आहे.
- देशाच्या नागरिकांसाठी स्वच्छ स्वयंपाक इंधन (पीएनजी) आणि स्वच्छ वाहतूक इंधन (सीएनजी) उपलब्ध करुन देणे सीजीडी नेटवर्कच्या विकासाचे उद्दीष्ट आहे.
- सप्टेंबर २०१८पर्यंत देशातील ९६ शहरांमध्ये सीजीडी नेटवर्क विकसित करण्यात आले होते. येत्या ८ वर्षांमध्ये देशभरात २ कोटी घरगुती जोडण्या आणि ४६०० सीएनजी स्टेशन स्थापन करण्यात येतील.
सीजीडी योजनेचे फायदे
- सीजीडी सरकारच्या विविध स्वच्छ उर्जा उपक्रमांना (उदा. ईथेनॉल ब्लेंडिंग, बायोगैस संयंत्रांची उभारणी, एलपीजी वापरात वृद्धी, वाहनांसाठी बीएस-६ इंधनाची सुरुवात इत्यादी) पाठिंबा प्रदान करेल.
- सीजीडी पंतप्रधान उज्ज्वला योजनेलाही पाठिंबा देईल. कारण शहरी भागात पाईपलाइनद्वारे गॅस प्राप्त झाल्यास, ग्रामीण भागात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात वाढ होईल.
- सीजीडी नेटवर्कच्या विस्तारातून औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांनाही फायदा होईल कारण यामुळे नैसर्गिक वायूचा अखंडित पुरवठा सुनिश्चित होईल.
सरकारचा स्वच्छ उर्जेसाठी पुढाकार
- सरकार देशात स्वच्छ ऊर्जेच्या वापरास चालना देण्यास वचनबद्ध आहे.
- यासाठी सरकारने एलईडी बल्ब, बीएस-६ इंधन, जैव ऊर्जा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, पंतप्रधान उज्ज्वला योजना अशा अनेक उपक्रमाची सुरुवात केली आहे.
- अधिकाधिक शहरांमध्ये पाईपद्वारे स्वच्छ गॅसचा पुरवठा करणे हेदेखील या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
नैसर्गिक वायूच का?
- कोळसा आणि इतर द्रव इंधनांपेक्षा नैसर्गिक वायू एक आदर्श इंधन आहे कारण ते पर्यावरण अनुकूल, सुरक्षित आणि स्वस्त इंधन आहे.
- पाइपलाइनच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला जसा पाणीपुरवठा केला जातो, तितक्याच सहजतने नैसर्गिक वायूचा पुरवठादेखील केला जातो.
- त्यासाठी स्वयंपाकघरामध्ये सिलेंडरची आवश्यकता नाही. त्यामुळे ही जागा इतर कोणत्याही हेतूसाठी वापरली जाऊ शकते.
- नैसर्गिक वायूचा उपयोग घरात, वाहने आणि उद्योगांमध्ये केला जाऊ शकतो. यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होण्यासही मदत मिळते.
ॲक्रॉस (ACROSS) योजनेला सरकारची मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट कमिटीने ॲक्रॉस (ACROSS) योजनेच्या ९ उप-योजनांना १४५० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह २०१७ ते २०२० दरम्यान सुरु ठेवण्यास मंजूरी दिली आहे.
- ॲक्रॉसचे पूर्ण रूप ॲटमॉस्फीयर अँड क्लायमेट रिसर्च – मॉडलिंग ऑब्जर्विंग सिस्टम्स अँड सर्विसेस आहे. हवामान अंदाजमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- ॲक्रॉस योजना ९ उप-योजनांची मिळून बनलेली आहे. या योजना बहु-विषयक आणि बहु-संस्थात्मक स्वरुपातील आहेत. समाजाच्या कल्याणासाठी विश्वासार्ह हवामान अंदाज प्रदान करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनांची अंमलबजावणी भूविज्ञान मंत्रालयाच्या प्रमुख संस्था उदा. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था (IITM), नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग (NCMRWF) आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्या माध्यमातून केली जाईल.
- आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट कमिटीने २०२०-२१ दरम्यान १३० कोटी रुपयांच्या आर्थिक बांधिलकीसह नॅशनल फॅसिलिटी फॉर एयरबोर्न रिसर्चच्या (NFAR) स्थापनेलाही मंजुरी दिली आहे.
- ॲक्रॉस (ACROSS) योजना भूविज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहे, जी चक्रीवादळ, वादळ, लाटा, तीव्र उन्हाळा आणि अतिवृष्टी यांसारख्या विविध घटकांचा सामना करते.
भूविज्ञान मंत्रालय
- राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे १२ जुलै २००६ रोजी नवीन भूविज्ञान मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.
- भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था (IITM), नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग (NCMRWF) या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
- सरकारने अंतराळ व अणुउर्जा आयोगाच्या धर्तीवर पृथ्वी आयोगाच्या स्थापनेलाही अनुमोदन दिले आहे.
- भूविज्ञान मंत्रालयाकडे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींशी संबंधित घटनांचे अंदाज लावण्यासाठी क्षमतेचा विकास आणि सुधारणा करण्याच्या हेतूने संशोधन आणि विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा अधिकार आहे.
- यासाठी हवामान आणि वातावरण मॉडेलिंग, मान्सून संशोधन, हवामान बदल विज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये संशोधन केले जात आहे.
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमला विजेतेपद
- नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात विजेतेपदावर नाव कोरले.
- अंतिम फेरीत मेरी कोमने युक्रेनच्या एच. ओखोटोचा पराभव करत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे ऐतिहासिक सहावे विजेतेपद जिंकले.
- या कामगिरीसह मेरीने आयर्लंडच्या केटी टेलरचा ५ विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. तर क्युबाचा बॉक्सर फेलिक्स सेव्हॉनच्या ६ विजेतेपदांच्या कामगिरीशी बरोबरी केली.
- यापूर्वी मेरीने २००१, २००२, २००५, २००६, २००८, २०१० या वर्षांमध्ये जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
- याच स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात भारताच्या सोनिया चहलने उपविजेतेपदासह रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत जर्मनीच्या ओर्नेला वानरने तिला पराभूत केले.
मेरी कोम
- मेरी कोम आघाडीची भारतीय बॉक्सिंगपटू आहे. तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपूरमधील दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा झाला.
- यापूर्वी मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पधेचे विजेतेपद ५ वेळा जिंकले होते.
- लंडन ऑलिंपिक (२०१२) स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या स्पर्धेतील फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. बॉक्सिंगमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
- २०१४च्या इंचिऑन आशियाई स्पर्धेमध्ये मेरी कोमने सुवर्णपदक जिंकले होते. २०१७मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
- २०१३साली तिचे ‘अनब्रेकेबल’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते.
- २०१४साली तिच्या जीवनावर आधारित ‘मेरी कोम’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
- तिच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तिला पद्मश्री (२००६), पद्मभूषण (२०१३), अर्जुन पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डब्ल्यूसीसीबीला एशियन एनव्हायर्नमेंटल एन्फोर्समेंट अवॉर्ड
- भारतीय संघटना वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) आणि त्याचे माजी अध्यक्ष आर एस शरथ यांना एशियन एनव्हायर्नमेंटल एन्फोर्समेंट अवॉर्ड २०१८ जाहीर झाला आहे.
- सीमेपलीकडच्या पर्यावरण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल डब्ल्यूसीसीबीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- डब्ल्यूसीसीबीने ऑनलाइन वन्यजीव गुन्हा डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम (Wildlife Crime Database Management: WCDM) ही नवीन यंत्रणा विकसित केली आहे.
- या यंत्रणेद्वारे भारतातील वन्यजीवांबाबत गुन्ह्यांना रोखणे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे, यासाठी आकडेवारी मिळविता येऊ शकते.
- संयुक्त राष्ट्रांद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार व्यक्ती किंवा सरकारी संस्था यांना प्रदान केला जातो.
- हा पुरस्कार खालील क्षेत्रात सीमेपलीकडे होणाऱ्या पर्यावरण संबंधी गुन्हेगारीला आळा घालण्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो.
- ही क्षेत्रे आहेत: सहयोग (Collaboration), अखंडता (Integrity), प्रभाव (Impact), नवकल्पना (Innovation), जेंडर लीडरशिप (Gender leadership)
- जेंडर लीडरशिप या क्षेत्राला पहिल्यांदाच या पुरस्काराच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
- डब्ल्यूसीसीबीला हा पुरस्कार नवकल्पना (Innovation) या क्षेत्रात देण्यात आला आहे.
भारताव्यतिरिक्त इतर पुरस्कार
- अखंडतेच्या श्रेणीमध्ये
- ले थाई हँग, व्हिएतनाम
- पिलर ४ केंद्रीय अन्वेषण विभाग, नेपाळ पोलिस
- विचियान चिन्नावोंग, थांगयई नरेशान वन्यजीव अभयारण्यचे (थायलंड) प्रमुख
- प्रभाव श्रेणीमध्ये
- थायलंडचा एक संघ: थाई कस्टम, रॉयल थाई पोलीस, राष्ट्रीय उद्यानाचा वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभाग
- वांग वेई, चीनच्या सीमाशुल्क विभागाचे तस्कर विरोधी ब्यूरोचे तपासणी संचालक
- नवकल्पना श्रेणीमध्ये
- संचालक डेचा विचैडीत यांच्या अंतर्गत रॉयल थाई कस्टम्स इन्व्हेस्टिगेशन अँड द सप्रेशन डिव्हिजन.
- आंतरराष्ट्रीय तपासणी विभाग, कोरिया कस्टम्स सर्व्हिस
- वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो, भारत सरकार
- सहयोग श्रेणीमध्ये
- जोइल बिन बमबोन, वन्यजीवन आणि राष्ट्रीय उद्यान प्रायद्वीपीय मलेशियाचे माजी अध्यक्ष
- आर एस शरथ, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोचे माजी अध्यक्ष
वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो
- इंग्रजी: वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो (डब्ल्यूसीसीबी)
- स्थापना: ६ जून २००७
- मुख्यालय: नवी दिल्ली
- ही एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेची स्थापना भारत सरकारद्वारे पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.
- या संस्थेची स्थापना ६ जून २००७ रोजी करण्यात आली. यासाठी वन्यजीवन (संरक्षण) कायदा १९७२मध्ये सुधारणा करण्यात आली होती.
- ही संस्था वन्यजीवांशी संबंधित गुन्ह्यांची माहिती गोळा करते आणि राज्य व इतर अंमलबजावणी एजन्सींसह या माहितीचे आदानप्रदान करते.
जागतिक टॅलेंट रँकिंगमध्ये भारताला ५३वे स्थान
- स्वित्झर्लंडच्या आयएमडी बिझनेस स्कूलने प्रसिध्द केलेल्या ६३ देशांच्या जागतिक टॅलेंट रँकिंगमध्ये २ स्थानांनी घसरण होऊन भारताला यावर्षी ५३वे स्थान प्राप्त झाले आहे.
- ही क्रमवारी गुंतवणूक आणि विकास, आव्हाने आणि तयारी या ३ निकषांवर आधारित आहे. या क्रमवारीमध्ये स्वित्झर्लंडने सलग पाचव्यांदा प्रथम स्थान मिळविले आहे.
- या यादीतील पहिले १० देश: स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, ऑस्ट्रिया, नेदरलँड, कॅनडा, फिनलँड, स्वीडन, लक्झेनबर्ग, जर्मनी.
भारत-मॉरीशस दरम्यान सामंजस्य करार
- केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत-मॉरीशस दरम्यानच्या ग्राहक संरक्षण आणि कायदेशीर प्रक्रियेवरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
- हा करार दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
- या करारामुळे ग्रहक संरक्षणाच्या क्षेत्रात उभय देशांमधले सहकार्य वाढणार असून त्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा उभी करणे शक्य होईल.
- या यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहक संरक्षणासाठी दोन्ही देशात होत असलेल्या उपाययोजनांची माहिती परस्परांना देता येईल.
- त्याशिवाय ग्रहक संरक्षण आणि कायदेशीर प्रक्रियेच्या क्षेत्रात एकात्मिक शाश्वत विकासाच्या दिशेने दोन्ही देश एकत्र पावले उचलतील.
- दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, टेलिमाकेर्टिंग, बहूस्तरीय मार्केटिंग, इ कॉमर्स अशा क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याचे आव्हान आज सरकारी यंत्रणेसमोर आहे. या आव्हानांचा सामना कारण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.
नाहिद अफरीन युनिसेफच्या युथ ॲडव्होकेट
- आसामच्या गायिका नाहिद अफरीन यांची युनिसेफ इंडियाने उत्तर-पूर्वी क्षेत्राच्या पहिल्या ‘युवा वकील’ (युथ ॲडव्होकेट) म्हणून नियुक्त केले आहे.
- युनिसेफ समाजात बदल घडवून आणण्यासाठी ‘युवा वकील’ नियुक्त करते. नाहिद अफरीन यांची बाल हक्कांबद्दल जनजागृती करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
- नाहिद अफरीन यांनी २०१६मध्ये ‘अकिरा’ चित्रपटाद्वारे आपली कारकीर्द सुरु केली. २०१८मध्ये आसाम राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये नाहिद यांना सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
मिलि बॉबी ब्राउन युनिसेफची सर्वात तरुण सद्भावना दूत
- १४ वर्षीय ब्रिटिश अभिनेत्री मिलि बॉबी ब्राउन हिची युनिसेफची सद्भावना दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- जागतिक बालदिन म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी तिची नियुक्ती करण्यात आली. ती युनिसेफची सर्वात तरुण सद्भावना दूत ठरली आहे.
- मिलि बॉबी ब्राउन बालहक्क, गरिबी, शिक्षण व हिंसा इत्यादींविषयी जागरुकता पसरविण्यासाठी सहकार्य करणार आहे.
- जागतिक बालदिनी बालहक्कांविषयी जनजागृती करण्यात येते तसेच बालकांना सुरक्षा आणि शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
- मिलि बॉबी ब्राउनचा जन्म १९ फेब्रुवारी २००४ रोजी झाला. ती एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. नेटफ्लिक्स सिरीज ‘स्ट्रेंजर थिंग्स’मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
- टाइम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तिचा समावेश केला होता. या यादीत समाविष्ट केले गेलेली ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.
युनिसेफ
- पूर्ण रूप: युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड (UNICEF)
- स्थापना: ११ डिसेंबर १९४६
- मुख्यालय: न्यूयॉर्क (अमेरिका)
- युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना व इतर आरोग्य संस्थांच्या सहकार्याने मुलांना पाणी, स्वच्छता, रागांपासून बचाव इत्यादीसाठी कार्यक्रम चालविते.
- जगातील मुलांच्या कल्याणासाठी कार्य करताना युनिसेफ कोणत्याही प्रकारच्या जाती, धर्म, राष्ट्रीयत्व, राजकीय विचारधारा इत्यादींच्या आधारे भेदभाव करीत नाही.
- युनिसेफ दरवर्षी जगभरातील नवजात बालकांच्या लसीकरणासाठी ३ अब्जांहून अधिक लसी प्रदान करते.
२१ नोव्हेंबर: जागतिक सीओपीडी दिन
- दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक सीओपीडी (Chronic Obstructive Pulmonary Disease) दिन म्हणून साजरा केला जातो.
- हा दिवस ग्लोबल इनिशीएटीव्ह फॉर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज (GOLD)द्वारे साजरा केला जातो.
- याचा उद्देश सीओपीडीबद्दल जनजागृती करणे आणि या रोगाच्या अटकाव व उपचार यांचा प्रचार करणे आहे.
- सीओपीडी फुफ्फुसांचा आजार आहे. यावर्षी सीओपीडी दिनाची मुख्य संकल्पना (थीम) ‘नेव्हर टू अर्ली, नेव्हर टू लेट’ ही आहे.
- सीओपीडी हा एक आजार नसून यात फुफ्फुसाशी संबंधित अनेक आजारांचा समावेश होतो. यामध्ये प्रदीर्घ कालावधीपर्यंत राहणारे फुफ्फुसाचे आजारही समाविष्ट आहेत. तंबाखू सेवन हे सीओपीडीचे मुख्य कारण आहे.
- सध्या सुमारे ६४ दशलक्ष व्यक्ती सीओपीडीने त्रस्त आहेत. ३० लाख व्यक्तींचा सीओपीडीमुळे मृत्यू झाला आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, २०३०पर्यंत सीओपीडी हा जगातील तिसरा सर्वात मृत्युकारक आजार बनेल.
शुभंकर शर्माला युरोपियन टूरचा रुकी ऑफ द ईयर पुरस्कार
- शुभंकर शर्मा युरोपियन टूरचा ‘सर हेनरी कॉटन रुकी ऑफ द ईयर’ हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय गोल्फर ठरला आहे. २०१८च्या जागतिक टूर चॅम्पियनशिपमध्ये त्याने ४१वे स्थान प्राप्त केले होते.
- युरोपियन टूरमध्ये रुकी ऑफ द इयर पुरस्कार आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने जिंकलेली नाही.
- एशियन टूरमध्ये रुकी ऑफ द इयर पुरस्कार अर्जुन अटवाल (१९९५), शिव कपूर (२००५), सी. मुनियापा (२००९) या भारतीयांनी जिंकला आहे.
- शुभंकर शर्मा भारतीय गोल्फर आहे. त्याचा जन्म २१ जुलै १९९६ रोजी झाला होता २०१३मध्ये तो व्यावसायिक गोल्फर बनला.
- डिसेंबर २०१७मध्ये जोबर्ग ओपनमध्ये त्याने व्यावसायिक कारकिर्दीत आपला पहिला विजय मिळवला. त्यानंतर त्याने फेब्रुवारी २०१८मध्ये मेबँक चॅम्पियनशिप जिंकली होती.
पंजाबमध्ये अंतर-धर्म अध्ययन संस्था सुरु होणार
- भारत सरकारने बंधुता आणि विविधता यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंजाबमध्ये अंतर-धर्म अध्ययन संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ही संस्था गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीच्या उत्सवाचा भाग आहे. या संस्थेसाठी राज्य सरकार मोफत जमीन उपलब्ध करून देणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीच्या उत्सवासाठी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीची स्थापना केली आहे.
- ही समिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्य सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा या समितीचे सदस्य आहेत.
- केंद्र सरकारने गुरु नानक देव यांची ५५०वी जयंती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे ठरविले आहे.
- या उत्सवात अनेक प्रकारचे धार्मिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापक समिती नॉलेज पार्टनर असेल.
- याशिवाय केंद्र सरकार पंजाबमधील सुलतानपुर लोधी या स्थळाला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार आहे.
- या ठिकाणी गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ व्यतीत केला होता. या शहराला ‘पिंड बाबे नानक दा’ या नावानेही ओळखले जाते.
- या ठिकाणी एक उच्च क्षमतेची दुर्बीण स्थापित करण्यात येणार असून, त्याद्वारे पाकिस्तानातील करतारपूर साहिब ठिकाण बघता येऊ शकेल. गुरू नानक देव यांनी अखेरचा काळ करतारपूर साहिबमध्ये व्यतीत केला होता.
- अमृतसरमध्ये गुरुनानक युनिव्हर्सिटी बनविण्यात येणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयही गुरुनानक देव यांच्याशी संबंधित स्थानकांवर विशेष ट्रेन चालवणार आहे.
- या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालय आणि पोस्टल विभाग गुरू नानक देव यांच्या स्मरणार्थ नाणी व पोस्टल स्टॅम्प देखील प्रकाशित करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा