चालू घडामोडी : १० नोव्हेंबर

सिम्बेक्स २०१८: भारत-सिंगापूर द्विपक्षीय संयुक्त युद्धसराव

  • भारत आणि सिंगापूरदरम्यान सिम्बेक्स २०१८ (Singapore-India Maritime Bilateral Exercise) या द्विपक्षीय संयुक्त युद्धसरावाला १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.
  • या अभ्यासाची ही २५वी आवृत्ती आहे. हा सराव १० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत अनेक टप्प्यांमध्ये अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पार पडणार आहे.
  • भारत आणि सिंगापूर दरम्यान १९९४पासून आयोजित केल्या जाणाऱ्या या युद्ध अभ्यासाची यंदाची आवृत्ती आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती असेल.
  • यापूर्वी या युद्धसरावाचे आयोजन मे २०१८मध्ये दक्षिण चीन समुद्रामध्ये करण्यात आले होते.
सिम्बेक्स २०१८
  • या सरावाचे प्रारंभिक टप्पा पोर्ट ब्लेअरमध्ये, त्यानंतर पुढचा टप्पा अंदमान समुद्रात आयोजित केला जाईल. विशाखापट्टणम येथे या अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा तर अखेरचा टप्पा बंगालच्या उपसागरात आयोजित केला जाईल.
  • या अभ्यासामध्ये भारतीय नौदालाद्वारे टॉर्पिडो व क्षेपणास्त्रांचा सर्वाधिक वापर केला जाईल. एखाद्या परदेशी नौदलाबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात टॉर्पिडो व क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.
या युद्धसरावात समाविष्ट उपक्रम
  • क्षेपणास्त्र प्रक्षेपण.
  • हेवीवेट टॉर्पिडो सराव (पाणतीर).
  • मध्यम पल्ल्याची तोफ डागणे.
  • अत्याधुनिक पाणबुडी विरोधी रॉकेटचे प्रक्षेपण व युद्धसराव.
  • पाणबुडी मदतकार्य.
  • जमिनीवरील आणि हवाई युद्ध अभ्यास.
  • UAV ऑपरेशन आणि हेलीकॉप्टरचे उड्डाण
या सरावात भारताचे प्रतिनिधित्व करणार
  • रणवीर श्रेणीची विध्वंसक युद्धनौका आयएनएस रणविजय
  • स्टील्थ विध्वंसक युद्धनौका आयएनएस सातपुडा, आयएनएस सह्याद्री
  • इतर युद्धनौका आयएनएस कदमत, आयएनएस कीर्च, आयएनएस सुमेधा आणि आयएनएस सुकन्या.
  • सिंधु घोष श्रेणीतील पाणबुडी आयएनएस शक्ति आणि आयएनएस सिंधुकीर्ति.
  • समुद्री टेहळणी विमान डॉर्नियर २२८, पी८१, एमके१३२ हॉक आणि यूएच३एच तसेच चेतक हेलीकॉप्टर.
या सरावात सिंगापुरचे प्रतिनिधित्व करणार
  • स्टील्थ विध्वंसक युद्धनौका आरएसएस फॉर्मिडेबल व आरएसएस स्टीडफास्ट.
  • आरएसएस यूनिटी, क्षेपणास्त्र तैनात असलेल्या आडन युद्धनौका आरएसएस विगर आणि आरएसएस वैलिएंट.
  • आर्चर श्रेणीतील पाणबुडी आरएसए स्वॉर्ड्समॅन.
  • खोल समुद्रात त्वरित मदत करणारे डीएसआरव्ही जहाज.
  • समुद्री टेहळणी जहाज फोकर एफ५०.
  • एस७०बी हेलीकॉप्टर तसेच मानवरहित विमान स्कॅन ईगल.

शत्रूंच्या मालमत्तांची विक्री करण्यास मंजुरी

  • फाळणीनंतर पाकिस्तानात किंवा ५० वर्षांपूर्वी चीनला स्थलांतर केलेल्या लोकांच्या (शत्रूंच्या) मालमत्तांची विक्री करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली.
  • ही मालमत्ता विकण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत.
  • ही विक्रीची रक्कम अर्थ मंत्रालयाच्या सरकारी खात्यात निर्गुंतवणूक निधी म्हणून जमा केला जाणार आहे.
  • शत्रू मालमत्ता कायदा (एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट) १९६८मध्ये केंद्र सरकारने सुधारणा केली होती. मात्र ते विधेयक संसदेत संमत न झाल्याने त्याचा वटहुकूम केंद्र सरकारने काढला होता.
  • या कायद्यान्वये भारत सोडून पाकिस्तान वा चीनला गेलेल्या या मंडळींना त्यांच्या येथील मालमत्तांवर अधिकार सांगता येत नाही.
  • या सर्व मालमत्ता आता विकण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. यातून सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे.
  • या निर्णयामुळे अनेक दशके निष्क्रिय पडलेल्या जंगम शत्रू मालमत्तेचे मुद्रीकरण होऊ शकेल.
  • याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग विकास आणि समाज कल्‍याण कार्यक्रमांसाठी करता येऊ शकतो.

अवनीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती स्थापन

  • महाराष्ट्राच्या वन खात्याकडून अवनी (टी१) या नरभक्षक वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी यवतमाळमध्ये ठार केल्यानंतर राज्यासह देशभरात मोठा गदारोळ माजला.
  • प्राणीप्रेमींसह अनेक राजकीय पक्षांनी यावरुन सरकारवर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
  • वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे या समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
  • ही समिती टी१ वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.
पार्श्वभूमी
  • नरभक्षक झालेल्या अवनी (टी१) वाघिणीला यवतमाळच्या पांढरकवडा भागात बंदुकीची गोळी घालून ठार करण्यात आले होते.
  • अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवालातून ती आठवडाभर उपाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  • तिच्या दोन बछड्यांचा सध्या वनखात्याचे कर्मचारी शोध घेत आहेत. मात्र, त्यांचाही भुकेने मृत्यू झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टी-२०मध्ये शतक झळकावणारी हरमनप्रीत पहिली भारतीय

  • भारतीय महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने, वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात इतिहासाची रचला आहे.
  • न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात हरमनप्रीतने शतक झळकावत, टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
  • हरमनप्रीतने ५१ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली. हरमनप्रीतच्या खेळीत ८ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.
  • या खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी ५ विकेटच्या मोबदल्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३४ धावांनी केली.

मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांना सुवर्णपदक

  • भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी कनिष्ठ जागतिक नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटात विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • त्यांनी विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदक तर चीनच्या खेळाडूंनी ४७७.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
  • भारताच्या सौरभचे या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. त्याआधी त्याने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकले.

विक्रम गदगकर यांना ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार

  • मूळ कर्नाटकचे असलेले भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक विक्रम गदगकर यांना मेंदूविषयक संशोधनासाठी पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार जाहीर झाला.
  • मेंदूविज्ञानात वेगळे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना द ग्रबर फाऊंडेशनकडून दिला जाणारा हा पुरस्कार २५ हजार डॉलर्सचा आहे.
  • विक्रम गदगकर हे कॉर्नेल विद्यापीठातील जेसी गोल्डबर्ग प्रयोगशाळेत संशोधन करीत आहेत.
  • त्यांनी बंगळुरु विद्यापीठातून पदवी घेतली आणि तेथीलच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून एमएस केले.
  • नंतर अमेरिकेला जाऊन त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात जे. सी. सीमस डेव्हिस यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी मेंदूविज्ञानात डॉक्टरेट पदवी घेतली.
  • त्यांनी मेंदूतील जैविक मंडलांची (सर्किट) जोडणी व मानव/प्राण्यांच्या वर्तनाचा त्याच्याशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न केला.
  • चुकत-चुकत शिकण्यात मेंदूतील डोपॅमाइन न्यूरॉनची भूमिका महत्त्वाची असते, हे त्यांच्या संशोधनातून दिसून आले आहे.

निधन: तेलुगू साहित्यिक कपिलावई लिंगमूर्ती

  • तेलुगू साहित्यात फार मोठी कामगिरी केलेले साहित्यिक, कवी, ज्योतिषी, इतिहासकार व शिक्षक कपिलावई लिंगमूर्ती यांचे ६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांचा जन्म ३१ मार्च १९२८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव के. व्यंकटाचलम होते. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी तेलुगू साहित्यात एम.ए.ची पदवी घेतली.
  • त्यांना इतिहासाचेही प्रचंड वेड होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाचन करून आंध्र व तेलंगणाच्या इतिहासाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये इतिहासाचे संदर्भ जागोजागी दिसून येतात.
  • अनेक संस्थांमध्ये ते व्याख्याते म्हणून काम करीत होते. सुरुवातीला नगरकुर्नुल येथील शाळेत ते तेलुगूचे शिक्षक होते. नंतर पालेम येथे श्री व्यंकटेश्वरा ओरिएंटल कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
  • श्रीशैलममधील उमा माहेश्वरम या पवित्र ठिकाणाचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
  • तेलुगू साहित्यात १०० पुस्तकांची भर घालून त्यांनी १९८३मध्ये लेखनातून निवृत्ती पत्करली. त्यांची २५ पुस्तके आजही अप्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यावर आतापर्यंत ६ संशोधकांनी पीएचडी केली आहे.
  • सतकाम, द्विपद नाटकम, विविध ठिकाणांच्या दंतकथा, बालसाहित्य यात त्यांनी मोठे काम केले. चिता पडी, चित्र बंधमु यांसारख्या साहित्यतंत्रांचा वापर त्यांनी केला.
  • कविता कलानिधी, रीसर्च पंचना, कवी केसरी, वेदांत विशारद, गुरू शिरोमणी, साहित्य स्वर्ण सौरभ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
  • २०१४मध्ये त्यांना पोट्टी श्रीरामुलू विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
  • प्रसिध्द साहित्यकृती: आर्य सताकम, श्रीमथ प्रताप गिरी खंडम, सोमेश्वर क्षेत्र माहात्म्यम, पड्या कथा पारिमलामु, पालामूर जिला देलालयालु, सलग्राम सास्त्रम, श्री रुद्रध्यायामु इत्यादी.

१० नोव्हेंबर: जागतिक विज्ञान दिवस

  • दरवर्षी १० नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिवस (शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस) म्हणून साजरा केला जातो.
  • जनतेच्या जीवनात विज्ञानाचा प्रभाव व समाजातील विज्ञानाची भूमिका अधोरेखित करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
  • यावर्षी जागतिक विज्ञान दिनाचा मुख्य विषय ‘विज्ञान, एक मानवी हक्क’ (Science, a Human Right) हा आहे.
  • २००१मध्ये युनेस्कोने जागतिक विज्ञान दिनाची स्थापना केली. २००२मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला गेला.
  • हा दिवस साजरा करण्याचे उद्देश
  • शांततापूर्ण आणि शाश्वत समाजाच्या विकासामध्ये विज्ञानाची भूमिका स्पष्ट करणे.
  • समाजाच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करण्याच्या वचनबद्धता अधोरेखित करणे.
  • विज्ञानासमोरील आव्हानांकडे लक्ष वेधून घेणे.
  • वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास करण्यासाठी योगदान देणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा