चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

मिशन रक्षा ज्ञान शक्ति

  • केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ति’ सुरु केले.
  • या अभियानाचा मुख्य उद्देश स्वदेशी संरक्षण निर्मिती क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.
  • या अभियानाची सुरुवात संरक्षण उत्पादन विभागाद्वारे करण्यात आली आहे. संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये देशाला स्वयंपूर्ण बनविणे हा त्यामागील उद्देश आहे. 
  • या अभियानाच्या समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी गुणवत्ता आश्वासन महासंचालकांना देण्यात आली आहे.
  • पार्श्वभूमी
  • बौद्धिक संपदा अधिकारांमुळे नवकल्पनांना चालना मिळते. भारत नेहमी ज्ञानाचे केंद्र राहिला आहे. परंतु संशोधनांना सुरक्षित करण्यासाठी आवश्यक माहितीच्या अभावामुळे देशातील नवकल्पना आणि ज्ञानाचा पूर्ण वापर होऊ शकत नाही.
  • त्यामुळे देशामध्ये बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल जागरुकता पसरवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • संरक्षण मंत्रालयाने एप्रिल २०१८मध्ये बौद्धिक संपदा समर्थन कक्षाची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश ऑर्डीनन्स फॅक्टरी मंडळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण युनिट्सच्या १० हजार कामगारांना प्रशिक्षित करणे आहे.

भारत-चीन दरम्यान दुहेरी करआकारणी टाळण्यासाठी करार

  • करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत आणि चीनने डीटीएए करारातील (डबल टॅक्सेशन अवॉईडन्स अॅग्रीमेंट) सुधारणांसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
  • डीटीएए करारामध्ये केलेल्या सुधारणांमुळे, माहितीच्या आदान-प्रदान मानकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अद्ययावत करण्यात आले आहे.
  • माहितीच्या आदान-प्रदानामुळे भारत आणि चीन यांच्यातील कर चुकवण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे.
दुहेरी कर आकारणी
  • जेव्हा एखादी कंपनी अथवा व्यक्तीचे एकच उत्पन्न एकपेक्षा अधिक देशात करपात्र ठरते, अशा वेळी दुहेरी कर आकारणीची स्थिती निर्माण होते.
  • विविध देशांमधील कर आकारणीच्या विविध नियमांमुळे अशी स्थिती निर्माण होत असते.
  • दुहेरी कर आकारणीपासून मुक्ती मिळविण्यासाठी दोन देश ‘डबल टॅक्सेशन अवॉईडन्स अॅग्रीमेंट’ (डीटीएए) करार करतात.
  • याचा उपयोग कर चुकवेगिरी टाळण्यासाठी आणि दुहेरी कर आकारणीची समस्या सोडविण्यासाठी केला जातो.
  • आयकर कायदा १९६१च्या कलम ९०नुसार, दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत कोणत्याही अन्य देशाबरोबर करार करू शकतो.

अखिलेश रंजन प्रत्यक्ष कर कायद्याशी संबंधित टास्क फोर्सचे संयोजक

  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य अखिलेश रंजन यांना नवीन प्रत्यक्ष कर कायदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे संयोजक म्हणून नियुक्त केले आहे.
  • ते अरविंद मोदी यांची जागा घेतील. अरविंद मोदी सप्टेंबर २०१८मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
  • या टास्क फोर्सच्या इतर सदस्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. अखिलेश रंजन सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
  • ही टास्क फोर्स नोव्हेंबर २०१७मध्ये स्थापन करण्यात आली. आयकर अधिनियम १९६१ आणि नवीन प्रत्यक्ष कर कायदा तयार करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
  • ही टास्क फोर्स विविध देशांमधील प्रत्यक्ष कर कायद्यांचा अभ्यास करेल आणि भारताच्या आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा तयार करेल.
  • ही टास्क फोर्स २८ फेब्रुवारी २०१९ रोजी सरकारकडे आपला अहवाल सादर करणार आहे.

नागेश्वर राव गुंटूर अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष

  • प्रसिद्ध शास्त्रज्ञ नागेश्वर राव गुंटूर यांना ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाचे (एईआरबी) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • सध्या नागेश्वर राव गुंटूर प्रोजेक्ट डिझाईन सेफ्टी कमिटी, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरचे अध्यक्ष आहेत.
  • त्याआधी त्यांनी न्यूक्लियर पॉवर कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्येही काम केले होते.
अणुऊर्जा नियामक मंडळ
  • एईआरबी: ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड
  • एईआरबीची स्थापना नोव्हेंबर १९८३मध्ये झाली. अणुऊर्जा कायदा १९६२च्या कलम २७ नुसार राष्ट्रपतींनी या संस्थेची स्थापना केली आहे.
  • एईआरबीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. एईआरबी देशातील अणुऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित कार्य करते.
  • सध्या या मंडळामध्ये एक अध्यक्ष, एक पूर्णवेळ सदस्य, तीन अर्धवेळ सदस्य आणि एक सचिव आहे.

सरकारचा एकीकृत रोग नियंत्रण कार्यक्रम

  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच एकीकृत रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम ७ राज्यांमधील एकात्मिक आरोग्य माहिती मंचाचा विभाग आहे.
  • केंद्र सरकारद्वारे सार्वजनिक आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे.
  • ही एक रियल टाईम, केस बेस्ड इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती प्रणाली आहे, ज्यामध्ये महामारी टाळण्यासाठी जीआयएस टॅगिंगचा वापर केला जाईल. यामध्ये नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
  • याद्वारे एखाद्या मोठ्या महामारीची माहिती योग्य मिळू शकते आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकते.
  • या कार्यक्रमाच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी, ब्लॉक स्तरावर ३२ हजार, जिल्हा स्तरावर १३ हजार आणि राज्य पातळीवरील ९०० लोकांना प्रशिक्षित केले जाईल.
  • या कार्यक्रमाचे राज्यांद्वारे सामायिक केलेल्या माहितीच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल.

२७ नोव्हेंबर: भारतीय अवयवदान दिन

  • २७ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • यावेळी ९व्या भारतीय अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृतीसाठी महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ राज्य घोषित करून, पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल ऑर्गेन अँड टिशू ट्रान्सप्लंट ऑर्गनायझेशनने (NOTTO) केले होते.
  • जागतिक अवयवदान दिवस प्रतिवर्षी २३ ऑगस्टला साजरा केला जातो.

कुरुक्षेत्रमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन

  • हरियाणातील कुरुक्षेत्र येथे ७ ते २३ डिसेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित केला जमणार आहे. या कार्यक्रमाची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • या कार्यक्रमासाठी मॉरीशसचा भागीदार देश आणि गुजरात भागीदार राज्य असेल. 
  • फेब्रुवारी २०१९मध्ये मॉरीशसमध्ये गीता महोत्सव आयोजित करण्यात येणार असून, भगवतगीतेचा संदेश जगामध्ये पसरविणे हा त्यामागील उद्देश आहे.
  • या कार्यक्रमात श्रीमद भगवतगीतेतील ज्ञानाच्या प्रसारावर चर्चा करण्यात येणार आहे.
  • भगवतगीतेमध्ये भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला दिलेल्या ज्ञानाचे तपशीलवार वर्णन आहे. हे ज्ञान श्रीकृष्ण यांनी महाभारत युद्धापूर्वी कुरुक्षेत्रात दिले होते.
  • कुरुक्षेत्र विकास मंडळ, हरियाणा पर्यटन तसेच जिल्हा प्रशासन व माहिती आणि जल संपर्क विभाग संयुक्तपणे आंतर्राष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करतात.
  • या कार्यक्रमामध्ये कुरुक्षेत्राच्या भिंतीवर २०० पेक्षा अधिक चित्रकार महाभारतच्या संकल्पनेवर आधारित चित्र काढतील. यामध्ये भारत, मॉरीशस, इंडोनेशिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि रशिया या देशातील कलाकार सहभागी होतील.

रिम्सकडून तितली चक्रीवादळ अतिदुर्लभ म्हणून घोषित

  • आफ्रिका आणि आशियामधील आपत्तीची पूर्वसूचना देणारी ४५ देशांची संस्था रिम्सने ऑक्टोबरमध्ये आलेले भयानक चक्रीवादळ ‘तितली’ला (Titli) अतिदुर्लभ म्हणून घोषित केले.
  • रिम्सच्या अहवालानुसार ओडीशाच्या किनाऱ्यावर येणाऱ्या चक्रीवादळांचा मागील २०० वर्षांचा इतिहास बघता तितली चक्रीवादळ आपल्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत अतिदुर्लभ आहे.
  • यापूर्वी भारताच्या हवामानशास्त्र विभागाने तितलीच्या रचनेचा अतिदुर्लभ घटना म्हणून उल्लेख केला होता. या तीव्र वादळाने जमिनीवर आदळल्यानंतर आपली दिशा बदलली होती.
तितलीबद्दल
  • तितली हे भयानक चक्रीवादळ ऑक्टोबरमध्ये ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर आले होते. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली होती.
  • अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अशा शक्तिशाली वादळांची निर्मिती फार दुर्लभ असते. या वादळाचे तितली हे नामकरण पाकिस्तानद्वारे करण्यात आले होते.
रीजनल इंटीग्रेटेड मल्टी-हॅजर्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम (रिम्स)
  • RIMES: Regional Integrated Multi-Hazard Early Warning System
  • रिम्स ही ४५ देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ही संस्था आपत्ती चेतावनींशी संबंधित आहे. ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक नोंदणीकृत अंतर-सरकारी संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना २००९ साली करण्यात आली होती. यात आशिया-पॅसिफिक आणि आफ्रिकेतील देश समाविष्ट आहेत.
  • या संघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया २००४ साली हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीनंतर सुरू झाली होती.

अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र ठरणार पहिलेच राज्य

  • होलटेक इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा साधनांचा उत्पादन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
  • अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन साठवणूक व ऊर्जा वहनासारख्या विविध उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या उपकरणांसह इतर आवश्यक सामग्री पुरवठादारांमध्ये होलटेक इंटरनॅशनल अग्रणी कंपनी आहे.
  • कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून ४,९०० कोटी रुपयांची (६८ कोटी डॉलर) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
  • ऊर्जा आणि प्रक्रिया, एरोस्पेस, पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांना संयंत्रांची निर्मिती करताना लागणाऱ्या अवजड सुटय़ा भागांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
  • राज्य शासनाकडून प्रकल्प उभारणीसाठी लागणारी मंजुरी-परवानगी एक खिडकी योजनेतून सुलभरीत्या देण्यात येणार आहे.
  • होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषत: अणुऊर्जा क्षेत्राशी निगडित तज्ञ कंपनी आहे.
  • आजवर विविध ३५ देशातील २००हून अधिक अणुऊर्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.

पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटीला राणी राशमोनी यांचे नाव

  • पश्चिम बंगाल विधानसभेने अलीकडेच पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटी (दुरुस्ती) विधेयक, २०१८ पास केले आहे.
  • पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटीचे नामकरण राणी राशमोनी ग्रीन युनिव्हर्सिटी असे करण्यात येणार आहे. लोकमाता राम राशमोनी यांच्या २२५व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
राणी राशमोनी
  • राणी राशमोनी यांचा जन्म २८ सप्टेंबर १७९३ रोजी झाला. पश्चिम बंगालमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी खूप कार्य केले.
  • त्यांनी कलकत्ता येथील दक्षिणेश्वर मंदिराची स्थापना केली. याशिवाय त्यांनी धार्मिक पर्यटकांसाठी सुवर्णरेखा नदीपासून पुरीपर्यंत मार्गही बांधला.
  • त्यांनी बाबुघाट, अहिरितोला घाट आणि नीमतोला घाट देखील बांधून घेतला होता. त्यांनी इंपीरियल ग्रंथालय (आता भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय) आणि द हिंदू कॉलेज (आता प्रेसीडेंसी विद्यापीठ) यासाठीही लक्षणीय योगदान दिले आहे.

नंदीता दास यांना एफआयएपीएफ पुरस्कार

  • भारतीय चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांना यावर्षीचा ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • २९ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या १२व्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवार्ड्स (APSA) या पुरस्कार वितरण सोहळ्याहा पुरासाक्र त्यांना प्रदान करण्यात येईल.
  • इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स (FIAPF) ही चित्रपट क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे.
  • ३० देशांमधील चित्रपट निर्मात्यांच्या ३६ संघटना या संस्थेच्या सदस्य आहेत.
  • या संघटनेची १९३३साली स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय फ्रान्सच्या पॅरिस शहरात आहे.
  • ही संस्था जगभरात काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा