सुनील अरोरा यांची देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (२३वे) म्हणून निवड केली आहे.
- अरोरा १ डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेले विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान घेतील. २ डिसेंबरला अरोरा पदभार स्वीकारतील.
- त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. २०१९च्या निवडणुका सुनील अरोरा यांच्या कार्यकाळात होणार आहेत.
- अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८०च्या तुकडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
- ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे.
- त्यांनी १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ दरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
- त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
- त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते पाच वर्षे एअर इंडियाचे सीएमडीही होते.
- २०१६मध्ये त्यांना प्रसार भारतीचे सल्लागार म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. त्यांनतर त्यांची भारतीय अर्थ व्यवहारांच्या संस्थेचे सीईओ आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
निवडणूक आयोग
- भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.
- भारतातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्य विधानसभा इत्यादी निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
- निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.
- सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.
- सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या ओमप्रकाश रावत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२२वे) आहेत.
विद्यार्थ्यांचा गृहपाठ आणि दप्तराच्या वजनासाठी दिशा-निर्देश जारी
- केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याचे निर्देश दिले आहेत.
- याशिवाय दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही निश्चित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे निर्देश
- विविध विषय शिकविणे आणि दप्तराचे वजन नियंत्रित करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिशा-निर्देश तयार करावे लागणार.
- पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देता येणार नाही आणि भाषा व गणिताशिवाय इतर कोणताही विषय निर्धारित करता येणार नाही.
- तिसरी ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना NCERTद्वारे निर्धारित भाषा, गणित आणि पर्यावरणशास्त्र याव्यतिरिक्त इतर कोणताही विषय निर्धारित करू नये.
- विद्यार्थ्यांना अतिरिक्त वह्या-पुस्तके व इतर अतिरिक्त सामग्री आणण्यास सांगू नये आणि दप्तराचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असू नये.
दप्तराच्या वजनाबद्दल निर्देश
- पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन १.५ किलोपेक्षा अधिक नसावे.
- तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन २ ते ३ किलो असावे.
- सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ४ किलोपेक्षा अधिक नसावे.
- आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ४.५ किलोपेक्षा अधिक नसावे.
- दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ५ किलोपेक्षा अधिक नसावे.
केंद्रीय विद्यालयात पूर्वीपासूनच आहेत हे नियम
- केंद्रीय विद्यालय संस्थेच्या २००९मधील बनविण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन २ किलोपेक्षा अधिक असू नये ज्यात दप्तराचे वजनही समाविष्ट आहे.
- यानंतर तिसरी व चौथीसाठी ३ किलो, पाचवी ते सातवीसाठी ४ किलो आणि आठवी ते बारावीसाठी ६ किलोची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
- दप्तराच्या वजनाबद्दल अनेक दशकांपासून चिंता व्यक्त होत आहे. ही समस्या प्राथमिक इयत्तांपर्यंतच मर्यादित नसून, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही अधिक असते.
- हा मुद्दे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असून, वेळोवेळी त्यासाठी आंदोलनही झाले आहे. संसदेतही अनेकदा या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.
- १९७७मध्ये ईश्वरभाई पटेल समितीने पहिल्यांदा दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अहवाल सदर केला होता.
- १९९०मध्ये शैक्षणिक धोरणाचे पुनरावलोकन करणाऱ्या समितीने दप्तराचे ओझे कमी करण्याची शिफारस केली होती.
- १९९२मध्ये केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने एक राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन केली. यात देशातील आठ शिक्षणतज्ञांचा समावेश होता. प्रो. यशपाल या समितीचे अध्यक्ष होते.
- ‘शिक्षणाच्या सर्व स्तरावरील विद्यार्थी, विशेषतः लहान इयत्तेतील विद्यार्थ्यांवर अभ्यासामुळे पडणारे ओझे कमी कसे करावे’ यावर विचार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
- १९९३मध्ये यशपाल समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला, ज्यामध्ये दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचविण्यात आले होते.
- पाठ्यपुस्तके ही शाळेची संपत्ती समजून, ती शाळेतच ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉकर्स देण्यात यावे अशी शिफारसही या समितीने केली होती.
नासाचे इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले
- नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन, जिओडेसी अँड हिट ट्रान्सपोर्ट) यान मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे.
- मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. या यांचे वजन सुमारे ३५८ किलो आहे.
- ग्रहाच्या पृष्ठभागावर १९,८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान उतरताना ६ मिनिटांत शून्य वेगावर आले.
- त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
- नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर (७० अब्ज रुपये) खर्च करण्यात आले आहे. ६ महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले.
- सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
- इनसाइट यान पृष्ठभागावर १० ते १६ फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल.
- २०३०पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.
- इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. यामुळे मंगल ग्रहाच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकेल.
- नासाने इनसाइटला लँड करण्यासाठी इलीशियम प्लॅनिशिया नावाच्या जागेची निवड केली. यामुळे सिस्मोमीटर लावणे आणि पृष्ठभागाला खोदणे सोपे झाले.
- यापूर्वी २०१२मध्ये नासाने क्युरीऑसिटी रोव्हर मंगळावर पाठविले होते. या यानाने मंगळ ग्रहाबद्दल ठोस माहिती पृथ्वीवर पाठविली होती.
दीपा कर्माकरला जिम्नॅस्टिक विश्वचषकात कांस्यपदक
- भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
- जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत १४.३१६ गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले.
- ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारेने रौप्य पदक मिळवले.
- दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
- गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती.
अझीम प्रेमजी यांना शेवलिएर डि ला लीजन डि ऑनर सन्मान
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेवलिएर डि ला लीजन डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
लीजन डि ऑनर
- हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सम्मान आहे. नेपोलियन बोनापार्टने हा सम्मान १८०२मध्ये सुरु केला. हा सम्मान फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्याही देशाच्या नागरिकाला दिला जातो.
- या सम्मानाच्या ५ श्रेणी पुढीलप्रमाणे: शेवलिएर (योद्धा), ऑफिसिएर (ऑफिसर), कॉमोडोर (कमांडर), ग्रँड ऑफिसिएर (ग्रँड ऑफिसर) आणि ग्रँड क्रॉइक्स (ग्रैंड क्रॉस).
- २००७ आणि २०१४मध्ये अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना हा सम्मान देण्यात आला होता.
- याशिवाय अमर्त्य सेन, पंडित रवी शंकर, झुबिन मेहता, लता मंगेशकर, जेआरडी टाटा, रतन टाटा आणि सौमित्र चॅटर्जी यांनादेखील हा सम्मान देण्यात आला आहे.
दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि एसएसबी एकत्रितपणे काम करणार
- दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांनी दुधवाचे जंगल आणि तेथील समृद्ध वन्य जीवसृष्टीला संपूर्ण संरक्षण प्रदान करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
- एसएसबीद्वारे गस्त घालण्याचे हे कार्य वन्यजीव व वन गुन्हेगारांच्या हालचालींबद्दल विविध सुरक्षा एजन्सींमध्ये समन्वय आणि माहितीचे आदानप्रदान करण्याच्या हेतूने केले जात आहे.
- सशस्त्र सीमा बल भारताचे एक निमलष्करी दल आहे. यावर १,७५१ किमी भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी आहे.
दुधवा व्याघ्र प्रकल्प
- हे अभयारण्य उत्तर प्रदेशच्या लखीमपूर-खीरी जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर स्थित उत्तर प्रदेशातील तराई भागातील सर्वोत्तम नैसर्गिक जंगले आणि गवताळ मैदानाचे प्रतिनिधित्व करते.
- या तराई आर्क लँडस्केपमध्ये ३ महत्वाची संरक्षित क्षेत्रे आहेत: दुधवा व्याघ्र प्रकल्प, किशनपूर वन्यजीव अभयारण्य, कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य.
- राज्यातील रॉयल बंगाल वाघाचे एकमेव निवासस्थान असल्यामुळे प्रोजेक्ट टायगर (Project Tiger) अंतर्गत या तिन्ही संरक्षित क्षेत्रांना दुधवा व्याघ्र अभयारण्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रोजेक्ट टायगर (व्याघ्र प्रकल्प)
- भारत सरकारने १९७३मध्ये राष्ट्रीय पशु वाघाला संरक्षित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केले. सध्या ‘प्रोजेक्ट टाइगर’ अंतर्गत संरक्षित व्याघ्र प्रकल्पांची संख्या ५० आहे.
- ‘प्रोजेक्ट टायगर’ पर्यावरण, वने आणि हवामान मंत्रालयाची १ केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेद्वारे वाघ असलेल्या राज्यांना व्याघ्र संवर्धनासाठी मदत केली जाते.
भारत-रशिया दरम्यान पहिला रणनीतिक आर्थिक संवाद
- भारत-रशिया दरम्यान पहिला रणनीतिक (सामरिक) आर्थिक संवाद २५ नोव्हेंबर २०१८ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आले.
- या संवादात भारतीय दलाचे प्रतिनिधित्व नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले. तर रशियाचे प्रतिनिधित्व आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओरेश्किन यांनी केले.
- या एकदिवसीय फोरममध्ये दोन्ही देशांतील अग्रगण्य व्यावसायिक नेत्यांनी भाग घेतला. या फोरममध्ये द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उद्योग यावर चर्चा केली गेली.
- या संवादामध्ये परिवहन, कृषी आणि कृषि प्रक्रिया, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, डिजिटल परिवर्तन आणि औद्योगिक सहकार इत्यादि या विषयावर लक्ष केंद्रित केले गेले.
बिहारमध्ये भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण
- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे भगवान बुद्धांच्या ७० फुटी पुतळ्याचे अनावरण केले. ही देशातील भगवान बुद्धांची दुसरी सर्वात उंच प्रतिमा आहे.
- हा पुतळा घोरा कटोरा येथे १६ मीटरच्या परिघामध्ये स्थापन करण्यात आला आहे. ४५,००० क्यूबिक फूट गुलाबी बलुआ दगडाने तो बांधण्यात आला आहे.
- घोरा कटोरा हे ५ टेकड्यांच्यामध्ये असलेला एक नैसर्गिक तलाव आहे. इको-टुरिझमच्या दृष्टीने या पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करण्यात आला आहे.
- या क्षेत्रामध्ये डीझेल किंवा पेट्रोल वाहनास परवानगी नसेल. या ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक वाहने प्रवेश करू शकतील.
२५ नोव्हेंबर: महिलांच्या विरोधात हिंसाचार संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- दरवर्षी २५ नोव्हेंबरला महिलांच्या विरोधात हिंसाचार संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. (International Day for the Elimination of Violence Against Woman)
- महिला व मुली यांच्याविरोधात हिंसाचार दूर करणे आणि याबद्दल जागरुकता पसरवणे हा या दिनाचा उद्देश आहे.
- या दिनाची यावर्षाची थीम ‘ऑरेंज द वर्ल्ड: #हियरमीटू’ (Orange the World: #HearMeToo) अशी आहे.
- महिलांविरोधातील हिंसा आता थांबली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असा संदेश देण्यासाठी, यामध्ये ऑरेंज म्हणजेच नारंगी (एकतेच्या सूत्रात बांधणारा रंग) आणि #HearMeToo हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे.
- या दिवसाची स्थापना १९९९मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभाने केली. मिराबाल बहिणींच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्या डोमिनिकन रिपब्लिकच्या राजकीय कार्यकर्ता होत्या.
- राफेल ट्रुजिलोच्या एकाधिकारशाहीच्या काळात (१९३०-१९६१) १९६०मध्ये त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली होती.
- महिलांवरील हिंसा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाचा हा परिणाम आहे. ही एक जागतिक समस्या आहे.
- यामुळे महिलांच्या विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो तसेच हिंसा त्यांच्या प्रतिष्ठित जीवनाच्या मार्गात अडथळा ठरते.
२६/११च्या सुत्रधारांबद्दल माहिती देणाऱ्यास अमेरिकेकडून बक्षीस
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवाद विरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली.
- त्याचबरोबर, अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडून देणाऱ्यांना ५० लाख डॉलर (३५ कोटी) रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
- २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत हल्ला झाला त्यात १० दहशतवादी सामील होते, हा हल्ला लष्कर-ए-तोयबाने घडवून आणला होता.
- पाकिस्तानच्या १० अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता.
- दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता.
- या हल्ल्यामध्ये ३४ परदेशी नागरिकांसह (पैकी ६ अमेरिकन) १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.
- अमेरिकेने या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने या हल्ल्यातील दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.
- यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लष्कर-ए- तोयबाचा संस्थापक हाफिज महंमद सईद, हाफिज अब्दुल रहमान मक्की व इतरांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते.
- तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेच लष्कर-ए-तोयबा या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते.
- मे २००५मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीने लष्कर-ए- तोयबाचे नाव निर्बंध घातलेल्या संस्थांच्या यादीत समाविष्ट केले होते.
ओडिशामध्ये दुर्मिळ आदिवासी भाषांचे शब्दकोष
- आदिवासी भाषांना लुप्त पावण्यापासून वाचविण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने २१ आदिवासी भाषांचे शब्दकोष तयार केले आहेत.
- द्वैभाषिक आदिवासी शब्दकोष आदिवासी जमात असलेल्या जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या बहुभाषिक शिक्षणामध्ये वापरले जातील.
- ओडिशा राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या १३ आदिवासी समुदायांसह ६२ वेगवेगळे आदिवासी समुदाय आढळतात.
- या जमाती २१ भाषा आणि ७४ बोलीभाषा बोलतात. २१ आदिवासी भाषांपैकी सातकडे त्यांची स्वत:ची लिपी आहे.
पं. केशव गिंडे यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार
- महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांना जाहीर झाला.
- प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराचा पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
- या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
- यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
- पं. गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ साली पुणे येथे झाला. संगीतामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे.
- बासरी वादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले.
- पं. गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला.
- वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये गिंडे यांनी अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे आणि केशव वेणू या बासरीची निर्मिती १९८४साली केली आहे.
- या बासरीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडस्’ तसेच ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी ७ सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
- श्री. गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार, जगदगुरु शंकराचार्य श्रृंगेरी महापीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा