निधन: अनेक सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणारे स्टेन ली
- कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे जनक व माजी संपादक स्टेन ली यांचे १३ नोव्हेंबर रोजी लॉस एंजेलिस येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
- स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणाऱ्या स्टेन ली यांची अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ओळख होती.
- कॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता व प्रकाशक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले स्टेन ली हे मार्वल कॉमिक्सचे बलस्थान होते.
- ली यांचा जन्म २८ डिसेंबर १९२२ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. १९६१मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोर या सुपर हिरो कुटुंबासोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले व त्याला अफाट प्रतिसाद मिळाला.
- त्यानंतर ली यांनी स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँटमॅन, डॉक्टर स्ट्रेंज अशा अनेक सुपरहिरोंना आपल्या लेखणीतून जन्म दिला. पनिशर, डेअरडेव्हिल हे अँटी सुपरहिरोही ली यांनी उभे केले.
- ली यांनी लिहीलेल्या या सुपरहिरोंवर कालांतराने चित्रपटही तयार झाले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.
- त्याचबरोबर मार्वलच्या काही चित्रपटामध्ये स्टेन ली यांनी विशेष भुमिकाही साकारली. कॉमिक्सशिवाय ली यांनी चित्रपटांसाठी पटकथाही लिहील्या आहेत.
- ली यांनी २०१३मध्ये ‘चक्र’ नामक पहिला भारतीय सुपरहिरोवरील अॅनिमेशनपट बनवला होता.
- ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने तयार झालेला ‘चक्र : द इन्व्हिसिबल’ हा चित्रपट कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आला होता.
- या चित्रपटात एक भारतीय तरुण राजू रायची गोष्ट आहे. तो आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह तंत्रज्ञानावर आधारित एक असा आधुनिक पोषाख तयार करतात ज्यामुळे शरीरातील रहस्यमयी चक्रे सक्रिय होत असतात.
- कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००८मध्ये त्यांना नॅशनल मेडल ऑफ द आर्ट्स देऊन सन्मानित केले होते.
- १९९४ साली कॉमिक बुक इंडस्ट्रीच्या ‘विल आईजनर अवॉर्ड हॉल ऑफ फेम’ आणि ‘जॅक कर्बी हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना समाविष्ट आकरण्यात आले होते.

अॅमनेस्टीने परत घेतला आंग सान स्यू की यांचा पुरस्कार
- जागतिक पातळीवरील मानवाधिकार संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनलने म्यानमारच्या नेत्या आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांना दिलेला पुरस्कार परत घेतला आहे.
- स्यू की यांनी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर लष्कराकडून झालेल्या अत्याचारावर त्यांनी कोणतीच भूमिका न घेतल्याने संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
- लंडन येथील जागतिक मानवाधिकारी संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनलने आंग सान स्यू की यांना दिलेला अॅम्बेसेडर ऑफ कॉन्शन्स पुरस्कार परत घेतला आहे.
- अॅमनेस्टीने २००९मध्ये स्यू की यांना हा पुरस्कार दिला होता. त्यावेळी त्या मानवाधिकारासाठी नजरकैदेत होत्या.
- गेल्या १ वर्षापासून म्यानमारमधील लष्कराकडून रोहिंग्या मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. देशातील रखाइन प्रांतातील ७ लाखांहून अधिक लोकांनी पळ काढला आहे.
- हिंग्यांवर इतके अत्याचार होऊन सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकारासाठी लढणाऱ्या स्यू की यांनी त्यावर काहीच भूमिका घेतली नाही.
कॅनडाने काढून घेतले मानद नागरिकत्व
- ऑक्टोबर २०१८मध्ये रोहिंग्या मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणी आंग सान स्यू की यांचे मानद नागरिकत्व कॅनडाने काढून घेतले होते. कॅनडाच्या संसदेने २००७ साली त्यांना मानद नागरिकत्व बहाल केले होते.
- एखाद्या देशाने दिलेले मानद नागरिकत्व काढून घेण्यात आलेल्या स्यू की या पहिल्या व्यक्ती ठरल्या.
- विशेष म्हणजे नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तीचे मानद नागरिकत्व काढून घेण्याची ही जगातील पहिलीच घटना होती.
आंग सान स्यू की
- त्यांचा जन्म १९ जून १९४५ रोजी रंगून (ब्रह्मदेश) (आताचे यांगून, म्यानमार) येथे झाला होता. लोकशाहीच्या त्या कडव्या समर्थक आहेत.
- त्या आधुनिक म्यानमारचे राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंग सान यांच्या कन्या आहेत.
- त्या म्यानमारमधील राजनेता, मुत्सद्दी आणि लेखक आहेत. सध्या त्या म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर (पंतप्रधानाच्या दर्जाचे पद) आहेत. म्यानमारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- म्यानमारमधील नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी ३ वर्षे संयुक्त राष्ट्रांमध्येही कार्य केले आहे.
- स्यू की यांनी म्यानमारमधील लष्करशाही विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना १५ वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
- या लढ्यासाठी त्यांना १९९१मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- याशिवाय त्यांना रफ्तो प्राईझ, सखारोव्ह पुरस्कार, जवाहरलाल नेहरू पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सिमोन बोलिवर पुरस्कार, ओलाफ पाल्मे पुरस्कार, भगवान महावीर विश्व शांती पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

अॅमनेस्टी इंटरनॅशनल
- स्थापना: जुलै १९६१
- मुख्यालय: लंडन, युनायटेड किंग्डम
- ही एक गैर-सरकारी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, जी मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी कार्य करते.
- या संस्थेची स्थापना जुलै १९६१मध्ये पीटर बेनेसन यांनी केली होती. सध्या भारतीय वंशाचे कुमि नायडू अॅमनेस्टी इंटरनॅशनलचे महासचिव आहेत.
- या संस्थेला १९७७मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९७८मध्ये मानवाधिकार क्षेत्रातील संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

समुद्र शक्ती २०१८: भारत-इंडोनेशिया नौदल अभ्यास
- भारत आणि इंडोनेशिया दरम्यान १२ नोव्हेंबरपासून इंडोनेशियातील सुराबाया येथे ‘समुद्र शक्ती’ या द्विपक्षीय नौदल अभ्यासाला सुरूवात झाली. हा अभ्यास १८ नोव्हेंबरपर्यंत चालेल.
- या युद्धाभ्यासाचा उद्देश दोन्ही देशांमधील समुद्री सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि दोन्ही देशांमध्ये समन्वय वाढविणे आहे.
- भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलांदरम्यान हा पहिलाच द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास आहे.
समुद्र शक्ती २०१८
- या भाय्साच्या बंदरावरील टप्प्याचे आयोजन १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत केले जाईल. या टप्प्यात क्रॉस डेक विजिट आणि चर्चा आयोजित केली जाईल.
- यानंतर १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत या अभ्यासाचा समुद्री टप्पा आयोजित केला जाईल.
- यामध्ये हेलिकॉप्टर ऑपरेशन, समुद्रातील युद्धसराव, पाणबुडी विरोधी सराव आणि समुद्री चाच्यांविरोधी कारवाई यांचा अभ्यास केला जाईल.
- मे २०१८मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सागरी सहकार्य करार झाला होता.
- यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीवर भर देण्यास सहमती झाली होती. याशिवाय भारताने इंडोनेशियाचे सबांग बंदर विकसित करण्यास सहमती दर्शविली होती.
इंद्र २०१८: भारत-रशिया संयुक्त लष्करी सराव
- भारत आणि रशिया दरम्यान त्रि-सेवा संयुक्त लष्करी सराव ‘इंद्र २०१८’चे आयोजन १८ नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशमधील बबीना छावणीमध्ये करण्यात येणार आहे.
- हा युद्धसराव ११ दिवस चालेल. या सरावात भारतातील इंफंट्री बटालियन आणि रशियाची पाचवी बटालियन सहभागी होणार आहे.
- दोन्ही देशांच्या सैन्यामधील धोरणात्मक सहकार्याला चालना देणे, हा या लष्करी सरावाच मुख्य हेतू आहे.
पार्श्वभूमी
- इंद्र लष्करी सरावाची सुरुवात २००३मध्ये करण्यात आली होती. या युद्धसरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सहकार्याला चालना देणे आहे.
- २०१६पर्यंत भारत आणि रशियाच्या लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यात वेगवेगळ्या वेळी या युद्धसरावाचे आयोजन केले जात होते.
- परंतु आता हा सराव तिन्ही सेनादलांसाठी एकत्रितपणे आयोजित केली जाते. ऑक्टोबर २०१७मध्ये अशा पहिल्या त्रि-सेवा युद्धसरावाचे आयोजन रशियातील व्लादीव्होस्टोक येथे करण्यात आले होते.
फैजाबाद जिल्ह्याचे नाव आता अयोध्या
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले आहे. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यानत्यांनी ही घोषणा केली.
- याशिवाय अयोध्येतील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला राजा दशरथ यांचे तर विमानतळाला प्रभू रामचंद्रांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.
- अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाला दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सूक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
- यापूर्वी योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नामांतर प्रयागराज आणि मुगलसराय जंक्शनचे नामांतर पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन केले आहे.
निधन: भाकपचे ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाड
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबुजी) यांचे १२ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
- महाराष्ट्रातील खंडकरी शेतकऱ्यांना जमीन परत मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा देऊन ही चळवळ गायकवाड यांनी यशस्वी केली.
- १८ जुलै १९२४ रोजी मनमाड येथे माधवरावांचा जन्म झाला. गोवा मुक्ती संग्रामासह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्यांनी भाग घेतला.
- मनमाडचे नगराध्यक्ष, नांदगावचे आमदार, विरोधी पक्षनेते अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली.
- माधवरावांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी-कामगार वर्गासाठी अर्पण केले. रेल्वेत काही काळ त्यांनी नोकरी केली.
- पुढे अनेक सत्याग्रह, आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते माजी राज्य सचिव होते. सहकार क्षेत्रातही त्यांनी काम केले.
- त्यांनी किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्नांवर लढे उभारले. या बळावरच राज्यस्तरावरील लढाऊ नेतृत्व म्हणून ते पुढे आले.
- शेतकरी, शेतमजूर, कामगार यासह विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. आमदारकीच्या काळात गायकवाड यांनी विधानसभा भाषणांनी गाजविली.
एडीबीकडून ईईएसएलला १३ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज
- आशियाई विकास बँक (एडीबी) ईईएसएलला भारतातील उर्जेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी १३ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देणार आहे.
- ही कर्जाची रक्कम आशियाई विकास बँकेद्वारे ग्लोबल एन्वायार्मेंट फॅसिलीटी (जीईएफ)च्या माध्यमातून पुरविली जाणार आहे.
- हे कर्ज उर्जा कार्यक्षमता क्षेत्रातील प्रकल्पांसाठी एडीबीद्वारे दिल्या जाणाऱ्या २०० दशलक्ष डॉलरच्या कर्जाचा भाग आहे.
- आशियाई विकास बँक ईईएसएलचे अनेक प्रकल्प उदा. एलईडी स्ट्रीट लाइटिंग इत्यादींसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे.
- ही रक्कम ट्रायजनरेशन, कार्यक्षम मोटर आणि एअर कंडिशनर, स्मार्ट मीटर, स्मार्ट ग्रिड इत्यादीसारख्या नवीन तंत्रज्ञानासाठी वापरली जाईल.
आशियाई विकास बँक
- आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक: एडीबी) ही आशियाई देशांच्या आर्थिक विकासाला सहाय्य करण्यासाठी १९ डिसेंबर १९६६ रोजी स्थापन झालेली एक प्रादेशिक विकास बँक आहे.
- या बँकेचे मुख्यालय मनिला (फिलिपाइन्स) येथे आहे. सध्या जपानचे ताकेहीको नकाओ एडीबीचे अध्यक्ष आहेत. एडीबीच्या अध्यक्षपदी आतापर्यंत नेहमी जपानी व्यक्तीचीच निवड करण्यात आली आहे.
- स्थापनेच्यावेळी या बँकेचे ३१ देश सदस्य होते. आता या बँकेची सदस्य संख्या ६७ आहे. ज्यापैकी ४८ देश आशिया व पॅसिफिक प्रदेशातील तर १९ देश गैर-आशियाई आहेत.
- आशिया आणि पॅसिफिक प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाला गती देणे हे या बँकेचे प्रमुख लक्ष्य आहे.
- त्यासाठी ही बँक आपल्या विकसनशील सदस्य राष्ट्रांना आर्थिक-सामाजिक विकासासाठी कर्जे देते तसेच समभाग गुंतवणूक करते.
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल)
- ईईएसएलची स्थापना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली आहे.
- एनटीपीसी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी), ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (आरईसी) आणि पॉवर ग्रिडचा हा संयुक्त उपक्रम आहे.
- ही संस्था नॅशनल मिशन फॉर एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सीसाठी (एनएमईईई) बाजाराशी संबंधित कार्येदेखील करते.
- हे राज्यांमधील वितरण कंपन्याच्या (डीस्कॉम) क्षमता निर्मितीसाठी संसाधन केंद्र म्हणून काम करते.
- जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा कार्यक्षमता पोर्टफोलिओची देशात अंमलबजावणी ईईएसएल करीत आहे.

अलिबाबाची एका दिवसात विक्रमी विक्री
- चीनमधील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने एका दिवसात (११ नोव्हेंबर) सुमारे २१३.५ अरब युआन म्हणजेच जवळपास २.१६ लाख कोटींची (३०० कोटी डॉलर्स) विक्रमी विक्री केली.
- एका दिवसाच्या सेलमध्ये सर्वाधिक विक्री करणारी अलिबाबा ही पहिली चिनी वेबसाईट ठरली आहे. गेल्यावर्षी या कंपनीने २४ तासात १.८० लाख कोटी रुपयांची विक्री करण्याचा विक्रम केला होता.
- अलिबाबा दरवर्षी ११ नोव्हेंबरला सिंगल्स डे सेलचे आयोजन करते. या सेलमध्ये आकर्षक ऑफर असल्याने चीनमधील लोक याची आतूरतेने वाट पाहत असतात.
- या एका दिवसात २७ हजार ब्रँड विकले गेले. यामध्ये अॅपल, शाओमी व डायसन या ब्रँडच्या वस्तू सर्वाधिक विकल्या गेल्या आहेत.
- सुरुवातीच्या १२ सेकंदांतच कंपनीने १२,३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला. दिवसभरातील हा व्यवहार ५२ हजार कोटींचा होता.

गायक एल्विस प्रेस्लीला प्रेसिडेंशियल मैडल ऑफ फ्रीडम
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गायक एल्विस प्रेस्लीसमवेत ७ व्यक्तींना १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रेसिडेंशियल मैडल ऑफ फ्रीडम देऊन सन्मानित करणार आहेत.
- एल्व्हिस प्रेस्ली हा विसाव्या शतकातील अमेरिकेतील लोकप्रिय गायकांपैकी एक होता. तो संगीतकारही होता. त्यांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान केला जाईल.
- याव्यतिरिक्त बेसबॉल खेळाडू बेब रूथ, सुप्रीम न्यायालयाचे न्यायाधीश अन्तोनिन स्कालिया, मिरियम अॅडेलसन, फुटबॉल खेळाडू रॉजर स्टोबेक आणि ऍलन पेज यांना देखील हे पदक देण्यात येईल.
प्रेसिडेंशियल मैडल ऑफ फ्रीडम
- हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याची स्थापना १९४५मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रुमॅन यांनी युद्धात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी केली होती.
- १९६२मध्ये राष्ट्राध्यक्ष केनडी यांनी नागरी सेवेसाठी पुन्हा या पुरस्काराची सुरुवात केली.
- अमेरिकेचे राष्ट्रीय हित, जागतिक शांतता, सांस्कृतिक कार्य आणि सार्वजनिक कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कार्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
- हा पुरस्कार मुख्यतः अमेरिकन नागरिकांना दिला जातो. परंतु इतर देशांतील नागरिकांनाही हा पुरस्कार प्राप्त करता येऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा