चालू घडामोडी : ०६ नोव्हेंबर

आयएनएस अरिहंत देशाला समर्पित

  • भारताची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतने ५ नोव्हेंबर रोजी आपले पहिले गस्त (टेहळणी) अभियान यशस्वीरीत्या पूर्ण केले.
  • याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस अरिहंतला धनत्रयोदशीची भेट म्हणून देशाला समर्पित केले.
  • अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे आणि त्यांचा फक्त बचावासाठी वापर करण्याचे भारताचे धोरण आहे. त्यादृष्टीने प्रतिहल्ल्याचे साधन म्हणून अरिहंत अधिक परिणामकारक ठरेल.
आयएनएस अरिहंत
  • आयएनएस अरिहंत ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल या गटातील मोडणारी ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे.
  • भारताची ही पहिलीच आण्विक पाणबुडी असून यापूर्वी भारताने रशिया कडून आण्विक पाणबुडी भाडेतत्वावर घेतली होती.
  • सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प यासाठी १९८०मध्ये सुरू झाला. २ दशके विशाखापट्टणम येथील गोदीत या पाणबुडीची उभारणी चालू होती.
  • अरिहंतचे जलावतरण २६ जुलै २००९ (कारगिल विजय दिन) रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी केले होते.
  • यामुळे भारत स्वतःची आण्विक पाणबुडी विकसित करणारा अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि चीननंतर सहावा देश ठरला.
  • या पाणबुडीची लांबी ११० मी. व रुंदी १२ मी. आहे. तिचा वेग २२ ते २८ किमी प्रति तास इतका आहे. यावरील अणुभट्टीची वीज निर्मिती क्षमता ८५ मेगावॉट आहे.
  • ६००० टन वजनाच्या या पाणबुडीवर ७५० किमी आणि ३५०० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात आहेत.
  • पाण्याच्या खालून अथवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जमीन, पाणी आणि आकाशात अण्वस्त्र डागण्यासाठी अरिहंत सक्षम आहे.
  • अरिहंतचा अर्थ शत्रूचा नाश करणारी. भारतीय नौदलाला जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी अशा पाणबुडीची तीव्र गरज होती.
हेदेखील लक्षात ठेवा
  • सध्या जगात सर्वाधिक म्हणजे ७० पेक्षा अधिक पाणबुड्या अमेरिकेकडे आहेत. त्याखालोखाल ३० पाणबुड्या असलेल्या रशियाचा क्रमांक लागतो. ब्रिटन आणि फ्रान्सकडे प्रत्येकी १२ पाणबुड्या आहेत.
  • चीन, अमेरिका आणि रशियाच्या पाणबुड्या ५००० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत, तर आयएनएस अरिहंतची क्षमता ७५० ते ३५०० किमीपर्यंतच आहे.

आरबीआय स्थापन करणार पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विलफुल डिफॉल्टरसहित सर्व कर्जदारांची माहिती एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी डिजिटल पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची (पीसीआर) स्थापना करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
  • यासाठी आरबीआयने अशा कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत, ज्यांची मागील ३ वर्षांतील वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
  • देशातील अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) वाढते प्रमाण लक्षात घेता हे एक आवश्यक पाऊल आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेत एनपीएचे प्रमाण सध्या सुमारे १० लाख कोटी रुपये आहे.
पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर)
  • पीसीआर कर्जदारांची प्रमाणित डिजिटल रजिस्ट्री असेल. यामुळे कर्जदारांविषयी माहिती यंत्रणा मजबूत होईल. हे एक आर्थिक माहिती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कार्य करेल.
  • यामध्ये सेबी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, जीएसटी नेटवर्क व इंडियन इंसॉल्वंसी अँड बैंकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया इत्यादी संस्थांकडील माहितीचा समावेश असेल.
  • पीसीआरमध्ये विलफुल डिफॉल्टर आणि प्रलंबित न्यायालयीन खटल्यांबद्दलही माहिती उपलब्ध असेल.
  • याद्वारे बँक आणि वित्तीय संस्था जुन्या अथवा नव्या कर्जदारांबद्दल संपूर्ण माहिती त्वरित मिळवू शकतात.
  • पीसीआरच्या स्थापनेपासून माहितीचा अभाव दूर होईल, कर्जाच्या उपलब्धतेला चालना मिळेल आणि आणि कर्जसंस्कृती बळकट केली जाईल.
  • वाय. एम. देवस्थली समितीच्या शिफारशीनुसार जून २०१८मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ पीसीआरच्या स्थापनेची घोषणा केली होती. 
  • भारतात सध्या बऱ्याच क्रेडिट रेपॉजिटरी आहेत, परंतु त्यांचा उद्देश आणि आवाखा भिन्नभिन्न आहे.

आयटीयू परिषदेचा सदस्य म्हणून भारताची फेरनिवड

  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) परिषदेचा सदस्य म्हणून भारताची २०१९ ते २०२२ अशा ४ वर्षांच्या कालावधीकरीता फेरनिवड झाली आहे.
  • दुबई येथे पार पडलेल्या आयटीयू प्लेनिपोटेन्शीअरी कॉन्फरन्स २०१८दरम्यान या परिषदेच्या निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या.
  • आशिया-ऑस्ट्रेलेया क्षेत्रामधून परिषदेसाठी निवडलेल्या १३ देशांमध्ये १६५ मते मिळवून भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक पातळीवर परिषदेसाठी निवडलेल्या ४८ देशांमध्ये भारत आठव्या क्रमांकावर आहे.
  • आयटीयूमधील १९३ सदस्य देशामार्फंत आयटीयू परिषदेच्या प्रतिनिधींची निवड  केली जाते.
  • १८६९पासून भारत आयटीयूचा सक्रिय सदस्य असून, जागतिक समुदायातील दूरसंचार विकास आणि प्रसार यासाठी प्रामाणिकपणे पाठींबा देत आहे.
  • १९५२पासून भारत आयटीयू परिषदेचा नियमित सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि भारताने सदैव समानता व सर्वसमंत्तीच्या भूमिकेचा आदर केला आहे.
  • या क्षेत्रातील सदस्य देशामधील आपसातील योगदान सुसंगत करण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 
  • विश्वाला एक राष्ट्र आणि ज्ञानाधिष्ठीत समाज म्हणून ओळख निर्माण करण्याच्या आयटीयूच्या स्वप्न व दृष्टीमध्ये भारतही सहभागी आहे.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ
  • इंग्रजी: International Telecommunication Union (ITU)
  • मुख्यालय: जिनीव्हा (स्वित्झर्लंड)
  • स्थापना: १७ मे १८६५
  • माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असलेली ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.
  • आंतरराष्ट्रीय रेडिओ आणि दूरसंचार याचे नियमन आणि प्रमाणन करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती.

५ नोव्हेंबर: जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस

  • दरवर्षी ५ नोव्हेंबरला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो, जगात त्सुनामीबद्दल जागरुकता पसरविणे हा यामागचा उद्देश आहे.
  • डिसेंबर २०१५मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक त्सुनामी जागृती दिवस स्थापन केला. या दिनाची ही तिसरी आवृत्ती आहे. 
  • या दिवशी जगभरात त्सुनामीच्या धोक्याबद्दल जागरुकता पसरविण्यात येते. तसेच त्सुनामीच्या पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेचे महत्व अधोरेखित करण्यात येते.
त्सुनामी
  • त्सुनामी म्हणजे महासागरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत झाल्याने निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यामुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.
  • त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ ‘बंदरातील लाटा’ (त्सु: बंदर, नामी: लाटा) असा आहे. हा शब्द कोळ्यांमध्ये प्रचलीत होता.
  • इतर नैसर्गिक आपत्तींप्रमाणे त्सुनामीचे अनुमान काढणे कठीण असले तरी, भूकंपाच्या प्रक्रियांमुळे त्सुनामीचे पूर्वानुमान काढता येऊ शकते.
  • २००४मध्ये सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे उद्भवलेल्या लाटांमुळे त्सुनामी निर्माण झाली होती.
  • या त्सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वात नुकसानकारक व भयानक आपत्ती ठरली.

सिमोन बाइल्स जागतिक चॅम्पियनशिपमध्ये १३ सुवर्णपदके जिंकणारी पहिली जिम्नॅस्ट

  • अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स जागतिक चॅम्पियनशिपमध्ये १३ सुवर्णपदके जिंकणारी पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे. तिने बेलारूसचा पुरुष जिम्नॅस्ट विताली शेर्बोचा १९९६चा विक्रम मोडला.
  • तिने दोहा (कतार) येथे पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक वोल्ट प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिचे हे १७वे जागतिक चॅम्पियनशिप पदक आहे.
  • सिमोन बाइल्स ४ वेळेची जागतिक ऑलअराउंड चॅम्पियन, ४ वेळेची जागतिक फ्लोर एक्सरसाइज चॅम्पियन, २ वेळेची जागतिक बॅलंस बीम चॅम्पियन आहे.
  • वर्ल्ड आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०१८च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचा ती एक भाग होती.
  • सिमोन बाइल्सने २०१६ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक ऑलअराउंड, वोल्ट आणि फ्लोर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, तर बॅलंस बीम स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
  • तिने ऑलिंपिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण २५ पदके जिंकली आहेत. २ वर्षांपूर्वी तिने ऑलिंपिकमध्ये ४ पदक जिंकणारी पहिली अमेरिकन जिम्नॅस्ट होण्याचा सन्मान मिळविला होता.
  • तिने आपले आत्मचरित्र ‘करेज टू सोर’मध्ये आपल्या उत्कृष्ट जिम्नॅस्ट होण्याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा