चालू घडामोडी : ११ नोव्हेंबर

जवाहरलाल सरीन यांना फ्रान्सचा लीजन डी’हॉनर सम्मान

  • फ्रेंच भाषेचे विद्वान जवाहरलाल सरीन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक सम्मान शेवलिएर डी ला लीजन डी’हॉनरने सन्मानित करण्यात आले.
  • भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक सहकार्य दृढ करण्यासाठी आणि फ्रेंच भाषेच्या प्रचाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हा सम्मान देण्यात आला.
  • त्यांनी पंजाब विद्यापीठात ५ वर्षे आणि त्यानंतर पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठात फ्रेंच भाषेचा अभ्यास केला.
  • सध्या ते Alliance Francaise De Delhi या इंडो-फ्रेंच सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आहेत.
लीजन डी’हॉनर
  • हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सम्मान आहे. नेपोलियन बोनापार्टने हा सम्मान १८०२मध्ये सुरु केला. हा सम्मान फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्याही देशाच्या नागरिकाला दिला जातो.
  • या सम्मानाच्या ५ श्रेणी पुढीलप्रमाणे: शेवलिएर (योद्धा), ऑफिसिएर (ऑफिसर), कॉमोडोर (कमांडर), ग्रँड ऑफिसिएर (ग्रँड ऑफिसर) आणि ग्रँड क्रॉइक्स (ग्रैंड क्रॉस).
  • २००७ आणि २०१४मध्ये अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना हा सम्मान देण्यात आला होता.
  • याशिवाय अमर्त्य सेन, पंडित रवी शंकर, झुबिन मेहता, लता मंगेशकर, जेआरडी टाटा आणि रतन टाटा यांनादेखील हा सम्मान देण्यात आला आहे.

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला १०० वर्षे पूर्ण

  • २८ जुलै १९१४ रोजी सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला ११ नोव्हेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण झाली.
  • सलग ४ वर्ष, ३ महिने आणि २ आठवडे चाललेले हे युद्ध ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपुष्टात आले.
  • सुमारे ११ लाख भारतीयांनी या महायुद्धात सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे ७४ हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर ७० हजार सैनिक यामध्ये जखमी झाले होते.
  • या युद्धात भारतीय सैनिकांनी १३,०००हून अधिक पदके मिळविली यामध्ये १२ व्हिक्टोरिया क्रॉसचाही समावेश होता.
  • या युद्धाला सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून ओळखले जाते. या महायुद्धाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना भारतासह जगभरात श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • या युद्धात एकूण ९० लाख सैनिकांचा आणि ७० लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. या युद्धात ३०हून अधिक देशांनी सहभाग नोंदवला होता.
  • भारतातून १३ लाखहून अधिक लोकांना आणि १.७ लाखहून अधिक जनावरांना या युद्धासाठी पाठवण्यात आले होते.
फ्रांसमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारक
  • भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी फ्रान्सच्या ३ दिवसीय दौऱ्यादरम्यान पॅरिसमधील भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन करत, पहिल्या महायुद्धामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
  • भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेले हे युद्ध स्मारक विल्लर्स गुइस्लेन येथे बांधण्यात आले आहे.
  • परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जून २०१८मध्ये पॅरिसमध्ये हे स्मारक बांधण्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्रात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मितीला चालना

  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
  • त्यामुळे मनरेगा योजनेबरोबरच सामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी कुंपण, ग्रामपंचायत भवन यांसारख्या इतर विभागांच्या योजनांतील २८ कामे आता अभिसरण नियोजन आराखड्याअंतर्गत करता येतील.
  • त्यामुळे राज्य-जिल्हास्तरीय योजनेतून अधिक प्रमाणात रोजगारनिर्मिती करता येणार आहे.
  • मनरेगाअंतर्गत कोणती कामे करायची याची यादी निश्चित आहे. पण त्याचबरोबर राज्य सरकारच्या इतर विभागांच्या योजनांचे अभिसरण (Convergence) मनरेगा योजनेशी करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
  • प्रत्येक आर्थिक वर्षांत १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरदरम्यान ग्रामसभेच्या मान्यतेने मनरेगाअंतर्गत लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा तयार केला जातो.
  • मनरेगाअंतर्गत २६० कामे करता येतात. त्यामध्ये विविध विभागांच्या योजनांसोबत २८ कामांचे अभिसरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या कामांसोबतच सामाजिक संस्था आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) यांचा सहभाग घेऊनही कामे करता येतील, असे रोजगार हमी विभागाने ठरवले आहे.
  • याशिवाय महाराष्ट्रात मनरेगा अंतर्गत ११ कलमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू करण्यात आली आहे.
  • गेल्या चार वर्षांत ग्रामीण भागात या योजनेंतर्गत ८,१३,१२३ कामे करण्यात आली. त्यातून कोट्यावधी मजुरांना रोजगार मिळाला.

बजरंग पुनिया जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी

  • भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • या वर्षात ५ पदके जिंकणारा बजरंग पुनिया यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत ९६ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.
  • क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर ६६ गुणांसह दुसऱ्या तर रशियाचा अखमद चाकेइव ६२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
  • यावर्षात बजरंगने आशियाई स्पर्धा आणि गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
  • बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. बजरंगची ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी कामगिरी आहे.

ए. आर. रहमान यांचे चरित्र ‘नोट्स ऑफ अ ड्रीम’चे अनावरण

  • भारताचे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘नोट्स ऑफ अ ड्रीम’ या त्यांच्या जीवनचरित्राचे मुबईमध्ये अनावरण केले. या पुस्तकाचे लेखन कृष्णा त्रिलोक यांनी केले आहे.
  • या पुस्तकात ए. आर. रहमान यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
ए. आर. रहमान
  • अल्लाह रक्खा रहमान उर्फ ए. आर. रहमान हे एक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला.
  • ते संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि संगीत निर्माते आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना २०१०मध्ये सरकारने पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित केले.
  • आपल्या अभूतपूर्व संगीतासाठी त्यांनी आतापर्यंत ६ राष्ट्रीय पुरस्कार, २ ग्रॅमी अवॉर्ड, २ अॅकॅडमी (ऑस्कर) पुरस्कार, १ बाफ्टा पुरस्कार, १ गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि १५ फिल्मफेयर पुरस्कार जिंकले आहेत.
  • आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
  • २००८साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलिनिअर या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना ऑस्करसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

११ नोव्हेंबर: राष्ट्रीय शिक्षण दिन

  • देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
  • भारत सरकारद्वारे ११ नोव्हेंबर २००८ रोजी या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.
मौलाना अबुल कलाम आझाद
  • मौलाना अबुल कलाम आझाद १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ दरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते.
  • त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी मक्का येथे झाला. वडिलांबरोबर १८९०साली ते कलकत्याला आले.
  • त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे आझाद (स्वतंत्र) हीदेखील उपाधि त्यांना मिळाली.
  • लोकजागृतीसाठी १९१२साली कलकत्ता येथे त्यांनी अल-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून आझाद या टोपणनावाने ते लेखन करीत.
  • ते गांधीजींच्या विचारांनी खूप प्रभावित होते. त्यांनी खिलाफत आंदोलन, असहकार चळवळ, धारासना सत्याग्रह, स्वदेशी आंदोलन तसेच भारत छोडो आंदोलनात भाग घेतला.
  • ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यही होते. १९२३साली ते वयाच्या ३५व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले.
  • त्यांचा मृत्यू २२ फेब्रुवारी १९५८ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले.
  • भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अमुल्य योगदान देणाऱ्या मौलाना आझाद यांना १९९२मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.

निधन: ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. अविनाश डोळस

  • आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले.
  • प्रा. डोळस राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य व प्रकाशन समितेचे सदस्य सचिव होते.
  • प्रा. डोळस यांचा जन्म ११ डिसेंबर १९५० रोजी झाला होता. मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
  • भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे नेते असलेले डोळस हे दलित, कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लेखणीही समर्थपणे चालवणारे साहित्यिक होते.
  • जानेवारी १९९०मध्ये नांदेड येथे भरलेल्या ५व्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
  • जानेवारी २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. यासह विविध संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
  • त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झालेले असून विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
  • आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, महासंगर (कथासंग्रह), सम्यकदृष्टीतून ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

निधन: चीनी चित्रपट-निर्माते रेमण्ड चाउ

  • ब्रूस ली, जॅकी चॅन यांना चित्रपट सृष्टीत आणणारे चित्रपट-निर्माते रेमण्ड चाउ यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • तरुणपणी स्वत: कराटे शिकलेले व व्यवसायाने चित्रपट-निर्माते असलेले रेमण्ड तसे प्रसिद्धीविन्मुखच राहिले होते.
  • मूळ हाँगकाँगचे असलेले चाउ यांचे शांघायच्या विद्यापीठातून पत्रकारिता शिकले. त्यानंतर एक क्रीडाविषयक नियतकालिकही त्यांनी चालविले.
  • हाँगकाँगला शॉ ब्रदर्स या स्थानिक माध्यम संस्थेसाठी प्रसिद्धी विभागात त्यांनी काम केले. पुढे १९५७मध्ये याच कंपनीत चित्रपट निर्मिती विभागाचे ते प्रमुख झाले.
  • त्यांनी स्वतःच्या गोल्डन हार्वेस्ट चित्रपटसंस्थेची स्थापना करून १९७०साली ब्रूस ली सोबत ‘बिग बॉस’ (फिस्ट्स ऑफ फ्यूरी) हा चित्रपट केला.
  • अवघ्या ५० हजार अमेरिकी डॉलरमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने क्रांती घडवली. त्यामुळे हाँगकाँगच्या सिनेसृष्टीत प्रथमच हॉलीवूडची भागीदारी झाली.
  • वॉर्नर ब्रदर्ससह रेमण्ड-ब्रूस ली यांचा ‘एन्टर द ड्रॅगन’ हा दुसरा आणि ‘वे ऑफ द ड्रॅगन’ हा तिसरा चित्रपटही आला.
  • ‘टीनएज म्यूटंट निन्जा टर्टल्स’ या सचेतपटाचे खऱ्या चित्रपटात रूपांतर करण्याचे आव्हान रेमण्ड यांनीच पेलले होते.
  • त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर पुरस्कार, २०११चा एशियन फिल्म अवॉर्ड हे पुरस्कार मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा