चालू घडामोडी : २५ नोव्हेंबर

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ५ सामंजस्य करार

  • भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान ४ दिवसीय ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. 
  • परस्परसंबंध बळकट करण्याच्या हेतूने भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता.
  • या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यू इंडिया बिझिनेस समिट आणि ऑस्ट्रेलिया-इंडिया बिझिनेस कौन्सिलला संबोधित केले.
  • तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली व परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी ५ करारही केले.
पाच सामंजस्य करार
  • अशक्ततेसाठी झालेल्या करारांतर्गत दिव्यांगांसाठीच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार.
  • दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करार करण्यात आला.
  • रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अँड रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी करार झाला.
  • कृषी क्षेत्रातील संशोधनात सहकार्यासाठीचा गुंटूर येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करार झाला.
  • दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात संयुक्त पीएचडीबाबत करार करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने लाँच केले ‘व्हिजन इंडिया २०३५’ 
  • भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने व्हिजन इंडिया २०३५ लाँच केले. हे व्हिजन डॉक्युमेंट २०३५पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आकार देईल.
  • या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘इंडिया इकॉनॉमिक सर्वे’ अहवालाच्या अंमलबजावणीचीही घोषणा केली.
  • ‘इंडिया इकॉनॉमिक सर्वे’ हा माजी ऑस्ट्रेलियन राजदूत पीटर वर्गीस यांनी तयार केलेला अहवाल आहे, जो यावर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आला होता.
  • ऑस्ट्रेलिया आणि भारतीय राज्यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आणि भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी व्यापक शिफारसी या अहवालात केल्या आहेत.
  • हा अहवाल भारतासह ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक भविष्यासाठी एक रोडमॅप प्रदान करतो. येत्या १२ महिन्यांमध्ये या अहवालातील काही महत्वाच्या शिफारशी लागू करण्यास ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शवली आहे.
  • यामध्ये फूड पार्टनरशिप, खाण व्यवसायाचा विस्तार आणि हवाई संपर्कामध्ये अधिक सुधारणा करणे, यांचा समावेश आहे.
  • ऑस्ट्रेलियाचे शिक्षण, कृषीव्यवसाय, संसाधन आणि पर्यटन व्यवहारांचे मंत्री इंडिया इकॉनॉमिक सर्वेच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करतील.
इन्वेस्ट इंडिया म्हणजे काय?
  • विदेशी गुंतवणूकदारांसोबत व्यापार आणि व्यावसायिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे कार्य इन्वेस्ट इंडिया करते.
  • ही भारताची अधिकृत राष्ट्रीय गुंतवणूक संवर्धन आणि सुविधा एजन्सी आहे, जी देशातील गुंतवणूकदारांद्वारे सहयोग वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकीत सहकार्यासाठी बनविण्यात आली आहे.
  • देशातील संभाव्य जागतिक गुंतवणूकदारांसाठी हे पहिले केंद्र आहे.
  • अलीकडेच, शाश्वत विकासासाठीच्या गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्रांचा विशिष्टता पुरस्कारही देण्यात आला.
  • युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटद्वारे (UNCTAD) हा पुरस्कार देण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट २०१८

  • भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे सातव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन केले.
  • केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि ईशान्येकडील राज्यांच्या सहयोगाने या पर्यटन मार्टचे ईशान्येकडील राज्यांमध्ये दरवर्षी आयोजन केले जाते.
  • आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची ही सातवी आवृत्ती आहे. यावर्षी पर्यटन मार्टची मुख्य थीम (संकल्पना) ‘ॲडव्हेंचर टुरिझम’ ठेवण्यात आली आहे.
  • याचा उद्देश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ईशान्येकडील क्षेत्रातील पर्यटन संधींना अधोरेखित करणे आहे.
  • हे पर्यटन मार्ट आठही पूर्वोत्तर राज्यांच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित समुदाय आणि उद्योगपतींना एकत्र आणण्यासाठी मंच उपलब्ध करून देतो.
  • यामुळे पूर्वोत्तर क्षेत्रातील पर्यटन उत्पादनांच्या पुरवठादारांना आंतरराष्ट्रीय आणि देशी ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळते.
  • या पर्यटन मार्टमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया, जपान, केनिया, मलेशिया, म्यानमार इत्यादी १८ देशांचे ४१ प्रतिनिधीही सहभागी होत आहेत. 
  • ईशान्येकडील राज्यांमध्ये क्रमाक्रमाने आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन केले जाते. यापूर्वी डिसेंबर २०१७मध्ये सहाव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन गुवाहाटीमध्ये करण्यात आले होते.
ॲक्ट ईस्ट धोरणासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट महत्त्वाचे
  • भारताचा ईशान्येकडील राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम रांचा समावेश होतो.
  • आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचा उद्देश ईशान्येकडील क्षेत्रातील पर्यटन संधींना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रस्तुत करणे आहे.
  • या पर्यटन मार्टमुळे भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणांतर्गत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आसियानच्या सदस्य देशांचे पर्यटन क्षेत्र आणि भारताची उदयोन्मुख पर्यटन बाजारपेठ यांना एकत्रित आणून, त्यांना चालना देण्याची संधी मिळते.
  • आसियानचे द्वार असलेल्या ईशान्येकडील राज्यांमधील पर्यटनाला प्रोत्साहन दिल्याने, भारत आणि आसियान देशांमधील लोकांमध्ये परस्पर संपर्काला चालना मिळते.

संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिक विधेयक २०१८

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षण आणि सेवांच्या नियमन आणि प्रमाणीकरणासाठी संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिक विधेयक २०१८ला मंजुरी दिली आहे.
  • भारतीय संलग्न आणि आरोग्यसेवा परिषद आणि राज्य संलग्न आणि आरोग्यसेवा परिषद स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे.
  • संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ते मानक ठरवतील तसेच सुविधा उपलब्ध करून देतील.
  • केंद्रीय आणि संबंधित राज्यांच्या संलग्न आणि आरोग्यसेवा परिषदांमध्ये १५ प्रमुख व्यावसायिक श्रेणींमध्ये संलग्न आणि आरोग्यसेवा शाखेतील ५३ व्यावसायिकांचा समावेश असेल.
  • केंद्रीय आणि राज्य परिषदांच्या रचना, स्थापना व कार्याची तरतूद या विधेयकात आहे. उदा. धोरण आणि मानके आखणे, व्यावसायिक वर्तनाचे नियमन इत्यादी
  • केंद्रीय परिषदेत ४७ सदस्य असतील, यापैकी १४ सदस्य वैविध्यपुर्ण भूमिका पार पाडतील तर उर्वरित ३३ सदस्य १५ व्यावसायिक श्रेणीचे प्रतिनिधित्व करतील.
  • केंद्रीय आणि राज्य परिषदांतर्गत, व्यावसायिक सल्लागार संस्था स्वतंत्रपणे मुद्दे तपासतील आणि विशिष्ट श्रेणीसंबंधी शिफारशी करतील.
  • अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गुन्हे आणि दंडाचे कलम विधेयकात समाविष्ट करण्यात आले आहे.
  • हे विधेयक केंद्र आणि राज्य सरकारांना नियम बनवण्याचे अधिकार देते. नियमन आणि सुधारणा करण्यासाठी परिषदेला निर्देश देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत.
  • हा कायदा पारित झाल्यापासून ६ महिन्याच्या आत हंगामी परिषदेची स्थापना केली जाईल. तिचा कालावधी दोन वर्षाचा असेल.
  • केंद्र आणि राज्य परिषदेची स्थापना करताना विविध स्रोतांकडून निधी मिळवण्याची तरतूद केली जाईल.
  • परिषदांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून आवश्यकतेनुसार अनुदान दिले जाईल. जर राज्य सरकारने असमर्थता दर्शवली तर केंद्र सरकार सुरुवातीची वर्षे अनुदान उपलब्ध करून देईल.
  • सुरुवातीच्या ४ वर्षांसाठी एकूण खर्च ९५ कोटी रुपये अपेक्षित आहे. एकूण खर्चाच्या ८० टक्के (सुमारे ७५ कोटी रुपये) राज्यांसाठी राखीव असतील तर उर्वरित निधी केंद्रीय परिषदांच्या परिचलनासाठी वापरला जाईल.
  • संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिक विधेयकाचा थेट लाभ सुमारे ८-९ लाख व्यावसायिकांना होईल. देशातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी हे विधेयक असल्यामुळे संपूर्ण देशाला आणि आरोग्य क्षेत्राला याचा लाभ होईल.

भारतीय संविधान ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध होणार

  • अलीकडेच भारतीय संविधान ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. ब्रेलमध्ये संविधान उपलब्ध करुन देण्याची पहिलीच वेळ आहे.
  • ब्रेलमधील मुद्रित संविधानाचा पहिला खंड २६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे.
  • सवी फाऊंडेशन आणि स्वागत थोरात यांच्यासह दृष्टिहीन लोकांसाठीच्या बुद्धिस्ट संघटनेने एकत्रितपणे या योजनेची जबाबदारी घेतली आहे.
  • ब्रेल लिपीमध्ये मुद्रित केले हे भारतीय संविधान दृष्टीहीन लोकांसाठी ५ खंडांमध्ये सादर केले जाईल.
  • बुद्धिस्ट संघटनेने पहिल्यांदा दृष्टिहीन लोकांसाठी सर्वप्रथम बुद्धवंदना ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित केली होती.
  • संविधान आतापर्यंत दृष्टिहीनांच्या आवाक्याच्या बाहेर राहिले आहे. त्यामुळे संविधानाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांना जाणून घेण्यासाठी संविधान ब्रेल लिपीमध्ये अनुवाद करणे आवश्यक आहे.
  • ब्रेलमध्ये अनुवादित केलेली संविधानाची अधिकृत प्रत डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथून घेतली गेली आहे.
  • ब्रेल लिपीच्या मर्यादांमुळे कोणत्याही पुस्तक्मध्ये १५०हून अधिक पृष्ठे ठेवली जाऊ शकत नाहीत.
  • म्हणूनच, अनुवादित संविधान ५ खंडांमध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचा पहिला भाग २५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केला जाईल. २ महिन्यांनंतर या संविधान मालिकेचा दुसरा भाग प्रकाशित होईल.
  • संविधानाच्या प्रकाशनासह ब्रेल लिपीमध्ये इतरअनेक पुस्तकेही प्रकाशित केली जाणार आहेत, जी दृष्टिहीन समुदायातून येणाऱ्या लोकसेवा आयोग उमेदवार आणि वकीलांना फायदेशीर ठरणार आहेत.
संविधान
  • भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. 
  • भारतचा संविधानाचा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकार करण्यात आला. तर २६ जानेवारी १९५०पासून ते लागू झाले होते.
  • तेव्हापासून २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून आणि २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • संविधान इंग्रजी भाषेत असून त्याची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.
  • भारतीय संविधानात सध्या २५ भाग, ४४८ कलमे, १२ परिशिष्टे आहेत. यामध्ये आतापर्यंत १०१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे.
  • संविधानाच्या उद्दीष्टांना प्रकट संविधानामध्ये सुरुवातीला उद्देशिका देण्यात आली आहे. त्यामध्ये अशी घोषणा करण्यात आली आहे कि, संविधानाने आपली शक्ती थेट जनतेकडून प्राप्त केली आहे.
  • याच कारणामुळे भारतीय संविधानाची प्रस्तावना ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने सुरू होते.
  • भारत किंवा इंडिया हा राज्यांचा संघ आहे. संविधानात भारताला संसदीय प्रणाली असलेले एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक म्हणून घोषित केले आहे.

९९व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

  • आगामी ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड झाली.
  • ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.
  • नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार असून, यासाठी नागपूर, लातूर किंवा पिंपरी-चिंचवड या ठिकाणांची नावे स्पर्धेत आहेत.
  • सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे हे प्रेमानंद गज्वी यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे.
  • यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने वि. वा. शिरवाडकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
  • त्यांची तनमाजोरी, किरवंत आदी नाटके प्रचंड गाजली. त्यांच्या नाटकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली असून, देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग चालू आहेत.
  • बोधी नाट्य चळवळीमुळे देशभरातील रंगकर्मी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. गज्वी यांचे रंगभूमीवरील व साहित्यातील योगदान अतुलनीय आहे. 

सायना नेहवालला सय्यद मोदी स्पर्धेचे उपविजेतेपद

  • भारताची आघाडाची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पराभवासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला चीनच्या हान यू सेकडून पराभवाचा सामना करावा लागला.
  • सायना नेहवालने याआधी २००९, २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघ चौथ्यांदा टी-२० विश्वविजेता

  • महिला टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ८ गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चौथ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला.
  • गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. तिने प्रथम गोलंदाजी करताना ३ फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना ३३ धावांचे योगदान दिले.
  • गार्डनसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ऑस्ट्रेलियाच्याच एलिसा हेलीला मालिकावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • यजमान वेस्टइंडीजला पराभूत करत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • अंतिम सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १०५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने १५.१ षटकांत १०६ धावा करत अजिंक्यपदावर नाव कोरले.

फुटबॉलपटू दिदिएर ड्रोग्बा निवृत्त

  • आयव्हरी कोस्ट फुटबॉल संघाचा प्रमुख स्ट्रायकर दिदिएर ड्रोग्बा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ४० वर्षीय ड्रोग्बाने देशाकडून १०४ सामने खेळताना ६५ गोल केले आहेत.
  • आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये ड्रोग्बाने आयव्हरी कोस्टकडून ३ वर्ल्डकप खेळले आहेत.
  • आयव्हरी कोस्टला २ वेळा आफ्रिकन कपचे उपविजेतेपद मिळवून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • क्लब फुटबॉलमध्ये ड्रोग्बा चेल्सी संघाकडून खेळतो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ड्रोग्बा क्लब फुटबॉलमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे.
  • ड्रोग्बा चेल्सी संघातील त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनासाठी ओळखला जातो. २००४ ते २०१२ दरम्यान त्याने चेल्सीसाठी २२६ सामन्यांमध्ये १०० गोल केले होते.
  • चेल्सी संघाला युरोपीय चॅंपियन्स लीगचे जेतेपद पटकावून देण्यात दिदिएर ड्रोग्बाचे योगदान महत्वाचे आहे.
  • त्याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी २००६-०७ आणि २००९-१०चा प्रीमियर लीगचा सर्वात प्रतिष्ठीत गोल्डन बूट पुरस्कारही त्याला प्रदान करण्यात आला होता.
  • ड्रोग्बाने त्याच्या २० वर्षाच्या दिर्घ कारकिर्दीत एकूण ६७९ सामन्यांमध्ये ३६७ गोल केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा