दुष्काळाच्या तीव्र झळांनी होरपळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने ३,०५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या राज्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली.
राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्रासाठी ३,०५० कोटींची तर मध्य प्रदेशसाठी २,०३३ कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली.
अल निनो प्रभावामुळे १४ टक्के नैऋत्य मोसमी पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी पावसाची ही तूट १२ टक्के होती. देशाच्या काही भागात पूरपरिस्थिती उद्भवली असली तरी अनेक भागात अपुरा पाऊस झालेला आहे.
महाराष्ट्र गेल्या ३ वर्षांपासून सतत दुष्काळसदृश परिस्थितीत आहे. केंद्रीय पथकाने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. या पथकाने अहवाल सादर केल्यानंतर मदतीची ही घोषणा करण्यात आली.
यापूर्वी केंद्र सरकारने राज्यासाठी ९२० कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी जाहीर केला होता.
महत्वाच्या नियुक्त्या
उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या निर्गुतवणूक खात्याच्या सचिव आराधना जोहरी यांच्या जागी सार्वजनिक उद्योग खात्याचे विशेष सचिव नीरजकुमार गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आराधना जोहरी यांना मंत्रिमंडळ सचिवालयात राष्ट्रीय रासायनिक अस्त्रे राष्ट्रीय प्राधिकरणच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक दिली आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये काम करणारे संजय मित्रा यांना रस्ते वाहतूक व महामार्ग सचिवपद देण्यात आले आहे. ते विजय छिब्बर यांच्याकडून कार्यभार घेतील.
औद्योगिक धोरण व बढती विभागाचे सचिव अमिताभ कांत यांना निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. सध्या सिंधुश्री खुल्लर या पदावर होत्या.
खुल्लर यांना एक वर्षांसाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद देण्यात आले होते, तो कालावधी ७ डिसेंबर रोजी संपत आहे.
बिहार केडरच्या आयएएस अधिकारी रश्मी वर्मा यांना वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव नेमण्यात आले आहे. त्या सध्या महसूल खात्यात विशेष सचिव आहेत. सध्या या विभागाचे सचिव असलेले संजयकुमार पांडा निवृत्त होत आहेत.
मेस्सीला ‘ग्लोब सॉकर’ पुरस्कार
दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘ग्लोब सॉकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर बार्सिलोनाला वर्षांतील सर्वोत्तम संघाचा मान मिळाला आहे.
बार्सिलोनाने २०१५च्या हंगामात स्पॅनिश लीग, कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग, युरोपियन सुपर चषक आणि क्लब विश्वचषक अशा पाच स्पर्धाचे जेतेपद पटकावले. स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेत त्यांना अॅटलेटिको बिलबाओ संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने वर्षांतील सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या संघाला करता आला नाही.
बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांना सर्वोत्तम व्यवस्थापकाचा़, तर बेनफिकाला सर्वोत्तम अकादमी क्लबचा पुरस्कार देण्यात आला. तसेच इटलीचा आंद्रेआ पिर्लो व इंग्लंडचा फ्रँक लॅम्पर्ड यांना दीर्घकालीन सेवेबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऑस्ट्रेलियासोबत नागरी अणु सहकार्य करार
ऑस्ट्रेलियासोबतच्या नागरी अणु सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनिअम पुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे.
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान माल्कर टर्नबुल यांनी १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कराराची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले होते.
सध्या ऑस्ट्रेलियाकडे युरेनिअमचा मोठा साठा आहे. युरेनिअमच्या साठ्याच्या दृष्टीने जगात ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रमांक लागतो.
ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेचा वापर करीत नसल्यामुळे त्यांच्याकडील युरेनिअमची जास्तीत जास्त निर्यातच केली जाते. अणुऊर्जेचा विस्तार करण्याची योजना आखल्यामुळे भारतासाठी युरेनिअमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने या कराराला अत्यंत महत्त्व आहे.
खाद्यपदार्थांवर एक्स्पायरी डेट छापणे अनिवार्य
देशात खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्या व व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांवर आता त्याच्या निर्मितीची तारीख (मॅन्युफॅक्चरिंग डेट) आणि वापराच्या अंतिम मुदतीची तारीख (एक्स्पायरी डेट) नमूद करावी लागेल.
खाद्यपदार्थांच्या वापराबाबत असलेल्या संभ्रमांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादकांना उत्पादनाच्या लेबलवर या दोन्ही तारखा स्पष्टपणे छापण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे आता आता खाद्यपदार्थांवर ‘बेस्ट बिफोर’ (अमुक तारखेपर्यंत वापरल्यास उत्तम) असे छापता येणार नाही. असे लिहिल्याने ग्राहक न्यायालयांत अनेक प्रश्न उद्भवत होते.
केंद्रीय अन्न व पुरवठा तसेच ग्राहक मंत्री : रामविलास पासवान
इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवास
इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओल्मर्ट यांच्यावर १,२८,५०० डॉलरची लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
एखाद्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची इस्रायलमधील ही पहिलीच वेळ आहे. सध्या ओल्मर्ट ७० वर्षांचे आहेत. २००६-०९ या कालावधीमध्ये ते पंतप्रधानपदी होते.
लाचखोरीचे आरोप झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होणार असल्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला आणि त्यांनी पंतप्रधानपद सोडले होते.
या प्रकरणी मे २०१४ मध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये एकूण ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवून दुसऱ्या प्रकरणात दीड वर्षांची शिक्षा दिली आहे.
यशवंत होळकर यांचे नायरिका गोदरेजसोबत लग्न
अहिल्याबाई होळकरांचे वंशज रिचर्ड होळकरांचा छोटा मुलगा राजकुमार यशवंत होळकर (तिसरे) यांचे २९ डिसेंबरला नायरिका गोदरेजसोबत महेश्वर किल्यातील राजवाड्यात थाटात लग्न झाले.
हरिद्वारच्या कुशावर्त घाटाची नियमबाह्य विक्री प्रकरणाच्या चौकशी अहवालात मध्यप्रदेशातील होळकर राजांच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा उल्लेख आहे. सरकारसोबत झालेल्या करारानुसार, या संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी देण्याबदल्यात होळकर संस्थानाला २,९१,९५२ कोटी रुपये दिले आहेत.
नायरिका गोदरेज ही प्रसिद्ध उद्योगपती विजय कृष्ण गोदरेज यांची मुलगी आहे. फोर्ब्स मासिकाने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात गोदरेज कुटुंबांची संपत्ती ७५,३१८ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. आशियातील ५० श्रीमंत कुटुंबांपैकी हे कुटुंब १५व्या स्थानी आहे.
भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ५१वा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.
वरिष्ठ साहित्य समालोचक नामवर सिंह यांच्या अध्यक्षीतेखीलील समितीने रघुवीर चौधरी यांची निवड केली आहे.
चीनमध्ये आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक
आग्नेय चीनच्या शेनझेनमध्ये २९ डिसेंबर रोजी आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.
'फुतियान हायस्पीड रेल्वे स्टेशन' असे या स्थ्नाकाचे नाव असून ते १ लाख ४७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर विस्तारले आहे.
जीबी मीमामसी यांचे निधन
सेंटर फॉर डिवेलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT)चे संस्थापक व कार्यकारी संचालक जीबी मीमामसी यांचे २१ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.
भारतात टेलिकॉम क्रांतीचा पाया रचणाऱ्या जीबी मीमामसी यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
स्वतंत्र भारतात मीमामसी यांच्या नेतृत्वाखाली C-DoT ने रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयत्न सुरू ठेवले होते आणि त्यात त्यांना अन्य संशोधन संस्थांपेक्षा जास्त यश मिळाल्याचेही जाणकार सांगतात.
भारतात पीसीओ सर्वदूर पसरण्यामागे देखील C-Dotचे प्रयत्नच कारणीभूत होते.
विजय हजारे ट्रॉफी गुजरातला
युवा फलंदाज पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी पटकावली.
या टीमने फायनलमध्ये गौतम गंभीरच्या दिल्ली संघावर मात केली. याच स्पर्धेत २०१०-११ मध्ये गुजरात संघ उपविजेता होता.
चीनमध्ये पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू
चीनने २७ डिसेंबरपासून पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू असून या कायद्यान्वये चिनी सेना आता दहशतवाद्यांच्या धरपकडीसाठी परदेशातही रवाना करणे शक्य होईल.
विविध देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त मोहिमेत चिनी सैनिकही सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच तंत्रज्ञान कंपन्यांना सरकारने मागितलेली माहिती देणे बंधनकारक असेल.
अमेरिकेने चीनच्या या नव्या कायद्याचा विरोध केला आहे. हा कायदा तिबेटमध्येही लागू होईल. येथे चीनच्या धोरणांविरुद्ध १२० बौद्ध धर्मीयांनी आत्मदहन केले आहे.
चीनच्या संसदेने या कायद्याला १५९च्या बहुमताने संमती दिली. चिनी सैन्यदल आणि सशस्त्र पोलिस दल दहशतवादविरोधी लढ्यात केंद्रीय सैन्य आयोगाच्या संमतीनंतर सहभागी होऊ शकतील.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला भारत दौऱ्यावर आले आहेत. २८ जानेवारी रोजी त्यांनी हैदराबादमध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंची भेट घेतली. याआधी दोन आठवड्यांपूर्वी गुगल सीईओ सुंदर पिचाई भारत दौऱ्यावर आले होते.
यावेळी नायडूंनी आंध्रप्रदेशात मायक्रोसॉफ्टचे आणखी एक ऑफिस सुरु करण्याचा नडेला यांना प्रस्ताव दिला. मायक्रोसॉफ्टचे हैदराबादमध्ये एक मोठे कॅम्पस आहे. आणखी एका ऑफिसमुळे हैदराबादमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नडेला दुसऱ्यांदा भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
वार्षिक १० लाख उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही
वार्षिक १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळणार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे.
नोंदणी असणाऱ्या ग्राहकाचे किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांवर असेल, तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय नागरीविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोलकात्यामध्ये पेड एलपीजीबाबत संकेत दिले होते.
यापूर्वी सरकारकारने स्वतःच्या इच्छेने एलपीजी गॅस वर मिळणारे अनुदान दुसऱ्यांना देण्याचे आव्हान केले होते. आतापर्यंत ५७ लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत केंद्र सरकार सर्व ग्राहकांना एका वर्षातील १२ एलपीजी सिलिंडरवर अनुदान देत होते. मोदी सरकारच्या 'पहल' या योजने अंतर्गत एलपीजी अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यांत जमा केले जाते.
रिलायन्स जियोचे उद्घाटन
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला महत्त्वकांक्षी ४जी प्रोजेक्ट अर्थात 'जियो'ची घोषणा केली आहे. रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला कंपनीने ही सेवा लॉन्च केली आहे.
शाहरूख खानला 'रिलायन्स जियो'चे ब्रँड अॅम्बेसडर बनवण्यात आले आहे.
रिलायन्स कंपनीने आपल्या एक लाखांहुन जास्त कर्मचाऱ्यांना निशुल्क जियो मोबाइल सेवा देण्याची घोषणा केली आहे. येत्या मार्च-एप्रिलपासून ही ग्राहकांसाठी सुरु करण्यात येणार आहे.
आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी
बीसीसीआयची कार्यपद्धती पारदर्शक करण्यासाठी न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीची नियुक्ती करण्यात आली होती. जस्टिस लोढा या समितीचे अध्यक्ष होते.
लोढा समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्वरूप पुढच्या वर्षी पूर्णपणे बदलू शकते.
ब्रिटीश थिंक टँक ‘सीआयबीआर’चा अहवाल
भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी आणि २०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थसत्ता म्हणून उदयाला येईल. पंधरा वर्षांनंतर भारताची अर्थव्यवस्था आजच्या पाचपट मोठी अर्थात १०,१३३ अब्ज डॉलरची असेल.
२०२९नंतर चीन व अमेरिकेला पिछाडीवर टाकून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. इंग्लंडचा मंद विकास दर पाहता भारत २०१९मध्ये इंग्लंडला मागे टाकेल. अर्थात २०१९ मध्ये भारत राष्ट्रकुल देशांत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
अर्थव्यवस्थेचा आकार पाहता १५ वर्षांत फ्रान्स आणि इटलीला जी-८ मधून बाहेर पडावे लागेल. भारतासह ब्राझील या गटात सहभागी होईल. विशेष म्हणजे सध्या ब्राझील आणि फ्रान्सचा जीडीपी भारताहून अधिक आहे. परंतु १५ वर्षांनंतर आपली अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा तीनपट अधिक असेल.
६८ युनिकॉर्नमध्ये ११ भारतीय : एक अब्ज डॉलरहून अधिक किंमत असलेल्या स्टार्टअप्सला युनिकॉर्न म्हटले जाते. जगातील ६८ युनिकॉर्नमध्ये ११ भारतीय आहेत.
धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये भारत दुसरा
भारतात सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या झपाटयाने कमी होत असली तरी, महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
१९८० मध्ये भारतात धुम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५३ लाख होते. २०१२ मध्ये हेच प्रमाण १ कोटी २७ लाख झाले आहे. जागतिक तंबाखू सेवनाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
धुम्रपानासंबंधी आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये ९३.२ अब्ज सिगारेटची विक्री झाली. २०१२-१३ च्या तुलनेत सिगारेट विक्रीमध्ये १० अब्जने घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये सिगारेटच्या उत्पादनातही ११७ अब्जवरुन १०५.३ अब्जपर्यंत घसरण झाली आहे.
रमादी शहर इराक आर्मीच्या ताब्यात
इराक आर्मीने रमादी शहर इसिसच्या ताब्यातून सोडवण्यात यश मिळवले आहे. गेल्या १८ महीन्यांदरम्यान आर्मीने मिळवलेला हा पहिला विजय आहे. इसिसने सिरिया आणि इराकच्या एका मोठ्या भागावर ताबा मिळवलेला आहे.
यूफ्रेट्स व्हॅली (फरात नदी घाटी) मध्ये असलेले रमादी शहर अनबर प्रांताची राजधानी आहे.
यापूर्वी इराकच्या आर्मीने तिकरित शहरावरही ताबा मिळवला होता. त्याठिकाणी इराणी शिया मिलिशियाने त्यांना मदत केली होती.
जून २०१४मध्ये इसिसने सुमारे एक तृतीयांश इराकवर ताबा मिळवून सिरिया आणि इराकमध्ये खलीफाच्या सत्तेची घोषणा केली होती.
दोन अपत्यांच्या धोरणास चीनमध्ये मान्यता
गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दो’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल.
नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत १५९ सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सध्या चीनची लोकसंख्या १ अब्ज ३७ कोटी एवढी आहे.
जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शहा निलंबीत
पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शहाच्या नमुन्यांमध्ये वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे (क्लोरटालिडोनचे) घटक सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
आयसीसीचे डोपिंग विरोधी जे नियम आहेत त्यानुसार यासिरवर आता पुढील कारवाई होईल. यासिरने १३ नोव्हेंबरला २०१५ रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते.
भारत-पाकिस्तान दरम्यान परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक १५ जानेवारी रोजी इस्लामाबाद येथे होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबुलहून परतताना लाहोरला आकस्मिक भेट देऊन पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी हे पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला.
मागील ११ वर्षांपासूनचा एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. पाकिस्तान दौरा करणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत.
ऑलिम्पिकसाठी भारतीय सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड
पुढील वर्षी ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड झाली आहे. भारतीय कुस्ती सामनाधिकाऱ्यांची क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अशोक कुमार सध्या एअर इंडियात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पन्नासपेक्षा अधिक स्पर्धामध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या कार्यशाळेतील प्रदर्शनावर सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
जगभरातून ५० सामनाधिकारी, निरीक्षक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक कुस्ती असोसिएशनने आशिया खंडातून नऊ सामनाधिकाऱ्यांची निवड केली.
डीडीसीए प्रकरणात जेटलींच्या विरोधात पुरावा नाही
दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मधील गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील केजरीवाल सरकारने नेमलेल्या आयोगाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही.
दिल्ली सरकारने डीडीसीए घोटाळ्याच्या चौकशीसाठी गोपाल सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या २३७ पानी अहवालात डीडीसीए घोटाळ्याच्या तपासाचा उल्लेख आहे, पण जेटलींच्या नावाचा मात्र कुठेही उल्लेख नाही.
डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचे एकही प्रकरण चौकशी समितीच्या निदर्शनास आलेले नाही.
मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २७ जानेवारी रोजी 'मन की बात' कार्यक्रमातून अपंगत्वावर मात करत पुढे येणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला. या व्यक्तींना ईश्वराने अन्य अतिरिक्त शक्ती दिल्या असल्याचे म्हणत त्यांना 'अपंग' म्हणण्याऐवजी 'दिव्यांग' म्हणू शकतो, असा नवा दृष्टीकोन मोदींनी आपल्या कार्यक्रमातून दिला आहे.
१६ जानेवारी रोजी भारत सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंजिया'चा कृती आरखडा देशासमोर मांडण्यात येईल असेही मोदींनी सांगितले.
याखेरीज प्रजासत्ताक दिनानिमित्त 'कर्तव्य' या विषयावर निबंध, काव्य लिहून २६ जानेवारीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
ऑस्ट्रेलिया १००० शतक करणारा पहिला देश
वेस्ट इंडीजच्या विरोधात मेलबॉर्नमध्ये दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सलामवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने शतक केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडून १०००वे आंतरराष्ट्रीय शतक बनवणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या व्यक्तिगत रेकॉर्डसह ऑस्ट्रेलिया क्रिकटमध्ये १००० शतक बनवणारा पहिला देश बनला आहे.
सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या १० फलंदाजांमध्ये १००० शतके ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे केवळ दोनच फलंदाज आहेत. असे असतानाही कांगारूंनी हे नवे रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची कमाल करून दाखवली आहे.
सर्वाधिक शतक केलेले देश
देश
शतके
ऑस्ट्रेलिया
१०००
इंग्लंड
९६४
भारत
६८८
वेस्ट इंडीज
६२९
पाकिस्तान
५४३
आधार कार्डचा दुरुपयोग करणाऱ्याला १० वर्षे कारावास
आधार कार्डासाठी गोळा केलेल्या माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने त्याविषयीची दक्षता यंत्रणा अधिक कडक केली आहे.
त्यामुळे आता परवानगी नसताना किंवा अधिकार नसताना एखाद्याच्या आधार कार्डाची माहिती स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्याला १० वर्षांपर्यंत कारावास होणार आहे.
या आदेशानुसार, अधिकृत व्यक्तीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तीने यूआयडीएआय प्रणालीचा वापर केल्यास किंवा तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला दंडासह १० वर्षांपर्यंत कारावास होऊ शकणार आहे.
त्याचवेळी अधिकाधिक सार्वजनिक सेवा आधार अंतर्गत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने कॅबिनेट सचिवांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
सरकारने २१ डिसेंबर रोजी आधार कार्ड देणाऱ्या यूआयडीएआयच्या माहिती साठा यंत्रणा, माहिती जमा करण्याची केंद्रे, यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, साहित्य या सर्वांना संरक्षित प्रणाली म्हणून घोषित केले. ही घोषणा माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत करण्यात आली.
सय्यद किरमाणी यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांना २०१५या वर्षीचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि हिंदूचे संपादक एन. राम यांचा समावेश होता.
क्रिकेटमधील सेवेसाठी भारत सरकारने १९८२मध्ये किरमाणी यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला आहे. तसेच ते कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.
मोदींचा आकस्मिक पाकिस्तान दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी अचानक लाहोरला भेट दिली. पाकिस्तान दौरा करणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत.
मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर जाणारे शेवटचे भारतीय पंतप्रधान होते. अकरा वर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.
वाजपेयी २००४ साली १२व्या शिखर परिषदेसाठी इस्लामाबादला गेले होते. वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग पाकिस्तान दौऱ्यावर जातील अशी शक्यता होती. मात्र २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान दौरा केला नाही.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सहा वर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९५३ साली पाकिस्तान दौरा केला. सप्टेंबर १९६०मध्ये नेहरु एक करार करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.
नेहरु यांच्यानंतर २८ वर्षांनी राजीव गांधी यांनी डिसेंबर १९८८ आणि जुलै १९८९ मध्ये पाकिस्तान दौरा केला. राजीव गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याबरोबर परस्परांच्या अणूऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा महत्वपूर्ण करार केला होता.
केंद्र सरकारची गरोदर महिलांसाठी अभिनव योजना
केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी अभिनव योजना सुरू केली असून त्यानुसार गरोदर महिलांना मोबाइलवर दर आठवड्याला एक कॉल येईल. त्यात गर्भारपण आणि प्रसूतीनंतर काय काय खबरदारी घ्यायची, याबाबत माहिती असेल. गर्भवतींना चौथ्या महिन्यापासून असे संदेश मिळतील.
बाळ एक वर्षाचे होईपर्यंत ते सुरू असतील. त्यासाठी १८००११६६६६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपले नाव आणि मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर १७ महिन्यांत त्यांना एकूण ७२ कॉल येतील.
टाटा पॉवरचा रशियाशी सामंजस्य करार
ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक व विस्ताराच्या संधी या संदर्भात टाटा पॉवरने रशियाच्या विकास मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे. दोन्ही बाजूने ऊर्जा क्षेत्रातील विस्तार व गुंतवणूक संधी याबाबत हा करार आहे.
यामध्ये रशियाच्या अतिपूर्व भागातील विस्ताराबाबत प्रामुख्याने भर राहील. करारानुसार या संधी व विस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर रशियाचे विकास मंत्रालय टाटा पॉवरला सहकार्य करणार आहे. स्थानिक तसेच प्रशासकीय पातळीत संवाद साधण्याचे काम मंत्रालय करणार आहे.
या सामंजस्य करारावर टाटा पॉवरचे सीओओ अशाक सेठी आणि रशियाचे विकास मंत्री अलेक्झांडर गालुश्का यांनी सह्या केल्या.
२००५पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ
२००५पूर्वीच्या चलनी नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने पुन्हा वाढविली आहे. यानुसार २००५ पूर्वीच्या सर्व नोटा आता ३० जून २०१६ पर्यंत बदलता येतील.
२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची यापूर्वीची मुदत येत्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीची होती. या कालावधीपर्यंत सर्वच बँक शाखांमध्ये २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची सुविधा आहे.
मात्र १ जानेवारी २०१६ पासून ही सुविधा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात तसेच मध्यवर्ती बँकेने निवडलेल्या काही बँक शाखांमध्येच उपलब्ध असेल. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ या १३ महिन्यांच्या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडे २००५ पूर्वीच्या १६४ कोटी नोटा येऊन पडल्या आहेत.
भारतीय वंशाचे अमित मजूमदार ओहियोचे पहिले महाकवी
अमेरिकेतील ओहियो प्रांताने भारतीय वंशाचे अमेरिकी डॉक्टर अमित मजूमदार यांचे ‘महाकवी’ म्हणून नामांकन केले आहे. विविध शैलीच्या कविता रचल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
अमित मजूमदार हे ओहियोचे पहिले महाकवी ठरले आहेत. हे पद मानद आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एकदिवसाआड दिल्लीच्या रस्त्यावर सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी करणार याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा
पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज जानेवारी २०१६मध्ये इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आॅक्टोबरमधील ऐतिहासिक दौऱ्यानंतर स्वराज १६ ते १९ जानेवारीदरम्यान या देशांचा दौरा करतील.
स्वराज यांनी यापूर्वी इस्रायलला विश्वासू साथीदार म्हटले होते. त्यानंतर स्वराज यांच्या परराष्ट्रमंत्रिपदी झालेल्या नियुक्तीची इस्रायलने प्रशंसा केली होती.
स्वराज २००६ ते २००९ यादरम्यान भारत- इस्रायल मैत्री गटाच्या अध्यक्ष होत्या. तेव्हा त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता.
मोदींचा अफगाणिस्तान दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर अफगाण संसदेचे उद्घाटन केले. मोदींचा पंतप्रधान म्हणून हा पहिलाच अफगाण दौरा आहे.
भारताच्या ७१० कोटी रुपये मदतीने ही इमारत बांधण्यात आली असून संसद भवन परिसरात ‘अटल भवन’ असून त्याचेही उद्घाटन मोदी यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ हे नामकरण झाले आहे.
२००९मध्ये सुरु झालेला अफगाणिस्तानचा संसद भवन प्रकल्प २०११ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र त्याला चार वर्षे उशिर झाला.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष : अश्रफ घनी
जगातील सर्वात मोठा वाळूचा 'सांताक्लॉज' भारतात
जगभरातील अनेक शहरांमध्ये नाताळचा माहोल तयार झाला असून ख्रिसमसच्या निमित्ताने पुरी येथील बीचवर ४५ फूट उंचीचा वाऴूचा सांताक्लॉज उभारण्यात आला आहे.
आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी हा सांताक्लॉज साकारला असून जगातील सर्वात मोठा वाळूने साकारण्यात आलेला हा सांताक्लॉज असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
हा सांताक्लॉज साकारण्यासाठी १००० टनपेक्षा जास्त वाळू वापरण्यात आली. तसेच, अनेक कलर वापरण्यात आले असून आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांच्यासह सुदर्शन सॅन्ड ऑर्ट इन्सिट्युटच्या २० विद्यार्थ्यांनीही हा सांताक्लॉज बनविण्यास मेहनत घेतली. हा प्रचंड मोठा वाळूचा सांताक्लॉज साकारण्यासाठी दोन दिवस लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर रवाना झाले. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्यासाठी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत मोदी चर्चा केली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधींचे हस्तलिखित असलेल्या डायरीचे पान आणि प्राचीन तलवारही आठवण म्हणून भेट दिली.
किर्ती आझाद भाजपातून निलंबित
दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जाहीरपणे लक्ष्य करणारे दरभंगाचे भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना भाजप पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
आझाद यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपातर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
आझाद यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि पक्षाशी नाराज असलेले खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'
ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटपटू आणि 'क्रिकेटर ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कसोटी क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ दी इयर हे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी मिळवणारा स्मिथ सातवा क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने २०१३ आणि ऑस्ट्रेलियाच्याच मिचेल जॉन्सनने २०१४ मध्ये एकाचवेळी हे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले होते.
स्मिथने १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत कसोटीमध्ये २५ डावात ८२.५७ च्या सरासरीने १,७३४ धावा केल्या. यात ७ शतकांचा समावेश आहे. स्मिथ हा तेंडुलकरनंतर आयसीसी टेस्ट रॅँकिंगमध्ये नंबर १ ठरलेला दुसरा यंगेस्ट क्रिकेटर आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डिविलियर्सला २०१५ सालचा ‘सर्वोत्कृष्ट वनडे प्लेयर’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग दुसऱ्यावर्षी डिविलियर्सने वनडे प्लेयरचा पुरस्कार मिळवला. त्याने २० सामन्यात १,२६५ धावा फटकावल्या. यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.
ICC चे पुरस्कार
क्रिकेटर
देश
अवॉर्ड
स्टीव्हन स्मिथ
ऑस्ट्रेलिया
बेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर
स्टीव्हन स्मिथ
ऑस्ट्रेलिया
बेस्ट टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर
एबी डिव्हिलियर्स
द. अफ्रीका
बेस्ट वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर
जोस हेजलवुड
ऑस्ट्रेलिया
इमरजिंग प्लेयर ऑफ द ईयर
ब्रॅन्डन मॅक्कुलम
न्यूझिलंड
स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड
मॅग लेनिंग
ऑस्ट्रेलिया
वुमन क्रिकेटर ऑफ द ईयर
खुर्रम खान
यूएई
ICC एसोसिएट क्रिकेटर ऑफ द ईयर
फॉफ डु प्लेसिस
द. अफ्रीका
टी-२० इंटरनेशनल परफॉर्मेंस ऑफ द इअर
स्टेफनी टेलर
वेस्ट इंडीज
टी-२० वुमन क्रिकेटर ऑफ द ईयर
रिचर्ड कॅटरलबर्ग
इंग्लंड
अंपायर ऑफ द ईयर
पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित
अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन-९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे.
पृथ्वीवर परतण्यापूर्वी ११ संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाशांत प्रक्षेपित केले. स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले.
यापूर्वी जूनमध्ये झालेला असा प्रयोग फसला होता. त्यावेळी फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा २३ मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या १० मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील ९ कि.मी. अंतरावरील तळावर परतला.
हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल.
सानिया-हिंगीस २०१५ची 'वर्ल्ड चॅम्पियन' जोडी
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताब देऊन गौरवले आहे.
सानिया-हिंगीस जोडीने २०१५ या वर्षात टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेवर राज्य केले आहे. यापूर्वी भारताचे लिअँडर पेस-महेश भूपती यांनी १९९९ साली पुरुष दुहेरीत 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब मिळवला होता.
मार्च २०१५ मध्ये एकत्र आलेल्या सानिया व हिंगीस या जोडीने यावर्षी नऊ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात विम्बल्डन व अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांसह डब्ल्यूटीए टूर फायनल्सच्या विजेतेपदाचाही समावेश आहे.
यावर्षी त्यांनी एकूण ५५ सामने जिंकले असून गेल्या २२ सामन्यांपासून दुहेरीची ही जोडी अपराजित आहे, त्यांना अवघ्या ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला.
त्यांच्या या नेत्रदीपक व शानदार कामगिरीमुळेच त्या दोघींनाही 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब देण्यात आला आहे.
“बालन्याय (देखरेख आणि संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०१५”ला राज्यसभेने सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने आवाजी मतदानाने त्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ते लागू होईल.
त्यामुळे आता अत्याचार, हत्या, अपहरण यांसारख्या सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यांत १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आरोपीला प्रौढ मानले जाईल. त्याला प्रौढांप्रमाणेच शिक्षा होऊ शकेल.
लोकसभेत हे विधेयक ७ मे २०१५ रोजी मंजूर झाले होते.
ब्रेंडन मॅक्युलम निवृत्त होणार
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅक्युलम हा सलग १०० कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणाऱ्या मालिकेतील तो त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. ३४ वर्षीय मॅक्युलमच्या कसोटी व क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे.
पाटण्यामध्येही जुन्या डिझेल गाडयांवर बंदी
डिझेल गाडया मोठया प्रमाणावर प्रदूषण करत असल्यामुळे आता दिल्ली पाठोपाठ बिहारची राजधानी पाटण्यामध्ये डिझेल गाडयांवर बंदी घालण्यात येणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंधरावर्ष जुन्या डिझेल गाडयांवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या फक्त पाटण्यामध्येच हा आदेश लागू होणार आहे.
दिल्लीमध्येही येत्या एक जानेवारीपासून गाडया सम आणि विषम क्रमांकानुसार एकदिवसाआड रस्त्यावर धावणार आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘पॅन’द्वारे एनपीएस खाते ऑनलाइन उघडणे शक्य
पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत (एनपीएस) ऑनलाइन खाते उघडण्यासाठी आधारची सक्ती रद्द केली आहे. आता पॅन कार्ड आणि बँक केवायसी क्रमांकाच्या आधारावर ऑनलाइन एनपीएस खाते उघडता येईल.
एक प्रयोग म्हणून आधार क्रमांकाच्या आधारावर एनपीएस खाते उघडण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती, पण ऑक्टोबरमध्ये आधारच्या वापरावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ती थांबवण्यात आली. या निर्णयामुळे एनपीएस खाते ऑनलाइन सुविधा सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेच्या निर्णयाला विरोध करणारी दिल्ली महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सध्याच्या कायद्यानुसार, त्या गुन्हेगाराला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरूंगात ठेवणे शक्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली व त्या गुन्हेगाराच्या सुटकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.
अल्पवयीन आरोपीची सुटका कायद्यानुसारच करण्यात आली असून कायद्यात सुधारणा होईपर्यंत न्यायालय काहीही करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या सुटकेच्या विरोधात राजपथवर निदर्शने करण्यात येत आहेत. निर्भयाचे आई-वडिलही इंडिया गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव इंडिया गेटवर निदर्शने करण्यास परवानगी नाकारली आहे. इंडिया गेटच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. जमावबंदीला न जुमानताही नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे.
मिरिया लालागुना रोयो मिस वर्ल्ड २०१५
चीनच्या ब्युटी क्राऊन ग्रँड टरी हॉटेलमध्ये तीन तास चाललेल्या मिस वर्ल्डच्या भव्य कार्यक्रमात स्पेनची मिरिया लालागुना रोयो हिला २०१५ची मिस वर्ल्ड जाहीर करण्यात आले.
मागील वर्षीची विजेती दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस हिने मिरियाला मिस वर्ल्डचा मुकुट देऊन गौरविले. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.
मिरिया लालागुना रोयो ही बार्सिलोनाची रहिवासी आहे आणि ती सध्या फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकत आहे. मिरिया ही अतिशय उत्कृष्ट पियानो वाजविते.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व आदिती आर्या करत होती. परंतु तिला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. मिस इंडिया अदिती ६५व्या क्रमांकावर राहिली.
या स्पर्धेत जगभरातल्या ११४ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
ब्लाटर, प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी
फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष मायकल प्लाटिनी यांच्यावर फिफाच्या शिस्तपालन समितीने आठ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे पुढची आठ वर्षे या दोघांना फिफाच्या कारभारापासून दूर रहावे लागणार आहे.
२०११ मध्ये फिफाने प्लाटिनी यांना वीस लाख स्विस फ्रॅन्क दिल्या प्रकरणी ऑक्टोंबर मध्ये दोघांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. फिफाची नैतिकता समिती या प्रकरणाचा तपास करत होती.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्लाटर यांचे फिफावरील १७ वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर प्लाटिनी यांच्याकडे त्या पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण या कारवाईमुळे प्लाटिनीही या स्पर्धेतून बाद झाले आहेत. आपल्या काळातील फ्रान्सचे सर्वोत्तम खेळाडू असणारे प्लाटिनी २००२ पासून यूईएफएचे अध्यक्ष होते.
खासदारांच्या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ
प्रदूषण मुक्त भारताची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात खासदारांसाठीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बस गाडीचे उद्घाटन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या बसच्या चाव्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सुपूर्त केल्या.
इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या अशा प्रकारच्या बसमुळे देशातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारच्या २० बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन बस संसदेच्या परिसरात खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
चेन्नईयन एफसी संघाला आयएसएलचे विजेतेपद
अंतिम लढतीत शेवटच्या क्षणी प्रतिस्पर्ध्यावर पलटवार करत विजयश्री खेचून आणत चेन्नईयन एफसी संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत चेन्नईयन एफसी संघाने एफसी गोवा संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला.
मार्को मॅटेराझीच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या व गुणतालिकेत तळाशी फेकलेल्या गेलेल्या चेन्नई संघाने सर्व जिद्दीने पुनरागमन करत सलग चार लढती जिंकत बाद फेरी गाठली. नंतर सातत्यपूर्ण प्रदर्शनासह चेन्नईने आयएसएल स्पर्धेला नवा विजेता मिळवून दिला.
माजी दिग्गज खेळाडू झिको यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने साखळी लढतींमध्ये आक्रमक खेळावर भर दिला होता. अंतिम लढतीत त्यांनी बचावावर भर देत चेन्नईला पहिल्या सत्रात गोल करु दिला नाही. परंतु शेवटच्या चार मिनिटांमध्ये तीन गोलसह झालेल्या नाटय़मय मुकाबल्यात चेन्नई संघाने सरशी साधली.
इंडियन सुपर लीग २०१५ पुरस्कार यादी
गोल्डन बूट पुरस्कार
स्टीव्हन मेन्डोझा
हिरो ऑफ द लीग
स्टीव्हन मेन्डोझा
गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार
इडेल बेटेला (चेन्नईचा गोलरक्षक)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू
जेजे लालपेखुला
तामिळनाडूमध्ये मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड
तामिळनाडू राज्य सरकारच्या नविन नियमानुसार राज्यातील मंदिरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मंदिरात कसल्याही प्रकारचे कपडे घालून जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, त्यांना मंदिरात पादत्राणे घालण्यासही मज्जाव करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१६पासून भाविकांना आता एक प्रकारचा ड्रेस कोड तयार करण्यात आला असून हा ड्रेस कोड पुरुषांसह महिला आणि मुलांनाही लागू करण्यात येणार आहे.
यामध्ये पुरुष भाविकांसाठी धोती आणि पायजमा, फॉरमल पॅन्ट आणि शर्ट असा पेहराव घालावा लागणार आहे. तर महिलांसाठी साडी आणि मुलांसाठी संपूर्ण अंग झाकलेले कपडे घालावे लागणार आहेत.
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी. परडीवाला यांनी अलीकडेच एका निकालपत्रात आरक्षणाचे धोरण आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी भाष्य केले होते.
या भाष्याबद्दल त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस राज्यसभेच्या ५८ सदस्यांनी दिल्यामुळे न्या. परडीवाला यांनी ते भाष्य निकालपत्रातून काढून टाकले आहे.
पाटीदार अमानत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांना अटक करताना गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाही गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी हार्दिक पटेल यांनी केलेली याचिका फेटाळताना परडीवाला यांनी हे भाष्य नोंदविले होते.
न्या. परडीवाला यांच्या या निकालपत्राची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यावर काँग्रेस, जनदा दल (संयुक्त), कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक आणि बहुजन समाज पक्षाच्या ५८ सदस्यांनी यावरून न्या. परडीवाला यांच्यावर महाभियोग चालविला जावा, अशी मागणी करणारी नोटीस राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे सादर केली.
या राज्यसभा सदस्यांचे म्हणणे असे होते की, राज्यघटनेत फक्त निवडणुकांमधील आरक्षण १० वर्षे ठेवण्याचा उल्लेख केला गेला होता. नोकरी व शिक्षणातील आरक्षणासाठी राज्यघटनेत अशा कुठल्याही कालमर्यादेचा उल्लेख नाही. राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन न्यायाधीश या घटनात्मक पदावर बसलेल्या न्या. परडीवाला यांनी अधिकृतपणे निकालपत्र लिहिताना राज्यघटनेविषयीचे असे अज्ञान प्रकट करावे, हे गैरवर्तन आहे.
सदस्यांनी दिलेल्या नोटिशीमधील आरोप संबंधित न्यायाधीशावर खरोखरच महाअभियोगाची कारवाई सुरू करण्याएवढे सकृत्दर्शनी गंभीर आहेत का याचा विचार करण्यासाठी राज्यसभा अध्यक्षांनी त्रिसदस्यीय समिती नेमणे हा याच्या पुढील टप्पा होता; परंतु त्याआधीच गुजरात सरकारने न्या. परडीवाला यांच्यापुढे निकालपत्रातील हा ‘आक्षेपार्ह’ परिच्छेद काढून टाकण्यासाठी अर्ज केला आणि तो परिच्छेद काढून टाकण्यात आला.
पिया अलोंझो वर्त्झबाक मिस युनिव्हर्स २०१५
लास वेगासमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत फिलिपिन्सची पिया अलोंझो वर्त्झबाकने बाजी मारली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेज आणि मिस युएसए तिसऱ्या क्रमांकावर आली.
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऊर्वशी रौतेला हिला मात्र अंतिम १० मध्ये स्थान मिळवता आले नाही.
यंदाच्या मिस युनिवर्स स्पर्धेत ८० देशातील १९ ते २७ वयोगटातील तरुणींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रेक्षकांनी आपल्या घरातून मत दिले. परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांच्या मतांची दाखल निवडीवेळी घेण्यात आली.
व्यवसाय करण्यासाठी उत्तम देशांत भारत ९७वा
व्यवसाय करण्यासाठी उत्तम देशांच्या 'फोर्ब्स'ने प्रसिद्ध केलेल्या यादीत भारताचे स्थान ९७व्या क्रमांकावर आले आहे. कझाकस्तान आणि घाना या देशांच्याही मागे भारताचे स्थान आहे. जगातील १४४ देशांचा या यादीत समावेश आहे.
व्यापार आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत सुमार कामगिरी, तसेच तसेच भ्रष्टाचार आणि हिंसाचार अशा आव्हानांचा सामना करण्यात आलेले अपयश याचा फटका भारताला बसला आहे.
दीर्घकालीन प्रगतीच्या दृष्टीने पाहिल्यास भारताचे भवितव्य सकारात्मक आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या तरुण लोकसंख्येचा फायदा देशाला होईल. त्यासोबतच बचत आणि गुंतवणुकीचे निरोगी प्रमाण, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत वाढत असलेला सहभाग यांचाही फायदा भारताला होणार आहे.
२०१५ या वर्षासाठी 'फोर्ब्स'ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ९७व्या स्थानी असलेला भारत खुली बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे. मात्र, भारतात भूतकाळातील राजकारणाचे ठसे अजूनही आहेत, असे 'फोर्ब्स'ने म्हटले आहे.
भारताचे स्थान गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या बाबतीत ८वे, संशोधनाच्या बाबतीत ४१वे, व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत ५७वे, तर संपत्ती अधिकारांच्या बाबतीत ६१वे आहे.
व्यापाराच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान १२५वे, तर वित्तीय स्वातंत्र्याच्या बाबतीत १३९वे आहे. त्याशिवाय तंत्रज्ञान १२०वे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत ७७वे, तसेच लालफितीच्या बाबतीत भारत १२३व्या स्थानी आहे.
व्यवसाय करण्यासाठी उत्तम असलेल्या देशांच्या यादीत डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेरिकेचे स्थान चार अंकांनी घसरून २२वर आले आहे. २००९मध्ये या यादीत अमेरिकेचे स्थान दुसरे होते.
भारताच्या शेजारील देशांचे या यादीतील स्थान : श्रीलंका (९१), चीन (९४), पाकिस्तान (१०३), बांगलादेश (१२१)
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे मुंबईत आयोजन
भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा शुभारंभ देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत.
१८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात १,००० हून अधिक कंपन्या, तर विविध ६० देश सहभागी होणार आहेत.
भारतातील थेट विदेशी गुंतवणूक वाढण्याच्या मोहिमेला प्रोत्साहन मिळावे, हा या विशेष सप्ताहाच्या आयोजनामागील हेतू आहे. नावीन्य, आरेखन आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित या सप्ताहादरम्यान विदेशी कंपन्यांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी केले जाईल.
एआयएफएफचे पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) जाहीर केलेल्या पुरस्कारात पुरुष गटात ‘वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान युजिन्सन लिंगडोहला मिळाला, तर महिला गटात हा मान आघाडीपटू बाला देवीने पटकावला.
एआयएफएफच्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दोन वर्षे सुनील छेत्रीची असलेली मक्तेदारी मध्यरक्षक लिंगडोहने मोडून काढली आहे.
लिंगडोहला चषक आणि दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. बाला देवी या पुरस्काराची सलग दुसऱ्यांदा मानकरी ठरली. तिला चषक व एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.