भारत-पाकिस्तान दरम्यान परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक १५ जानेवारी रोजी इस्लामाबाद येथे होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबुलहून परतताना लाहोरला आकस्मिक भेट देऊन पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी हे पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला.
मागील ११ वर्षांपासूनचा एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. पाकिस्तान दौरा करणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत.
ऑलिम्पिकसाठी भारतीय सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड
पुढील वर्षी ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड झाली आहे. भारतीय कुस्ती सामनाधिकाऱ्यांची क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अशोक कुमार सध्या एअर इंडियात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पन्नासपेक्षा अधिक स्पर्धामध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या कार्यशाळेतील प्रदर्शनावर सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
जगभरातून ५० सामनाधिकारी, निरीक्षक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक कुस्ती असोसिएशनने आशिया खंडातून नऊ सामनाधिकाऱ्यांची निवड केली.
डीडीसीए प्रकरणात जेटलींच्या विरोधात पुरावा नाही
दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मधील गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील केजरीवाल सरकारने नेमलेल्या आयोगाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही.
दिल्ली सरकारने डीडीसीए घोटाळ्याच्या चौकशीसाठी गोपाल सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या २३७ पानी अहवालात डीडीसीए घोटाळ्याच्या तपासाचा उल्लेख आहे, पण जेटलींच्या नावाचा मात्र कुठेही उल्लेख नाही.
डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचे एकही प्रकरण चौकशी समितीच्या निदर्शनास आलेले नाही.
मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २७ जानेवारी रोजी 'मन की बात' कार्यक्रमातून अपंगत्वावर मात करत पुढे येणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला. या व्यक्तींना ईश्वराने अन्य अतिरिक्त शक्ती दिल्या असल्याचे म्हणत त्यांना 'अपंग' म्हणण्याऐवजी 'दिव्यांग' म्हणू शकतो, असा नवा दृष्टीकोन मोदींनी आपल्या कार्यक्रमातून दिला आहे.
१६ जानेवारी रोजी भारत सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंजिया'चा कृती आरखडा देशासमोर मांडण्यात येईल असेही मोदींनी सांगितले.
याखेरीज प्रजासत्ताक दिनानिमित्त 'कर्तव्य' या विषयावर निबंध, काव्य लिहून २६ जानेवारीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
ऑस्ट्रेलिया १००० शतक करणारा पहिला देश
वेस्ट इंडीजच्या विरोधात मेलबॉर्नमध्ये दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सलामवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने शतक केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडून १०००वे आंतरराष्ट्रीय शतक बनवणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या व्यक्तिगत रेकॉर्डसह ऑस्ट्रेलिया क्रिकटमध्ये १००० शतक बनवणारा पहिला देश बनला आहे.
सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या १० फलंदाजांमध्ये १००० शतके ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे केवळ दोनच फलंदाज आहेत. असे असतानाही कांगारूंनी हे नवे रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची कमाल करून दाखवली आहे.
सर्वाधिक शतक केलेले देश
देश
शतके
ऑस्ट्रेलिया
१०००
इंग्लंड
९६४
भारत
६८८
वेस्ट इंडीज
६२९
पाकिस्तान
५४३
आधार कार्डचा दुरुपयोग करणाऱ्याला १० वर्षे कारावास
आधार कार्डासाठी गोळा केलेल्या माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने त्याविषयीची दक्षता यंत्रणा अधिक कडक केली आहे.
त्यामुळे आता परवानगी नसताना किंवा अधिकार नसताना एखाद्याच्या आधार कार्डाची माहिती स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्याला १० वर्षांपर्यंत कारावास होणार आहे.
या आदेशानुसार, अधिकृत व्यक्तीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तीने यूआयडीएआय प्रणालीचा वापर केल्यास किंवा तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला दंडासह १० वर्षांपर्यंत कारावास होऊ शकणार आहे.
त्याचवेळी अधिकाधिक सार्वजनिक सेवा आधार अंतर्गत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने कॅबिनेट सचिवांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
सरकारने २१ डिसेंबर रोजी आधार कार्ड देणाऱ्या यूआयडीएआयच्या माहिती साठा यंत्रणा, माहिती जमा करण्याची केंद्रे, यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, साहित्य या सर्वांना संरक्षित प्रणाली म्हणून घोषित केले. ही घोषणा माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा