निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेच्या निर्णयाला विरोध करणारी दिल्ली महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सध्याच्या कायद्यानुसार, त्या गुन्हेगाराला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरूंगात ठेवणे शक्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली व त्या गुन्हेगाराच्या सुटकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.
अल्पवयीन आरोपीची सुटका कायद्यानुसारच करण्यात आली असून कायद्यात सुधारणा होईपर्यंत न्यायालय काहीही करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या सुटकेच्या विरोधात राजपथवर निदर्शने करण्यात येत आहेत. निर्भयाचे आई-वडिलही इंडिया गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव इंडिया गेटवर निदर्शने करण्यास परवानगी नाकारली आहे. इंडिया गेटच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. जमावबंदीला न जुमानताही नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे.
मिरिया लालागुना रोयो मिस वर्ल्ड २०१५
चीनच्या ब्युटी क्राऊन ग्रँड टरी हॉटेलमध्ये तीन तास चाललेल्या मिस वर्ल्डच्या भव्य कार्यक्रमात स्पेनची मिरिया लालागुना रोयो हिला २०१५ची मिस वर्ल्ड जाहीर करण्यात आले.
मागील वर्षीची विजेती दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस हिने मिरियाला मिस वर्ल्डचा मुकुट देऊन गौरविले. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.
मिरिया लालागुना रोयो ही बार्सिलोनाची रहिवासी आहे आणि ती सध्या फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकत आहे. मिरिया ही अतिशय उत्कृष्ट पियानो वाजविते.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व आदिती आर्या करत होती. परंतु तिला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. मिस इंडिया अदिती ६५व्या क्रमांकावर राहिली.
या स्पर्धेत जगभरातल्या ११४ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
ब्लाटर, प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी
फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष मायकल प्लाटिनी यांच्यावर फिफाच्या शिस्तपालन समितीने आठ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे पुढची आठ वर्षे या दोघांना फिफाच्या कारभारापासून दूर रहावे लागणार आहे.
२०११ मध्ये फिफाने प्लाटिनी यांना वीस लाख स्विस फ्रॅन्क दिल्या प्रकरणी ऑक्टोंबर मध्ये दोघांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. फिफाची नैतिकता समिती या प्रकरणाचा तपास करत होती.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्लाटर यांचे फिफावरील १७ वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर प्लाटिनी यांच्याकडे त्या पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण या कारवाईमुळे प्लाटिनीही या स्पर्धेतून बाद झाले आहेत. आपल्या काळातील फ्रान्सचे सर्वोत्तम खेळाडू असणारे प्लाटिनी २००२ पासून यूईएफएचे अध्यक्ष होते.
खासदारांच्या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ
प्रदूषण मुक्त भारताची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात खासदारांसाठीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बस गाडीचे उद्घाटन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या बसच्या चाव्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सुपूर्त केल्या.
इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या अशा प्रकारच्या बसमुळे देशातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारच्या २० बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन बस संसदेच्या परिसरात खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
चेन्नईयन एफसी संघाला आयएसएलचे विजेतेपद
अंतिम लढतीत शेवटच्या क्षणी प्रतिस्पर्ध्यावर पलटवार करत विजयश्री खेचून आणत चेन्नईयन एफसी संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत चेन्नईयन एफसी संघाने एफसी गोवा संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला.
मार्को मॅटेराझीच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या व गुणतालिकेत तळाशी फेकलेल्या गेलेल्या चेन्नई संघाने सर्व जिद्दीने पुनरागमन करत सलग चार लढती जिंकत बाद फेरी गाठली. नंतर सातत्यपूर्ण प्रदर्शनासह चेन्नईने आयएसएल स्पर्धेला नवा विजेता मिळवून दिला.
माजी दिग्गज खेळाडू झिको यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने साखळी लढतींमध्ये आक्रमक खेळावर भर दिला होता. अंतिम लढतीत त्यांनी बचावावर भर देत चेन्नईला पहिल्या सत्रात गोल करु दिला नाही. परंतु शेवटच्या चार मिनिटांमध्ये तीन गोलसह झालेल्या नाटय़मय मुकाबल्यात चेन्नई संघाने सरशी साधली.
इंडियन सुपर लीग २०१५ पुरस्कार यादी
गोल्डन बूट पुरस्कार
स्टीव्हन मेन्डोझा
हिरो ऑफ द लीग
स्टीव्हन मेन्डोझा
गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार
इडेल बेटेला (चेन्नईचा गोलरक्षक)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू
जेजे लालपेखुला
तामिळनाडूमध्ये मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड
तामिळनाडू राज्य सरकारच्या नविन नियमानुसार राज्यातील मंदिरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मंदिरात कसल्याही प्रकारचे कपडे घालून जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, त्यांना मंदिरात पादत्राणे घालण्यासही मज्जाव करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१६पासून भाविकांना आता एक प्रकारचा ड्रेस कोड तयार करण्यात आला असून हा ड्रेस कोड पुरुषांसह महिला आणि मुलांनाही लागू करण्यात येणार आहे.
यामध्ये पुरुष भाविकांसाठी धोती आणि पायजमा, फॉरमल पॅन्ट आणि शर्ट असा पेहराव घालावा लागणार आहे. तर महिलांसाठी साडी आणि मुलांसाठी संपूर्ण अंग झाकलेले कपडे घालावे लागणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा