चालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१५


नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया व राहुल गांधी यांना जामीन मंजूर

    National Herald
  • नॅशनल हेरॉल्ड फसवणूक प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पटियाला हाउस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विनाअट जामीन मंजूर केला.
  • नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया व राहुल यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. या समन्सवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचे सांगत काँग्रेसने संसदेचे कामकाजही रोखून धरले होते.
 नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा आजपर्यंतचा प्रवास... 
  • जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेले ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते व नंतर काँग्रेसशी २००८ पर्यंत संलग्न होते.
  • १ एप्रिल २००८ रोजी संपादकीयामध्ये हे वृत्तपत्र तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. बंद करण्याआधी हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) चालवत होते.
  • २००८ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंद पडलेले हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्याचा निर्णय २००९ मध्ये सोनिया गांधींनी घेतला.
  • सोनिया गांधी व राहूल गांधी यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा असलेल्या यंग इंडिया लिमिटेडने एजेएलचा ताबा ९० कोटी रुपयांमध्ये घेतला. फेब्रुवारी २०११ मध्ये एजेएलचे संपूर्ण हस्तांतरण यंग इंडियाकडे करण्यात आले.
  • हा ताबा फसवणुकीच्या माध्यमातून घेतला गेला, हजारो कोटी रुपयांची मालमत्ता काही कोटींच्या कर्जफेडीतून, ती ही काँग्रेस पक्षाच्या निधीतून हडप केल्याचा आरोप ठेवत सुब्रमण्यम स्वामींनी कोर्टात धाव घेतली.
  • अनेकवेळा झालेल्या सुनावणीमध्ये काँग्रेसने नोव्हेंबर २०१२ मध्ये बाजू मांडली की, कुठल्याही व्यापारी उद्देशाने हा व्यवहार केलेला नसून नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र पुन्हा सूरू करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.
  • मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर स्वामींच्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवले. २६ जून २०१४ मध्ये ट्रायल कोर्टाने सोनिया गांधी, राहूल गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कोर्टात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले.
  • काँग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात केली. १४ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आणि सोनिया व राहूल यांना कोर्टात हजर रहावे लागणार हे स्पष्ट झाले.
  • त्याप्रमाणे काँग्रेसचे संबंधित नेते कोर्टात हजर झाले व जामिनासाठी अर्ज केला, जो मंजूर करण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका

  • दिल्ली हायकोर्टात १८ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे त्याची २० डिसेंबर रोजी सुटका होणार आहे.
  • या बलात्काऱ्याबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा निर्भयाच्या पालकांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी उघडपणे निषेध केला आहे. दिल्लीत ज्या सुधारगृहात या आरोपीला ठेवण्यात आले होते त्याबाहेर  निर्भयाच्या पालकांनी निदर्शने केली.
  • या आरोपीच्या सुटकेला स्थगिती मिळवण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.

सीबीएसईची सर्व पुस्तके इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध होणार

  • केंद्र सरकारच्या उत्तम प्रशासनासंदर्भातील (गुड गव्हर्नंस) धोरणाचा एक भाग म्हणून लवकरच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमावर आधारलेली सर्व पुस्तके व अभ्यास साहित्य हे इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. 
  • याआधी ई-बुक्स व मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या माध्यमामधून एनसीआरटीची पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. याचप्रमाणे प्रशासकीय धोरणाचा भाग म्हणून लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमाची पुस्तकेही इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 
  • याचबरोबर शाला दर्पण आणि सारांश या दोन नवीन सेवा सुरु करण्यासंदर्भातही सरकार प्रयत्नशील आहे. शाला दर्पण या योजनेनुसार एसएमएस सेवेद्वारे पालकांना मुलांच्या शाळेमधील उपस्थितीसहच वेळापत्रक आणि परीक्षांमधील गुणांची माहिती दिली जाणार आहे; तर सारांश योजनेन्वये पालकांना त्यांच्या पाल्याची शैक्षणिक कामगिरी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या तुलनेत पाहता येणे शक्य होणार आहे.

युद्धग्रस्त सीरियासंदर्भातील शांतता प्रस्ताव मंजूर

  • सीरियामधील यादवी संपविण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या १५ सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्रीस्तरीय बैठकीत शांतता प्रक्रियेसंदर्भातील चर्चेचा मसुदा मान्य करण्यात आला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
  • सीरियामध्ये पाच वर्षांपासून सुरू असलेली अराजकता संपविण्यासाठी तेथील सरकार आणि विरोधकांमध्ये ही चर्चा सुरू होणार असली तरी, चर्चेसाठीच्या या मसुद्यामध्ये सीरियाचे अध्यक्ष बाशर अल असाद यांच्या भूमिकेबद्दल मात्र स्पष्टता नाही.
  • संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून हे पुढील महिन्यांत या चर्चेला सुरवात करतील. पुढील सहा महिन्यांमध्ये सीरियामध्ये स्थिर, सर्वसमावेशक आणि निधर्मी सरकार स्थापन करण्यासाठी ही चर्चा असेल.
  • तसेच, पुढील १८ महिन्यांमध्ये सीरियामध्ये राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली नवी राज्यघटना अस्तित्वात आणण्याचाही मुद्दा चर्चेच्या मसुद्यात आहे. या चर्चेला सुरवात होताच शस्त्रसंधीही लागू होणार असून, राजकीय स्थित्यंतराची समांतर प्रक्रिया सुरू होणार आहे.

रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ क्षेपणास्त्रे खरेदीस मान्यता

  • पाकिस्तान व चीन यांच्याबरोबरच्या सीमारेषेवर सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेण्यास मान्यता दिली आहे.
  • अशी पाच प्रगत क्षेपणास्त्रे खरेदी केली जात असून त्यांची किंमत ३९ हजार कोटी रूपये आहे. ही क्षेपणास्त्रे नाटो देशांनाही हादरवणारी असून त्यांच्या मदतीने ४० कि.मी टप्प्यातील विमाने, लढाऊ विमाने व ड्रोन विमाने तसेच इतर क्षेपणास्त्रे यांना लक्ष्य करता येते.
  • एस ४०० क्षेपणास्त्रे तैनात करण्यास प्रत्यक्षात काही वर्षे लागणार आहेत. पश्चिमकेडील पाकिस्तान सीमेवर तीन व पूर्वेकडे चीनच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे लावल्यानंतर भारताची संरक्षक फळी मजबूत होणार आहे.
  • भारतीय हवाई दलात असलेल्या कमतरता दूर करण्याचा एक भाग म्हणून ही क्षेपणास्त्रे खरेदी केली जात आहेत.

‘अ‍ॅपल’च्या ‘सीओओ’पदी जेफ विल्यम्स यांची नियुक्ती

  • मोबाईल बाजारपेठेत ‘अ‍ॅपल’ला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे जेफ विल्यम्स यांची कंपनीच्या ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’पदी (सीओओ) नियुक्ती झाली आहे.
  • ‘अ‍ॅपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्यानंतर टीम कुक यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ‘सीओओ’पद रिक्तच होते.
  • विल्यम्स यांनी १९९८ मध्ये खरेदी विभाग प्रमुख म्हणून कारकीर्द सुरू केली. ‘अ‍ॅपल वॉच’च्या निर्मितीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • त्यांच्यासह जॉनी स्त्रॉजी, फिल शिलर, तोर मायरेन यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या ‘शाहीन-३’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • पाकिस्तानने मध्यम पल्ल्याच्या ‘शाहीन-३’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 
  • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. 
  • या क्षेपणास्त्राचा पल्ला २,७५० कि.मी. असल्यामुळे अनेक भारतीय शहरे त्याच्या टप्प्यात आली आहेत.
  • हे क्षेपणास्त्र पारंपरिक शस्त्रांसह अण्वस्त्रांचाही मारा करू शकते.

  • उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवृत्त न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांची राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून नेमणूक केली असून २० डिसेंबरला राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना पदाची शपथ दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा