चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१५


देशातील पहिल्या बुलियन एक्सचेंजसाठी करार

  • देशातील पहिल्या मौल्यवान धातूच्या राष्ट्रीय विनिमय मंच (बुलियन एक्सचेंज) उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.
  • आयबीजेए आणि बीएसई यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार, प्रस्तावित विनिमय मंचासाठी विशेष हेतू उपक्रम स्थापण्यात येईल, ज्यात आयबीजेएचा ७० टक्के तर बीएसईचा ३० टक्के वाटा असेल.
  • या करारावर आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज आणि बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
  • भारतात मौल्यवान धातूच्या उलाढाली करणारे सर्वच घटक अर्थात बँका, सोने व्यापारी, सराफ समुदाय यांची घाऊक खरेदी व विक्री या प्रस्तावित विनिमय मंचामार्फत होऊ लागल्यास, या व्यापारात सरकारच्या दृष्टीने अपेक्षित असलेली पारदर्शकता दिसून येऊ शकेल.
  • संशयास्पद व दुर्व्यवहारांना पायबंद घातला जाईल यासाठी आवश्यक ती माहिती व नोंदी ठेवण्यास हा बाजारमंच उपयुक्त ठरेल.
  • देशात दरसाल सरासरी १००० टन सोन्याची अर्थात सुमारे २५०००० कोटी रुपये मूल्याचे सोने आयात होते. पण ते नेमके कुणाकडून वापरात येते, उलाढाल कशी होते याबाबत पुरती पारदर्शकता आणि अधिकृतरीत्या नोंदी ठेवणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे. विनिमय मंचामुळे त्यात सुसूत्रता येऊ आणि व्यवहारात पारदर्शकता येऊ शकेल.

दिल्लीमध्ये डिझेलवरील नवीन वाहनांची नोंदणी बंद

  • दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यापुढे तेथे डिझेलवर चालणाऱ्या नवीन वाहनांची नोंदणी करता येणार नाही व दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या परवान्यात वाढ केली जाणार नाही, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.
  • सम-विषम क्रमांकाच्या वाहनांची योजना लागू करून दर दिवशी निम्मीच वाहने रस्त्यावर येऊ देण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाने काही साध्य होणार नाही. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे लोक दोन चारचाकी गाड्या घेण्यास उद्युक्त होतील, अशी शंका लवादाने उपस्थित केली आहे.
  • या प्रकरणी सर्व घटकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना परवानावाढ देऊ नये व नवीन डिझेल वाहनांना परवानगी देऊ नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांनी दिला.
  • लवादाने केंद्र व राज्य सरकारला असा आदेश दिला आहे की, सरकारी खात्यांसाठी डिझेल वाहनांची खरेदी करण्यात येऊ नये. 

राजदच्या माजी खासदाराला अटक

  • राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याच्यासह तीन जणांना बिहारमधील सिवान जिल्ह्य़ात अकरा वर्षांपूर्वी दोन भावांचा खून केल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.
  • शहाबुद्दीन व त्याचे तीन साथीदार राजकुमार साह, शेख अस्लम व अरिफ हुसेन यांना २००४ मधील या प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शहाबुद्दीन याला २० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

'भारत फोर्ज'चा 'रोल्स रॉईस'शी सामंजस्य करार

  • पुण्यातील आघाडीच्या 'भारत फोर्ज'ने लक्झरी कारनिर्मिती क्षेत्रातील 'रोल्स रॉईस'शी परस्पर सामंजस्य करार केला. या करारानुसार 'भारत फोर्ज' आता 'रोल्स रॉईस'निर्मित विमानांच्या इंजिनाच्या सुट्या भागांची निर्मिती करणार आहे.
  • या करारानुसार कंपनी आता विमाननिर्मितीतील महत्त्वाच्या ट्रेंट इंजिनांसह अनेक महत्त्वपूर्ण भागांची निर्मिती करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा