संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव विकास निर्देशांकानुसार महिला सक्षमीकरणात भारत १३५व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकास अहवाल २०१४ प्रसिद्ध केला आहे. त्यात हे नमूद करण्यात आले आहे.
एकूण १४७ देशांमधील महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा आढावा यात घेतला आहे. अशा प्रयत्नांत भारत १३५व्या क्रमांकावर आहे.
सांख्यिकी मंत्रालयाने तयार केलेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया- २०१५’ या अहवालात देशांतील महिलांचे स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, काम व निर्णय घेण्यातील सहभाग तसेच महिला सक्षमीकणातील सामाजिक अडथळे यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
देशातील ८० टक्के महिलांची गर्भधारणेच्या काळात पुरेशी काळजी घेतली जात नाही. निरक्षरता, दुर्लक्ष, रूढींचा पगडा, अपुऱ्या सुविधा, आर्थिक प्रश्न हे सर्व घटक याला कारणीभूत आहेत.
गंगानदीच्या परिसरात प्लास्टिक बंदी
गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लास्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. १ फेब्रुवारी २०१६ पासून या निर्देशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
गंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योगही बंद करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तसेच गंगा नदीची उपनदी असलेल्या रामगंगा नदीतील पाण्याचे नमुने लवादाने तपासणीसाठी मागविले आहेत.
रामगंगा नदीतील प्रदूषणाबद्दल उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारला फटकारले आहे. नोव्हेंबरमध्ये लवादाने उत्तराखंडमधील गंगा नदीच्या परिसरात २०० मीटर अंतरावर बांधकामावर बंदी आणली आहे.
फिचकडून भारताला ‘बीबीबी’ श्रेणी
गुंतवणुकीसाठी भारताला कनिष्ठ श्रेणीचे पतमानांकन फिच या आर्थिक पाहणी संस्थेने दिले आहे. याचबरोबर मध्यमकालीन विकास चांगला राहणार असून, उत्पादन स्थिर राहणार असल्याचा अंदाज फिचने वर्तविला आहे.
त्याचबरोबर संतुलित मध्यमकालीन विकास चांगला राहील. यासोबत परकी गुंतवणूक आणि परकी गंगाजळीची स्थिती चांगली राहणार आहे. मात्र, सरकारवरील कर्जाचा बोजा आणि रचनात्मक सुधारणा कमकुवत असल्यामुळे व्यवसायाच्या वातावरणात फारशी सुधारणा होणार नाही. असे फिचने म्हटले आहे.
तसेच, भारताला विकास दर (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ७.५ टक्क्यांपर्यंत जाईल आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाजही वर्तविला आहे.
व्यवसाय करण्याच्या वातावरणातील सुधारणेबाबत जागतिक बॅंकेच्या क्रमवारीत भारताचे स्थान वधारले आहे. मात्र, फिचने केलेल्या पाहणीत १८९ देशांमध्ये भारत १३०व्या स्थानावर आहे.
हमीद अन्सारी तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यावर
भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ११ डिसेंबर रोजी तुर्कमेनिस्तानच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले.
अन्सारी यांचे अश्गाबाद विमानतळावर अहल प्रांताच्या राज्यपालांनी स्वागत केले. या दौऱ्यात अन्सारी तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षांची भेट घेणार असून, या वेळी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे.
तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान भारत (टीएपीए) गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत
अन्सारी यांच्या तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानही सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये तुर्कमेनिस्तानला भेट दिली होती.
तुर्कमेनिस्तानची राजधानी : अश्गाबाद
ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २०१६च्या या वर्ल्ड कपमध्ये एकूण ५८ लढती होतील. यात ३५ लढती पुरुष संघांच्या, तर २३ लढती महिला संघांच्या असणार आहेत.
८ मार्च ते ३ एप्रिल या काळात होणारे सामने भारतातील एकूण ८ शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्लीचा समावेश आहे. तीन एप्रिल रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर अंतिम सामना होणार आहे.
भारताची सलामीची लढत १५ मार्चला न्यूझीलंड संघाविरुद्ध नागपूर येथे होणार असून १९ मार्च रोजी भारत पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे.
पुरुषांच्या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले असून, अ गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड यांचा समावेश असून, ब गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धेत प्रवेशासाठी सामने खेळवले जातील. यातील विजेत्या संघाला अ गटात प्रवेश दिला जाणार आहे.
तर बांगलादेश, नेदरलॅंड्स, आर्यलंड आणि ओमान यांच्यात सामने खेळवले जाणार असून, त्यांच्यातील विजेत्याला ब गटात प्रवेश दिला जाणार आहे.
‘फोर्ब्ज’च्या ‘टॉप १०० सेलिब्रेटीं’च्या यादीत शाहरुख प्रथम
‘फोर्ब्ज‘ने तयार केलेल्या देशातील यंदाच्या ‘टॉप १०० सेलिब्रेटीं’च्या यादीमध्ये शाहरुख खानने अव्वल स्थान पटकाविले आहे. अभिनेता सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘बिग बी‘ अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानी आहेत.
एखाद्या सेलिब्रेटीची ‘ब्रॅंड व्हॅल्यू‘ आणि त्याचे वर्षभरातील उत्पन्न असे या यादीचे निकष आहेत. बहुतांश सेलिब्रेटींच्या मानांकनामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असला, तरीही काही जणांच्या मानांकनामध्ये उत्पन्नापेक्षा लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे.
उदाहरणार्थ: क्रिकेटपटू रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, गौतम गंभीर, गायक यो यो हनीसिंग, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सनी लिऑन इत्यादींच्या मानांकनामध्ये लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष आहे.
या यादीतील पहिले दहा सेलिब्रेटी पुढीलप्रमाणे
नाव
(उत्पन्न कोटी रुपयांत)
१. शाहरुख खान
२५७.५०
२. सलमान खान
२०२.७५
३. अमिताभ बच्चन
११२.००
४. महेंद्रसिंह धोनी
११९.३३
५. आमीर खान
१०४.२५
६. अक्षयकुमार
१२७.८३
७. विराट कोहली
१०४.७८
८. सचिन तेंडुलकर
४०.००
९. दीपिका पदुकोण
५९.००
१०. हृतिक रोशन
७४.५०
याशिवाय ए. आर. रेहमान (१४वा क्रमांक), अजिंक्य रहाणे (२५वा क्रमांक), कपिल शर्मा (२७वा क्रमांक), साईना नेहवाल (३९वा क्रमांक), चेतन भगत (६६वा क्रमांक), रजनीकांत (६९वा क्रमांक), अजय-अतुल (८२वा क्रमांक) हे अन्य सेलिब्रेटीही या यादीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा