चालू घडामोडी - १४ डिसेंबर २०१५
'तापी' पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ
- देशातील ऊर्जा प्रकल्प चालवण्यासाठी लागणाऱ्या गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याची क्षमता राखणाऱ्या 'तापी' पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ १३ डिसेंबर रोजी झाला. तुर्कमनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत असे चार देश या मार्गाचे लाभार्थी ठरणार आहेत.
- तुर्कमनिस्तानची राजधानी असलेल्या असघाबादपासून ३११ किमी दूर असलेल्या मेरी येथे भारताच्या वतीने उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी, तुर्कमनिस्तानचे अध्यक्ष बरदीमुहामेदव उपस्थित होते.
योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांची ९७वी जयंती
- विश्वविख्यात योगगुरू दिवंगत बी. के. एस. अय्यंगार यांच्या ९७व्या जयंती दिनानिमित्त गुगलनं एका खास डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या डुडलमध्ये अय्यंगार यांचा अॅनिमेटेड अवतार गुगलच्या अक्षरांच्या आकारातील योगासनं करताना दाखवण्यात आला आहे.
- अय्यंगर यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूरमध्ये झाला होता. आपले संपूर्ण जीवन योगाला वाहिलेल्या अय्यंगार यांनी योगविश्वात 'अय्यंगार योगा' नावाचा अभिनव प्रकार प्रचलित केला होता.
- अय्यंगर हे जगातील सर्वोत्तम योगगुरूंपैकी एक होते. त्यांनी योगासंदर्भात लिहिलेली अनेक पुस्तके जगभरात गाजली आहेत. 'लाइट ऑन प्राणायाम', 'लाइट ऑन योग', 'सूत्राज ऑफ पतांजली' आणि 'लाइट ऑन लाइफ' या त्यांच्या पुस्तकांना जगभरात प्रचंड मागणी आहे.
- योग क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि जगभरात योगाभ्यासाचा प्रसारासाठी त्यांना १९९१ साली भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कारने गौरविले होते. त्यानंतर २००२मध्ये 'पद्मभूषण' आणि २०१४ मध्ये 'पद्मविभूषण' सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.
- जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने २००४ साली जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत अय्यंगर यांचा समावेश केला होता. २० ऑक्टोबर २०१४ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
सॅम्युएल्सच्या गोलंदाजीवर वर्षभराची बंदी
- वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज मार्लोन सॅम्युएल्स याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १२ महिन्यांची बंदी घातली आहे.
- आयसीसीच्या पथकाने सॅम्युएल्सची गोलंदाजी शैली तपासल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सॅम्युएल्सवर आयसीसीकडून दुसऱ्यांदा गोलंदाजीवर बंदी घातली आहे. वेस्ट इंडीजसाठी सॅम्युएल्स पार्ट-टाईम गोलंदाजी करतो.
- वेस्ट इंडीजचा ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. या नंतर आयसीसीने ब्रिस्बेनमध्ये या महिन्याच्या सुरवातीला त्याच्या गोलंदाजीची तपासणी केली होती.
- सॅम्युएल्सवर यापूर्वी २००८ मध्ये चार वर्षांसाठी गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली होती.
सौदीत २० महिला उमेदवार विजयी
- सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये महिलांना मतदान करण्याची संधी मिळाल्यावर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी २० महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.
- सौदी अरेबियातील मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत विविध ठिकाणी या महिला उमेदवारांनी यश मिळवले आहे. सौदी अरेबियाच्या दृष्टीने ही निवडूणक सर्वच अर्थांनी ऐतिहासिक ठरली. निवडून आलेल्या महिलांचे प्रमाण एकूण सदस्यांमध्ये एक टक्का इतके आहे.
- सौदी अरेबियातील सुमारे २१०० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये पहिल्यांदाच महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
- अद्यापही सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालविण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर त्यांचे पालकत्व हे पुरुषांकडेच असते. त्यामुळे त्यांनी कोणते शिक्षण घ्यायचे, कोणाशी लग्न करायचे, कुठे प्रवास करायचा याचा निर्णय पालकत्व असलेली पुरुष व्यक्तीच घेते.
- निवडून येणाऱ्या महिलांची संख्या जरी कमी असली, तरी आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेतून संपूर्णत वगळल्या गेलेल्या महिलावर्गाला या निमित्ताने प्रतिनिधित्व मिळाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा