चालू घडामोडी - २० डिसेंबर २०१५


न्या. परडीवाला यांच्यावर महाभियोग चालविण्याची नोटीस

  • गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी. परडीवाला यांनी अलीकडेच एका निकालपत्रात आरक्षणाचे धोरण आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी भाष्य केले होते.
  • या भाष्याबद्दल त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस राज्यसभेच्या ५८ सदस्यांनी दिल्यामुळे न्या. परडीवाला यांनी ते भाष्य निकालपत्रातून काढून टाकले आहे.
  • पाटीदार अमानत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांना अटक करताना गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाही गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी हार्दिक पटेल यांनी केलेली याचिका फेटाळताना परडीवाला यांनी हे भाष्य नोंदविले होते. 
  • न्या. परडीवाला यांच्या या निकालपत्राची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यावर काँग्रेस, जनदा दल (संयुक्त), कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक आणि बहुजन समाज पक्षाच्या ५८ सदस्यांनी यावरून न्या. परडीवाला यांच्यावर महाभियोग चालविला जावा, अशी मागणी करणारी नोटीस राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे सादर केली.
  • या राज्यसभा सदस्यांचे म्हणणे असे होते की, राज्यघटनेत फक्त निवडणुकांमधील आरक्षण १० वर्षे ठेवण्याचा उल्लेख केला गेला होता. नोकरी व शिक्षणातील आरक्षणासाठी राज्यघटनेत अशा कुठल्याही कालमर्यादेचा उल्लेख नाही. राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन न्यायाधीश या घटनात्मक पदावर बसलेल्या न्या. परडीवाला यांनी अधिकृतपणे निकालपत्र लिहिताना राज्यघटनेविषयीचे असे अज्ञान प्रकट करावे, हे गैरवर्तन आहे.
  • सदस्यांनी दिलेल्या नोटिशीमधील आरोप संबंधित न्यायाधीशावर खरोखरच महाअभियोगाची कारवाई सुरू करण्याएवढे सकृत्दर्शनी गंभीर आहेत का याचा विचार करण्यासाठी राज्यसभा अध्यक्षांनी त्रिसदस्यीय समिती नेमणे हा याच्या पुढील टप्पा होता; परंतु त्याआधीच गुजरात सरकारने न्या. परडीवाला यांच्यापुढे निकालपत्रातील हा ‘आक्षेपार्ह’ परिच्छेद काढून टाकण्यासाठी अर्ज केला आणि तो परिच्छेद काढून टाकण्यात आला.
 महाभियोगाचा इतिहास 
  • उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा राज्यघटनेत महाभियोग हा एकमेव मार्ग दिलेला आहे. गेल्या सात दशकांत भारतात एकही महाभियोग यशस्वी झालेला नाही.
  • सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश न्या. व्ही. रामस्वामी यांच्याविरुद्धचा महाभियोग काँग्रेसने ऐनवेळी मतदानातून अंग काढून घेतल्याने १९९३ मध्ये बारगळला होता.
  • २०११ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सौमित्र सेन यांच्याविरुद्धचा महाभियोग ठराव राज्यसभेत मंजूर झाला; परंतु तो लोकसभेत येण्यापूर्वीच न्या. सेन यांनी राजीनामा दिला होता.


पिया अलोंझो वर्त्झबाक मिस युनिव्हर्स २०१५

    Pia Alonso Miss Universe 2015
  • लास वेगासमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत फिलिपिन्सची पिया अलोंझो वर्त्झबाकने बाजी मारली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेज आणि मिस युएसए तिसऱ्या क्रमांकावर आली.
  • या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऊर्वशी रौतेला हिला मात्र अंतिम १० मध्ये स्थान मिळवता आले नाही.
  • यंदाच्या मिस युनिवर्स स्पर्धेत ८० देशातील १९ ते २७ वयोगटातील तरुणींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रेक्षकांनी आपल्या घरातून मत दिले. परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांच्या मतांची दाखल निवडीवेळी घेण्यात आली.
 स्टीव्ह हार्वेची निकाल वाचनात चूक 
    Steve Harvey
  • ‘मिस युनिव्हर्स’ (जगत्सुंदरी) स्पर्धेच्या निकालावेळी सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांच्याकडून चूक घडून उपविजेत्या सुंदरीचे नाव विजेती म्हणून घोषित झाले.
  • स्टीव्ह हार्वे यांनी निकाल वाचताना मिस फिलिपाईन्स पिया वर्त्झबाक हिच्याऐवजी चुकून मिस कोलंबिया ग्वातरेज हिच्या नावाची ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषणा केली. त्यानंतर परंपरेनुसार २०१४ ची मिस युनिव्हर्स पॉलिना वेगा हिने मिस कोलंबिया ग्वातरेज हिला मिस युनिव्हर्सचा मुकुट दिला.
  • चूक लक्षात आल्यावर हार्वे यांनी मंच व प्रेक्षागारातील जल्लोष थांबवत निकाल वाचनात घोडचूक झाल्याचे जाहीर केले आणि चुकीबद्दल क्षमा मागत त्यांनी ग्वातरेज नव्हे, तर मिस फिलिपाईन्स पिया ही मिस युनिव्हर्स ठरली असल्याचे घोषित केले. त्यानंतर ग्वातरेजकडून मुकुट परत घेऊन तो पियाला प्रदान करण्यात आला.


व्यवसाय करण्यासाठी उत्तम देशांत भारत ९७वा

  • व्यवसाय करण्यासाठी उत्तम देशांच्या 'फोर्ब्स'ने प्रसिद्ध केलेल्या यादीत भारताचे स्थान ९७व्या क्रमांकावर आले आहे. कझाकस्तान आणि घाना या देशांच्याही मागे भारताचे स्थान आहे. जगातील १४४ देशांचा या यादीत समावेश आहे. 
  • व्यापार आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत सुमार कामगिरी, तसेच तसेच भ्रष्टाचार आणि हिंसाचार अशा आव्हानांचा सामना करण्यात आलेले अपयश याचा फटका भारताला बसला आहे.
  • दीर्घकालीन प्रगतीच्या दृष्टीने पाहिल्यास भारताचे भवितव्य सकारात्मक आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या तरुण लोकसंख्येचा फायदा देशाला होईल. त्यासोबतच बचत आणि गुंतवणुकीचे निरोगी प्रमाण, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत वाढत असलेला सहभाग यांचाही फायदा भारताला होणार आहे.
  • २०१५ या वर्षासाठी 'फोर्ब्स'ने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ९७व्या स्थानी असलेला भारत खुली बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे. मात्र, भारतात भूतकाळातील राजकारणाचे ठसे अजूनही आहेत, असे 'फोर्ब्स'ने म्हटले आहे.
  • भारताचे स्थान गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या बाबतीत ८वे, संशोधनाच्या बाबतीत ४१वे, व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत ५७वे, तर संपत्ती अधिकारांच्या बाबतीत ६१वे आहे.
  • व्यापाराच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान १२५वे, तर वित्तीय स्वातंत्र्याच्या बाबतीत १३९वे आहे. त्याशिवाय तंत्रज्ञान १२०वे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत ७७वे, तसेच लालफितीच्या बाबतीत भारत १२३व्या स्थानी आहे. 
  • व्यवसाय करण्यासाठी उत्तम असलेल्या देशांच्या यादीत डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेरिकेचे स्थान चार अंकांनी घसरून २२वर आले आहे. २००९मध्ये या यादीत अमेरिकेचे स्थान दुसरे होते.
  • भारताच्या शेजारील देशांचे या यादीतील स्थान : श्रीलंका (९१), चीन (९४), पाकिस्तान (१०३), बांगलादेश (१२१)

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे मुंबईत आयोजन

    Make In India
  • भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा शुभारंभ देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. 
  • १८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात १,००० हून अधिक कंपन्या, तर विविध ६० देश सहभागी होणार आहेत.
  • भारतातील थेट विदेशी गुंतवणूक वाढण्याच्या मोहिमेला प्रोत्साहन मिळावे, हा या विशेष सप्ताहाच्या आयोजनामागील हेतू आहे. नावीन्य, आरेखन आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित या सप्ताहादरम्यान विदेशी कंपन्यांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी केले जाईल.

एआयएफएफचे पुरस्कार जाहीर

    Lyngdoh-Bala Devi
  • अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) जाहीर केलेल्या पुरस्कारात पुरुष गटात ‘वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान युजिन्सन लिंगडोहला मिळाला, तर महिला गटात हा मान आघाडीपटू बाला देवीने पटकावला.
  • एआयएफएफच्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दोन वर्षे सुनील छेत्रीची असलेली मक्तेदारी मध्यरक्षक लिंगडोहने मोडून काढली आहे. 
  • लिंगडोहला चषक आणि दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. बाला देवी या पुरस्काराची सलग दुसऱ्यांदा मानकरी ठरली. तिला चषक व एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 
 इतर पुरस्कार विजेते 
  • उदयोन्मुख खेळाडू : प्रीतम कोटल (पुरुष) / प्यारी सासा (महिला)
  • सर्वोत्तम फुटबॉल विकासक कार्य : ओदिशा फुटबॉल संघटना
  • सर्वोत्तम सामनाधिकारी : सी. आर. श्रीक्रिष्णा
  •  सर्वोत्तम साहाय्यक सामनाधिकारी : सपम किनेड्डी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा