भारत व जपान दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरू
- जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या भारतभेटीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ९७,६३६ कोटी रुपयांचा समझोता व सहकार्य करार झाला. या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर तीन तासांत कापले जाणार आहे.
- जपानने भारताशी नवे सहकार्य पर्व सुरू करीत, नागरी आण्विक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सहकार्य, संरक्षणविषयक तंत्रज्ञान हस्तांतरण, अकरा औद्योगिक वसाहतींची निर्मिती, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा, पश्चिम रेल्वे स्वतंत्र मालवाहतूक मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लाइन निर्मिती प्रकल्प असे बहुविध करार केले आहेत.
सौदी अरेबियात निवडणुकीत महिला विजयी
- सौदी अरेबियात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला नगरसेवक निवडून आली आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या मक्का येथे ही महिला निवडणून आली आहे.
- सौदी अरेबियामध्ये निवडणुका फक्त स्थानिक पातळीपर्यंतच मर्यादित असतात. आत्तापर्यंत सौदीमध्ये फक्त तीनदा स्थानिक निवडणुका घेतल्या गेल्या आहेत.
- मुस्लिम समाजाचे सगळ्यात महत्वाचे धार्मिक स्थळ समजल्या जाणाऱ्या मक्का शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीत सलमा बिन्त हिजाब अल-ओतैबी ही महिला विजयी झाली आहे. सौदी अरेबियाच्या इतिहासातील नगरसेवकपदी निवडून येणारी ही पहिली महिला ठरली आहे.
विकास गौडा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र
- भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा हा पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) रिओ ऑलिम्पिकमध्ये अधिक अॅथलिट्सना सहभागी होता यावे, यासाठी ऑलिम्पिक प्रवेशाच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे विकासचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले.
- एप्रिल २०१५मध्ये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी थाळीफेकमध्ये पुरुष गटात किमान ६६.०० मीटर फेक करणे आवश्यक होते. आता त्यात बदल करून किमान फेक ६५.०० मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
- ३२ वर्षीय गौडाने या वर्षी मे महिन्यात जमैकन आमंत्रित अॅथलेटिक्स स्पर्धेत किंग्जस्टन येथे ६५.१४ मीटर फेक केली असल्याने त्याचा ऑलिम्पिक प्रवेश सुकर झाला.
- विकासने मागील वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचप्रमाणे आशियाई स्पर्धेतही त्याने अजिंक्यपद मिळवले आहे. विकासची सर्वोत्तम कामगिरी ६६.२८ मीटर अशी असून तो राष्ट्रीय विक्रम आहे.
- ऑगस्ट २०१५मध्ये बीजिंग येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ६२.२४ मीटर अशी कामगिरी नोंदवली होती. त्यात तो नवव्या स्थानावर फेकला गेला होता.
- आयएएएफची २६ नोव्हेंबरला बैठक झाली. त्यात १७ क्रीडा प्रकारासाठी रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निकषात बदल करण्यात आला आहे.
- गौडाप्रमाणेच सपना आणि नीतेंद्र सिंग रावत या भारतीय खेळाडूंनाही ऑलिम्पिक पात्रतेचे निकष बदलल्याचा फायदा झाला आहे. सपता २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरली असून नीतेंद्रने ऑलिम्पिकसाठी पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीतील स्थान निश्चित केले आहे.
शेतकरी नेते शरद जोशी यांचे निधन
- लाखो शेतकऱ्यांची संघटना बांधून त्यांच्यासाठी आवाज उठविणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार आणि ज्येष्ठ विचारवंत शरद जोशी (वय ८१) यांचे १२ डिसेंबर रोजी निधन झाले.
- भारतीय टपाल सेवेत, तसेच परदेशात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर जोशी यांनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे मोठे संघटन राज्यात, तसेच देशात उभे राहिले.
- शेतीमालाला रास्त भाव मिळावा, या संदर्भात त्यांच्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फुटली. त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. राज्यसभेचे खासदार, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कार्यबल या संस्थेचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून त्यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा