ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीचे अभ्यासक अरुण खोपकर यांना ‘चलत चित्रव्यूह’ या स्मृतिग्रंथासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
कोकणी भाषेत उदय भेंब्रे यांच्या ‘कर्ण पर्व’ या नाटकाची निवड झाली आहे.
अरुण साधू, प्रा. दिगंबर पाध्ये आणि ना.धों. महानोर यांच्या निवड मंडळाने खोपकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
ताम्रपट, शाल व १ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत साहित्य अकादमीतर्फे ‘साहित्य उत्सवा’त आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमात तो प्रदान केला जाईल.
२३ साहित्यिकांची निवड : साहित्य अकादमीने यंदाच्या पुरस्कारांसाठी इंग्रजीसह २३ भारतीय भाषांमधील साहित्यकृतींची निवड केली आहे. त्यात लघुकथा व कवितांसाठी प्रत्येकी सहा, कादंबरीसाठी चार, ललितनिबंध, समीक्षा आणि नाट्यलेखनासाठी प्रत्येकी दोन आणि स्मृतिग्रंथासाठी एका पुरस्काराचा समावेश आहे.
बहुलकर यांना भाषा सन्मान : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना अभिजात व मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल ‘भाषा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपट व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मदर तेरेसा होणार संतपदाने सन्मानित
गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा यांनी केलेल्या दुसऱ्या चमत्कारावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांना २०१६मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या वतीने संतपद बहाल करण्यात येणार आहे. ख्रिश्चनांच्या सर्वोच्च धर्मपीठाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधील धर्माचार्याना या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे.
पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ख्रिश्चन धर्मामध्ये संबंधित व्यक्तीने दोन चमत्कार सिद्ध केल्यास चर्च संतपद देते. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.
तेरेसा यांनी विविध विकारांनी त्रस्त असलेल्या एका बंगाली महिलेला, तर एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये पेचप्रसंग
अरुणाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी एकत्रितपणे नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव संमत केला व त्यासोबतच काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिखो पुल यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली.
विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया यांना पदावरून हटविणे, मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करणे आणि त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नेमण्याच्या निर्णयाला गुवाहाटी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
भाजपा, काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी १६ डिसेंबर रोजी एका कम्युनिटी हॉलमध्ये विधानसभेची तात्पुरती बैठक घेऊन विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संमत केला होता.
त्यानंतर १७ डिसेंबर रोजी भाजप, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी एका हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष टी. नोरबू थोंगडॉक यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली. यावेळी ६० सदस्यीय विधानसभेतील ३३ सदस्यांनी कालिखो पुल यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली.
मुख्यमंत्री तुकी आणि त्यांच्या समर्थक २६ आमदारांनी ही बैठक असंवैधानिक असल्याचे सांगत त्यावर बहिष्कार घातला.
इस्त्रोद्वारे सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात
भारताने पीएसएलव्ही-सी २९ या प्रक्षेपकांद्वारे सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात पाठवत इतिहास घडविला आहे. ध्रुवीय प्रक्षेपकाने पार पाडलेले हे ५०वे यशस्वी मिशन होते.
सिंगापूरच्या या उपग्रहांमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि नगर नियोजनाबाबत माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे.
पीएसएलव्हीचे प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे सहा उपग्रह नियोजित कक्षेत स्थापन केले जातील. या सहा उपग्रहांमध्ये ४०० किलोग्रॅम वजनाचा टीईएलईओएस-१ हा प्राथमिक उपग्रह आहे. अन्य पाच उपग्रहांमध्ये दोन मायक्रो आणि तीन नॅनो उपग्रह आहेत
ख्रिस्तिना लीगार्ड यांच्या विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा ख्रिस्तिना लीगार्ड यांनी फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड तापी यांना अवैधरीत्या सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना हे प्रकरण घडले होते.
अंशत सरकारी मालकीच्या ‘क्रेडिट लिओनीज’ या बँकेने आपल्या मालकीच्या ‘आदिदास’ या क्रीडा वस्त्रप्रावरण उत्पादक कंपनीचे मूल्यांकन कमी दाखवून आपल्याला फसविल्याचा आरोप तापी यांनी केला होता. ही कंपनी तापी यांनी १९९३ मध्ये विकली होती. त्यामुळे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी भरपाईची मागणी केली होती.
त्यांचा दावा मान्य करीत त्यांना ४०३ दशलक्ष युरो देण्याचा आदेश लीगार्ड यांनी बँकेला दिला होता. त्या वेळी त्या माजी राष्ट्राध्यक्ष निकोलाय सार्कोझी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या.
तापी व सार्कोझी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या आदेशापाठीमागे गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत लीगार्ड यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यानंतर न्यायालयाने तापी यांना बँकेला पैसे परत करण्याचा आदेश दिला. या खटल्यामुळे लीगार्ड यांना नाणेनिधी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा