जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी १३ शहरे भारतात
ग्लोबल सर्वे एजन्सी नमबेओ (NUMBEO) ने केलेल्या एका सर्वेनुसार जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी १३ शहरे ही एकट्या भारतातील आहेत.
जगातील २०० हून अधिक शहरात नमबेओ संस्थेने सर्वे केला असून सर्वाधिक प्रदूषित शहरात देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा २१वा तर देशाची राजधानी दिल्लीचा १२वा क्रमांक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
एजन्सीच्या पल्यूशन इंडेक्सनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील टॉप ५० प्रदूषित शहरांच्या यादीत बनारस ८५.२ गुणांसह २८ व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहर हे २९ व्या क्रमांकावर आहे.
या अहवालात गुवाहाटी २६ स्थानावर तर गुडगाव २५व्या स्थानावर आहे. दिल्लीला लागून असलेले नोएडा शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरात टॉपवर असून हे शहर ४थ्या स्थानावर आहे.
मिस्रची राजधानी काहिरा हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
नमबेओचा दावा आहे की त्यांनी दिलेला अहवाल जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्ट्सवर आधारित आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जोरदार झटका दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहण्याची गांधींनी केलेली विनंती हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
२६ जून २०१४ ला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना याप्रकरणी समन्स बजावत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
यावर दिल्ली हायकोर्टात अपील केल्यानंतर कोर्टाने समन्स रोखले होते. यानंतर ४ डिसेंबरला दिल्ली हायकोर्टाने सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता.
'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री'
'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री' हे वेंडी डॉनिगर यांचे बहुचर्चित आणि वादग्रस्त पुस्तक पुन्हा एकदा विक्रीसाठी बाजारात आले आहे.
या पुस्तकात हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापल्याची जोरदार टीका झाल्यानंतर पेंग्विन इंडिया या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक परत घेतलं होते. आता स्पीकिंग टायगर या प्रकाशन संस्थेने ते कुठलीही काटछाट न करता प्रकाशित केले असून बाजारातही आणले आहे.
'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री' हे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झालं होतं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दीनानाथ बत्रा यांनी, लेखिका वेंडी डॉनिगर आणि प्रकाशक पेंग्विन इंडियाविरोधात तक्रार दाखल केली होती.
या पुस्तकात हिंदू धर्माच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा, धर्माचा अनादर करणारा मजकूर असल्याचा बत्रांचा आक्षेप होता. त्यामुळे प्रकाशकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
अखेर, २०१४ मध्ये पेंग्विन इंडियानं स्वतःहूनच वादग्रस्त पुस्तक बाजारातून मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि पुढच्या सहा महिन्यांत सर्व विक्रेते आणि वितरकांकडून पुस्तकं परतही मागवली.
या भूमिकेबद्दल अनेक विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली होती. हिंदू धर्म, संस्कृती, भारतीय पुराण यासंबंधी 'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री'मध्ये प्रचंड माहिती आहे. त्यामुळे हे पुस्तक मागे घेणं योग्य नसल्याचं मत बुद्धिजीवींनी मांडले होते.
हा मतप्रवाह विचारात घेऊनच, 'स्पीकिंग टायगर'नं हे पुस्तक, मजकुरात कुठलाही बदल न करता प्रकाशित केलंय. प्रकाशकांनी सात हजार प्रतींची पहिली आवृत्ती छापली आहे.
अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा अपंग कोट्यात समावेश
अॅसिड हल्ल्यातील पीडितांवर मोफत उपचार करावे, त्यांना भरपाई द्यावी आणि त्यांचे पुनर्वसनही करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना दिले आहेत.
तसेच सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा सामवेश अपंग कोट्यात करावा, त्यांच्या रोजगाराची व्यवस्थाही करावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
अपंगांना नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आता अपंगांचा तीन टक्के कोटा लागू होणार आहे.
बिहारमधील पीडित चंचल दास हिला दहा लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
भारताला वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत ब्राँझपदक
भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या नेदरलँडसला पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ (५-५) असे पराभूत करून हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले.
या स्पर्धेतील साखळीत नेदरलँडसने भारतावर ३-१ने मात केली होती. या पराभवाची भारताने परतफेड केली.
१९८२मध्ये भारताने अमस्टरडॅम येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानवर ५-४ अशी मात करून पदक मिळवले होते. त्यानंतर आज ३३ वर्षांनतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याचा विक्रम भारताने केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा