जागतिक हवामानबदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने पॅरिसमध्ये फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँक्वा ओलँद यांच्या उपस्थितीत 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी'ची (इंटरनॅशनल सोलर अलायन्स-आयएसए) स्थापना करण्यात आली. शंभरहून अधिक देश त्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
या आघाडीला केंद्र सरकार सौरऊर्जा संस्थेच्या सचिवालयासाठी जमीन तसेच ३ कोटी डॉलर्सची मदत देणार असून पाच वर्षे ही मदत दिली जाणार आहे.
रेड्डी बंधूंचा टीडीपीत प्रवेश
आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते रामनारायण रेड्डी यांच्यासह त्यांचे बंधू माजी आमदार विवेकानंद रेड्डी या बंधूंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तेलगू देसम पक्षात (टीडीपी) प्रवेश केला.
टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रेड्डी बंधूंच्या टीडीपी प्रवेशाबद्दल स्वागत केले.
रामनारायणन रेड्डी हे २००४-२०१४ या काळात ज्येष्ठ मंत्र होते. तसेच, एन. किरणकुमार रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात ते २०१४ मध्ये अर्थमंत्री होते.
रामनारायण आणि विवेकानंद रेड्डी यांच्यावर नेल्लोर जिल्ह्यातील अणम कुटुंबीयांचा प्रभाव आहे.
‘आयएमएफ’मध्ये युआन चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)तर्फे ‘युआन’ या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा देण्यात आला आहे. युआन चलनास पाचवे राखीव चलन म्हणून ‘स्पेशल ड्राइंग बास्केट’मध्ये स्थान मिळाले आहे.
अमेरिकेचा डॉलर, ब्रिटनचा पाउंड, युरोपीय समुदायाचा युरो, जपानचा येन ही ‘आयएमएफ’ची आधीची चार राखीव चलने आहेत.
या चलनाला राखीव दर्जा मिळाल्याने आता नाणेनिधीने चीनच्या आर्थिक सुधारणा व इतर कामगिरीवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे.
ला लीगा स्पर्धेच्या सर्वोत्तम खेळाडूचा मान लिओनेल मेस्सीला
आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) प्रतिष्ठित ‘बॅलोन डी’ओर पुरस्काराचा प्रबळ दावेदार असलेल्या बार्सिलोना क्लबच्या लिओनेल मेस्सीने लीगा फुटबॉल स्पर्धेच्या गतसत्रातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कुरघोडी करीत मेस्सीने मागील सात हंगामांतील सहाव्या पुरस्कारावर नाव कोरले. सर्वोत्तम खेळाडूसह मेस्सीने सर्वोत्तम आघाडीपटूचा पुरस्कारही जिंकला.
२०१४-१५ या हंगामात मेस्सीने ४३ गोल्स केले असून बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग, ला लीगा आणि स्पॅनिश चषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्या बळावर या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.
आयसीसीच्या कसोटी संघात एकही भारतीय नाही
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या २०१५ वर्षीच्या कसोटी संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळविता आले नाही.
भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी हा एकमेव खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. आयसीसीने आज २०१५ या वर्षीच्या वन-डे आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे.
भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला कसोटी संघात १२ वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
आयसीसी क्रिकेट समितीचे प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबलेच्या मार्गदर्शनाखाली या संघाची निवड करण्यात आली असून या समितीत वेस्ट इंडिजचा माजी तेज गोलंदाज इयान बिशप, इंग्लंडचा माजी फलंदाज मार्क बूचर, ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार बेलिंडा क्लार्क आणि हिंदू स्पोर्ट्सस्टारचे डेप्युटी एडिटर जी विश्वनाथ यांचा समावेश आहे.
आजारी उद्योगांची संख्या साडेपाच लाख
चालू वर्षात अतिलघु, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांमध्ये आजारी उद्योगांची संख्या ५ लाख ३७ हजार २८६वर गेल्याची माहिती केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी संसदेत दिली.
आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत आजारी उद्योग पुनरुज्जिवित होण्यासाठी अर्ज करू शकतो.
अर्ज केल्यानंतर त्याचा विचार एका समितीतर्फे केला जाणार आहे. या समितीमध्ये राज्य सरकारचे प्रतिनिदी, तज्ज्ञ तसेच प्रादेशिक व क्षेत्रीय बँकांचे प्रमुख यांचा समावेश आहे.
आजारी उद्योगांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात ८४ हजार ६३, गुजरातमध्ये ४९ हजार ३८३, महाराष्ट्रात ४९ हजार २९३ तर कर्नाटकात ३८ हजार २७७ आजारी कंपन्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा