फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत धोनी २३व्या स्थानावर
- फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या महेंद्रसिंह धोनी २३व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी तो २२व्या स्थानावर होता.
- धोनीने एका वर्षात ३१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली असून यामध्ये क्रिेकेट सामन्यांच्या माध्यमातून मिळवलेला ४ दशलक्ष डॉलर्स आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळविलेल्या २७ दशलक्ष डॉलर्सच्या उत्पन्नाचा समावेश आहे.
- भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरी गाठली होती. धोनीच्या या सर्व कमाईचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
- या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.
- मेवेदर याची यंदाची कमाई ३०० मिलियन डॉलर इतकी आहे. गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा मेवेदरला सर्वांत श्रीमंत खेळाडू घोषित करण्यात आले आहे.
- सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (१३), सेबॅस्टियन व्हेटेल (२१), रॅफेल नदाल (२२) आणि वॅन रुनी (३४) आणि उसेन बोल्ट (७३) या प्रमुख खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.
साखर कारखान्यांना सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज
- साखरेचे वाढलेले उत्पादन व घसरणाऱ्या किमतीमुळे शेतकऱ्यांची देणी रोखणाऱ्या साखर कारखान्यांना सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. सहा हजारांपैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला अवघे १ हजार ८५० कोटी रुपये येणार आहेत.
- साखर कारखान्यांकडून तपशील घेऊन ही रक्कम बॅंकांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या ‘जनधन’ खात्यांत जमा केली जाईल. यातून शिल्लक राहिलेली रक्कम कारखान्यांना दिली जाईल.
- देशभरात २१ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून, या मदतीनंतर उर्वरित थकबाकी कारखान्यांनी साखर विकून द्यावी, असे सरकारचे म्हणणे आहे.
- यंदाचे वाढीव ऊस उत्पादन पाहता इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉलच्या दरात ३२ रुपयांवरून ४२ रुपये अशी वाढ करण्याचाही निर्णय झाला आहे.
- उसाची थकबाकी चुकती करण्यासाठी द्यावयाच्या सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज एक वर्षासाठी केंद्र सरकारतर्फे दिले जाईल.
- जे साखर कारखाने ३० जूनपर्यंत ५० टक्के थकबाकी चुकती करतील, त्यांनाच या ‘सॉफ्ट लोन’चा लाभ घेता येईल.
अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ऑनलाईन ठरविण्यासाठी पोर्टल
- मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहीमेतंर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘myvisit.gov.in’ पोर्टलद्वारे नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या आगाऊ भेटीची वेळ ऑनलाईन पद्धतीने निश्चित करता येणार आहे.
- हे पोर्टल राष्ट्रीय माहिती केंद्राकडून हाताळण्यात येणार आहे. हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांशी आणि खात्यांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनातील सनदी अधिकारीदेखील सामान्यांशी संवाद साधू शकणार आहेत.
- या पोर्टलला भेट देणाऱ्या प्रत्येकाची माहिती स्वयंचलित पद्धतीने डेटाबेसमध्ये साठविण्यात येणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी भेट निश्चित करण्यासाठी नागरिकांना एक साधा नोंदणी अर्ज भरावा लागणार आहे.
- हा अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणी क्रमांक देण्यात येईल. या नोंदणी क्रमांकाद्वारे अर्जदार प्रत्येकवेळी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकेल. सध्या माहिती अधिकारातंर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
- अर्जदरांकडून त्याला ज्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे तो योग्य असल्याची पडताळणी आणि खातरजमा झाल्यानंतर संबंधित अर्जाला मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराला मोबाईल मेसेज किंवा ई-मेलद्वारे सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ कळविण्यात येईल.
बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ या देशांमध्ये मोटर वाहन सामंजस्य करार
- प्रवासी, खाजगी आणि मालवाहू वाहनांच्या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी १० जून २०१५ रोजी बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ (BBIN) या देशांमध्ये मोटर वाहन सामंजस्य करार करण्यात आला.
- १५ जून रोजी भूतानची राजधानी थिंफू येथे या देशांच्या वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. या कराराच्या अंमलबजावणीचा खर्च प्रत्येक देश स्वत:च करणार आहे.
- या करारानंतर या प्रदेशांमधील रस्ता वाहतूक अधिक सुरक्षित व आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असेल तसेच प्रत्येक देश प्रादेशिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या दिशेने संस्थात्मक प्रक्रिया तयार करण्यास सक्षम होईल.
ताजमहाल परिसरात विनामूल्य वाय-फाय सुविधा
- ताजमहाल या जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या ठिकाणी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) वतीने विनामूल्य वाय-फायची सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ते वाय-फायचे हॉटस्पॉट तयार असून येत्या १६ जून पासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
- ही विनामूल्य वाय-फाय सुविधा केवळ पहिल्या ३० मिनिटांसाठी असेल. त्यानंतरच्या प्रत्येक तासाला ३० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ताजमहालपासून केवळ ३० मीटर परिसरातच ही सेवा पुरविण्यात येणार आहे.
- लवकरच आग्रा येथील महाविद्यालये, रेल्वे स्थानके आणि अन्य ठिकाणीही बीएसएनएलच्यावतीने वाय-फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाने वाय-फाय उभारता येऊ शकतील अशा भारतातील अन्य २५ पर्यटनस्थळेही बीएसएनएलला सुचविली आहेत. हा प्रकल्प सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा आहे.
मॅगी बंदी विरोधात नेस्ले उच्च न्यायालयात
- मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्यानंतर राज्य सरकारने मॅगीवर घातलेल्या बंदी विरोधात नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- अन्न व औषधद्रव्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी मॅगीवर बंदी घातली आहे. मॅगीमधील समस्या सोडविण्यात आल्या आहेत. यामुळे बंदी विरोधात नेस्लेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
- भारतामध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली असून, बाजारामधील मॅगी नेल्से कंपनीने परत घेतली आहे.
माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन
- भारताचे माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर (वय ७२) यांचे दीर्घकालीन आजारामुळे निधन झाले.
- कानिटकर यांनी १९७४-७५ च्या मोसमात बलाढ्य वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्यांनी २७.७५च्या सरासरीने १११ धावा केल्या. पदार्पणात बंगळूर कसोटीत पहिल्या डावात त्यांनी ६५ धावांची प्रभावी खेळी केली होती.
- रणजी स्पर्धेत मात्र त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. फलंदाज म्हणून त्यांनी लक्षवेधी योगदान दिले.
- कानिटकर १९९२-९३ व ९३-९४ हे दोन मोसम ज्युनिअर निवड समितीचे सदस्य होते. ९६-९७ व ९८-९९ हे दोन मोसम त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती.
- रणजीत दीर्घ कारकीर्द : प्रथमश्रेणीत कानिटकर यांनी १९६३ ते १९७८ अशी दीड दशकांची प्रदीर्घ कारकीर्द घडविली. ८७ सामन्यांत ४२.७८च्या सरासरीने त्यांनी ५००६ धावा केल्या. यात १३ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थानविरुद्ध २५० धावांची खेळी त्यांची कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार
- पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहाव्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सर्वानुमते फेरनिवड झाली.
- पक्षाचे सरचिटणीस टी. पी. पीतांबर मास्टर यांनी पवारांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे जाहीर केले.
कपिल मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री
- दिल्ली जन मंडळाचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा यांची दिल्लीचे नवे कायदामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बनावट पदवी बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मिश्रा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
- आपचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर मिश्रा यांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आमदारांची स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती.
मंगळावरील विवरात काचेचे थर
- मंगळावर पाठवण्यात आलेल्या नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबिटर यानाला तेथील विवरात काचेचे थर सापडले आहेत. मंगळ हा पृथ्वीजवळता लाल रंगाचा ग्रह आहे. जोरदार आघाताच्या उष्णतेमुळे हे काचेचे थर तयार झाले असावेत व त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नासाने म्हटले आहे.
- नासाच्या मते काचेमुळे प्राचीन काळातील जीवसृष्टीचे अवशेष टिकून राहू शकतात. तेथे काचेचे थर आढळून आल्याने मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नवीन धोरण आखता येईल.
- मंगळावर निली फोस नजीक गारग्रेव्हज विवरात काचेचे थर सापडले असून मंगळावरील ६५० कि.मी.चा कमी दाबाचा पट्टा निली फोस नजीक आहे. नासा २०२० मध्ये मार्स रोव्हर यान त्याच भागात उतरवणार असून तेथील माती व खडकांचे नमुने गोळा करणार आहे.
- निली फोसी हा भाग वैज्ञानिकांनी महत्त्वाचा वाटण्याचे कारण म्हणजे या भागातील कवचाचा भाग फार पूर्वीचा आहे. जेव्हा मंगळावर पाणी होते असे मानले जाते. तेथे जलऔष्णिक गुणधर्मही दिसून आले आहेत. तेथे गरम वाफा बाहेर पडण्याने सजीवांना ऊर्जा मिळत होती असे म्हणतात. गेल्या काही वर्षांत मंगळावर पूर्वी जीवसृष्टी असल्याचे पुरावे संशोधनात मिळाले आहेत.
तुर्कस्तानच्या निवडणुका
- तुर्कीच्या निवडणुकीत इस्लामिक पाया असलेल्या सत्ताधारी पक्षाला बहुमत गमवावे लागले आहे, त्यामुळे अध्यक्ष रेसीप तायिप एर्दोगन यांच्या विस्तारवादी आकांक्षांना लगामही घातला गेला.
- यात सत्तारूढ पक्ष ‘जस्टिस अँड डेव्हलपेंट पार्टी’ला फक्त २५८ जागा जिंकता आल्या. आधीच्या (२०११) निवडणुकीत या पक्षाचे ३११ जागा जिंकल्या होत्या.
- दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पिपल्स पार्टीला १३२ जागा मिळाल्या आहेत. आधीच्या लोकसभेत या पक्षाचे १२५ खासदार होते.
- या निवडणुकीतील धक्कादायक निकाल म्हणजे स्वतंत्र कुर्दीशस्तानची मागणी करणाऱ्या आणि डावी विचारसरणी असलेला पिपल्स डेमोक्रटीक पक्षाला ८० जागा मिळाल्या आहेत. तसेच उजव्या विचारसरणीच्या नॅशनॅलिस्ट मुव्हमेंट पक्षाला ८० जागा मिळाल्या आहेत.
- तुर्कस्तानात गेली अनेक वर्षे इर्दोगान यांच्या पक्षाकडे एकमुखी सत्ता आहे. आता जर त्यांच्या पक्षाला ३/४ बहुमत मिळाले असते तर त्यांनी घटनादुरूस्ती करून अमेरिकन पद्धतीचे सर्वशक्तीमान राष्ट्राध्यक्षपद अस्तित्वात आणले असते. त्यांच्या पक्षाला जर साधे बहुमत मिळाले असते तर ते सार्वमत घेऊन घटनादुरूस्ती करून अमेरिकन पद्धतीची शासनव्यवस्था आणणार होते. पण तुर्की मतदारांनी त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी ओतले.
जागतिक महासागर दिन
- ८ जून २०१५ रोजी ‘निरोगी महासागर, निरोगी ग्रह’ या थीमसह जागतिक महासागर दिन जगभरात साजरा करण्यात आला.
- महासागराचे महत्व आणि त्यासंबंधित अन्न सुरक्षा, जैवविविधता, परिस्थितीकी इ. घटकांकडे राजकीय आणि सामाजिक लक्ष वेधून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती.
- ८ जून २००९ साली पहिला जागतिक महासागर दिन साजरा करण्यात आला होता.
भारत-जपान आणि ऑस्ट्रेलियात तिरंगी संरक्षण विषयक करार
- दृढ सुरक्षा संबंध, संयुक्त नौदल सराव आणि लष्करी संबंधातील मजबूती या अपेक्षांसह नवी दिल्लीत जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या देशांच्या बैठकीत पहिल्यांदाच तिहेरी ठराव करण्यात आला.
- युपीए सरकारच्या काळात चीनने या तिहेरी चर्चेला आक्षेप घेतला होता. तर २००७ मध्ये अमेरिकेने त्यात भाग घेतला होता. भाजप सरकारने या विषयात नव्याने पाऊल उचलले असून परराष्ट्र सचिव स्तरावरील बोलणी सुरू केली.
- भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, जपानचे उपपरराष्ट्र सचिव अकी टाका सैकी आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र सचिव पीटर वर्गिस यांनी संरक्षण आणि आर्थिक बाबींवर तसेच दक्षिण चीनमधील समुद्राबाबत चर्चा केली.
- नौदल विषयक सहकार्याबाबत प्रामुख्याने यात चर्चा झाली. यानुसार आता या तीन देशांच्या तिहेरी संयुक्त सरावाची शक्यता आहे. याआधी भारताने जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून सराव केला आहे.
भारत आणि इंग्लंड संयुक्त लष्करी सराव
- भारत आणि इंग्लंड सैन्यादरम्यान सकारात्मक लष्करी संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारत-ब्रिटन संयुक्त लष्करी सराव ‘अजेय वॉरीयर २०१५’ १३ जून ते २८ जून २०१५ दरम्यान इंग्लंड मधील वेस्टडाऊन कॅम्प येथील प्रशिक्षण क्षेत्रात पार पडणार आहे.
- भारतीय लष्कराच्या कुमाऊँ रेजिमेंटमधील एका पलटण या सरावात सहभागी होण्यासाठी नामांकित करण्यात आली आहे.
- भारत आणि यूके सैन्यादरम्यान सकारात्मक लष्करी संबंधांना प्रोत्साहन देणे तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे सामना करण्यासाठी प्रयत्न करणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा